पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४२

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४२


पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, ईश्वरी आणि स्वराज चेन्नईला फिरायला जाण्यासाठी तयार होत होते. शालिनीताईनी ईश्वरीसाठी सुंदर ड्रेस गिफ्ट केला होता. ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी मागे टाकण्यास सांगून स्वराजलाही ईश्वरीची काळजी घेण्यास सांगितली. घरातल्या सर्वांचा निरोप घेऊन ते दोघे मुंबई एअरपोर्टला पोहचले. ईश्वरीचा हा पहिलाच विमानप्रवास होता त्यामुळे ती खूप घाबरून गेली होती. स्वराज तिला धीर देत होता आता पुढे..

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४२

ईश्वरीने सावकाश डोळे उघडले. तिने पाहिलं, तिने स्वराजचा हात घट्ट पकडून ठेवला होता. भानावर येताच तिने पटकन तिचा हात बाजूला काढला. स्वराजलाही अवघडल्यासारखं झालं. एअर हॉस्टेस अधून मधून येऊन चौकशी करून जात होती. ती विमानाच्या खिडकीतून बाहेर नवलाईने पाहत होती. तिच्यासाठी हे सारं नवीन होतं. एखादी गोष्ट पहिल्यांदाच पाहत असल्यावर लहान मुलांना जसा आनंद होतो तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिच्यातलं लहान मुलं आनंदाने टाळ्या पिटत होतं. स्वराज तिच्याकडे पाहत होता. एरवी धीर गंभीर वाटणारी ईश्वरी आज लहान मुल असल्यासारखं वागत होती. स्वराजला तिचं असं लहान मुल होऊन वागणं आश्चर्यचकित करत होतं. तो दुसरीकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. तो तिच्याकडे पाहून हसतोय ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आली. तिलाही तिच्या वागण्याचं हसू आलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली. ईश्वरी आता स्वराजशी मनमोकळेपणाने बोलू लागली.

“साधारण किती वेळ लागेल आपल्याला चेन्नईला पोहचायला?”

“दोन सव्वा दोन तासात पोहचू..” - स्वराज

“तुम्हाला सवय असेल नां विमान प्रवासाची?”- ईश्वरी

“हो.. तू पहिल्यांदाच असा प्रवास करतेयस नां?”

त्याने विचारलं. तिने मान डोलावली.

“तुला आवडतं फिरायला?” - स्वराज

“हो.. खूप आवडतं.. त्यातल्या त्यात ऐतिहासिक स्थळं पाहायला, त्या मागचा इतिहास जाणून घ्यायला.. आणि ना..”

ती भरभरून बोलत होती. खरंतर तुला काय आवडतं असं पहिल्यांदाच कोणीतरी विचारलं होतं. तोही मन लावून ऐकत होता.

“आणि काय?”

स्वराजने प्रश्न केला. ती सांगू लागली.

“मला म्युजिक आवडतं.. जुन्या शांत गाण्यांची मी वेडी आहे फार.. मराठी नाटकं पाहायला आवडतं.. मला कविता लिहायला, वाचायला आवडतं.. मराठी इंग्लिश नॉवेल्स वाचायला आवडतात. आताही मी तुमच्या कपाटातून दोन पुस्तकं आणलीत वाचायला. कवितेसाठी तर मला कॉलेजमध्ये असताना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं पण घरी कोणालाच याबद्दल काहीच माहीत नाही. घरी फारसं कोणाला आवडत नाही. वेळ घालवणं वाटतं त्यांना. मला नृत्यकला फार आवडते. गाण्याच्या तालावर आपोआप पावलं थिरकतात न.. पण घरी चालत नाही. देशमुखात बायका नृत्य करत नाहीत ना.. एकदा असंच घरात कोणी नाही पाहून मी दार लावून टेपरेकॉर्डर लावून एकटीच नाचत होते. बाबांनी खूप मारलं होतं. तेंव्हापासून नाचले नाही कधी..”

तिचे डोळे पाण्याने भरले होते. ती पुढे सांगू लागली.

“मला ना.. पाऊस खूप आवडतो.. पावसात चिंब होताना, ते थेंब अंगावर झेलताना मी भान हरपून जाते. ओल्या मातीचा तो सुगंध मनाला वेड लावतो.. दरवळणाऱ्या मोगऱ्याचा, प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध मला खूप आवडतो.. समुद्रकिनारी ओल्या वाळूत फिरायला फार आवडतं.. चांदण्या रात्रीत त्या चंदेरी प्रकाशात चांदणं मोजायला आवडतं.. तुम्हाला सांगते..”

ती क्षणभर थांबली. आपण एकटेच वेड्यासारखं बडबडतोय तिच्या लक्षात आलं आणि जीभ चावत ती म्हणाली,

“सॉरी हं.. मी एकटीच बडबडतेय.. तुम्हाला बोलण्याची संधीच दिली नाही. खरंच सॉरी..”

“नाही गं.. तसं काही नाही.. बोलत रहा.. मनातल्या गोष्टी शेअर कराव्यात मग तो आनंद असो वा दुःख.. वाटल्याने दुःख कमी होतं आणि सुख, आनंद द्विगुणित होतो.. समजलं?”

स्वराज हसून म्हणाला.

“तुम्ही सांगा.. तुमच्याबद्दल.. तुम्हाला काय आवडतं?”

तिने त्याला विचारलं.

“मला असं स्पेसिफिक सांगता येणार नाही पण मला पुस्तकं वाचायला, संग्रह करून ठेवायला फार आवडतं. आपल्या घरातल्या पुस्तकांच्या कपाटावरून तुझ्या लक्षात आलंच असेल. कॉलेजमध्ये असल्यापासून मला बोलण्याची, गप्पा मारण्याची, असंख्य मित्र बनवण्याची, फिरायला जाण्याची खूप आवड आहे. तुझ्यासारखंच मला जुनी गाणी गायला ऐकायला.. मला हॉकी खेळायला आवडतं.. तसंच मला बुद्धिबळ फार छान जमतं. फिरायला तितकं आवडत नाही.. पण शांत ठिकाणी, निसर्गाच्या सानिद्यात जायला आवडतं. कोकण माझं फेव्हरेट ठिकाण.. श्रीवर्धनचा समुद्र माझा जीव की प्राण! नेहमी जातो मी खास सुट्टी काढून.. नंदूलाही कोकण फार आवडतं..”

पटकन चमकून त्याने ईश्वरीकडे पाहिलं. त्याच्या तोंडी नंदिनीचं नाव होतं.

“सॉरी, चुकून..”

तो थोडा वरमला. अनावधानाने का असेना आपण ईश्वरीचं मन दुखावतोय असं त्याला वाटलं.

“इट्स ओके स्वराज.. काही हरकत नाही.. बरं तुमची आणि नंदिनीची ओळख कशी झाली? कुठे भेटलात? लव्ह ऍट फर्स्ट साईट ऑर व्हॉट?”

तिने स्वराजला विचारलं. स्वराज सांगू लागला.

“नंदिनी आणि माझी लव्ह स्टोरी फारच जुनी बघ.. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आम्ही एकत्र होतो. दिसायला अतिशय देखणी, पाणीदार डोळे.. गोऱ्या रंगाची, कुरळे केस, आधुनिक विचारसरणी, चालण्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास.. एकदा का एखादी गोष्ट मनात आली तर करणार म्हणजे करणारच.. प्रचंड हुशार आणि तितकीच हट्टीसुद्धा.. ते म्हणतात नं ब्युटी विथ ब्रेन.. असंच काहीसं होतं तिच्याबाबतीत. कॉलेजमध्ये असताना कॉलेजमधली बहुतांशी मुलं तिच्या मागे लागली होती. मलाही ती फार आवडायची. तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास मला फार आवडायचा. आपला मुद्दा पटवून सांगायला तिला छान जमायचं. ती बोलायला लागली की फक्त तिचं बोलणं ऐकावंसं वाटायचं.. मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. आपल्या समाजातल्या मुली कशा लाजऱ्याबुजऱ्या, स्वतःचे निर्णय घेऊ नं शकणाऱ्या, पुरुषांवर अवलंबून असलेल्या.. पण ती मात्र स्वावलंबी होती. स्वबळावर तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं, जॉब मिळवला. तिच्या त्या बिनधास्त वागण्याबोलण्याच्या मी कधी प्रेमात पडलो, माझं मलाच समजलं नाही. खरंतर तिला प्रपोज करण्याची माझ्यात हिंमत नव्हती उलट तिनेच आमच्या सर्व मित्रमैत्रिणींसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि मला प्रपोज केलं. मी फार खुश होतो. कॉलेज क्वीन माझ्या प्रेमात होती. कॉलेजची सोनेरी चार वर्षे किती सुंदर गेली म्हणूं सांगू! लॉन्ग ड्राईव्ह, हॉटेलिंग, शॉपिंग तिला फार आवडायचं. मला नाही शॉपिंगचं जास्त वेड पण तिला आवडतं म्हणून मी जायचो, तिला कम्पनी द्यायचो.”

स्वराज भरभरून बोलत होता. ईश्वरीही मन लावून ऐकत होती.

“नंदिनीचं माझ्यावर खूप प्रेम होतं म्हणजे अजूनही आहे..”

तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

“मग पुढे काय झालं? आई बाबांना ती आवडली नव्हती? लग्न का नाही केलंत?”

ईश्वरीने कुतूहलाने विचारलं.

“समाज ईश्वरी.. समाज.. आईवडिलांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता. ती ब्राम्हण होती आणि आपण मराठा देशमुख.. तिचं आधुनिक राहणीमान बाबांना मान्य नव्हतं.. तिचे बोल्ड विचार त्यांना रुचले नाही. बाबांनी कडाडून विरोध केला पण आईचं तसं काही नव्हतं. पण तिला नंदिनी आवडली नव्हती.”

“पण तुम्हाला आवडली होती ना? मग तुम्ही का नाही स्टॅन्ड घेतलात आपल्या प्रेमासाठी?”

त्याने तिच्याकडे चमकून पाहिलं. एरवी शांत वाटणारी ईश्वरी आता थोडी आक्रमक वाटली. स्वतः साठी स्टॅन्ड का घेतला नाही असं ती विचारत होती. त्याला थोडं नवल वाटलं.

“नाही घेऊ शकलो गं.. घर सोडूनही जाण्याचा प्रयत्न केला. नंदिनी तयार होती माझ्यासोबत घर सोडून यायला.. तिनेच गळ घातली होती पळून जाऊया म्हणून पण मीच नात्यांच्या बंधनात गुरफटून गेलो. आईच्या प्रेमाने पायात दोरखंड पडले. आईने शपथ घातली. जीव देण्याची धमकी दिली आणि म्हणून मग मी माघार घेतली.”

त्याने सुस्कारा टाकला. डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला,

“काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात..”

“हम्म..”

तिने हुंकार भरला. मग त्याने विचारलं,

“तुला नाही आवडलं कोणी कॉलेजमध्ये? कोणावर प्रेम?”

ती स्मित हास्य करत म्हणाली,

“देशमुख आहोत ना! देशमुखांच्या मुलींना असं काही करण्याचा अधिकार असतो का?”

तिने प्रश्न केला. त्याने शरमेने खाली मान घातली.

“खरं सांगू! कॉलेजमध्ये असताना वाटायचं कुणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं.. आपली काळजी करणारं, मायेने जवळ घेणारं.. असं कुणीतरी हवं, ज्याच्याजवळ मनातलं सगळं सगळं सांगता येईल कशाचीही भीड न बाळगता.. स्वराज, आपण कोणालातरी आवडतो ही भावनाच खूप सुखावणारी.. तुम्ही खरंच नशिबवान आहात, नंदिनीसारखी तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला भेटली आणि आजही ती तुमच्यासोबत आहे. स्वराज, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात.. पण मी दुःख करत बसत नाही कारण आजवर जे मला मिळालं त्यात मी आनंदी आहे. परिस्थितीप्रमाणे बदलायला मी शिकलेय अगदी माझ्या लहानपणापासून.. आणि खरंतर माझा फोकस क्लिअर होता. मला खूप शिकायचं होतं. बाकीच्या गोष्टींसाठी वेळच नव्हता माझ्याकडे.. विचार केला.. प्रेम, मैत्री वैगेरे कुठे पळून जाणार आहे का? ते करायला आयुष्य पडलंय असं वाटायचं मला.. पण आता वाटतंय..“

ती क्षणभर बोलता बोलता अडखळली. स्वराजने ओशाळून ईश्वरीला विचारलं,

“ईश्वरी, तुला माझा खूप राग येत असेल ना?”

गळ्यात दाटून आलेला आवंढा गिळत ती हसून म्हणाली,

“खरं सांगू? पहिल्यांदा मला तुमचा प्रचंड राग आला होता. आपण फसले गेलो ही भावना खूप तीव्र होत गेली. संताप, चीड उफाळून आला पण मग नंतर शांत झाले. शांत चित्ताने विचार केला तेंव्हा लक्षात आलं, माझा फोकस माझं शिक्षण, माझं करियर होतं, आजही आहे. मग त्या पुढे प्रेम वैगेरे गोष्टी गौण वाटू लागलं आणि स्वराज, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी वाटतं जी गोष्ट आपली असते ती फिरून आपल्याकडेच येते आणि जी येत नाही ती आपली नसतेच कधी.. मग सांगा जे आपलं नाहीच तर मग त्यासाठी हट्टहास का? का इतका जीवाचा आटापिटा करायचा?”

डोळ्यात दाटून आलेलं पाणी लपवण्यासाठी तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली. स्वराजच्या मनात कालवाकालव सुरू झाली. एका विचित्र वेदनेने तो कळवळला. पुढे काय बोलावं त्याला सुचेना. काही वेळ असाच शांततेत गेला. इतक्यात एअर हॉस्टेसने सूचना दिली. विमान लवकरच चेन्नईला पोहचणार होतं.

दोघेही विमानातून खाली उतरले. आणि चैन्नई एअरपोर्टच्या दिशेने चालू लागले.

“राज..”

कुणीतरी स्वराजला मागून आवाज दिला. स्वराजने मागे वळून पाहिलं.

पुढे काय होतं? कोण होती ती व्यक्ती? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all