सरदेसाई आणि गायत्री रागाने घरातून बाहेर पडले. अनघाने अडवण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही तडक निघून गेले. सार्थक थोडा वेळ तिथेच घुटमळत राहिला. वडिलांच्या आणि आपल्या बायकोच्या वागण्यामुळे तो खजिल झाला होता.
“भावोजी, तुम्ही तरी समजून घ्या.. बाबांना समजून सांगा प्लिज.. मला काही नकोय.. मला कशाचा, या घराचा हव्यास नाहीये.. फक्त ही यांची आठवण माझ्याकडे राहू द्या इतकंच मागतेय मी.. प्लिज तुम्ही वहिनींना समजावून सांगाल का की मी का हे घर न विकण्याचा हट्ट करतेय? भावोजी, या घरावर फक्त माझ्या एकटीचा नाही तर आई बाबांचा तुमचा वहिनींचा सर्वांचा अधिकार आहे आपलंच आहे सगळं..पण हे घर विकूया नको.. मला तुम्ही सर्वजण हवे आहात.. मी एकटी नाही जगू शकत भावोजी..”
ईश्वरी रडू लगली. सार्थकला तिच्या डोळ्यातलं पाणी बघून खूप वाईट वाटत होतं.
“नंदिनी, मी बोलतो बाबांशी.. आणि..”
इतक्यात गायत्रीने त्याला आवाज दिला. मग मात्र त्याचा नाईलाज झाला.
“नंदिनी, काळजी घे स्वतःची..”
इतकं बोलून तो तिथून निघून गेला. ईश्वरी मटकन खाली खुर्चीत बसली. तिला तिच्याच दुःखांनी घट्ट मिठी मारली होती. तिचे डोळे पाणावले तशी ती निःशब्द झाली. अनघाला तिची अवस्था बघवत नव्हती. तिने वातावरण हलकं करण्यासाठी ईशुला आवाज दिला.
“ईशू, चल आवरलं का तुझं? निघायचं ना तुला? मंजू कशी आली नाही अजून?”
अनघा एकटीच बोलत होती. ईश्वरीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.
“ईशू, मी काय विचारतेय? अगं लक्ष कुठंय तुझं?”
“अं.. काय गं आई? काय म्हणतेय? सॉरी गं माझं लक्ष नव्हतं..”
भानावर येत ईश्वरी म्हणाली. अनघा तिच्या जवळ येऊन बसली. पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाली,
“बाळा, आता आयुष्यात असे अनेक चढउतार येतील, संकटं येतील आपण डगमगायचं नाही.. असं संकटाना घाबरायचं नाही. खंबीरपणे उभं राहायचं.. त्याचा सामना करायचा. मला माहित आहे माझी ईशू निडर आहे. धाडसी आहे. ती नक्कीच यातून मार्ग काढेल..”
“पण आई माझीच माणसं आहेत ना ही? मग का माझ्याशी अशी वागताहेत? इतकी भावनाशून्य? स्वराज त्यांचाही कोणीतरी होता ना? खरंच संवेदना हरवलीय का गं? मला का आपल्याच माणसांसोबत लढावं लागतंय? मी त्यांच्याविरुद्ध उभं राहायचं? का.. कशासाठी? काय जिंकायचंय मला? कशासाठी हा अट्टहास? आणि समज, मी त्यांच्या विरोधात जाऊन लढले आणि जिंकलेही.. पण तो आनंद सोहळा साजरा करायला माझीच जिवाभावाची माणसं नसतील तर अशा विजयाचा काय फायदा?”
ईश्वरी धाय मोकलून रडू लागली.
“शांत हो ईशू.. आता ही तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे. ही वाट चालताना ठेच लागेल, पडशील, रस्त्यातली अग्निफूलं वेचताना रक्तबंबाळ होशील पण तू घाबरू नकोस. यातूनही मार्ग निघेल.. तू चालत रहा..”
“आई, बाहेरच्या जगाशी लढायचं असतं ना तर मला काहीच वाटलं नसतं गं.. मी सहज लढले असते पण इथे सगळी माझीच माणसे आहेत. आपल्याच माणसांसोबत कसं लढू गं?”
“लढावं लागेल तुला बाळा, तुझ्यासाठी.. स्वराज आणि तू सजवलेल्या या तुझ्या घरासाठी तुला लढावं लागेल.. हीच खरी सुरुवात आहे तुझ्या सत्वपरीक्षेची.. फार कस लागणार आहे बघ.. खूप दमछाक होईल. बऱ्याच अडचणी, संकटं तुझ्या वाटेत फणा काढून उभे राहतील.. तुझा प्रवास खडतर करतील. पण तू घाबरायचं नाही. ठामपणे उभं राहायचं.. काय होईल? फार फार तर ही लढाई तू जिंकणार नाहीस पण तू प्रयत्न केला होतास हे तर तुझ्या कायम लक्षात राहील नं? ईशू, काहीही प्रयत्न न करता फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहण्यापेक्षा लढून हरलेलं चांगलं नाही का?”
अनघाच्या बोलण्यावर ईश्वरी विचार करत होती. आईचं म्हणणं तिला पटू लागलं होतं.
“बरोबर आहे तुझं आई.. मला लढावं लागेल. ही लढाई माझ्या अस्तित्वाची.. माझ्या स्वाभिमानाची. मी लढेन आई.. मी त्यांना स्वराजची आठवण अशी सहजासहजी पुसू देणार नाही. मी माझं घर कधीच विकणार नाही. मी आणि स्वराजने इतक्या आपुलकीने, मायेने सजवलेलं घर, माझा संसार असा मोडू देणार नाही..”
“माझी गुणाची बाय गो..”
अनघाने ईश्वरीला मायेने जवळ घेतलं. तिला पोटाशी घट्ट धरलं. दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. इतक्यात अनघाच्या मोबाईलची रिंग वाजली. अनघाचं तिकडे लक्ष गेलं.
“अगं बाई! आदीचा फोन..”
अनघाने कॉल घेतला.
“हं आदी, बोल नं.. कसा आहेस बाळा? माईंची तब्येत? तुझे बाबा? आणि अर्पिता?”
अनघा सर्वांची ख्वालीखुशाली विचारत होती. अचानक बोलता बोलता तिच्या चेहऱ्याचे हावभाव बदलू लागले. मुलीच्या व्यथांनी व्याकुळ झालेल्या तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरू लागला.
“काय सांगतोस? अरे व्वा! अभिनंदन हो..”
अनघा खूप आनंदी वाटत होती. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून ईश्वरीला थोडं बरं वाटलं.
“चला.. माझ्या नाही.. निदान आईच्या थोडं तरी तिच्या मनासारखं झालेलं दिसतंय..”
ईश्वरी मनातल्या मनात पुटपुटली.
बोलता थोडा अचानक तिच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेची काजळी पसरू लागली. तिने फोन ठेवून दिला.
“काय झालं आई? काय म्हणाला दादा? सगळं ठीक आहे ना?”
ईश्वरीने काळजीने विचारलं.
“अभिनंदन गं बाई.. आपलं लवकरच प्रमोशन होणार आता.. लवकरच मी आजी आणि तू आत्याबाई होणार आहेस.. अर्पिताला दिवस गेलेत.. ती आई होणार आहे. किती गोड बातमी आहे ना ईशु!”
“वॉव.. खरंच आई! किती छान! आपल्या घरात आता लहान बाळ येणार.. माझ्या नंतरचं तेच सगळ्यात छोटं बाळ. इवलासा जीव.. त्याच्या येण्याने सगळं घर आनंदाने भरून जाईल. चैतन्य येईल.. कसलं भारी यार.. आई.. आई.. आई..”
ईश्वरीने अनघाला पकडून तिच्याभोवती आनंदाने गिरकी घेतली. इतक्या दिवसानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं होतं. तिचा आनंदून गेलेला चेहरा पाहून अनघालाही खूप बरं वाटलं.
“अगं हळू.. मला चक्कर येईल नं.. ”
अनघा हसून ईश्वरीला थांबवत म्हणाली.
“पण बाळा, आदी सांगत होता की अर्पिताची तब्येत फारच नाजूक आहे.. तिला खूप त्रास होतोय. डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितलंय.. ईशू, अगं.. आदी म्हणतोय की..”
अनघा अडखळत म्हणाली.
“आई, दादा तुला परत बोलावतोय. ना?”
अनघाने मान डोलावली.
“अगं, मग अशी उदास का होतेस? मी करेन सगळं मॅनेज.. जाऊया आपण.. मी तुला मुंबईला सोडून परत इकडे येते.. मी राहीन इथे एकटी.. आताच म्हणालीस ना! माझी लढाई.. मी खंबीरपणे लढायला हवी.. मग मी लढेन.. अशी उदास होऊ नकोस आई.. चल आवरायला घे.. मी कॅब बुक करते.. ऑफिसमध्ये सांगावं लागेल.. आजच्या सुट्टीबद्दल मी कळवते त्यांना..”
ईश्वरीने ऑफिसमध्ये एक दिवसाच्या रजेचं कळवण्यासाठी फोन उचलला इतक्यात अनघा अस्वस्थ होऊन म्हणाली,
“अगं पण बाळा.. तुला एकटीला असं कसं सोडून जायचं? अजून तुझं दुःख ओसरलंही नाही. इतक्यातच तुला एकटीला सोडून देऊ? आई गं मी.. आणि तुझे बाबा ऐकतील का? मुलींना एकटीला असं घराबाहेर राहू देतील?”
“आई, आता माझ्यासाठी ही नोकरी आणि माझं राहतं घर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांना सोडून मला काही करता येणार नाही. या घरासाठी आम्ही बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते तर मला फेडावं लागेल ना? तरच हे घर शाबूत राहिल.. मला नोकरी करणं गरजेचं आहे आणि सध्या काही दिवस हे घर सोडता येणार नाही. सगळी परिस्थिती तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलीसच. आई, तू काळजी करू नकोस. मी समजावेन सर्वांना.. परिस्थिती नीट समजावून सांगितली की पटेल बाबांना आणि दादालाही.. तू टेन्शन घेऊ नकोस.. मी सर्व सांभाळेन..”
ईश्वरीला सोडून जाण्यासाठी अनघाचं मन तयार होत नव्हतं पण तिकडेही बिकट परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे तिचा नाईलाज झाला. अनघाने बॅग भरायला घेतली. तोपर्यंत ईश्वरीने केळकरसरांना फोन करून सुट्टीबद्दल सांगितलं. केळकरांनी परवानगी दिली.
थोड्याच वेळात कॅब आली. मोठ्या जड अंतःकरणाने अनघा कारमध्ये जाऊन बसली आणि दोघीजणी मुंबईला जाण्यासाठी निघाल्या..
पुढे काय होतं? विनायक आणि आदित्य ईश्वरीला एकटीला राहण्याची परवानगी देतील? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा