पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७०

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७०


“स्वराजच्या अपघाताची बातमी ऐकून त्याच्या ऑफिसमधले त्याचे बरेच मित्र आले होते. हो.. मला आठवतंय.. दिनेश भावोजी आणि मंजिरीही आली होती पण नंदिनी.. ती कुठे होती? ती यूएसला परत गेली? पण मिस्टर एडवर्ड पण भेटायला आले होते. मला चांगलं आठवतंय.. याचा अर्थ ती पुण्यातच होती आणि जर ती पुण्यातच होती तर मग त्याच्या अंतिम दर्शनालाही न येण्याचं कारण काय असेल?”

ईश्वरी विचारात पडली. मनात शंकाकुशंका येऊ लागल्या. तिने पुन्हा स्वराजचा मोबाईल चाळायला सुरुवात केली. तिला एकदम स्वराजचं त्या दिवशीचं कॉलवरचं बोलणं आठवलं,

“ईशु, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. खूप महत्वाची आहे. तुला कळणं गरजेचं आहे. काल नां..”

ती एकदम चमकली.

“स्वराजला मला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. काय सांगायचं असेल? इतक्या घाईने काय बोलायचं होतं? काहीतरी नक्कीच आहे. त्याच्या या मोबाईलमध्येच सापडेल काहीतरी ”

ईश्वरी पुन्हा मोबाईल चेक करू लागली. तिने मेसेज बॉक्स उघडला. क्रेडिट कार्ड, बँकेचे, लोन ऑफर्स असे बरेच मेसेज येऊन पडले होते. ती खाली स्क्रोल करत असताना तिला एडवर्डचा मेसेज दिसला. तिने तो मेसेज ओपन केला.

“स्वराज, अगेन एरर इन सिस्टम, प्लिज कम ऍट गेस्टहाऊस..”

मेसेजवर रात्रीच्या साडे अकराची वेळ होती. तिने कॉललिस्ट चेक करायला सुरुवात केली.

“अरे त्या दिवशी मी स्वराजला कॉल केला त्यानंतर त्याने मिस्टर एडवर्डला शेवटचा कॉल केला होता पण बोलणं झालेलं दिसत नाही. मिस्डकॉल पडलेला दिसतोय. म्हणजे स्वराज एडवर्ड यांना भेटायला गेस्टहाऊसवर गेला होता? त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं असेल? ते स्वराजला मला सांगायचं असेल? याचा शोध लावलाच पाहिजे. स्वराजला काय सांगायचं होतं? मला समजायला हवं..”

ईश्वरीने मनाशी एक निर्धार केला. तिने मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि बिछाण्यात आडवी झाली.

सकाळी ईश्वरी लवकर उठली. अंघोळ वगैरे आटोपून तयार झाली. स्वयंपाकघरात तिने एकीकडे चहाचं आधाण ठेवलं आणि दुसरीकडे सर्वांसाठी सकाळच्या नाष्ट्याची तयारी करू लागली. इतक्यात अनघा स्वयंपाकघरात आली.

“ईशु, इतक्या लवकर उठलीस? काय करतेस? सोड ते सगळं.. जा तू तुझ्या खोलीत.. आराम कर.. मी आहे ना.. मी करते सगळं..”

अनघा ईश्वरीच्या हातातलं भांडं घेत म्हणाली.

“अगं आई, मी काय पाहुणी आहे का? मी करते सगळं.. तू बस इथे.. ये चहा घे थोडा..”

अनघा किचनमधल्या स्टुलावर बसली. ईश्वरीने चहाचा कप अनघाच्या हातात दिला.

“लेकीच्या हातच्या चहाची चवच न्यारी.. मस्त झालाय चहा ईशु..”

अनघा कौतुकाने म्हणाली तशी ईश्वरी गालातल्या गालात हसली. अनघा लेकीकडे कौतुकाने पाहत होती.

“इतकं मोठं दुःख उराशी असतानाही पोर माझी हसत समोर आली.. आपलं दुःख लपवणं जमू लागलंय तिला.. एका मुलीची बाई झाली की सगळं जमायला लागतं खरंय हे..”

हळूहळू घरातले बाकीचे सदस्य उठले फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये आले. सर्वजण डायनींग टेबलवर नाष्ट्यासाठी एकत्र जमले. माई देवपूजा करून नामस्मरण करत बाहेर आली. ईश्वरीने सर्वांना कांदेपोहे आणि चहा दिला. ईश्वरीही सर्वांसोबत बसली. कॉफीचा घोट घेत तिने बोलायला सुरुवात केली.

“आई, दादा मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय..”

सर्वांच्या नजरा तिच्या दिशेने वळल्या.

“मी पुण्याला जायचा निर्णय घेतेय..”

“काय? पुण्याला? एकटी?”

विनायकने आश्चर्यचकित होऊन विचारलं. ईश्वरीने होकारार्थी मान डोलावली. सर्वजण तिच्याकडे पाहत होते.

“वेड लागलंय का हिला? एकटी राहायचं म्हणतेय. लोक काय म्हणतील? तरण्याताठ्या मुलीला एकटं सोडलं? नातेवाईक तोंडात शेण घालतील आमच्या? अजिबात नाही.. तू कुठेही जाणार नाहीस..”

विनायकने स्पष्टपणे त्याचा निर्णय सुनावला. पण ईश्वरी निग्रहाने म्हणाली,

“बाबा, माझा निर्णय झालाय.. मला पुण्याला जायचंय.. माझी नोकरी आहे तिथे.. ती मला लगेच सोडता येणार नाही.. आणि सोडायचं असेल तर कंपनीला तसं कळवावं लागेल. मी पुण्याला जाणार.. हवं तर तुम्ही दोघं माझ्यासोबत रहा..”

“तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही जायचं.. संपला विषय..”

तिच्या बोलण्यावर विनायक चिडला. ईश्वरीच्या निर्णयाने मात्र अर्पिताला खूप आनंद झाला होता.

“चला.. म्हणजे सुंठीवाचून खोकला जाणार तर..”

ती मनातल्या मनात बडबडली. तिने आदित्यला खुणावलं.

“बाबा, मी काय म्हणतो, ती जर एवढं म्हणतेय तर जाऊ देत ना तिला.. तिला तिच्या ऑफिसमध्ये रीतसर राजीनामा द्यावा लागेल. हवं आईला किंवा माईला तिच्यासोबत पाठवू..”

आदित्यचं बोलणं ऐकून अर्पिता पटकन म्हणाली,

“आईंना नको.. आई पुण्याला गेल्या तर माझं कसं होईल? एकटीने सर्वांचं करणं मला जमणार नाही.. माईंना घेऊन जा हवं तर..”

“बघ म्हणजे माई, तुला प्रवास झेपणार असेल तर चल.. उगीच दगदग करू नकोस.. ”

आदित्यने माईंना सांगितलं.

“मी जाईन एकटी.. करेन सगळं मॅनेज.. डोन्ट वरी..”

ईश्वरी हिरमूसली.

“मी जाऊ का ओ? तेवढीच ईशुला सोबत होईल.. फार नाही पण थोड्या दिवसांसाठी तरी..”

अनघा विनायकडे पाहून म्हणाली. अर्पिताच्या कपाळावर आठ्या पडल्या. आदित्यनेही ईश्वरीला पुण्याला पाठवण्यावर जोर दिला. त्यामुळे मग विनायकने अनघाला तिच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. ईश्वरी आणि अनघाला पुण्याला जाण्यासाठी तयारी करू लागल्या. अनघाने लेकीसाठी थोडे खाण्याचे पदार्थ, पापड लोणची पॅक केलं. तिच्या आवडीचे बेसनचे लाडू बनवून सोबत घेतले. सर्व तयारी झाली. ईश्वरीने कॅब बुक केली. कार सोसायटीच्या आवारात येऊन थांबली. आदित्यने तिचं सामान गाडीच्या डिकीत ठेवलं. निघण्याची वेळ समीप येत होती तशी ईश्वरीचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. तिने माईंना वाकून नमस्कार केला तसं माईंनी तिला पोटाशी धरलं. डोळ्यातून धारा वाहू लागल्या.

“बाळा, काळजी घे गं.. जप स्वतःला..”

माईंच्या बोलण्यावर ईश्वरीने मान डोलावली. अनघा आणि ईश्वरी गाडीत जाऊन बसल्या. थोड्याच वेळात सर्वांचा निरोप घेऊन ईश्वरी पुण्याला जाण्यासाठी निघाली. कार पुण्याच्या दिशेने धावू लागली. कारच्या खिडकीच्या काचेतून बाहेर बघताना ईश्वरीला जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. स्वराजसोबतच बोलणं, त्याने केलेली चेष्टा, त्याचं मिश्किल बोलणं सारं डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखं पुढे सरकू लागलं. पुन्हा डोळ्यांच्या कडा पाणावल्या. थोड्याच वेळात ईश्वरी आणि अनघा पुण्याला घरी पोहचल्या. कारच्या डिकीतलं सामान तिने ड्राईव्हरकरवी खाली काढून घेतलं. ड्राईव्हरला त्याचं भाडं देऊन टाकलं आणि दोघी लिफ्टने दहाव्या मजल्यावर आल्या. दारावरच्या नावाच्या पाटीवर तिचं लक्ष गेलं आणि त्या दिवशीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जशाच्या तसा उभा राहिला.

“नंदू, आज आपल्या घराचं सेलडीड झालं.. आपलं स्वतःचं घर झालं.. मस्त नं.. मला इतका आनंद झालाय नं काय सांगू तुला! हे बघ मी काय आणलंय?”

बॅगमधून एक वस्तू बाहेर काढत स्वराज म्हणाला. ईश्वरी कुतूहलाने त्याच्या हातातल्या वस्तूकडे पाहू लागली. त्याने त्या वस्तूवरचं वेष्टन बाजूला सारलं.

“राजनंदिनी सरदेसाई”

त्याच्या हातात तिच्या नावाची नेमप्लेट होती.

“दारावरची आता आपल्या जुन्या मालकाची पाटी काढायला हवी नं.. आणि नव्या घरमालकाची पाटी लावायला हवी..”

तो तिच्याकडे पाहून हसला. त्याच्या हातातली नावाची पाटी स्वतःच्या हातात घेत ती म्हणाली,

“अहो, हे काय केलंत? आपल्या दारावर तुमच्या नावाची पाटी असायला हवी. बदलून आणा बरं..”

“अगं असं काय करते? माझं नाव आहे त्यात.. हे तुझं नि माझं म्हणजेच आपलं घर आहे. त्यामुळे दारावरची पाटी ही कोण्या एकट्याच्या नावाची नसून आपल्या दोघांच्याच नावाची असायला हवी नं. म्हणून मग ही ‘ राजनंदिनी सरदेसाई ’ नावाची पाटी.. कशी आहे?”

ते आठवून ईश्वरीच्या ओठांवर किंचित हसू आलं. डोळे धुसर होत होते. ईश्वरीने दारावरचं लॉक काढलं. सामानाची बॅग घेऊन अनघा आत आली. ईश्वरीची पावलं मात्र दारातच थबकली. संपूर्ण घरभर तिची नजर फिरली. मनात काहूर दाटून आलं.

“कशी राहू मी इथे स्वराजशिवाय? या वास्तूतल्या प्रत्येक गोष्टीत त्याचाच वास.. त्याचाच भास.. प्रत्येक ठिकाणी त्याचेच स्पर्श.. कसं जगू शकेन मी त्याच्याशिवाय? त्याच्या आठवणी मला जगू देतील?”

पुढे काय होईल? ईश्वरी यातून कसा मार्ग काढेल? तिच्या वाटयाला आलेल्या सर्व संकटावर मात करू शकेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all