पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५२
थोडयाच वेळात स्वराज नंदिनीच्या सोसायटी जवळ पोहचला. गाडी पार्किंगमध्ये पार्क करून तो लिफ्टने दहाव्या मजल्यावर पोहचला. नंदिनीच्या घराच्या दारावरची बेल वाजवली. नंदिनी त्याची वाट पाहतच थांबली होती. तिने दार उघडलं आणि तो आत आला.
“हेय, नंदू.. कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? एकदम इतक्या घाईघाईने तू बोलवून घेतलंस?”
सोफ्यावर बसत स्वराज तिच्याकडे पाहून म्हणाला. नंदिनी फार विचार करत बसली नाही. तिने लगेच मूळ मुद्यालाच हात घातला.
“राज, सगळं ठीक आहे. मी पण मजेत आहे. आज सकाळीच यूएस वरून सर्व कामं, मिटींग्स आटोपून आलेय. ट्रिप खूपच छान झाली. सर्वांनी माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. खरंतर तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती म्हणूनच मी तुला तातडीने बोलवून घेतलं. बरं मला सांग तू चहा घेणार की कॉफी?”
नंदिनीने विचारताच त्याने तिला कॉफी करायला सांगितलं. थोड्याच वेळात नंदिनीने दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफीचा मग त्याच्यासमोर धरत ती म्हणाली,
“राज, मी तुझा जास्त वेळ वाया न घालवता तुला सरळ स्पष्टपणे विचारतेय. तू पुढे काय करायचं ठरवलंयस? तूझ्या म्हणण्यानुसार मी शांत बसले. आता तुझं लग्न होऊन सहा महिनेही उलटून गेलेत. काय करणार आहेस तू? ईश्वरीला घटस्फोटाचे पेपर्स दिलेस का तू?”
तिच्या प्रश्नासरशी स्वराजला एकदम आठवलं.
“अरेच्या! सहा महिने उलटून गेले? किती भुर्रकन दिवस निघून गेले! या सहा महिन्यात ईश्वरी किती छान रूळली. सर्वांना इतका जीव लावला. आता तिला असं वाऱ्यावर सोडणं जमेल का मला?”
तो विचारात बुडून गेला. नंदिनीच्या हाक देण्याने तो भानावर आला. त्याचा जीव कासावीस झाला होता. नंदिनीने स्वराजकडे पाहिलं. त्याच्या नजरेत नंदिनीला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं होतं. तिचा राग उफाळून आला होता तरी राग आवरत ती शांतपणे म्हणाली,
“राज, तू म्हणाला होतास नं? फक्त सहा महिने.. मी संयम बाळगला. तुझ्यासाठी मी तुला दिलेलं वचन देखील पाळलंय. आता तुझी परीक्षेची वेळ आहे. तुला तुझं प्रेम सिद्ध करावं लागेल राज.. तू मला असं वाऱ्यावर सोडू शकत नाहीस. तुझ्या प्रेमाखातर मी तुझी वाट पहात मी थांबले ना? पण आता नाही.. मला तुझ्याशिवाय जगता येणार किंबहुना तुझ्याशिवाय मला जगायचंच नाही.”
स्वराजच्या ओढीने तिच्या डोळ्यात पाणी तरळून आलं. मोठ्या प्रयासानं तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच रॊखून धरलं होतं. तिने कॉफीचा मग त्याच्या घेऊन किचन ओट्यावर ठेवला आणि ती त्याच्या जवळ आली. दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती गुंफत ती लाडीकपणे म्हणाली,
“राज, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची मला.. म्हणजे ती आपल्या दोघांच्या फायद्याचीच आहे.”
त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
“आमच्या कंपनीची एक नवीन ब्रँच यूएसला सुरू होतेय आणि कंपनीने मला त्या ब्रँचची मार्केटिंग हेड म्हणून काम पाहण्याची ऑफर दिलीय. त्यासोबत प्रमोशन आणि चांगलं पॅकेजसुद्धा दिलंय. राज, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि ती संधी मला गमवायची नाहीये. तू तुझ्या बायकोला आता लगेच घटस्फोट दे किंवा नको देऊ, आपण दोघं यूएसला जाणार आहोत हे फायनल आहे. माझ्या जॉबचं काही टेन्शन नाही आणि तिथे गेल्यावर तुलाही मिळेलच ना चांगला जॉब? आपण दोघं सुखात राहू.. काय ठेवलंय इथे इंडियात?”
नंदिनी कुत्सितपणे म्हणाली. नंदिनीने तिचा निर्णय सांगितला होता. तिच्या निर्णयाचं स्वराजला खूपच नवल वाटलं. त्याच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले.
“आणि माझे आई बाबा? माझी फॅमिली? आई आजारी असते विसरलीस का?”
“अरे, आपण भरपूर पैसे पाठवून देऊ त्यांना? चांगली ट्रीटमेंट देऊ? हवंतर चोवीस तास त्यांच्यासाठी घरात मेड ठेवू आणि तसंही इथे सार्थक आणि त्याची बायको आहे ना.. ते पाहतील त्यांचं काय करायचं ते?”
नंदिनी सहजपणे म्हणाली. तिच्या बेफिकीरपणे बोलण्याने स्वराज दुखावला गेला होता. तो चिडून म्हणाला,
“आणि त्यांनी नाही सांभाळलं तर? कोण बघेल त्यांच्याकडे?”
“मग आपण त्यांचं नाव एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवू. भरपूर पैसे दिले की कोणीही सांभाळतं रे.. ”
ती सहजपणे म्हणाली.
“नंदिनी….”
तो रागाने जोरात ओरडला.
“तुला कळतंय तू काय बोलतेस ते? माझ्या आईवडिलांना तू वृद्धाश्रमात पाठवायला निघालीस तेही मी जिवंत असताना? हे असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही? नंदू, इतकी स्वार्थी झालीस? स्वतःच्या सुखाच्या पुढे तुला काहीच सुचत नाहीये का?”
तो तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत अंगार बरसवत होता.
“राज, मी माझ्या स्वतःच्या सुखाचा विचार करणं चुकीचं आहे का?”
नंदिनीही चिडली होती.
“मुळीच चुकीचं नाही नंदू, पण स्वतःचा विचार करता करता थोडा इतरांचा विचार करायला शिक जरा.. नंदू, तू अशी नव्हतीसच. जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती इतकी स्वार्थी मुळीच नव्हती. मग असं कसं घडलं? का घडलं? ती ईश्वरी बघ.. किती निस्वार्थी भावनेने सगळं करतेय.. साऱ्या घराला तिने आपलंसं केलंय.. आणि तू? मला माझंच आश्चर्य वाटतंय की मी तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीवर प्रेम केलं..”
तो हताशपणे म्हणाला. स्वराजच्या तोंडी ईश्वरीचं नाव ऐकताच नंदिनी अधिकच चिडली.
“राज, मला स्वार्थी बोलतोयस तू? मला? तू दुसऱ्या मुलीशी लग्न करून सुखात आहेस. तुझं आयुष्य मस्त जगतोयस. अरे..पण माझं काय? मी काय करू? माझ्यासमोर तू तिच्या चांगुलपणाचे गोडवे गातोयस पण माझा विचार केलास तू? तुझ्यावर मनापासून प्रेम केलं मी पण मला काय मिळालं? तुझा तिरस्कार, अवहेलना? प्रत्येकवेळी मी तुझी वाट पहायची. तुझ्या प्रेमासाठी अगतिक व्हायचं.. का? तू मला तुझ्या आईवडिलांचा विचार करायला सांगतोयस. त्यांनी केला माझा विचार? मीही रडले होते. त्यांना किती आर्जवे केली होती! तुझ्याशी लग्न लावून द्या म्हणून अक्षरशः मी त्यांच्यासमोर हात जोडून याचना केल्या होत्या पण त्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. त्यांनी मला धुडकावून लावलं. त्यांनी तुझी इच्छा नसतानाही एका सुमार दर्जेच्या, एका गांवढळ मुलीशी लावून दिलं. त्यांनी माझ्या मनाचा तिळमात्रही विचार केला नाही मग मी का त्यांचा विचार करू? आणि राज तू काय केलंस माझ्यासोबत? तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस. फक्त नाटक.. माझा वापर करून घेतलास आणि आता मला इग्नोर करतोयस.”
तिच्या डोळ्यातलं पाणी अंगार ओतत होतं. स्वराज काही बोलणार इतक्यात नंदिनी म्हणाली,
“सी राज, माझा निर्णय झालाय. मी यूएसला जाणार आहे. माझं करियर माझ्यासाठीही महत्वाचं आहे. आता तुला निर्णय घ्यायचाय. तुला मी हवीय का तुझे आई बाबा?”
तिच्या प्रश्नावर क्षणाचा विलंब न करता तो शांतपणे म्हणाला,
“त्यात निर्णय काय घ्यायचा नंदू? ते स्पष्ट आहे.”
“म्हणजे तू यूएसला यायला तयार आहेस? मला माहित आहे राज, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. तू मला सोडून राहणारच नाहीस. मी आपली दोन तिकिटं बुक करते.”
ती आनंदित होऊन म्हणाली.
“थांब नंदू, घाई करू नकोस. माझा निर्णय झालाय मी माझ्या आईवडिलांना सोडून कुठेही जाणार नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण त्याहीपेक्षा माझं माझ्या आईवडिलांवर जास्त प्रेम आहे. तू जा नंदू.. तुझं करियर कर.. खूप मोठी हो.. पण तुझ्या यशाच्या आड मी कधीही येणार नाही.. येतो मी..”
असं म्हणून तो नंदिनीच्या घरातून बाहेर पडला. नंदिनी त्याला आवाज देत होती पण तो थांबला नाही. वाट फुटेल तिकडे चालत राहिला. मनातून खूप दुःखीकष्टी झाला होता. मनात काहूर माजलं होतं.
“नंदू, तू इतकी स्वार्थी कधी झालीस? किती प्रेम केलं मी तुझ्यावर! प्रत्येक क्षणी तुझाच विचार केला आणि तू फक्त स्वतःचाच विचार केलास. मी ईश्वरीशी लग्न केलं पण तिला कधी माझं प्रेम दिलं नाही कारण मला वाटायचं की ती तुझ्याशी प्रतारणा होईल. तिची काय चुक होती? माझ्याशी लग्न करून तिला काय सुख मिळालं? पण तरीही माझ्या घरात सर्वांशी मिळुनमिसळून प्रेमाने वागत होती. माझ्या घरच्यांची काळजी घेतली. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या. निरपेक्ष भावनेने ती घरात राबत राहिली आणि मी काय केलं तिच्यासोबत?”
त्याच्या मनात पश्चाताप दाटून आला. डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. आपोआप डोळे बरसू लागले. तशाच अवस्थेत तो घरी पोहचला.
पुढे काय होतं? स्वराज कोणता निर्णय घेईल? 7पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा