पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७७

पुन्हा बरसला श्रावण..


पुन्हा बरसला श्रावण भाग ७७


ईश्वरी आणि अनघा मुंबईला पोहचले. दारावरची बेल वाजताच अर्पिताने दार उघडलं.

“वहिनी.. वहिनी.. काँग्रॅच्यूलेशन.. कसली गोड बातमी दिलीस यार.. कसलं भारी!”

ईश्वरी दारातच तिच्या गळ्यात पडून म्हणाली.

हो.. हो.. अगं आधी आत तर या..”

अर्पिता हसून म्हणाली. दोघी आत आल्या. आत येताच अनघाने अर्पिताच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. हसून तिने अर्पिताला कवेत घेतलं.

“सुखी रहा बाळा, खूप आनंदाची बातमी दिलीस.. आता स्वतःची काळजी घ्यायची.. जास्त दगदग करायचं नाही. मी पाहीन सगळं तुझं.. आता तू फक्त आराम करायचा.. समजलं का?”

अर्पिताने मान डोलावली. सोफ्यावर जपमाळ घेऊन बसलेल्या माईंना ईश्वरीने नमस्कार केला.

“माई, आता तू पणजी होणार.. तुझ्या नातवाचं बाळ तुझ्या मांडीवर खेळणार. मज्जा आहे बाबा माई तुझी!”

माईच्या कुशीत शिरत ईश्वरी मिश्किलपणे म्हणाली. तिचा आनंदाने भरलेला चेहरा पाहून माईला बरं वाटलं,

“बाळाच्या निमित्ताने तरी दुःख विसरेल.. जगदीश्वरा, माझ्या ईशुला आनंदात ठेव..”

माई स्वतःशीच बोलली. ईश्वरीला प्रेमाने गोंजारत तिने विचारलं,

“कशी आहेस बाळा?”

ईश्वरी किंचित हसली.

“जा आधी फ्रेश होऊन ये.. नंतर निवांत गप्पा मारू..”

ईश्वरीने मान डोलावली. थोड्याच वेळात अनघा आणि ईश्वरी फ्रेश होऊन बाहेर आल्या. अनघाने सर्वांसाठी कॉफी बनवली. कॉफीचा घोट घेता घेता त्यांच्या गप्पा छान रंगल्या. बोलता बोलता मधेच आदित्यचा फोन येऊन गेला. तो अर्पिताची काळजीने विचारपूस करत होता. ईश्वरी अर्पिताकडे पाहत होती. अर्पिताचा खुललेला चेहरा पाहून ती गालातल्या गालात हसली.

“कसलं भारी आहे ना! जसं एका मुलीची बाई होत असताना, आई होत असताना तिच्यात शाररिक मानसिक अवस्थेत बदल होत जातात.. मातृत्वाचा एक नवीन प्रवास सुरू होत असतो अगदी त्याच वेळेस एका मुलाचा पुरुष होण्याचा, पिता होण्याचा प्रवास सुरू होत असतो.. जशी आईला आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाची या जगात येण्याची उत्सुकता असते, आई होण्याची घाई असते अगदी तसंच पुरुषालाही बाबा होण्याची ती ओढ लागत असते. अचानक दोघांच्याही वागण्या बोलण्यात प्रगल्भता, समंजसपणा यायला सुरुवात होते.. ते म्हणतात ना! बाबा म्हणजे काय हे स्वतः पिता झाल्याशिवाय कळणार नाही. अगदी बरोबरच आहे ते.. दादा सुद्धा नक्की बदलेल. वहिनीची काळजी घेता घेता, आईची, आपल्या बहिणीचीही काळजी घेईल..”

ईश्वरी स्वराजच्या जाण्याचं दुःख मागे टाकण्याचा प्रयत्न करत होती. घरच्यांच्या आनंदात सहभागी होत होती. थोडा वेळ विश्रांती घेऊन अनघा दुपारच्या जेवणाचा बंदोबस्त करायला किचनकडे वळली. अर्पिता ईश्वरीला डॉक्टरांचे रिपोर्ट्स दाखवत होती. दुपारची जेवणं झाली. अनघा आणि ईश्वरीने किचन आवरलं आणि ईश्वरी आराम करण्यासाठी तिच्या खोलीत गेली. पलंगावर आडवी झाली. तिच्या मनात विचार घोळू लागले.

“आता पुढे काय? पुढचा प्रवास मला एकटीला करायचा आहे. राहतं घर आणि नोकरी टिकवणं जास्त गरजेचं.. कळत नाही गायत्री वहिनी, बाबा असे का वागले? माझ्याबद्दल का त्यांच्या मनात इतका राग भरलाय? आईंना फोन करू? त्यांना याची कल्पना असेल? नसेल कदाचित.. नाहीतर त्यांनी बाबांना आणि वहिनींना असं करण्यापासून नक्कीच अडवलं असतं.. नाही आमचं घर मी कोणाला विकू देणार नाही.. मला ते घर सोडून कुठेही जाता येणार नाही.. मला स्वराजच्या आठवणी जपून ठेवायच्यात. आईंना कॉल केला तर? नको.. आधीच त्या स्वराजच्या जाण्याने कोलमडून गेल्यात आणि उगीच हे सांगून अजून त्यांच्या दुःखात भर घालायला नको.. मलाच काहीतरी मार्ग काढायला हवा.. मला परत पुण्याला जायला हवं. बाबांना, दादाला हे सर्व सांगायला हवं.. ते ऐकून घेतील? मला त्यांना पटवून द्यायलाच हवं..”

ईश्वरीच्या मनात घोंगावणाऱ्या वादळाला थोपवणं ईश्वरीला शक्य नव्हतं. मिटलेल्या बंद डोळ्यातून पाणी वाहणं सुरूच होतं.

इकडे प्रचंड चिडलेल्या अवस्थेत सरदेसाई, गायत्री घरी पोहचले. सरदेसाई तणतण करत पाय आपटत शालिनीताईंच्या खोलीत आले. त्यांच्या मागोमाग सार्थक आणि गायत्रीही आले. मुलाच्या वियोगाने शालिनीताईंनी अंथरुण धरलं होतं. रखमा मावशीं त्यांना उठवून त्यांची रोजची औषधं देत होत्या. सरदेसाई शालिनीताईंवरच कडाडले,

“तुझ्या लाडाचे परिणाम पाहतेस ना शालिनी? तुझी लाडकी सुन आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागलीय.. देशमुखांच्या मुली घरातल्या वडिलधाऱ्या माणसांना असं तोंड वर करून बोलत नाहीत.. पण तुझी सुन चांगलेच दिवे लावतेय..”

शालिनीताईंनी रखमा मावशीकडे पाहिलं.

“रखमा तू जा आणि दुपारच्या जेवणाचं बघ..”

“हो बाईसाहेब..”

असं म्हणून रखमा तिथून निघून गेली. सरदेसाईंचा रौद्र रूप पाहून शालिनीताई शांतपणे म्हणाल्या,

“अहो काय झालंय? का इतकी चिडचिड करताय?”

शालिनीताईंना बोलताना धाप लागत होती.

“काय झालं म्हणून काय विचारता सासूबाई, नंदिनी फारच धूर्त निघाली.. एक नंबरची स्वार्थी बाई.. भावोजीना फितवून तिने….”

“शांत बस जरा गायत्री.. आई आजारी आहे.. तिला आताच काही सांगायला नकोय.. तुला इतकी साधी गोष्टही कळत नाही का?”

सार्थक गायत्रीला अडवत चिडून म्हणाला.

”काय चुकीचं बोलतेय ती? खरं तेच सांगतेय ना? नकार दिला तिने? मला विरोध केला.. पण मी तिला सोडणार नाही.. बघतोच तिच्याकडे.. माझ्या मुलाला तर खाऊन बसली आता घर पण बळकवायला बघतेय.. आजच वकिलाला भेटतो मी..”

“अहो पण झालंय काय? मला नीट सांगाल का? तुम्ही नंदिनीला भेटायला गेले होतात ना? बरी आहे ना ती?”

“तिला काय धाड भरलीय सासूबाई? मस्त आहे ती.. मुलगा तर आपला गेलाय ना.. तिला काय त्याचं? एवढं मोठं घर बळकावून बसलीय.. अतिशय धूर्त मुलगी आहे ती.. ‘खाली मुंडी पाताळ धुंडी..’ तुम्हाला माहित नाही सासूबाई तिने काय केलंय..”

शालिनीताईंच्या प्रश्नावर गायत्री चिडून म्हणाली.

“काय झालंय? काय केलं तिने?”

मग गायत्रीने पुण्यात घडलेला सविस्तर वृत्तांत शालिनीताईंना सांगितला.

“काही चुकलेलं नाहीये तिचं.. योग्य तोच निर्णय घेतलाय तिने..”

शालिनीताई शांतपणे म्हणाल्या.

“सासूबाई काय बोलताय हे?”

गायत्री चिडून म्हणाली. सरदेसाईही शालिनीताईंकडे आश्चर्याने पाहू लागले.

“गायत्री, ते घर स्वराज आणि नंदिनीने मिळून घेतलं होतं. घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी दोघांनी एकमेकांच्या पसंतीने घेतल्या असतील. स्वराजच्या कितीतरी आठवणी त्या घरात असतील. तिचं मन तिथे गुंतून राहिलं नसेल का गं? तू एक बाई आहेस ना? तिच्या भावना का कळत नाही तुला? तिला घर विकायचं नाही यात काय चुकलं तिचं? तिला स्वराजच्या आठवणीसोबत राहायचं असेल तर आपण का हरकत घ्यावी?”

शालिनीताईंचं बोलणं ऐकून सार्थक हायसं वाटलं आणि आपल्या आईचा अभिमानही..

“सासूबाई.. तसं नाहीये काही.. पुण्यासारख्या प्राईम लोकेशनला असलेल्या घराची किंमत खूप जास्त आहे हे तिला माहित आहे म्हणून तिला ते विकायचं नाहीये. तिने भावोजीना फितवून ते घर स्वतःच्या नावावर करून घेतलंय. तिने बरोबर पुढची व्यवस्था करून ठेवली. घर घेताना स्वतःच्या नावावर केले जेणेकरून स्वराजनंतर त्या घरावर तिचाच अधिकार राहील.. अतिशय कपटी आणि धूर्त बाई आहे ती..”

“काही धूर्त नाही ती.. या सर्व प्रकरणात तिची काहीही चुक नाहीये कारण स्वराजने घर नंदिनीच्या नावावर करण्याआधी मला विचारलं होतं. मीच त्याला तसा सल्ला दिला होता.”

“काय? काय सांगतेय तू?”

सरदेसाई जवळजवळ त्यांच्यावर किंचाळलेच.

“होय माझ्याच संमतीने त्याने पुण्याचं घर नंदिनीच्या नावावर केलं होतं आणि त्याचा निर्णय योग्यच होता. आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराच्या डोक्यावर निदान स्वतःचं हक्काचं छप्पर तरी असावं ही भावना चुकीची नाहीच.. कोणत्याही वकिलाला भेटलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सगळ्या स्थावर मालमत्तेवर पहिला अधिकार त्याच्या पत्नीचाच असतो. तेंव्हा हा विषय इथेच थांबवा.. जसा आपला मुलगा गेलाय तसं तिनेही तिचा नवरा गमावलाय. तिचं तिला ठरवू द्या.. अजून तिला त्रास देऊ नका.. तुम्हाला माझी शपथ आहे..”

बोलता बोलता शालिनीताई थांबल्या. त्यांना धाप लागली होती. त्यांनी सरदेसाईंकडे पाहिलं आणि म्हणाल्या,

“माझा मुलगा गेलाय.. मला अजून दुःख देऊ नका ओ.. हे सगळं थांबवा.. मला सहन होत नाहीये.. नाहीतर मीच हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जाईन..”

शालिनीताईंना रडू फुटलं. त्यांचं निर्वाणीचं बोलणं ऐकून सरदेसाई आणि गायत्रीचा नाईलाज झाला. कायदेशीररित्या आपण काहीच करू शकत नाही हे त्यांना उमगलं होतं.

“बरं, ठीक आहे आई.. तूर्तास हा विषय इथेच थांबवूया.. तू त्रास करून घेऊ नकोस.. आता तू आराम कर.. आम्ही जातो..”

असं म्हणून सार्थक त्यांच्या खोलीतून बाहेर पडला आणि मागोमाग गायत्रीही.. सरदेसाई फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. शालिनीताई ईश्वरीच्या विचारांनी अस्वस्थ झाल्या होत्या.

“ईश्वरीला यांच्या बोलण्याने किती त्रास झाला असेल.. नवरा गेल्याचं इतकं मोठं दुःख उरात असताना परत यांनी तिच्यावर शब्दांचे घाव केले.. मला तिच्याशी बोलायला हवं..”

ईश्वरीच्या विचारांनी त्यांना गलबलून आलं. शालिनीताईंनी हातात मोबाईल घेतला आणि ईश्वरीचा नंबर फिरवला.

पूढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all