पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३६

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३६

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, ईश्वरीने तिच्या पुढच्या शिक्षणाचा निर्णय घरी सांगितल्यावर विनायक खूप संतापला होता पण आदित्यची त्यावर शांत प्रतिक्रिया पाहून ईश्वरीला खूप नवल वाटलं. अनघाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ईश्वरीला स्वराजचं सत्य अनघाला सांगावंसं वाटत नव्हतं. गायत्रीकडून सरदेसाई आणि शालिनीताईंना स्वराजचं सत्य समजल्यावर त्यांना प्रचंड दुःख आणि संताप झाला. बाप लेकाची भांडणं सोडवत असताना अचानक शालिनीताईंच्या छातीत कळ आली आणि त्या खाली जमिनीवर कोसळल्या. आता पुढे..


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३६

शालिनीताईंना ताबडतोब अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि उपचार करण्यास सुरुवात झाली. संपूर्ण सरदेसाई कुटुंब अतिदक्षता विभागाच्या बाहेर बसले होते. स्वराज प्रचंड काळजीत होता. त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. आईला हरवण्याच्या भीतीने जीव कासावीस झाला होता. त्याने दोन्ही हात जोडून ईश्वराला स्मरण केलं,

“देवा, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या आईला देऊ नको रे.. तिला काही होऊ देऊ नको रे देवा.. ती म्हणेल तसं वागेन मी.. तिचं सगळं सगळं ऐकेन मी.. आईला सुखरूप ठेव.. तिची रक्षा कर.. प्लिज ईश्वरा..”

स्वराज मनोमन ईश्वराला आर्जवे करत होता. डोळ्यातून मेघ झरू लागले. नर्स, डॉक्टरांची धावपळ सुरू होती. अतिदक्षता विभागात शालिनीताईंवर प्राथमिक उपचार सुरू झाले. शालिनीताईंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. दिवसभर हसतखेळत साऱ्या घरभर वावरणाऱ्या शालिनीताई आता हॉस्पिटलच्या बेडवर अतिशय चिंताजनक स्थितीत पडल्या होत्या. तोंडावर ऑक्सिजन मास्क चढवलेला होता. डॉक्टरांनी तातडीने एन्जॉग्राफी केली. त्यात त्यांना ब्लॉकेज दिसून आले. डॉक्टरांनी स्वराज आणि कुटुंबियांना त्याची कल्पना दिली आणि ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. सरदेसाई कुटुंबाने अगदी क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलच्या प्रक्रिया पूर्ण केल्या. ऑपेरेशनची तयारी करण्यात आली. एन्जॉप्लास्टी करून ब्लॉकेज काढण्यात आले. रात्रभर सर्वजण खूप टेन्शनमध्ये होते. बऱ्याच तासांनी ऑपरेशन थिएटरच्या दारावरचा लाल दिवा बंद झाला. दार उघडून डॉक्टर देवधर बाहेर आले. स्वराज खुर्चीतून उठून धावतच त्यांच्याकडे गेला.

“डॉक्टरसाहेब, आई..”

स्वराजने काळजीने विचारलं

“नाऊ शी ईज आऊट ऑफ डेंजर.. रिलॅक्स..”

डॉक्टर देवधर स्वराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. स्वराज कृतज्ञपणे त्यांच्यासमोर हात जोडून समोर उभा होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

“मिस्टर सरदेसाई, आता त्या बऱ्या आहेत. तुम्ही काळजी करू नका. सिव्हिअर अटॅक होता. ऑपरेशन यशस्वी झालंय. लवकरच शुद्धीवर येतील..”

डॉक्टरांच्या बोलण्याने सरदेसाईंनी आनंदाने सुटकेचा निःश्वास टाकला. डॉक्टरांच्या हातात हात मिळवून त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. डॉक्टर देवधरांनी औषधांची चिट्ठी स्वराजच्या हातात दिली. स्वराजला औषधं आणायला सांगून ते पुन्हा आत निघून गेले. सरदेसाईंनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिलं,

“सार्थक, देशमुखांच्या घरी फोन करून तुझ्या आईबद्दल कळव. आता सगळं ठीक आहे म्हणून सांग. नंदिनीला बोलवून घे. तुझी आई लवकरच शुद्धीवर येईल. यापुढे आपल्याला तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आता तिला कोणताच स्ट्रेस येणार नाही हे पाहायला लागणार आहे. ती जास्तीत जास्त आनंदी राहायला हवी..”

हे बोलत असताना त्यांनी स्वराजकडे रागाने पाहिलं. स्वराज निमूटपणे मान खाली घालून बसला होता. सरदेसाईंच्या म्हणण्यानुसार स्वराजच्या भावाने हास्पिटलमधूनच आदित्यला फोन केला. आदित्यच्या मोबाईलची रिंग वाजली. तो डोळे चोळत उठला. टेबलवरच्या लॅम्पचं बटण दाबलं. समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे त्याचं लक्ष गेलं. रात्रीचे चार वाजले होते.

“एवढ्या रात्री कोणाचा कॉल?”

त्याच्या मनात विचार चमकून गेला. रिंगच्या आवाजाने अर्पितालाही जाग आली. आदित्यने हातात मोबाईल घेतला. ‘हॅलो..’ म्हणताच पलीकडून आवाज आला.

“हॅलो, मी सार्थक सरदेसाई, स्वराजचा मोठा भाऊ.. आमच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय.”

त्याचं वाक्य ऐकताच आदित्यच्या डोळ्यावरची झोप उडाली. तो उठून बसला.

“काय? काय झालं अचानक? काय झालं आईंना?”

आदित्यने काळजीने प्रश्न विचारला.

“तिला हार्टअटॅक आला होता. आताच ऑपेरेशन झालंय. सध्या आयसीयूमध्ये आहे. अजून शुद्ध आलेली नाही.”

सार्थकने उत्तर दिलं. 

“बापरे, कोणतं हॉस्पिटल? आम्ही लगेच येतो तिकडे..”

आदित्य म्हणाला. 

“आता, आई आऊट ऑफ डेंजर आहे. काळजी करू नका.. बाबांनी तुम्हाला कळवायला सांगितलं होतं. म्हणून कॉल केला. मी ऍड्रेस मेसेज करतो तुम्हाला.. ठेवतो.. बाय..”

असं म्हणून सार्थकने कॉल कट केला.

“काय झालं? कोणाचा कॉल होता?”

अर्पिताने आदित्यला प्रश्न केला. आदित्यने सार्थकने सांगितलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला.

“आईबाबांना सांगायला हवं. सर्वात आधी ईश्वरीला ही बातमी द्यायला हवी. तिचं तिथे असणं गरजेचं आहे.”

बेडवरून खाली उतरत आदित्य म्हणाला.

“कशाला? थोड्या वेळात सकाळ होणारच आहे. तेंव्हा सांगू.. आपली झोपमोड झाली ती झालीच आता त्यांची कशाला करतोस? झोप शांतपणे..”

आदित्यला थांबवत अर्पिता म्हणाली.

“अगं पण.. त्यांची अवस्था.. ”

अर्पिताने पुन्हा त्याला अडवलं.

“अरे नको म्हणतेय नां? ऐक जरा.. सकाळी सांग ईशुला.. सगळेच जाऊ.. सासूबाई आजारी आहेत म्हटल्यावर आता ईश्वरीला जावंच लागेल. एका अर्थी बरंच झालं. सुंठीवाचून खोकला जाईल..आता झोपूया.. तो दिवा बंद कर मला खूप झोप येतेय.”

अर्पिता अंगावर रजई ओढून घेत म्हणाली. आदित्यलाही अर्पिताचं म्हणणं पटलं आणि तोही पुन्हा बेडवर आडवा झाला. 

सकाळ झाली. सर्वात माई, अनघा उठल्या. स्नानादी उरकून तयार झाल्या. माई देवघरात पूजा करत बसली. अनघा स्वयंपाकघरात सकाळचा नाष्टा, डब्याची तयारी करू लागली. विनायक हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. इतक्यात अर्पिता आणि आदित्य त्यांच्या खोलीतून बाहेर आले.

“आई.. ए आई.. ईशु उठली का? उठव तिला लवकर.. जा पटकन..”

आदित्य घाईघाईने अनघाला आवाज देत होता. विनायक आणि माईच्या नजरा आदित्यकडे वळाल्या. मंत्र पुटपुटत हातवारे करत काय झालं म्हणून माईंनी विचारलं. 

“काय झालं? ईशुला का उठवायचं? रात्री उशिरा झोपली होती. करू दे आराम अजून थोडा वेळ..”

अनघा पोळ्या लाटता लाटता म्हणाली.

“आई.. उठव तिला.. आपल्याला निघावं लागेल. बाबा, ईशुच्या सासूबाईंना काल रात्री हार्टअटॅक आला. त्यांना त्यांच्या घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. एन्जॉप्लास्टी झाली त्यांची. आयसीयूमध्ये आहेत. अजून शुद्ध आलेली नाही.”

आदित्यने घाईने सर्व सांगितलं. ते ऐकून सर्वांना धक्का बसला. अचानक सकाळी सकाळी असं काहीतरी वाईट ऐकायला मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.

“अरे, तुला कसं समजलं? कोणी आणि कधी सांगितलं?”

गॅस बंद करत अनघाने आदित्यला विचारलं. माईने देवाला नमस्कार केला आणि उठून बाहेर आल्या.

“काल रात्री चार वाजता मला स्वराजच्या भावाचा, सार्थकचा कॉल आला होता.” - आदित्य

“मग तेंव्हाच का नाही सांगितलंस? आता सांगतोयस ते?“

माई आदित्यला दटावत म्हणाल्या.

“माई, मीच म्हणाले सकाळी सांगूया म्हणून. रात्री चार वाजता कुठे झोपमोड करणार सर्वांची. असंही आपण थोडी रात्रीतच जाणार होतो? आणि त्यांच्या घरचे आहेतच की..”

अर्पिता माईंकडे पाहत म्हणाली. माई काही बोलणार इतक्यात अनघाने त्यांना खुणेनेच शांत राहण्यास सांगितलं.

“माई, मी पाहते ईशु उठली का? आदी, गाडी काढ पटकन.. जाऊया आपण सगळेच..”

“आई, अर्पिताची आज ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग आहे. तिला घरी थांबता येणार नाही तेंव्हा तू आणि माई घरीच थांब.. मी आणि बाबा ईशुला घेऊन जातो. तुला कॉल करून कळवतो आम्ही. तिकडे काय होतंय ते.. आधी ईशुचं तिकडे असणं गरजेचं..”

आदित्य स्वतःचं आवरत म्हणाला. अनघाने मान डोलावली आणि ईश्वरीला उठवण्यासाठी तिच्या खोलीच्या दिशेने गेली. विनायकही त्याच्यासोबत जाण्यास तयार झाला. अनघा ईश्वरीच्या खोलीत आली. ईश्वरी अजूनही बिछाण्यातच होती. नुकतीच तिला जाग आली होती. आईला पाहताच ती उठून बसली.

“ईशु, उठ लवकर.. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे.”

असं म्हणत अनघाने ईश्वरीला सगळा वृतांत सांगितला. ईश्वरी पटकन तयार होऊन बाहेर आली. विनायक आणि आदित्यसोबत सार्थकने पाठवलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहचली. आदित्यने रिसेप्शनच्या टेबलावर चौकशी केली आणि ते अतिदक्षता विभागाच्या दिशेने चालू लागले. अतिदक्षता विभागाबाहेरच सरदेसाई आणि स्वराज, सार्थक आणि गायत्री त्यांना बसलेले दिसले. ईश्वरी घाबरलेल्या अवस्थेत धावतच गायत्रीजवळ आली.

“वहिनी काय झालं? कसं झालं?”

ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आणि सासूबाईंविषयीची काळजी दाटू लागली. गायत्री काही बोलणार इतक्यात आयसीयू मधून डॉक्टर देवधर आणि एक नर्स धावत बाहेर आली.

“मिस्टर सरदेसाई?”

तिचा आवाज ऐकून सरदेसाई उठून उभे राहत म्हणाले, 

“पेशन्ट शुद्धीवर आलाय. नंदिनी कोण आहे?”

डॉक्टर देवधरांनी विचारलं. ईश्वरी उठून उभी राहिली.

“तुम्ही आहात का? त्या नंदिनी.. नंदिनी बोलताहेत. सध्या फक्त तुम्ही पेशन्टला भेटू शकता. मला वाटतं त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. जा तुम्ही आत. सिस्टर यांना आत घेऊन जा..”

डॉक्टर देवधरांचं बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्याने ईश्वरीकडे पाहू लागले. स्वराजनेही ईश्वरीकडे पाहिलं. 

पुढे काय होईल? शालिनीताई आणि ईश्वरीचं बोलणं होईल का? ईश्वरी कोणता निर्णय घेईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे (अनुप्रिया)


🎭 Series Post

View all