पुन्हा बरसला श्रावण भाग ९०
ईश्वरी पुण्याला तिच्या घरी पोहचली. घरी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. ‘राजनंदिनी सरदेसाई’ दारावरच्या पाटीवर अलगद तिचा हात फिरला आणि डोळ्यातला पाऊस तिच्याही नकळत सुरू झाला. तिने दारावरचं कुलूप काढलं आणि ती आत आली. एक विचित्र एकाकीपणाचा दमट दर्प तिच्या नाकात शिरला. ती अस्वस्थ झाली. बॅग खाली ठेऊन ती पटकन बाथरूममध्ये शिरली आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली ती डोळे मिटून उभी राहिली. मनातलं वादळ शमवण्यासाठी तिच्या जीवाचा आटापिटा सुरू होता. मनातल्या भावनांचा त्या पाण्यासोबत निचरा व्हावा असं तिला वाटत असावं. तिच्या डोळ्यातला श्रावण शॉवरमधून कोसळणाऱ्या जलधारेत कधी एकरूप झाला हे तिलाही समजलं नाही. बराच वेळ ती तशीच शॉवरखाली उभी होती. स्वराजच्या आठवणी पुन्हा तिच्यासमोर फेर धरू लागल्या. त्यादिवशी ती अशीच न्हाऊन बाथरूममधून बाहेर आली. अंगात लाल रंगाचा बाथरोब परिधान केला होता. केसांना गुंडाळलेला टॉवेल काढून ती तिचे केस पुसत होती. इतक्यात स्वराज धाडकन बेडरूमचं दार पुढे ढकलून आत आला. तेंव्हा तिची उडालेली त्रेधातिरपीट आठवून तिचं तिलाच हसू आलं. ईश्वरी बाहेर आली. कपडे बदलून बाहेर सोफ्यावर येऊन बसली. हवेत थोडा गारवा जाणू लागला होता. मुंबईपेक्षा पुण्यात थोडं थंड वातावरण होतं. तिने स्वतःसाठी छान कॉफी बनवून घेतली. कॉफीचा एक घोट घश्यात उतरताच तिला एकदम तरतरी जाणवली. पुण्याला सुखरूप पोहचल्याचं तिने अनघाला कॉल करून कळवलं आणि पुन्हा आपल्याच विचारात ती गढून गेली.
“उद्यापासून ऑफिसला रुजू व्हायचंय. बरीच कामं खोळंबली असतील. पटकन मुगाच्या डाळीची खिचडी बनवते. जेवून लवकर झोपी जाते म्हणजे उद्या लवकर जाग येईल.”
मनातल्या मनात तिचा स्वतःशीच संवाद सुरू होता. तेवढ्यातही श्लोकचा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेलाच. मनात आलेले सगळे विचार झटकून ईश्वरी स्वयंपाक करण्यासाठी उठली. म्युजिक सिस्टीमवर जुन्या हिंदी गाण्याची सीडी लावली आणि ती किचनमध्ये स्वयंपाक करू लागली.
दुसऱ्या दिवशी ईश्वरी लवकर उठून तयार झाली. घरातली सगळी कामे आवरून ती तयार होऊन खाली पार्किंगमध्ये आली. सोसायटीच्या आवारात ठेवलेली गाडी पार्किंगमधून बाहेर काढत तिने तिचा मोर्चा ऑफिसच्या दिशेने वळवला. थोड्याच वेळात ती ऑफिसला पोहचली. नाही म्हटलं तरी इतक्या लवकर निघूनही ट्राफिकमध्ये अडकल्याने तिला थोडा उशीरच झाला होता. ती पटकन तिच्या नेहमीच्या टेबलजवळ आली. पाहते तर काय! तिचा कॉमप्युटर तिथे नव्हता. टेबलावर तिने ठेवलेली गणेशाची मूर्ती तिथून गायब झाली होती. तिची डायरी, पेन, टेबलवरचा फ्लॉवरपॉट सारं काही गायब होतं. तिच्या नावाची नेमप्लॅटही तिला दिसत नव्हती. तिला काहीच समजेना. ती तिच्या टेबलासमोरची खुर्ची ओढून बसली आणि तिच्या सहकारी मैत्रीण स्मिताला आवाज देण्यासाठी ती मागे फिरणार इतक्यात मागून एक आवाज आला.
“हॅलो मॅडम, इथे कुठे बसताय? तेही माझ्या जागेवर? कमाल आहे!”
ईश्वरीने आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं. साधारण सहा फूट उंचपुरा, गव्हाळ वर्णाचा, वाऱ्याने भुरभुरणारे सिल्की काळेभोर केस, छान रेखीव फ्रेंच दाढी, डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास, अंगात पांढरा शर्ट आणि निळी कॉटन जीन्स, हातात काळ्या पट्याचं घड्याळ, ओठांवर अवखळ हसू उमटवत हसतमुख चेहऱ्याचा पंचवीशीचा तरुण उभा होता. प्रश्नार्थक मुद्रेने ईश्वरीने त्यांच्याकडे पाहिलं.
“एक्सक्युज मी?”
“अहो मॅम, माझी जागा आहे. असं कसं तुम्ही मला न विचारता..”
“सॉरी?”
“यू शुड बी..”
त्याने बेफिकीरपणे उत्तर दिलं.
“काय चाललंय हे? योगिनी…”
ईश्वरीने त्रासिक मुद्रा करत एच आर डिपार्टमेंटच्या योगिनीला आवाज दिला. ती धावतच अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आली. तिला समोर पाहताच ईश्वरीने चिडूनच तिला विचारलं.
“योगिनी, काय चाललंय हे? आणि हे महाशय कोण आहेत? माझ्याच जागेवर बसून माझ्यावरच रुबाब झाडताहेत. मी सुट्टीवर गेले तर इतका बदल झाला? आणि यांना सांग ही माझी जागा आहे. समजलं?”
योगिनी काही बोलणार इतक्यात तिला मधेच अडवत तो मुलगा म्हणाला,
“ही माझी जागा आहे. तुम्ही विनाकारण वाद घालताय. असंही तुम्हा मुलींना भांडणाशिवाय दुसरं येतं तरी काय म्हणा?”
तो खळखळून हसत म्हणाला. त्याचं सर्वांसमोर असं खिजवून बोलण्याने ईश्वरी अजूनच चिडली.
“व्हॉट नॉन्सेन्स! तुम्ही मुलंच आम्हा मुलींना भांडायला भाग पाडता. असं कसं माझ्या खुर्चीत बसलात? आणि तोंड करून मलाच जाब विचारताय?”
तो पुन्हा उलट काहीतरी बोलणार इतक्यात योगिनीच्या मोबाईलची रिंग वाजली.
“ए, एक मिनिट.. केळकरसरांचा कॉल आहे शांत बसा..”
असं म्हणत योगिनीने कॉल घेतला. सगळेच शांत होऊन तिच्याकडे पाहत राहिले.
“हं.. हॅलो सर..”
“काय गोंधळ आहे? इतका आवाज?”
“काही नाही सर.. नंदिनी आजपासून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. आणि ती..”
“एक मिनिट, सर्व स्टाफ मेंबर्सना कॉन्फरेन्सरूममध्ये मिटिंगसाठी जमा व्हायला सांग. मला काही महत्वाचं सांगायचंय.”
“हो सर.. लगेच सांगते.”
असं म्हणत योगिनीने कॉल कट केला आणि सर्व स्टाफ मेंबर्सना केळकरसरांचा निरोप दिला.
“चला सर्वांनी कॉन्फरन्समध्ये जमा व्हा.”
“अगं पण माझं काय? हे असं अर्धवट ठेवून..”
ईश्वरीने योगिनीला विचारलं.
“आधी कॉन्फरन्सरूममध्ये चला. तिथली मिटिंग संपवू आणि मग बोलू. चल लवकर..”
योगिनीच्या वाक्यावर काही न बोलता त्या युवकाकडे रागाने पाहत ईश्वरी कॉन्फरन्सरूमच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात सर्व स्टाफ मेंबर्स कॉन्फरन्सरूममध्ये जमा झाले. सरांनी असं अचानक मीटिंग बोलावल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. आपापसात कुजबुज सुरू होती. इतक्यात केळकरसरांनी आत प्रवेश केला सर्वजण उठून उभे राहिले.
“गुडमॉर्निंग सर..”
केळकर सरांनी मान तुकवून अभिवादन केलं आणि खुणेनेच सर्वांना बसायला सांगितलं. आणि ते पुढे येऊन सर्वांसमोर उभे राहिले.
“व्हेरी गुडमॉर्निंग, आज मी तुम्हाला असं अचानक एकत्र मीटिंगला बोलावलं याचं तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटलं असेल ना? पण गोष्टच तशी आहे. मला सर्वांसमोर जाहीर करण्यास अतिशय आनंद होतोय की, नंदिनी सरदेसाई आतापर्यंत एकटीच अकाउंट असिस्टंट म्हणून काम पाहत होती. तिच्या कामाचा आवाका पाहून एकंदरीत तिला कामाचा प्रचंड ताण येतोय आणि तिला तो झेपत नाहीये असं दिसतंय. त्यामुळे आपण तिच्या जागी एक नवीन नियुक्ती केली आहे. त्याचं नाव आहे ‘ के. शिवराज.’”
केळकरांनी समोर उभ्या असलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं. मगाशी ईश्वरीशी भांडणारा तोच तरुण पुढे आला. ईश्वरीने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
“अच्छा, सरांनी याला माझ्या जागी अपॉइंट केलाय तर..”
ईश्वरी मनातल्या मनात पुटपुटली. चेहऱ्यावर हिरमुसलेपण स्पष्ट दिसत होतं. केळकरसर पुढे म्हणाले,
“शिवराजने त्याचं एमबीए (फायनान्स) यूएसमध्ये पूर्ण केलं आहे. बाहेरच्या देशातून शिकून आल्यानंतर आता त्याला भारतातलं वर्क कल्चर समजून घ्यायचं आहे. बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं आहे. आणि त्यानंतर मग स्वतःचा बिझनेस पुढे घेऊन जायचं आहे. कदाचित पुढे आपलीच कंपनी तो टेकओव्हरही करू शकेल, सांगता येत नाही. त्याचा अधिकचा इंटरेस्ट फायनान्समध्ये असल्याने शिवाय अकाउंटिंगसोबत तो ग्लोबल मार्केटिंगही पाहणार असल्याने त्याला आपण नंदिनीच्या जागी नियुक्त करत आहोत. शिवराज प्लिज पुढे ये आणि सर्वांना आपली ओळख करून दे.”
केळकरसरांनी त्याला पुढे बोलवलं. सहकारांच्या गर्दीतून तो पुढे येऊन सर्वांसमोर येऊन उभा राहिला. त्याने बोलायला सुरुवात केली.
“हॅलो एव्हरीवन, मी शिवराज.. तुम्ही मला ‘शिव’ किंवा ‘राज’ म्हणू शकता. केळकरसरांनी माझ्याबद्दल सांगितलंच आहे. माझ्याकडे जरी परदेशातला शैक्षणिक अनुभव असला तरी मला इथे प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे. एकमेकांचे ज्ञान, अनुभव वाटून घेतल्याने आपल्याच ज्ञानात अधिक भर पडते. मला तुमच्याकडून खूप शिकायला मिळेल अशी आशा करतो. थँक्यू सो मच सर फॉर धिस वंडरफुल अपॉरच्यूनिटी टू वर्क विथ यू.. थँक्यू.”
इतकं बोलून तो शेजारी येऊन थांबला. त्याचं बोलून झाल्यावर केळकरसरांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
“आता शिवराजला नंदिनीच्या जागी नियुक्त केल्यानंतर मग नंदिनीचं काय? ती काय करणार? असा प्रश्न नंदिनीला किंबहुना सर्वांना पडला असेल. हो ना? तर कंपनीने असा निर्णय घेतलाय की…”
केळकरसर क्षणभर थांबले. त्यांची नजर ईश्वरीवर स्थिरावली होती. केळकरसरांच्या नजरेत तिला का कोणास ठाऊक! पण आज राग दिसत होता. ईश्वरी श्वास रोखून केळकरसरांकडे पाहू लागली. माथ्यावर घामाचे थेंब जमा होऊ लागले.
पुढे काय होतं? कोण आहे हा शिवराज? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©अनुप्रिया
क्रमशः
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा