पुन्हा बरसला श्रावण.. भाग ६४

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ६४

इकडे एडवर्ड आणि स्वराज कामात गुंग होते. प्रोजेक्ट संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात होता पण सिस्टममध्ये सारखी एरर दाखवत होती. दोघेही प्रोजेक्ट नीट सुरू व्हावा यासाठी धडपडत होते आणि अखेरीस एकदाचा मिस्टर एडवर्डचा प्रोजेक्ट यशस्वीपणे चालू झाला. 

“वेल डन माय बॉय.. फायनली द सिस्टम इज रनिंग सक्सेसफुली.. ग्रेट जॉब..”

एडवर्डच्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडले. स्वराजने उठून आनंदाने त्यांना घट्ट मिठी मारली.

“येस सर, वी डिड इट.. काँग्रॅच्यूलेशन सर..”

“सेम टू यू माय बॉय.. सो नाऊ इट्स पार्टी टाईम.. कॅन वुई?”

एडवर्डने आनंदाने त्याला पार्टीची ऑफर दिली. 

“थँक्यू सो मच सर.. बट नॉट नाऊ, नेक्स्ट टाईम सर.. आय हॅव टू गो.. थँक्स वन्स अगेन..”

एडवर्डच्या हातात हात मिळवत स्वराज नम्रपणे नकार देत म्हणाला. त्याला खूपच आनंद झाला होता. एक मोठं प्रोजेक्ट त्याने यशस्वीपणे सुरू करून दिलं होतं. एकमेकांना शुभेच्छा दिल्यानंतर दोघे आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले. स्वराज घरी पोहचला. दरवाजा उघडून आत आला. आज पहिल्यांदा ईश्वरी समोर नव्हती. तिची गैरहजेरी त्याला जाणवत होती. वातावरणात एक प्रकारची उदासी दाटू लागली. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि टीव्ही लावून सोफ्यावर नुकताच टेकला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आता कोण आलं असेल?”

विचार करत स्वराज सोफ्यावरून उठला आणि त्याने दार उघडलं. समोर दिनेश उभा होता. 

“अरे दिन्या तू? आता? ये..ये आत ये.. कसा काय अचानक?”

स्वराज त्याला आत घेत म्हणाला.

“अरे काही नाही.. मंजिरीने तुझ्यासाठी डबा पाठवला आहे.”

टिफिनची बॅग नाचवत दिनेश म्हणाला.

“अरे तिला कशाला त्रास दिलास? मी शेजारच्या रेस्टोरंटमधून ऑर्डर करणारच होतो. तू पण नां.. उगीच तिला कामाला लावलंस..”

स्वराज दिनेशला लटक्या रागाने म्हणाला.

“ए हॅलो.. मी काही तिला कामाला लावलं नाही बरं का.. तिला आधीच नंदिनीवहिनी मुंबईला जाण्याआधी सांगून गेल्यात. समजलं?”

दिनेश पिशवीतून डबा बाहेर काढून डायनींग टेबलवर ठेवत म्हणाला.

“काहीही बोल यार.. तू जाम लकी आहेस. नंदिनी वहिनीसारखी देखणी, इतकी लाघवी बायको तुला मिळाली. किती काळजी करत असतात तुझी? आता हेच बघ नां., तुझ्या जेवणासाठी मंजिरीला सांगून गेल्या., दुसरी कोणी असती तर म्हटली असती दोन दिवसांचा तर प्रश्न आहे करतील मॅनेज.. पण नाही काळजीच भारी नवऱ्याची..”

दिनेश स्वराजला चिडवत म्हणाला. स्वराजच्या चेहऱ्यावर हसू आलं. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. ईश्वरीचा कॉल आला होता.

“बघा बघा..किती ती काळजी.. किती ते प्रेम!”

दिनेश मोठ्याने हसत म्हणाला.

“गप रे.. तुझं आपलं काहीतरीच.. शांत बस मला कॉल घेऊ दे..”

त्याने हॅलो म्हणताच ईश्वरीने बोलायला लागली. 

“हॅलो, कुठे आहात?”

“घरी.. ”

“जेवलात?”

“नाही अजून.. बसणारच होतो.. हे काय मंजिरीने डबा पाठवून दिलाय. दिनेश घेऊन आलाय. तू सांगितलंस का तिला? कशाला उगीच त्रास तिला? मी खाल्लं असतं काहीतरी..”

स्वराज सोफ्यावर बसत म्हणाला.

“म्हणूनच तिला सांगितलं. काहीतरी खाल मग आजारी पडाल.. आणि त्रास कसला? एक दिवसाचा तर प्रश्न.. उद्या याल नां तुम्ही? किती वाजता याल? लवकर निघा.. जास्त उशीर करू नका. आणि नां गाडी सावकाश चालवा..”

ईश्वरीची बडबड सुरूच होती.

“अगं हो.. हो.. किती बोलतेस.. बोलून बोलून दमत कशी नाहीस तू?”

तो मोठ्याने हसला.

“जा.. आता मी काही बोलतच नाही..”

ती लटक्या रागाने म्हणाली.

“अगं रागावू नको, मस्करी केली मी.. लवकर निघतो उद्या. दुपारी निघेन.. गाडीही सावकाश चालवेन.. आता बोल नां.. रागावू नकोस नं.. ”

स्वराज तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता.

“ठीक आहे, नाही रागवत मी. पटकन जेवून घ्या. आणि विश्रांती घ्या थोडी.. चला ठेवते मी.. गुडनाईट..”

इतकं बोलून ईश्वरीने कॉल कट केला. दिनेशचं चिडवणं सुरूच होतं. स्वराज लाजून गोरामोरा झाला.

“चल तू जेवून घे सावकाश.. मी निघतो. उद्या भेटू ऑफिसमध्ये.. बाय.. ”

दिनेशने स्वराजचा निरोप घेतला आणि त्याच्या घरी निघून गेला. स्वराजने जेवण वाढून घेतलं. एक घास तोंडात घालणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर एडवर्डचा मेसेज झळकला.

“स्वराज, अगेन एरर इन सिस्टम, प्लिज कम ऍट गेस्टहाऊस..”

मेसेज वाचून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“आता काय झालं? मगाशी तर नीट सुरू होता. कॉल करून विचारून घेतो. कॉल वर सॉल्व झाला तर बरंय..”

असा विचार करून त्याने एडवर्ड यांना कॉल केला पण त्यांचा फोन बंद येत होता.

“अरे, आता तर मेसेज आला. असा कसा अचानक बंद लागतोय. चार्जिंग संपलं असेल. स्विच ऑफ झाला असेल. खरं म्हणजे जाण्याचा खूप कंटाळा आलाय पण जायला तर हवंच नां.. नाहीतर उद्याचा दिवस त्यातच जाईल आणि त्यामुळे उद्या मुंबईला जायचं कॅन्सल करावं लागेल. आताच जाऊन पाहून येऊ..”

त्याने विचार केला. पटकन दोन घास खाऊन तो एडवर्डकडे जाण्यासाठी निघाला. थोड्याच वेळात तो गेस्टहाऊसवर पोहचला. त्याने दारावरची बेल वाजवली. नंदिनीने दरवाजा उघडला. गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ती खूपच मादक दिसत होती. तिने त्याला आत यायला सांगितलं.

“ये राज आत ये.. बस.. काय घेशील?”

“काही नको.. मिस्टर एडवर्ड कुठे आहेत? त्यांनी मला बोलवलंय..”

स्वराज सोफ्यावर बसत म्हणाला. 

“अरे ते नाहीयेत.. आताच एका क्लाईंटचा कॉल आला म्हणून गेलेत.. काय झालं?”

नंदिनीचं बोलणं ऐकून तो ताडकन उठून उभा राहिला.

“ठीक आहे मग निघतो मी.. त्यांचा मेसेज होता सिस्टममध्ये एरर आहे लवकर ये.. उद्या पाहीन.. ओके बाय..”

असं म्हणून तो निघणार इतक्यात छद्मी हसत नंदिनी म्हणाली,

“राज, एडवर्ड क्लायन्टला भेटायला जाणार आणि रात्री उशिरा येणार हे कळल्यावर तो मेसेज मीच त्याच्या मोबाईलवरून तुला पाठवला होता. मला माहित होतं, काम आहे म्हटल्यावर तू धावत येशील पण त्या आधी कॉल करून एडवर्डला कन्फर्म करशील म्हणून थोडा वेळ मीच त्याचा मोबाईल बंद केला होता. पुन्हा मोबाईल सुरू करून तो मेसेज आणि तुझे मिस कॉल रेकॉर्ड्स डिलीट मारले..”

नंदिनी तिची धूर्त चाल त्याला सांगत होती.

“व्हॉट? अगं पण का केलंस असं? मी जेवण सोडून धावत आलो इथे.. का वागलीस असं मुर्खासारखं?”

“तुझ्याचसाठी राज, किती दिवस किंबहुना महिने लोटले आपण भेटलो नाही पूर्वीसारखं? देहभान विसरून एकमेकांच्या मिठीत विसावलो नाही.. ये नां राज..”

हात पसरून तिने स्वराजकडे पाहिलं.

“ते आता शक्य नाही.. मी निघतो.. बाय.”

असं म्हणून तो जाण्यासाठी वळला. इतक्यात नंदिनीने धावत येऊन मागून त्याला घट्ट मिठी मारली. तो गडबडला. 

“थांब नां राज.. थोडा वेळ प्लिज.. एडवर्ड खूप उशिरा परत येणार आहे कदाचित येणारही नाही.. आजची रात्र आपली आहे. मी यूएसला निघून गेल्यावर परत आपली भेट होईल की नाही माहित नाही. मी आधीपासून सर्वस्वी तुझीच आहे. फक्त आजची रात्र माझा हो आणि मला तुझं होऊ दे राज.. राज, प्लिज नं राज,. तू थांबलास तर माझी इतक्या दिवसांची अपुरी इच्छा…”

नंदिनीची मिठी अजूनच घट्ट होऊ लागली.

“व्हॉट नॉन्सेन्स नंदू? तुला कळतंय तू काय करतेय? तू एडवर्डची बायको आहेस आणि माझंही लग्न झालंय हे तू विसरू नकोस..”

त्याच्या छातीवर आवळलेले तिचे हात झटकत स्वराज म्हणाला. त्याने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला पण नंदिनी ऐकायला तयार नव्हती. त्याच्या स्पर्शासाठी ती आसूसली होती. तिने पुन्हा पुढे येऊन मिठी मारली आणि स्वराजला धाडकन सोफ्यावर ढकललं. तो सोफ्यावर कोसळला. स्वराज सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करत होता पण ती बेभान होऊन वेड्यासारखी त्याचे चुंबन घेत होती. तिच्या स्पर्शाने, त्याच्या छातीवर रूळलेल्या तिच्या उष्ण श्वासांनी तो आता विरघळू लागला. काही जुने स्पर्श, जुन्या आठवणी डोळ्यासमोर पिंगा घालू लागल्या. तिचा मादक स्पर्श त्याला सुखावत होता. लग्न होऊन सहा महिने उलटून गेले होते तरी ईश्वरी आणि त्याच्यात अजूनही वैवाहिक नातं निर्माण झालं नव्हतं. त्याचं मन आणि आता शरीरही त्या सुखासाठी आतुर झालं होतं. त्याचे डोळे आपोआप बंद होऊ लागले आणि त्याचा संयम सुटू पाहत होता. त्याने नंदिनीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला आणि तिच्या गुलाबी नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवत दीर्घ चुंबन घेतलं. श्वास श्वासात मिसळले. दोघांच्याही श्वासांची गती वाढली होती. तिची नाजूक बोटं त्याच्या मानेवर रूळणाऱ्या केसात फिरू लागली. हळूहळू त्याच अवस्थेत ती स्वराजला तिच्या बेडरूममध्ये घेऊन आली. नंदिनीने त्याला बेडवर ढकललं. अंगात घातलेल्या नाईट गाऊनचा वरचा कोट काढून बाजूला भिरकवत ती तिच्या अंगावर कोसळली. त्याच्या शर्टची बटणं उघडत ती त्याला चुंबत होती. त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले. दोघांच्याही देहावर शहारा फुलत होता. कामाग्नी भडकला होता. तिचं सर्वांग थरथरू लागलं. मिलनोत्सुक झालेलं तिचं शरीर त्या परमोच्च आनंदासाठी बेभान झालं होतं. अंगावरच्या वस्त्रांचा अडसर दूर होऊन देहाचं अंतर मिटू लागलं होतं. काही क्षणाचा अवधी बाकी होता..

इतक्यात..

पुढे काय होतं? स्वराज आणि नंदिनी एक होतील? ईश्वरीचं पुढे काय होईल? एडवर्ड नंदिनी यांच्या नात्याचं पुढे काय होईल? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे (अनुप्रिया)


🎭 Series Post

View all