पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५७

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५७


“मला कळतंय, माझ्या बोलण्याचा सर्वांना राग आला असेल पण माझा नाईलाज आहे. आता मी स्वराज आणि नंदिनीच्या सुखाच्या आड कोणालाही येऊ देणार नाही. स्वराज, मी तुला एकट्याला कुठेच जाऊ देणार नाही. तुझ्यासोबत कायम तुझी बायकोच असायला हवी.आता मला कोणताच धोका घ्यायचा नाही. तुला एकट्याला सोडून मी चुक केली होती पण आता याआधी केलेली चुक मला पुन्हा करायची नाही. तुम्ही दोघं एकत्र राहाल तरच तुमचा संसार बहरेल. भले काही दिवस नंदिनीला स्वतःचं करियर बाजूला ठेवावं लागेल पण तिच्या संसारासाठी तिला हे करावंच लागेल..”

शालिनीताईंच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते. स्वतःच्या मनाशी निश्चय करून त्या सोफ्यावरून उठल्या आणि झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्या.

ईश्वरी खोलीत आली. स्वराज बेडवर आडवा पडला होता. ती आत येताच तो उठून बसला. उशी आणि चादर घेऊन तो सोफ्यावर बसला. ईश्वरीचे डोळे रडून रडून सुजले होते. नाकपुड्याही लाल झाल्या होत्या.

“नंदिनी, आय ऍम सॉरी यार.. मी आईला समजावू नाही शकलो. मी तुझ्या शिक्षणासाठी काहीच करू शकलो नाही. मी प्रयत्न केला होता पण आई ऐकायलाच तयार नव्हती. ती हट्टच करून बसलीय. खरंच सॉरी गं..”

तो एकदम व्याकुळ झाला होता.

“ठीक आहे ओ.. आई म्हणताहेत ना.. मग त्यांच्या म्हणण्यानुसारच होईल आणि मी बाहेरून परीक्षा देईन ना.. नका टेन्शन घेऊ.. आता सध्यातरी मला तुमचं करियर जास्त महत्वाचं वाटतंय. तुमचं झालं की मग माझ्या करियरकडे लक्ष देऊ..”

ईश्वरी किंचित हसून म्हणाली. स्वराजनेही हसून तिच्याकडे पाहिलं. हताशपणा तिच्या देहबोलीतून त्याला जाणवत होता पण तोही काहीही न बोलता सोफ्यावर झोपी गेला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठली आणि तिचा रोजचा दिनक्रम सुरू झाला. सर्वांचा चहापाणी, नाष्टयाची सोय करून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली.

“मी सोडतो तुला.. सोबतच जाऊ..”

स्वराज ईश्वरीला म्हणाला. ईश्वरीने मान डोलावली आणि शालिनीताईंना सांगून ती बाहेर पडली. थोड्याच वेळात स्वराजने ईश्वरीला तिच्या कॉलेजजवळ सोडलं. ती आत आली. श्लोक आणि अर्चना आधीच येऊन थांबले होते. त्यांनी ईश्वरीकडे पाहिलं. ती काहीशी उदास वाटली. संपूर्ण वेळ शांत बसून होती. लेक्चर्स संपल्यावर ते बाहेर पडले. तिला विचारात गढलेलं पाहून श्लोकने काळजीने विचारलं,

“ईशू, काय झालंय? आज खूपच शांत आहेस.. तब्येत ठीक आहे ना तुझी? घरी कोणी काही बोललंय का?”

श्लोकच्या प्रश्नाने ती भानावर आली.

“काही नाही रे.. पुन्हा एकदा स्वप्नांना ब्रेक द्यावा लागणार बहुतेक.. खरं सांगू का श्लोक, कधी कधी वाटतं की मोठी स्वप्नंच पाहू नये. काय फायदा नं? स्वप्नं अशी तुटणार असतील तर..”

तिच्या गळ्यात उमाळा दाटून आला.

“काय झालं ईशू? नीट सांगशील का?”

ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवत अर्चना म्हणाली. ईश्वरी तिच्या गळ्यात पडून रडू लागली. रडत रडत तिने काल घरी घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला. दोघांनाही खूप वाईट वाटलं पण तिच्या घरच्यांच्या निर्णयापुढे ते सांत्वन करण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. थोड्या वेळाने ईश्वरीची समजूत घालून ते घरी जाण्यासाठी निघाले. त्यांचा निरोप घेऊन अर्चना निघून गेली. श्लोक मात्र ईश्वरीजवळच घुटमळत राहिला. 

“ईशू, तू रडू नकोस यार.. सगळं ठीक होईल. काहीतरी मार्ग नक्की निघेल. तू शांत हो..”

श्लोक तिला समजावत म्हणाला.

“कोणता मार्ग निघणार आहे श्लोक? कशी शांत राहू मी? तुला माहितीये? आता ऑफिसमध्येही सांगावं लागेल. मी जॉब सोडतेय हे.. फार दिवस नाही झाले रे पण गुंतले नं तिथे.. छान घडी बसली होती आता पुन्हा सारं विस्कळीत होणार..”

ईश्वरी हताश होऊन म्हणाली.

“काही नाही विस्कळीत होणार.. तू टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं ठीक. सी, मी कुठेतरी वाचलंय, जेंव्हा एक दरवाजा बंद होतो तेंव्हा हजार दरवाजे आपोआप आपल्यासाठी खुले होतात. फक्त ते आपल्याला पाहता आले पाहिजेत. नक्कीच यातून चांगला मार्ग निघेल. तुझ्या पंखाना नक्कीच बळ मिळेल. तू अजिबात काळजी करू नकोस आणि ऑफिसमध्ये तर तुला सांगावंच लागेल. आपल्यामुळे त्यांची काही गैरसोय व्हायला नको. सगळं छान होईल. पण ईशू, तू आमच्या पासून लांब जाणार.. थोडं वाईट वाटतंय गं.. इतके दिवस एकत्र केलेली धमाल आठवत राहणार.. पण ईशू, तुला कधीही माझी आठवण आली, गरज वाटली, मदत लागली तर मला निसंकोचपणे कॉल कर. मी तिथे हजर असेन.. कॉल करशील ना?”


श्लोक तिला आधार देत म्हणाला. तिने मान डोलावली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि ईश्वरी ऑफिसमध्ये आली. तिने दिवसभराची कामे संपवली. सगळ्या गोष्टीं मार्गी लावण्याचा ती प्रयत्न करत होती.

संध्याकाळ झाली. हळूहळू सर्वजण ऑफिसमधून बाहेर पडू लागले. ईश्वरीने राजीनामा लिहला आणि ती लिमयेसरांच्या केबिनमध्ये आली. सरांना राजीनामा दिला आणि स्वराजच्या ट्रान्सफर बद्दलही सांगितलं. लिमयेसर किंचित हसले आणि म्हणाले,

“पाहिलंस ईश्वरी, हेच सांगत होतो मी.. लग्न झालेल्या मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो बघ.. काय झालं पाहिलंस ना? तू इतकी हुशार असूनही काय उपयोग झाला? नवरा जाईल तिकडे निघावं लागलंच ना? तुझी हुशारी अशी मार खातेय की नाही? खरंतर बायकांनी करियर वगैरेच्या भानगडीत पडूच नये..”

लिमयेसरांनी तिचा राजीनामा टेबलवर आपटला. ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“सर, तुमच्याकडून मी खूप शिकलेय, अजूनही पुढे शिकायचं होतं. तुमचं कामातलं पॅशन, तुमची विचार करण्याची पद्धत, हजरजबाबीपणा सारं आवडायचं मला आणि तेच मी अंगीकारण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्यासोबत काम करून खूप छान वाटलं सर.. तुम्ही म्हणता ते बरोबर असेलही पण सर, कधी कधी नात्यांसाठी, आपल्या माणसांच्या आनंदासाठी करियरला तिलांजली द्यावी लागते आणि जास्त करून स्त्रियांनाच.. फक्त त्याच करू शकतात हे.. मी फक्त माझाच विचार करू शकत नाही. माझ्या माणसांचाही विचार केला पाहिजे नं? फक्त स्वतःचाच विचार करणं एक स्त्री म्हणून तशी मला परवानगीच नाही. माझा नाईलाज आहे सर.. मला जावंच लागेल. माझं कुटुंब मला माझ्या करियरपेक्षाही जास्त महत्वाचं आहे.. करियर झालं असतं तर नक्कीच मला आनंद झाला असता पण नाही होऊ शकणार आता.. काही हरकत नाही. एक वेळ करियर नाही झालं तरी चालेल पण माझं कुटुंब माझी पहिली प्रायोरिटी आहे.. ते विस्कळीत झालेलं नाही चालणार मला.. आय ऍम सॉरी सर..”

ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून लिमये सरांनाही गलबलून आलं. थोडंसं जुजबी बोलून त्यांनी तिचा राजीनामा स्विकारला. 

“ठीक आहे, मी तुझा राजीनामा घेतोय आता पण परत कधी विचार बदलला तर कळव मला. तू इथे कामासाठी कधीही येऊ शकतेस. पुढचे दोन तीन दिवस येऊन जा.. स्मिताला तुझं काम हॅन्डओव्हर करून जा.. बेस्ट ऑफ लक ईश्वरी..”

लिमयेसरांनी हसून तिला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डोळे पुसत तिनेही हसून मान डोलावली. थोड्या वेळाने ईश्वरी तिचं काम आटोपून ऑफिसमधून बाहेर पडली. डोक्यातले विचार राहून राहून बाहेर डोकं काढत होते त्यामुळे ती उदास आणि अस्वस्थ होत होती. डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. ईश्वरीने अनघाला फोन करून स्वराजचं प्रमोशन आणि पुण्याला शिफ्ट होण्याबद्दल सांगितलं.काही क्षण अनघाला काहीच सुचलं नाही. डोळ्यातलं पाणी पदराने टिपत ती म्हणाली, 

“ईशू, तू मुंबईत होतीस म्हणून निदान कधीतरी भेट तरी होत होती गं पण आता तू अजून दूर जातेस. कसं गं? तुझी खूप आठवण येईल गं.. पण ठीक आहे जावईबापूंनी दोघांच्या सुखासाठी, भवितव्यासाठी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना? काळजी घे बाळा.. मी घरात सर्वांना सांगते. एक दिवस तुझ्या घरी येऊन भेटून जाऊ..सुखी रहा बाळा..”

दोघींचे डोळे वाहत होते. लेक अजून दुरावणार म्हणून अनघाला वाईट वाटत होतं. त्यानंतर दोन तीन दिवसांनी अनघा आदित्यला घेऊन सरदेसाईंच्या घरी लेकीला भेटायला आली. तिच्या आवडीच्या वस्तू, खाण्याचे पदार्थ दिले आणि मुलीचा निरोप घेतला. 

काही दिवसांनी स्वराज नोकरीनिमित्त पुण्याला आला. बाणेरमध्ये त्याचा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार होता. काही दिवस त्याची ऑफिसच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. त्याच परिसरात स्वराजने मित्रांच्या साहाय्याने वन बीएचके फ्लॅट भाडे तत्वावर पाहिला आणि त्याने तसं घरी शालिनीताईंना कळवलं. पुढच्याच आठवड्यात सुट्टीच्या दिवशी तो मुंबईला आला. सामान शिफ्ट करण्यासाठी छोटा टेम्पो बोलवला. घरात लागणारं गरजेचं असणारं मोजकंच सामान त्यात भरलं आणि टेम्पो पुण्याच्या दिशेने निघाला. ईश्वरीने निघताना एकदा संपूर्ण घरावर नजर फिरवली. देवघरातल्या देवांवरून मायेने हात फिरवला. साश्रूपूर्ण डोळ्यांनी तिने त्यांच्यापुढे हात जोडले आणि ती बाहेर हॉलमध्ये आली. सरदेसाई, शालिनीताई, सार्थक, गायत्री यांना वाकून नमस्कार केला. शालिनीताईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. मायेने तिला गोंजारत त्या म्हणाल्या,

“काळजी घे नंदिनी, स्वराजची आणि तुझीही.. कॉल करत रहा.. खुशाली कळवत रहा.. इकडची बिलकुल चिंता करू नकोस. मी येईन अधून मधून तुला भेटायला..”

ईश्वरीचे अश्रू थांबत नव्हते. भरल्या डोळ्यांनी ईश्वरीने सर्वांना निरोप दिला आणि ती कारमध्ये जाऊन बसली. कार पुण्याच्या दिशेने निघाली. 


पुढे काय होतं? ईश्वरीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ दबा धरून बसलं होतं? पाहूया पुढील भागात..


क्रमशः

©निशा थोरे (अनुप्रिया)


🎭 Series Post

View all