पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४४

पुन्हा बरसला श्रावण



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४४

थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी नंदिनीला तपासलं.

“काळजी करण्यासारखं काही नाही. थोडी ऍसिडिटी झालीय. मी मेडिसिन लिहून देतो ते घ्या. एक दोन दिवसांत बरं वाटेल त्यांना.”

असं म्हणत डॉक्टरांनी मेडिसिन लिहून दिलं.

“थँक्यू डॉक्टर..”

स्वराजने त्यांच्या हातातून प्रिसक्रिप्शन घेतलं. त्यांची फी देऊन तो औषधं आणण्यासाठी त्यांच्यासोबत रूमच्या बाहेर पडला. ईश्वरी नंदिनीचं डोकं चेपून देत तिच्या उश्याशी बसून होती. स्वराज आणि ईश्वरीचा बाहेर जाण्याचा प्लॅन फिसकटला म्हणून नंदिनीला मनातून आनंद होत होता.

“राज फक्त माझा आहे. त्याच्यावर फक्त माझा अधिकार आहे. माझं प्रेम मी कोणासोबत शेअर करणार नाही. कधीच नाही.. तू काहीही कर राजनंदिनी.. तो तुझा कधीच होऊ शकणार नाही. मी होऊ देणार नाही. इथे तर माझं नाव सुद्धा तुला दिलं त्याने. तुझं असं स्वतःचं काहीही नाही.. तुला त्याच्या आयुष्यातून जावंच लागेल.. मी तुला त्याच्या आयुष्यातून घालवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन. तो फक्त माझा आहे..”

नंदिनी ईश्वरीकडे पाहून मनातल्या मनात बोलत होती.

“हो तो फक्त तुझाच आहे नंदिनी..”

ईश्वरीच्या वाक्यासरशी नंदिनी आश्चर्यचकित झाली. ती जागेवरून उठून उशीच्या आधारे मागे सरकून बसली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलत गेले.

“हिला कसं कळलं? मनातल्या मनात बोललेलं ऐकू येतं की काय?”

ती आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत राहिली. ईश्वरी हसून म्हणाली,

“नंदिनी, स्वराज कायम तुझेच आहेत. त्यांना माझं बनवण्यात मला कोणतंच स्वारस्य नाहीये. तुला असा ड्रामा करण्याची खरंच काही गरज नव्हती. आम्ही माझ्या सासूबाईंच्या इच्छेखातर इथे आलो. त्या आजारी आहेत. त्यांच्या मनावर कोणताच ताण नको म्हणून आलोत. त्यांना दाखवण्यासाठी दोन चार फोटोज काढू तेपण त्यांची इच्छा आहे म्हणून आणि जाऊ घरी परत.. बाकी तू समजतेस तसं काही नाही..”

ती बोलत असताना स्वराज औषधं घेऊन आत येणार इतक्यात ईश्वरीचे शब्द त्याच्या कानावर पडले. तो जागीच थबकला.

“हो, मला माहित आहे की तुमच्यात तसं काही नाही ते काल रात्रीच समजलं मला स्वराजला सोफ्यावर झोपलेलं पाहून.. लग्नाला इतके दिवस होऊनही तू अजूनही त्याची झालेली नाहीस.”

नंदिनी छदमी हसत बेडवरून खाली उतरत म्हणाली.

“मला माहित आहे त्याचं फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम आहे. माझ्याशिवाय तो दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. इतकी वर्षे आम्ही एकत्र घालवलीत त्यामुळे इतकं तर मी नक्कीच खात्रीपूर्वक सांगू शकते. तू फक्त लग्न करून आणलेली शोभेची बाहुली आहेस. राजने नाईलाजास्तव फक्त त्याच्या आईसाठी तुझ्याशी लग्न केलं. तू जेंव्हा माहेरी निघून गेलीस तेंव्हा मला वाटलं होतं की, एका अर्थी बरंच झालं. आमचा मार्ग मोकळा झाला. पण नेमकं राजची आई आजारी पडली आणि आईखातर त्याला तुला परत आणावं लागलं. त्याच्या आईवडिलांनी आमच्या प्रेमाला विरोध केला नसता तर आज तुझ्या जागी मी असते. पण एक लक्षात ठेव, आमचं लग्न झालं नसलं म्हणून काय झालं आमचं नातं नवराबायको इतकंच जवळचं आहे. आमच्या नात्याला कसल्याही शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही पण एक दिवस आम्ही नक्की लग्न करू. तू आमच्या मार्गातून दूर हो.. नाहीतर त्याला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन.”

तिच्या चवताळून बोलण्यावर ईश्वरी शांतपणे म्हणाली,

“ठीक आहे, मग सांग तुझ्या राजला.. मला या नात्यातून मोकळं कर.. मलाही काही हौस नाही. विचार त्याला तो असं करू शकतो? स्वतःच्या प्रेमासाठी जो स्टॅन्ड घेऊ शकला नाही तो या नात्यातून मुक्त होण्यासाठी स्टॅन्ड घेईल? आहे त्याच्यात हिंमत? स्वराजला मिळवणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश कधीच नव्हता आणि कधीच नसेल. मला या नात्यातून मुक्त करायला सांग त्याला. माझं काहीही म्हणणं नाही.”

डोळ्यातलं पाणी आवरत ती म्हणाली.

“हो, मी त्याला सांगेनच पण तुही लक्षात ठेव म्हणजे झालं. लवकरच घटस्फोटाचे पेपर तुला मिळतील त्यावर निमूटपणे सही कर आणि आमच्या मार्गातून बाजूला हो समजलं?”

नंदिनीचा स्वर चढला होता. ती पुढे काही बोलणार इतक्यात स्वराज दार लोटून आत आला. त्याला समोर पाहून नंदिनी गप्प बसली. स्वराजने ओशाळून ईश्वरीकडे पाहिलं. उगीचच त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. तिचा गुन्हेगार असल्यासारखं वाटलं.

“नंदिनी, ही औषधं.. जा तुझ्या रूममध्ये.. जाऊन आराम कर.. मी मेल तयार करून पाठवतो तुला. तू एकदा चेक कर आणि पाठवून दे पुढे.. आता मी आणि ईश्वरी बाहेर जाणार आहोत.”

औषधांच्या गोळ्यांची पाकिटं नंदिनीच्या हातात देत स्वराज म्हणाला.

“अरे पण..”

“नंदिनी तुझ्या खोलीत जाऊन आराम कर.. कळतंय तुला?”

तो करड्या स्वरात म्हणाला तशी नंदिनी पाय आपटत खोलीच्या बाहेर पडली.

“मला कुठेही यायचं नाहीये.. तुम्ही जा तुम्हाला कुठे जायचं तिकडे. माझा अजिबात मूड नाहीये..“

ईश्वरी चिडून म्हणाली.

“शांत हो ईश्वरी.. मला माहित आहे तू नंदिनीमुळे फार दुखावली गेली आहेस. ती थोडी फटकळ आहे. कोणापुढे काय बोलावं तिला कळत नाही. तू प्लिज तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मी बोलेन तिच्याशी..”

स्वराज समजावणीच्या सुरात म्हणाला.

“नाही, नाही मुळीच नाही.. मी अजिबात मनावर घेत नाही. मी थोडी ना माणूस आहे? दगड आहे ना मी? मला थोडी मन, भावना आहेत? कोणीही या बोलून जा.. मी आहेच सगळं सहन करायला.. आणि काय बोलणार आहात तुम्ही तिच्याशी? माझ्या आयुष्यात इतकं मोठं वादळ तुम्ही आणलंत.. आता काय करणार आहात तुम्ही? स्वराज, प्लिज मला नाही सहन होत हे.. मला या नात्यातून मुक्त करा.. नंदिनीच्या म्हणण्याप्रमाणे घटस्फोटाचे पेपर्स तयार करा.. मी तयार आहे त्या पेपर्सवर सही करायला.. तुम्हीही सुटाल आणि मीही..”

तिच्या डोळ्यात पाणी साठू लागलं. तिचं निर्वाणीचं बोलणं ऐकून आणि डोळ्यातलं पाणी पाहून स्वराजला गलबलून आलं.

“ईश्वरी, त्याचा विचार आता नको.. मी बोलेन नंदिनीशी. तू काळजी करू नकोस. मी करेन सगळं नीट.. आणि मला सांग आपण इथे का आलो आहोत? आईबाबांना चांगलं वाटावं म्हणूनच ना! मग निदान तसं भासवण्यासाठी तरी चल.. प्लिज ना ईशु..”

स्वराजच्या तोंडी \"ईशु’ नाव ऐकताच तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिला आर्जवे करत होता. त्याचा उदास चेहरा पाहून ती बाहेर जाण्यास तयार झाली.

“मी एवढं काम संपवतो मग निघू आपण.. तोपर्यंत तू आराम कर हं..”

ईश्वरीने मान डोलावली आणि ती बाल्कनीत जाऊन बाहेरचं दृश्य पाहत उभी राहिली. बाहेर बाल्कनीतून दिसणारा तो उधाणलेला समुद्र पाहून तिला खूप भरून आलं. डोळ्यातला श्रावण आपोआप बरसू लागला. स्वराजने पटकन नंदिनीचा मेल तयार केला आणि तिला पाठवून दिला. त्यानंतर त्याने नंदिनीला कॉल केला. नंदिनीने हॅलो म्हणताच त्याने बोलायला सुरुवात केली.

“मेल पाठवलाय तुला.. एकदा चेक करून घे आणि पुढे पाठवून दे.. व्यवस्थित जेवण कर.. वेळेवर औषधं घे आणि आराम कर.. आम्ही येऊ संध्याकाळपर्यंत..”

“अरे पण ती नको म्हणतेय ना? तरी तू का घेऊन जातोयस तिला? की तुलाच तिला घेऊन जायचं आहे, आजारी आईचं निमित्त सांगून? माझा कंटाळा आलाय का आता?”

नंदिनी चिडून म्हणाली.

“स्टॉप इट नंदू.. काहीही काय मूर्खासारखं बरळतेयस.. आजारी आईचं कारण सांगून मी का असं करेन? सी नंदू.., जे झालं त्यात ईश्वरीचा काहीही दोष नाही. तिला दुःख देण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.. तिला तिच्या घरी सुखरूप जाऊ दे.. मग ठरवू काय ते पण आता तिला वाईट वाटेल असं वागायला नको आपण..जरा धीर धर.. याविषयावर नंतर बोलू आपण..”

स्वराज बोलत असताना ईश्वरी आत आली.

“का? बराच पुळका आलेला दिसतोय तुला तिचा.. तिच्या विषयी एवढी सहानभूती, एवढा जिव्हाळा.. का आणि कशासाठी?”

नंदिनी चिडून म्हणाली.

“तू शांत बस.. बोलू नंतर..”

असं म्हणून त्याने पटकन कॉल कट केला.

“चल निघायचं?”

त्याने ईश्वरीला विचारलं. ईश्वरीने मान डोलावली आणि दोघेही बाहेर पडले. हॉटेलच्या बाहेरच कॅब बुक केली. कार येताच दोघेही आत बसले. कार मंदिराच्या दिशेने वेगाने धावू लागली.

इकडे मात्र नंदिनीचा राग उफाळून आला.

“राज तू मला असं इग्नोर करू शकत नाहीस. मी आणि मीच तुझी फर्स्ट प्रोयोरिटी असायला हवं.. तू माझा आहेस आणि मी तुला मिळणारच. बाय एनी कॉस्ट.. समजलं तुला?”

तिने चिडून मोबाईल बेडवर आपटला.

पुढे काय होतं? नंदिनी पुढे कोणतं पाऊल उचलेल? ईश्वरी आणि स्वराज एक होऊ शकतील का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all