पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४७

पुन्हा बरसला श्रावण



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४७

मोबाईलच्या स्क्रिनवर श्लोकचं नाव पाहून ईश्वरी गोंधळली. तिने कॉल कट केला आणि ती स्वराज जवळ आली. स्वराजने कॉफीचा मग कांदे पोह्यांची डिश तिच्या समोर धरली.

“थँक्यू..”

ती हसून म्हणाली. इतक्यात रूमच्या दारावर टकटक झाली.

“थांब मी बघतो..”

असं म्हणून स्वराज दाराकडे वळला. दार उघडताच समोर त्याला नंदिनी उभी असलेली दिसली. त्याने हसून तिला आत बोलावलं. नंदिनी आत आली.

“अरे नंदिनी ये ना.. कशी आहे तब्येत? ब्रेकफास्ट झाला तुझा? ये आमच्यासोबत कर.. बस इथे..”

असं म्हणत ईश्वरीने शेजारची खुर्ची ओढून नंदिनीला बसायला दिली आणि तिच्या समोर पोह्यांची डिश तिच्यात हातात दिली.

“थँक्यू गं.. जाम भूक लागली होती.. काल जेवलेच नव्हते बघ..”

पोह्यांचा एक घास तोंडात टाकत नंदिनी म्हणाली.

“का जेवली नव्हतीस? अजूनही बरं वाटत नाहीये का?”

ईश्वरीने प्रश्न केला.

“नाही.. तसं काही नाही.. मी एकदम ठीक आहे.. आणि काल स्वराज माझ्यासोबतच होता ना.. त्याने एकदम सॉलिड औषध दिलं ना.. आता मी एकदम ठणठणीत बरी झालेय.”

ती छद्मी हसली. ईश्वरीचा चेहरा पडला. पुन्हा तिच्या मोबाईलची रिंग झाली. नंदिनीचं तिकडे लक्ष गेलं. स्क्रीनवर श्लोकचं नाव दिसताच शंकेने तिच्या कपाळावर आठी पडली.

तिने खोचकपणे विचारलं,

“बॉयफ्रेंड?”

ईश्वरी फक्त हसली. नंदिनीच्या बुद्धीची, विचारांची तिला कीव करावीशी वाटली. ईश्वरी तिला उत्तर देणार इतक्यात स्वराज चिडून म्हणाला,


“काहीही काय बडबडतेस नंदू? मनात येईल ते बरळतेय.. तू कॉल घे बरं ईशु, तिच्याकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.”

नंदिनीच्या प्रश्नाचा स्वराजलाही राग आला होता. स्वराजच्या बोलण्याने ईश्वरीला नवल वाटलं. आजवर तिच्या दादासमोर, बाबांसमोर तिने कधीच मित्रांचे कॉल्स घेतले नव्हते. मित्रांसोबत बोलणं तिच्या घरात मान्यच नव्हतं. बुरसटलेल्या विचारसरणीत वाढलेल्या ईश्वरीसाठी ही आश्चर्याची बाब होती. ईश्वरीने कॉल घेतला. ईश्वरीने बोलायला सुरुवात केली.

“हॅलो, हं बोल श्लोक..”

“अगं कुठे आहेस? कधीपासून ट्राय करतोय तुझा फोनच लागत नाहीये..”

श्लोक वैतागून म्हणाला.

“पण झालं काय? तू का मला कॉल करतोयस?”

ईश्वरीने काळजीने विचारले.

“अगं कॉलेज सुरू होऊन आठ दिवस झाले. तुझा तपासच नाहीये. येणार आहे ना कॉलेजला?”

एकदम ईश्वरीला तिने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याची आठवण झाली. शालिनीताईंच्या आजारपणामुळे आणि घरातल्या कामाच्या व्यापामुळे ती पार विसरून गेली होती.

“अरे हो का? कधीपासून? आधी का नाही कॉल केलास तू? एनी वे.. आम्ही चेन्नईला आलोय. लवकरच निघू.. आपण भेटून बोलू..”

असं म्हणून तिने कॉल कट केला. स्वराज तिच्याकडे पाहत म्हणाला,

“काय झालं गं? कोणाचा कॉल? काही टेन्शन नाही ना?”

“नाही, नाही.. टेन्शन नाही.. ते मी तुम्हाला नाही का मागे म्हणाले होते, माझ्या एम कॉमच्या पहिल्या वर्षीच्या ऍडमिशनबद्दल..”

“हो.. तू म्हणाली होतीस.. त्याचं काय?”

स्वराजने तिच्याकडे पाहत विचारलं.

“अहो आठ दिवस झाले कॉलेज सुरू होऊन.. मला माहीतच नाही. खरंतर त्याने मला सांगितलं होतं पण मीच विसरून गेले.”

स्वराजला त्याने ईश्वरीसमोर मान्य केलेल्या गोष्टींची आठवण झाली. डोळ्यात चिंता दाटू लागली.

“अरे खरंच की! आपण तिला पुढच्या शिक्षणासाठी घरातून परवानगी मिळवून देऊ असं म्हणालो होतो.. माय गॉड.. आता काय करायचं? आईबाबांना कसं सांगायचं? ते ऐकतील?”

स्वराज चिंतेत पडला.

“आपल्याला लवकर निघायला हवं..“

ईश्वरीच्या बोलण्याने तो भानावर आला.

“हो.. निघूया.. मी तिकिटं बुक करतो. आताची करूया म्हणजे दुपारपर्यंत घरी पोहचू.”

घरी गेल्यानंतर ईश्वरीच्या कॉलेजचा विषय काढल्यावर काय रामायण होईल त्याला ठाऊक होतं. म्हणूनच त्यालाही लवकरच घरी पोहचायचं होतं.

“राज, माझंही तिकीट बुक कर.. तुझ्यासोबत मीही निघेन म्हणते.”

नंदिनी ईश्वरीकडे पाहून म्हणाली.

“अगं पण येताना तू एकटीच आली होतीस ना?”

स्वराज आश्चर्याने म्हणाला.

“मग मी एकटीनेच परत जावं अशी तुझी इच्छा आहे का? आता मला तुझ्यासोबत यायचंय. काही प्रॉब्लेम आहे का तुला?”

नंदिनीने त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली.

“मला काय प्रॉब्लेम असणार आहे? खुशाल ये.. मी तिकीट बुक करतो.”

असं म्हणत स्वराजने तिघांची प्लेनची तिकिटं बुक केली. तिघांनीही हॉटेलमधून चेकआऊट केलं. हॉटेलच्या बाहेर पडताच स्वराजने कॅब बुक केली. कार चेन्नई एअरपोर्टच्या दिशेने वेगाने निघाली. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहचले. चेकइन काउंटरवरच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून ते विमानाच्या दिशेने चालू लागले. तिघांनीही विमानात प्रवेश केला. सीट नंबर चेक करून स्वराज आणि ईश्वरी एकमेकांच्या शेजारी बसले आणि नंदिनी त्यांच्या मागच्याच बाजूला तिच्यासाठी स्वराजने बुक केलेल्या सीटवर जाऊन बसली पण तिचं लक्ष स्वराज आणि ईश्वरीकडेच होतं. ईश्वरीला त्याच्या शेजारी बसलेलं पाहून नंदिनीचा जळफळाट होत होता.

“ईश्वरी, तू मागे बस.. मला राजसोबत थोडं महत्वाचं बोलायचं आहे.”

नंदिनी ईश्वरीजवळ येऊन म्हणाली. स्वराजने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि त्याच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले.

“अगं पण..”

“ठीक आहे.. मी बसते मागे..”

स्वराज काही बोलण्याच्या आत ईश्वरी उठून मागे गेली. एअरहॉस्टेसच्या मदतीने सीट बेल्ट लावून घेतला आणि शांतपणे ती बाहेरचं दृश्य पाहत होती. मनातलं वादळ कधी डोळ्यातल्या अश्रूवाटे बाहेर येईल याचा काही नेम नव्हता.

“जो माझा नाही त्यासाठी वाईट का वाटून घ्यायचं? माझं ध्येय माझं शिक्षण, माझं करियर आहे. त्यावर मी फोकस करायला हवं. आता तर मला घर आणि कॉलेज या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत निदान काही महिने तरी.. माझा आणि स्वराजचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत तरी हे सगळं मॅनेज करावं लागेल.”

ती स्वतःला समजावत होती. नंदिनी स्वराजच्या शेजारी बसली. पुन्हा एकदा एक असुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकला. ईश्वरीसाठी स्वराजला वाईट वाटत होतं पण नंदिनीच्या हट्टी स्वभावापुढे त्याचा नाईलाज झाला होता. पुन्हा एकदा नंदिनीच्या वागण्याने ईश्वरी दुखावली गेली होती त्यामुळे त्याला अपराध्यासारखं वाटत होतं. नंदिनी बडबडत होती पण त्याचं तिच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत शांत बसून राहिला. थोड्याच वेळात विमान मुंबईला पोहचणार होतं. एअरहॉस्टेस तशी सूचना देऊन गेली. ते तिघेही विमानातून खाली उतरले आणि मुंबई एअरपोर्टच्या दिशेने चालू लागले. कधी एकदा घरी पोहचतोय आणि तिच्या लाडक्या सासूबाईंना म्हणजेच शालिनीताईंना भेटतोय असं ईश्वरीला झालं होतं. तिघेही एअरपोर्टच्या बाहेर आले.

“चलो राज, मी निघते आता माझ्या घरी.. इट वॉज व्हेरी मेमोरेबल जर्नी.. त्या रात्री तुझ्यासोबत घालवलेले ते रोमँटिक क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आता इथून पुढे आपल्या वाटा वेगळ्या.. वेगळ्या दिशेने जाणारा प्रवास आणि तोही एकट्याने करायचा..”

नंदिनी व्याकुळ होतं म्हणाली. तिने ईश्वरीकडे पाहिलं.

“पण लवकरच आपल्या मार्गातील अडथळा दूर होईल आणि आपला दोघांचा मार्ग एक होईल.. आपल्या दोघांचा प्रवास सुरू होईल..”

स्वराजच्या हातात हात गुंफत नंदिनी म्हणाली. तिच्या हातातून आपलं आत सोडवून घेत स्वराजने ईश्वरीकडे पाहिलं. निर्विकार चेहऱ्याने ती आजूबाजूला पाहत होती.

“ईश्वरी.. माझ्यासाठी एक काम करशील? तुमचा घटस्फोट होईपर्यंत माझ्या राजला सांभाळशील? सरदेसाईंच्या घरची सुन होण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. मीच येणार त्या घरात. तो पर्यंत राजची काळजी घेशील?”

नंदिनीच्या बोलण्याने ईश्वरी व्यथित झाली पण तोंडातून एकही शब्द न काढता ती शांत उभी होती.

“आपण निघायचं?”

तिने नंदिनीकडे दुर्लक्ष करत स्वराजला विचारलं. त्याने मान हलवून संमती दर्शवली. नंदिनीसाठी कॅब करून दिली. रस्त्यातच नंदिनीने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या गालावर ओठ टेकवत त्याच्या कानाजवळ येऊन हळूच पुटपुटली,

“आय लव्ह यू राज.. लव्ह यू सो मच..”

नंदिनीच्या अशा वागण्याने स्वराज गोंधळून गेला. त्याने नंदिनीला स्वतःपासून दूर केलं.

“काय करतेयस तू? आपण रस्त्यात उभे आहोत.. याचं तरी भान ठेव..”

स्वराज तिच्यावर चिडून म्हणाला ती खळखळून हसली. त्यानंतर स्वराजने नंदिनीला कॅबमध्ये बसवून दिलं. नंदिनी तिच्या घरी निघून गेली आणि मग ते दोघे दुसऱ्या कारमध्ये बसले. ईश्वरीला नंदिनीच्या वागण्याचा प्रचंड राग येत होता आणि मनाला यातनाही होत होत्या. ती कारमध्ये बसल्यापासून ते घरी पोहचेपर्यंत एका शब्दानेही स्वराजशी बोलली नव्हती. थोड्याच वेळात ते त्यांच्या घरी पोहचले. शालिनीताईंनी त्यांना दारातच अडवलं. त्या आश्चर्यचकीत होऊन म्हणाल्या,

“अरे लवकर आलात तुम्ही? कसं काय? सगळं ठीक आहे ना? तब्येत वैगेरे? नंदू, काय झालं बाळ?”

“काही नाही आई.. सगळं ठीक आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येत होती म्हणून थोडं लवकर आलो. काळजी करण्यासारखं काही नाही आई.. ”

ईश्वरी हसून म्हणाली. शालिनीताईंनी दोघांचं औक्षण केलं. दोघांच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून दाराबाहेर टाकला. ईश्वरी आणि स्वराज घरात आले. ईश्वरीने सर्वांना खाली वाकून नमस्कार केला. त्यांच्या येण्याने शालिनीताईंना खूप आनंद झाला होता. ईश्वरीने सर्वांची ख्वालीखुशाली विचारली. सर्वांसाठी घेतलेले गिफ्ट त्यांना दिले. सर्वांचा चेहऱ्यावरील आनंद पाहून ती अजूनच आनंदून गेली होती. गप्पा गोष्टी करण्यात, चेन्नईत पाहिलेल्या गोष्टीं सांगण्यात, काढलेले फोटो दाखवण्यात ईश्वरी रमून गेली. बोलण्याच्या नादात संध्याकाळ कधी झाली ईश्वरीला समजलंच नाही.

थोड्याच वेळात ईश्वरीने सर्वांसाठी चहा बनवून आणला आणि ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. सार्थक आणि सरदेसाई घरी येताच सर्वजण जेवायला बसले. ईश्वरीच्या हातच्या सुग्रास जेवणाचं कौतुक करत सर्वजण पोटभर जेवले. सर्वांची जेवणं झाली. हॉलमध्ये सर्वजण गप्पा मारत बसले होते. ईश्वरी शालिनीताईंच्या पायांच्या तळव्यांना कोमट तेल चोळून देत बसली होती. इतक्यात स्वराज शालिनीताई आणि सरदेसाईंकडे पाहून म्हणाला,

“आई, बाबा, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे परवानगी हवी आहे.”

स्वराजच्या वाक्यासरशी सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो बोलू लागला.

“आई, ईश्वरीला तिचं शिक्षण पुढे सुरू ठेवायचं आहे. तिला ऍम कॉम पूर्ण करायचं आहे. तुमची परवानगी असेल तर उद्यापासून ती कॉलेजला जाईल.”

सर्वजण आश्चर्याने स्वराजकडे पाहू लागले. सरदेसाईंचा चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. गायत्रीच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. सार्थक आणि शालिनीताई एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all