पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४०

पुन्हा बरसला श्रावण



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४०

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, शालिनीताईना ईश्वरीच्या रूपाने लेक मिळाली म्हणून त्या खुश होत्या. स्वराजने ईश्वरीसमोर मैत्रीचा हात पुढे केला. ईश्वरी आणि स्वराजच्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात झाली आता पुढे..

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४०

सकाळ झाली. पाखरांच्या किलबिलाटाने ईश्वरीला जाग आली. तशी तिला पहिल्यापासूनच लवकर उठायची सवय होती. त्यामुळे तिला लवकर उठण्याचा फारसा त्रास झाला नाही. सर्वांच्या आधी उठून स्नानादी उरकून ती तयार झाली. त्यानंतर पूजेसाठी सोसायटीतल्या बागेतून ताजी फुलं वेचून आणली. ताज्या टवटवीत फुलांचा सुगंध तिला फार आवडायचा. ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध श्वासात भरून घेताना तिला खूप प्रसन्न वाटायचं. तिने फुलं वेचून परडीत भरली आणि ती पुढच्या कामाला लागली. तिचा रोजचा दिनक्रम सूरू झाला. स्वराज आणि सार्थकचा डबा, सर्वांचा नाष्टा, चहा, कॉफी करणं सुरू होतं. तसं तिला मदत करण्यासाठी घरकामासाठी, स्वयंपाकासाठी बायका होत्या पण ईश्वरीला सर्वांच्या आवडीनिवडी जपायला आवडायचं. सर्वांच्या वेगवेगळ्या फर्मायशी सुरू व्हायच्या. सरदेसाईंना फ्रेश झाल्या झाल्या पहिला चहा लागायचा. त्यांनी ईश्वरीला मोठ्या आवाजात हाक मारली.

“नंदिनी, माझा चहा?”

“हो, आणते बाबा..”

ईश्वरी किचनमधून आवाज दिला. इतक्यात शालिनीताईंनी ईश्वरीला आवाज दिला,

“नंदू, माझी पूजेची तयारी झाली?”

“हो, आई सगळं पूजेचं साहित्य देवघरात ठेवलंय.. बाबा, हा तुमचा चहा..”

ईश्वरी स्मित हास्य करत चहाचा कप सरदेसाईंच्या हातात देत म्हणाली.

“थँक्यू बेटा..”

सरदेसाईं हसून तिच्या हातातला कप घेत म्हणाले. इतक्यात बाहेरून वॉक करून आलेल्या सार्थकने आवाज दिला.

“गायत्री, माझा मिल्कशेक?”

“भावोजी, समोरच ठेवलाय.. टीपॉयवर आहे बघा..”

ईश्वरी किचनमध्ये जात म्हणाली.

“अरे तू का केलंस? गायत्री कुठेय? अजून उठली नाही?”

सार्थकने प्रश्न केला.

“तुझी बायको तर काय बाबा, नंदिनी आल्यापासून कसल्या कामाला हात लावायचं नावच घेत नाहीये.. झोपली असेल बघ अजून.. जा आधी उठव तिला.. एकटी पोर ती! किती आणि काय काय करेल?”

शालिनीताई देवघरात बसल्या जागेवरून ओरडून म्हणाल्या.

“राहू देत आई, झोपू देत त्यांना. दमल्या असतील. मी करेन सगळं..“

ईश्वरीने हसून उत्तर दिलं.

“नंदिनी, तू तिला अशी सवय लावू नको बरं.. नाहीतर ती आळशी होईल आणि जाडजुड पण..”

सार्थक मिश्किलपणे हसून म्हणाला तशी ईश्वरी गालातल्या गालात हसली. इतक्यात गायत्री तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने सार्थकचं बोलणं ऐकलं. सार्थककडे रागाने पाहत ती ईश्वरीला म्हणाली,

“नंदू, माझी कॉफी?”

“हे घ्या वहिनी..”

ईश्वरीने तिच्या हातात कॉफीचा मग दिला. कॉफीचा घोट घेत नाक मुरडत गायत्री म्हणाली,

“इतकी वर्षे मी मोठी सुन म्हणून माझी जबाबदारी पार पाडली पण आजवर मी केलेली कामे कोणाला दिसली नाहीत बरं.. पण आता आमच्या धाकट्या जाऊबाईंनी जरा कुठे कामाला सुरुवात केली तर लगेच सर्वांना दिसलं. जाऊ दे.. पण मी ठरवलंय आता नंदिनी घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळेल. मोठी जाऊ म्हणून मी आता फक्त आराम करणार.. माझी जबाबदारी बऱ्यापैकी संपलीय असं वाटतं मला.. हो की नाही नंदिनी?”

तिने ईश्वरीकडे पाहिलं. ईश्वरीने हसून मान डोलावली. गायत्रीकडे पाहत हातांच्या बोटांचा मोर वर्तुळकार फिरवत शालिनीताई देवघरातून बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसत म्हणाल्या,

“पण मोठया जाऊबाईचा अधिकार मात्र गाजवणार तू..”

शालिनीताईंच्या बोलण्याकडे गायत्रीने साफ दुर्लक्ष केलं. इतक्यात बाहेर येत स्वराजने शालिनीताईंना आवाज दिला.

“आई, माझा डबा..”

ईश्वरीने टिफिन त्याच्या हातात आणून दिला.

“थँक्यू.. चल आई, मी निघतो.. तू वेळेवर जेवण कर आणि औषधं घेण्याचा अजिबात कंटाळा करू नकोस. समजलं?”

स्वराज ईश्वरीच्या हातून टिफिन घेत आईला थोडंसं रागे भरत म्हणाला आणि लगबगीने ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला. थोड्याच वेळात तयार होऊन सार्थकही घराबाहेर पडला.

हळूहळू ईश्वरी सरदेसाईंच्या कुटुंबात रमू लागली. सासरे थोडे कडक स्वभावाचे पण शालिनीताईंच्या मायेची ऊब तिला मिळत होती. अनघाचे संस्कार तिच्यात पुरेपूर रुजले होते. तिच्या सालस लाघवी स्वभावाने तिने सर्वांची मनं जिंकली होती. सासुसासऱ्यांची ती लाडकी सुनबाई नव्हे तर लेक झाली होती. स्वराज आणि तिच्यात मैत्रीचं नातं रुजू पाहत होतं.

एक दिवस आपल्या खोलीत दुपारची वामकुक्षी घेत असताना शालिनीताईंनी सरदेसाईंसमोर विषय काढला.

“अहो, ऐकलंत का? आपल्या स्वराजचं लग्न होऊन दोन महिने उलटून गेले. किती भुर्रकन दिवस निघून गेले नाही! पण बघा ना, दोघांना असा निवांत वेळ मिळालाच नाही. ते दोघे फिरायलाही कुठे गेले नाहीत. खरंतर तर लग्नानंतर त्यांनी कुठेतरी फिरायला जायला हवं.. हनिमून का काय म्हणतात ते.. अजून बाकी आहे त्यांचं..”

हे सांगताना त्या लाजल्या आणि पुढे म्हणाल्या.

“हे माझं आजारपण आलं आणि तो विषय तिथेच बारगळला पण आता आपण ही चुक सुधारायची बरं का?”

शालिनीताईंकडे पाहत सरदेसाई म्हणाले,

“हो राणीसरकार.. तुमच्या मनातलं आम्ही आधीच ओळखलं होतं बरं का? हे पहा काय आहे?

असं म्हणत त्यांनी कपाट उघडून एक पाकीट बाहेर काढलं.

“काय आहे हे?”

त्यांनी प्रश्नार्थक नजरेने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं.

“आपल्या मुलांना आपल्याकडून एक गिफ्ट.. चेन्नईच्या प्रवासाची विमानाची दोन तिकिटं आणि ही हॉटेल बुकिंगची. दोन दिवस दोन रात्री स्टे करायचा. मस्त फिरून घरी यायचं. तोवर आपणही अष्टविनायकाच्या तीर्थयात्रेला जाऊन येऊ.. काय म्हणतेस?”

“व्वा छानच ओ! हे कधी केलंत तुम्ही? छुपेरुस्तम निघालात की!”

शालिनीताई हसून म्हणाल्या. दारावरून तिच्या खोलीकडे जाताना ईश्वरीच्या कानावर त्यांचे शब्द पडले.. त्यांचा बोलण्यातून ते स्वराज आणि तिला फिरायला बाहेर पाठवणार असं दिसत होते. ईश्वरीचा चेहरा काळजीने भरून गेला.

रात्रीच्या जेवणानंतर सरदेसाईंनी स्वराजपाशी विषय काढला.

“स्वराज, तुझ्या लग्नानंतरचा बराच काळ धावपळीत गेला. तुझ्या आईचं आजारपण अचानक ओढवल्याने तुमचं बाहेर फिरायला जाणं लांबणीवर पडलं. तुला आणि नंदिनीला एकत्र वेळ घालवता आला नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलंय..”

“काय?”

स्वराजने प्रश्न केला. सरदेसाईंनी शालिनीताईंकडे पाहिलं तसं त्यांनी स्वतः जवळचं पाकिटं त्याच्यासमोर धरलं आणि हसून म्हणाल्या,

“हे घे.. विमानाची तिकिटं चेन्नईच्या प्रवासाची.. आणि हॉटेल बुकिंगची सुद्धा आहेत.”

त्याने आश्चर्याने एकदा आईबाबांकडे पाहिलं आणि नंतर ईश्वरीकडे पाहिलं.

“आई हे कशासाठी? आता मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत. सुट्टीही मिळणार नाही.. तुझी तब्येत ठीक नसते.. आम्ही आता जाणार नाही कुठेच.. नंतर पाहू..”

तो स्वतःला सावरत म्हणाला.

“हो आई, आम्ही बाहेर गेलो तर तुमची काळजी कोण घेईल? तुमचं पथ्यपाणी कोण पाहिल? मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये..”

त्याच्या बोलण्याला दुजोरा देत ईश्वरी निक्षुन म्हणाली.

“नाही.. आम्ही बिलकुल ऐकणार नाही.. स्वराज तुला सुट्टी घ्यावीच लागेल.. तुम्हालाही निवांत वेळ कधी मिळणार? हेच दिवस असतात मौजमज्जा करण्याचे.. परत आहेच की हे संसाराचे रहाटगाडगे..
तुम्ही अजिबात आमची काळजी करू नका..इथे आहेत ना बाकीचे.. तुम्ही जा.. मस्त फिरून या..”

शालिनीताईंही आपला हेका सोडायला तयार नव्हत्या. अखेर दोघांनी मिळून स्वराजला फिरायला जाण्यासाठी तयार केलं.

“ठीक आहे.. आई, तुझी तशी इच्छा आहे तर जातो आम्ही..”

त्याने ईश्वरीकडे पाहिलं. तिला स्वराजचा प्रचंड राग आला होता. सारा राग गिळून ती शांतपणे उभी होती. शालिनीताई बोलत होत्या. जुन्या आठवणी सांगत होत्या. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारून सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले.

खोलीत येताच ईश्वरी त्याच्यावर बरसली.

“काय गरज होती तुम्हाला आईंना हो म्हणायची? मी तुमच्याबरोबर कुठेच येणार नाही? कशाला उगीच हे असले नसते व्याप करायचेत? तुम्ही सांगा काहीतरी आईंना.. ईश्वरी नको म्हणतेय.. माझी तब्येत ठीक नाही वैगरे.. पण मी तुमच्यासोबत येणार नाही..”

ती प्रचंड संतापलेली होती. तिला समजावणीच्या सुरात स्वराज म्हणाला,

“हे बघ, तुला माहित आहे, मलाही जायचं नव्हतं पण मी नाही म्हणालो असतो तर तिला संशय आला असता.. आपल्यात काही मतभेद आहेत असं वाटलं असतं. आई आताच आजारपणातून उठलीय. तिला मनःस्ताप नको नं व्हायला.. तू समजून घे ना जरा.. आईची इच्छा आहे.. मला तिचं मन मोडवेना.. आपण सुखी राहावं हीच तर तिची इच्छा आहे. वाटल्यास चार दिवसांऐवजी दोन दिवसांत परत येऊ.. ठीक आहे?”

ईश्वरीच्या रागाचा पारा खाली उतरू लागला. तिनेही थोडा विचार केला.

“घरातलं वातावरण आनंदी असायला हवं असेल आणि आईंच्या प्रकृती अशीच राहावी असं वाटत असेल तर आपल्यातले मतभेद सर्वांसमोर यायला नकोत. हे नातं कोणाला समजायला नको.. आपल्यात सगळं काही ठीक आहे असंच भासवायला हवं.. ठीक आहे.. जाऊ आपण..”

ईश्वरी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all