पुन्हा बरसला श्रावण भाग १००

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १००


पुन्हा नव्याने शिशिर संपून नवी पालवी फुटू लागली होती. मुलांच्या जन्मानंतर आदित्यलाही नोकरीत प्रमोशन मिळालं. तो उच्चपदावर पोहचला होता. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर अर्पिताही तिच्या कामावर रुजू झाली. अनघा आता अर्पितामध्ये आपला हरवलेला आनंद शोधू लागली. ज्या हौशीमौजी तिच्या तरुणपणात करायच्या राहिल्या होत्या; त्या करण्याची मुभा अर्पिताला तिने दिले होती. शेजारच्या बायका बोलायच्या,

“अनघाताई, सुनेचे भारी लाड पुरवताय.. वेस्टर्न कपडे काय! हॉटेलात खाणंपिणं काय! बाहेर हिंडणं काय! सगळीच मुभा दिलीय तुम्ही.. इथे सासू दिवसभर घरात राब राब राबतेय आणि सुनबाई मस्त मजा करताहेत. शोभतं का हे? अनघाताई, इतकं पण सैल सोडू नका. थोडातरी सासूबाईचा धाक असायला हवा नाहीतर डोक्यावर बसून मिऱ्या वाटतील या सुना.. आम्ही आपलं तुमची काळजी वाटली म्हणून सांगितलं हो.. बाकी तुमची मर्जी!”

त्यांच्या बोलण्यावर अनघा हसून बोलायची,

“जाऊ द्या ओ ताई, सुना आपल्या मुलींसारख्याच असतात ना? आता त्यांनी नाही हौशीमौजी करायच्या तर मग काय आपण करणार आहोत? करू देत.. त्यांचे हसण्याबागडण्याचे दिवस आहेत. मला माझ्या तरुणपणी हौसमौज करायला मिळाली नाही. नटण्यामुरडण्याची हौस भागली नाही. निदान तिच्या नशिबाने तिला मिळतंय तर मिळू देत ना? माझी काही हरकत नाही.”

अनघाच्या बोलण्याने साऱ्या बायका शांत बसायच्या.
आदित्य आणि अर्पिता आपल्या संसारात रमून गेले. माई आणि अनघा आपल्या मुलाचा सुखी भरलेला संसार पाहून तृप्त झाले होते. जो तो आपल्या कामात व्यस्त झाला. अनघा नातवंडाच्या बाललीला पाहण्यात रमून गेली. त्यांना न्हाऊ माखू घालण्यात, त्यांचं सारं करण्यात व्यस्त झाली. आजी आजोबा म्हणजे दुधावरची साय.. मुलंही आजीसोबत रमू लागली. मुलांना सांभाळणं, घरातली कामं, माईचं आजारपण आणि नवऱ्याचा, विनायकचा तर्हेवाईक स्वभाव सारं सांभाळून घेता घेता तिची दमछाक होत होती. तरीही कसलीही तक्रार न करता अनघा निमूटपणे आणि विशेष म्हणजे आनंदाने सर्वांचं सारं करत होती. एकदा माईंचे पाय चेपता चेपता ती म्हणाली,

“माई, संपला वनवास. आता सुखच सुख.. पूर्ण आयुष्यभर नवऱ्याच्या धाकात, मार खाण्यात, अश्रू ढाळण्यात घालवलं. आता इतक्या वर्षांनी आजोबा झाल्यावर ते नक्की सुधारेल. माझी आयुष्यभराची तपस्या फळास आली. देवाने आयुष्याच्या उत्तरार्धात तरी सुखाचं दान माझ्या पदरात टाकलं.”

अनघाने कृतार्थ भावनेने हात जोडले. माईने हसून तिच्याकडे पाहिलं. अनघा तिच्या सत्वपरीक्षेच्या अग्निदाहातून तोलून सुलाखून निघाली होती. आता तारुण्याचा बहर ओसरून तिच्या केसात रुपेरी कडा डोकावू लागल्या होत्या. जो तो आपल्या आयुष्यात सुखी होता. आपापल्या कामात व्यस्त होता. आणि आता ईश्वरी एकटी पडू लागली. कामात मन रमवण्याचा तिने कितीही प्रयत्न केला तरी घरी आल्यावर एकटेपणामुळे घर खायला उठत होतं. स्वराजच्या आठवणी मनातून जात नव्हत्या. तिचं आपल्या सासूबाईंशी, शालिनीताईंशी बोलणं व्हायचं. ईश्वरी सर्वांची विचारपूस करत असे; पण सासूबाई सोडल्या दुसरं कोणाला तिच्याबद्दल प्रेम नव्हतं; पण म्हणताना ना! असतील शिते तर जमतील भूते! अशी अवस्था होती. तिची प्रगती पाहून, तिला यशाच्या शिखरावर पोहचलेलं पाहून संपत्तीसाठी तिच्याजवळ असलेल्या समृद्धीसाठी, पैश्यासाठी भुतं जमा होऊ लागली. कठीण प्रसंगी ज्या लोकांनी तिची साथ सोडली होती ती आता तिच्याकडे पैसा आल्यावर नाती जोडण्याचा प्रयत्न करू लागली; पण ईश्वरी आता माणसं वाचायला शिकली होती. त्यामुळे ती माणसांपेक्षा कामातच जास्त रमू लागली. दिवसाचे बारा बारा तास ती काम करू लागली. ना तिला ना घरी जाण्याची घाई असायची ना कोणी वाट पाहणारं असायचं. त्यामुळे ती ऑफिसच्या कामातच गर्क राहू लागली.

सगळं सुरळीत सूरू आहे असं वाटत असताना नियती मात्र अजूनही तिची पाठ सोडायला तयार नव्हती. बघता बघता वर्षे सरून गेलं. तिच्या एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्याचबरोबर तिच्या चिमुरड्या भाच्यांचा वाढदिवसही जवळ आला होता. अनघाने ईश्वरीला फोन केला.

“हॅलो ईशू, मुलांच्या वाढदिवसाला येतेस ना? आणि अशी उभ्या उभ्या पाहुण्यांसारखं येऊ नकोस. चांगली आठ दिवसांची सुट्टी काढून ये. नाहीतर तुझी नेहमीच ऑफिसची कामं असतात. यावेळीस मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. समजलं?”

“हो.. हो.. थांब, थांब.. थोडा श्वास घे. किती सूचना देतेस! अगं मी येणारच आहे आणि तीही चांगली आठ दिवसांची सुट्टी काढून..यावेळीस लवकर जाणार नाहीये. अगं माझी परीक्षा पण जवळ आल्यात ना!, त्यासाठी तर मला यावंच लागेल ना?”

ईश्वरी आईला हसून म्हणाली.

“ठीक आहे मग. ये लवकर.. आता मी फोन ठेवते. बाई, खूप कामं पडलीत. घरभर पसारा झालाय बघ. अजून मुलांना पण न्हाऊ माखू घालायचंय. त्यांना पोटभर खायला भरवलं की शांत झोपतील मग. चल ठेवू मी?”

“हो आई, पण किती काम करतेस? जेंव्हा बघावं तेंव्हा तू बिझी असतेस. असं करू नको गं.. स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घे. स्वतःला जप.. नीट खात पीत जा आणि सहा महिन्यातून एकदा तरी स्वतःचं मेडिकल चेकअप करून घेत जा.”

ईश्वरीचं बोलणं मध्येच तोडत अनघा म्हणाली,

“मेडिकल चेकअप? मला काय धाड भरलीय? चांगली ठणठणीत आहे मी.. बाळा तू तुझी काळजी घे. मला पहायला इथे सर्वजण आहेत. तू तिथे एकटी असतेस. जप स्वतःला..”

ईश्वरीच्या काळजीने अनघाच्या गळ्यात उमाळा दाटून आला. आवाज घोगरा झाला. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आली.

“हो आई, मी ठीक आहे आणि माझी काळजीही घेईन. तू टेन्शन घेऊ नकोस. चल ठेवते आता.”

असं म्हणत थोडंसं बोलून ईश्वरीने कॉल कट केला. का कोणास ठाऊक! ईश्वरीला अनघाची खूप काळजी वाटू लागली. तिने रीतसर केळकरसरांकडे रजेचा अर्ज दिला. ईश्वरीचा अर्ज त्यांनी हसत मंजूर केला. आणि का करणार नाही? इतक्या महिन्यात तिने एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती. इतक्या मोठ्या सुट्टीवर ती पहिल्यांदाच जाणार होती.

“मागे एकदा परीक्षेसाठी अशीच मोठी सुट्टी घेतली होती आणि सुट्टीवरून आल्यावर समोर शिवराज उभा होता. ती भांडणं.. त्याचं समजावून सांगणं, समजून घेणं. माझ्यासाठी साऱ्या ऑफिसच्या सहकाऱ्यांशी त्याने घातलेला वाद.. त्याचं असं माझी काळजी घेणं, आस्थेने चौकशी करणं, वेगवेगळे जोक्स सांगून मला हसवणं. सारं आज आठवतंय.”

ती स्वतःशीच बडबडली. शिवराजसोबतचे क्षण आठवून चेहऱ्यावर तिच्या आनंद पसरला.

“खरंच शिवराजने आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर पडायला खूप मदत केली. माझा ज्युनियर असूनही आयुष्याच्या शाळेत तो अनुभवी, हुशार आणि माझ्यापेक्षा सरस विद्यार्थी निघाला.”

ती गालातल्या गालात हसली. मंजिरी नंतर शिवराजच सर्वांत जवळचा मित्र झाला होता. तिच्या सुखदुःखाचा साथीदार झाला होता. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना न जुमानता तो संरक्षण कवच बनून तिच्याबरोबर उभा राहिला. त्यामुळे ऑफिसमधल्या काही लोकांनी ईश्वरीला वाळीत टाकले; पण ती आता कोणालाच घाबरणार नव्हती. तिच्या दृष्टीने काम हेच तिचं सर्वस्व होतं आणि ते ती इमानेइतबारे करत होती. ती विचारात मग्न असतानाच केबिनच्या दारावर टकटक झाली आणि परवानगी घेऊन शिवराज आत आला. नेहमीच्या स्टाईलने मिश्किलपणे ईश्वरीला चिडवत म्हणाला,

“अभिनंदन नंदिनी, मोठी सुट्टी मंजूर झाली. आता काय मज्जा आहे बुवा! आईने मायेने बनवलेलं चांगलंचुंगलं खायला मिळणार, भाचऱ्यांबरोबर धमाल, जुने मित्रमैत्रिणी भेटणार. मग या सर्वांत आमची आठवण कोण काढेल न?”

ईश्वरीनेही मग त्याचाच सूर पकडत त्याला उत्तर दिलं,

“हो रे, हे मात्र खरंय तिकडे गेल्यावर मला कोणाचीच आठवण होणार नाही आणि तुही आठवण करायची नाही. मला कॉल करून डिस्टर्ब करायचं नाही. आता तूझं तू छान सांभाळतोयस त्यामुळे मला त्रास द्यायचा नाही. आणि हो, गेल्या वर्षी सुट्टीवरून परत आले तेंव्हा तुझ्यारूपाने मला धमाका मिळाला होता. आता अजून काही नवीन धमाका देऊ नका म्हणजे झालं.. तसंतर तुझीही सुटका झाली ना माझ्या त्रासापासून? आता मी परत येईपर्यंत मज्जा कर.. बाहेरच्या हिरवळीकडे जरा लक्ष दे.. तेवढाच त्यांनाही दिलासा..”

ईश्वरी त्याला चिडवत होती. शिवराज मात्र काहीसा उदास वाटला. कामाच्या निमित्ताने सतत ईश्वरीसोबत असण्याची सवय झाली होती. तिच्या बोलण्याने त्याचा चेहरा पडला; पण पुन्हा पूर्ववत होत त्याने तिच्याकडून पुढील सर्व कामांचं नियोजन समजून घेतलं आणि थोडं बोलून तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी ईश्वरी मुंबईला जाण्यासाठी निघाली. जाताना सर्वांसाठी भेटवस्तू, मुलांसाठी सोन्याची चेन आणि छोटीला कानातले छोट्याश्या रिंगा घेतल्या. आदित्य अर्पितासाठी, आजीसाठी, आई बाबांसाठी कपडे घेतले. यावेळी आईकडे जाताना ती प्रचंड खूष होती. काही तासांच्या प्रवासानंतर ती घरी पोहचली. घरी आल्या आल्या तिच्या चिमुरड्या हसऱ्या भाच्यांना पाहून सगळा ताण संपून गेला. तिच्या येण्याने अनघा, माई प्रचंड खूष झाल्या. ईश्वरीने सर्वांना भेटवस्तू दिल्या. विनायक सोडून सर्वांनाच ईश्वरीच्या यशाचं कौतुक वाटत होतं आणि हेवाही. एकट्या स्त्रीने इतक्या लहान वयात संकटांना न जुमानता निडरपणे दिलेली झुंज खरंच वाखाणण्याजोगी होती. ईश्वरीत झालेला बदल पाहून अर्पिताला जरा जास्तच असुया वाटू लागली आणि त्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया..

🎭 Series Post

View all