Login

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३३

पुन्हा बरसला श्रावण


पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३३

सदर कथा ही सत्यघटनेवर आधारित आहे. त्यामुळे वाचकांना पडणारे अनेक प्रश्न एक व्यक्ती म्हणून लेखिका समजू शकते परंतू सत्यकथा असल्याने त्यात फारसा बदल करून मूळ कथेला बदलण्याची हिंमत करवत नाहीये. तरी वाचकांनी लेखिकेला समजून घ्यावं ही नम्र विनंती..


पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की ईश्वरीने स्वराजला तिचा निर्णय ऐकवला. ती स्वराजचा भूतकाळ विसरायला तयार झाली पण यापुढे स्वराजच्या आयुष्यात नंदिनी नसेल तरच ती त्याच्या सोबत राहणार होती पण स्वराज नंदिनीला सोडायला तयार नव्हता. तिला विसरायला तयार नव्हता. ईश्वरीचा नाईलाज झाला आणि तिने कायमचं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. आता पुढे..



पुन्हा बरसला श्रावण.. भाग ३३

“हिला काय झालं अचानक? आई तू काही बोललीस का ईशुला?”

अनघाकडे पाहत आदित्यने विचारलं.

“लाड.. अतिलाड आईचे.. दुसरं काय? निस्तरा आता तुमचं तुम्ही. मी जातो आत..”

विनायक अनघाकडे रागाने पाहत त्याच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाला.

“नाही रे.. पण तिथून निघाल्यापासून बघतेय.. हरवल्यासारखी वाटतेय. काहीतरी बिनसलंय बहुतेक.”

अनघाच्या वाक्यावर अर्पिता खळखळून हसत म्हणाली.,

“आई, स्वराजला सोडून येण्याचं दुःख झालं असेल. आता थोडाही विरह सोसवत नसेल.”

“हो तसंही असेल.”

अनघाने हसून अर्पिताकडे पाहिलं.

“मी बघतो, काय म्हणतेय ती.. आलोच.”

असं म्हणून आदित्य ईश्वरीच्या खोलीकडे जाण्यास निघाला. ईश्वरी खोलीत पलंगावर रडत बसली होती. आदित्य खोलीत आला तसा ईश्वरीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि रागाने म्हणाली,

“दादा, का वागलास असा? काय मिळालं तुला?”

“म्हणजे? काय म्हणतेस तू? जरा समजेल असं बोल.. मला काहीच समजत नाहीये..” - आदित्य

“तुला स्वराजचा पास्ट माहित होता ना? त्यांना हे लग्न करायचं नव्हतं. त्यांचं दुसरीकडे अफेअर सुरू आहे. हे त्यांनी स्वतः तुला सांगितलं होतं तरी मग का लग्न लावून दिलंस माझं त्यांच्यासोबत? कश्याची भुरळ पडली तुला? सांग मला.. मला सगळं सांग दादा?”

ईश्वरीच्या प्रश्नांनी त्याला चांगलाच घेराव टाकला होता. ईश्वरीने त्याला जाब विचारला तसा तो चपापला.

“ईशु, तू आधी शांत हो.. मी सांगतो सगळं..”

तो शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला.

“कसं शांत होऊ दादा? मी ज्याच्याशी लग्न केलं, त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही ही साधी गोष्ट वाटते तुला? कशी विसरू त्यांचा भूतकाळ? कसं राहू मी त्यांच्या घरात ज्यांच्या मनात माझं स्थानच नाही?

ईश्वरीचे डोळे बरसू लागले. डोळ्यातला अंगार अश्रूवाटे वाहू लागला. आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला पलंगावर बसवलं.

“झालं तुझं प्रश्नं विचारून? आता मी काय सांगतो ते ऐक, मला स्वराजने जेंव्हा त्याच्या अफेअर बद्दल सांगितलं तेंव्हा मलाही खूप मोठा धक्का बसला होता पण मग मी विचार केला शाळा कॉलेजमध्ये बहुतांशी मुलामुलींचे असे अफेअर्स असतातच.. अडनिड्या वयातलं हे प्रेम कुठे खरं असतं? आणि झालंच तर लग्न झालंच पाहिजे असं थोडीच आहे?”

“अरे दादा.. काय बोलतोयस तू हे? अरे तुझंही लव्ह मॅरेज आहे ना.. हे सोयीस्करपणे विसरतोयस तू?”

आदित्यचं बोलणं मधेच तोडत ईश्वरी संतापून म्हणाली.

“मी काहीही विसरत नाहीये.. पण एका साध्या, छोट्या गोष्टींचा तू किती इशू करतेय.. खरंच गरज आहे याची? आणि तू कधीपासून मला जाब विचारायला लागलीस? कधीपासून इतकी आक्रमक झालीस? मी, बाबा जसं सांगेल तसं वागणारी तू अशी कशी इतकी बदललीस? कश्याचा तुला इतका राग आलाय? आणि तू माझ्या लव्ह मॅरेजबद्दल बोलतेस तुझी हिंमत कशी झाली? तुझ्या पंखात इतकं बळ आलंच कुठून?”

आदित्य चिडून प्रश्न करत पुढे म्हणाला,

“आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या वहिनीची तुलना इतर कोणासोबत मुळीच करायची नाहीस. अर्पिता आपल्या घरात सर्वांना आवडली होती. ती आपल्यापैकीच होती. आपल्या घरात आल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिला दिलेली वागणूक विसरलीस का? गेली कित्येक वर्षे तिचं माहेर तुटलंय. तिच्या आईवडिलांना भेटलेली नाहीये ती.. नाही चालत आपल्यात.. कितीवेळा तेच सांगायचं तुला? अर्पिताने आपल्या घरच्यांना समजून घेतलं. आपल्या बाबांचा विचित्र स्वभाव स्वीकारला. श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी होती ती तरीही आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात सामावून गेली.”

आदित्यचा रागही उफाळून आला होता.

“दादा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजवर काहीही न बोलणारी मी इतकी अग्रेसीव्ह झालेय का माहीतीये? कारण एकच आहे दादा, मी सगळं सहन करू शकते पण माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागलेला नाही सहन करू शकत. ती एकच तर गोष्ट आहे माझ्याकडे माझ्या हक्काची.. सेल्फरिस्पेक्ट गमावून मला काहीच नकोय पण नेमका त्याच गोष्टीला धक्का लागलाय. आजवर या घरात जे जे घडत आलं ते मी निमूटपणे सहन केलं. तू, बाबानी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या मी तोंडातून एकही ब्र शब्द न काढता करत आले. कधीही मान वर करून कोणाला काही बोलले नाही. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झालाय. हा उद्रेक होणारच होता..”

“दादा, मी सगळं सहन करत राहिले. ते फक्त आईसाठी.. माझ्यामुळे तिला अजून दुःख नको इतकंच समजत होतं. वाटलं होतं इथे मनासारखं वागता नाही आलं, निदान लग्नानंतर तरी आपल्या जोडीदारासोबत आनंदाने जगेन. मला जे वाटतं ते सगळं करेन.. म्हणून मनात नसतानाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वराजशी लग्नाला तयार झाले. काय मिळवलं मी? प्रतारणा? तू स्वतः प्रेमाविवाह केलास न? मग तुला माझं दुःख का कळत नाही रे?”

“चांगली गोष्ट आहे ही की, वहिनी आपल्या घरात रमली. आपल्या सर्वांना आपल्या गुणांदोषासकट स्विकारलं तिने.. दादा, आपल्या संपूर्ण देशमुख घराण्यात लव्ह मॅरेज करणारा तू पहिला मुलगा होतास. मला वाटलं होतं, तू नव्या आधुनिक विचारसरणीचा.. जुन्या बुरसटलेल्या विचारांना रूढी परंपरांना, पडलेल्या चुकीच्या पायंडांना मोडीत काढशील पण आता माझ्या लक्षात येतंय की स्वतःचा विचार करताना तू मॉडर्न विचारांचा आहेस असं दाखवतोस आणि माझा विचार करताना मात्र तू जुन्या बुरसटलेल्या विचारांना कवटाळून बसलेला असतोस. हा भेदभाव का दादा? माझ्या बाबतीत असं का?”

ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. आदित्य तिला समजावणीच्या स्वरात म्हणाला,

“ईशु, मी मुलगा आहे. मला कोणी प्रश्न विचारणार नाही पण मुलींना लगेच प्रश्न विचारले जातात. नावे ठेवली जातात. माझं लव्हमॅरेज झालं कोणीच काही म्हटलं नाही पण तेच तू केलं असतं तर विचार कर किती बदनामी झाली असती.. देशमुखांची मुलगी तमक्यासोबत पळून गेली, आईवडिलांच्या तोंडाला काळिमा फासून गेली. काय काय ऐकावं लागलं असतं! ईशु, तुझं चिडणं खूप स्वाभाविक आहे. पण एक विचार कर ना.. अर्पिताला आपल्या घरातल्या सर्वांनी स्विकारलं होतं पण स्वराजच्या बाबतीत तसं नाहीये. त्याची गर्लफ्रेंड घरात कोणालाच आवडली नव्हती शिवाय ती आपल्या समाजातली सुद्धा नव्हती. आपल्यात आजही आंतरजातीय विवाहाला मान्यता देत नाहीत. मग त्यांचं लग्न शक्यच नव्हतं. स्वराजसारखा देखणा, रुबाबदार, सुशिक्षित, चांगली नोकरी असलेला मुलगा, आपल्या तोलामोलाचं स्थळ या अश्या क्षुल्लक कारणासाठी हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मला माहित असतानाही मी शांत बसलो. घरात कोणाला काही सांगितलं नाही फक्त बाबासोडून..”

“म्हणजे? बाबांना हे सगळं माहित होतं? आणि तरीही त्यांनी?”

ईश्वरीने चमकून आदित्यकडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली.

“का दादा? आणि जन्मदाते ना ते माझे? काय पाप केलंय मी? चांगली शिकत होते. माझं कॉलेज बंद करून तुम्ही मला या लग्नाच्या बंधनात अडकवलं. मी तयारही झाले होते. तुमच्या कोणत्याच गोष्टीला मी नकार दिला नाही. मोठे आहात.. माझ्या भल्याचाच विचार कराल असं वाटलं होतं. विश्वास होता माझा तुमच्यावर.. का असं केलंत दादा? काय अपेक्षा होती माझी? फक्त इतकीच ना, ज्याच्याशी लग्न करतेय त्याचं माझ्यावर फक्त माझ्यावरच प्रेम असावं. सहचारीणी म्हणून त्याने फक्त माझाच विचार करावा. काय चुकलं माझं? माझी अपेक्षा रास्त नव्हती? बोल दादा बोल..”

ईश्वरी हुंदके देऊन रडू लागली. आदित्य तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला,

“इतकं काय झालंय तुला रडायला? असं काय जगावेगळं घडलंय तुझ्यासोबत? कोणी गेल्यासारखं रडतेयस ते.. आणि आता झालं ते झालं. ते काही बदलता येणार आहे का? लग्न झालंय तुझं.. स्वराज नवरा आहे तुझा. एक स्त्रीच एका पुरुषाला सांभाळून घेऊ शकते आणि तेच तुला करायचंय.. समजलं?”

आदित्य तिला दरडावत म्हणाला.

“हेच जर मी केलं असतं तर असंच म्हणाला असतास? त्यांनी सांभाळून घेतलं असतं? माझं अफेअर मान्य केलं असतं?”

ईश्वरी रागाने फणफणत म्हणाली. ती दादाला जाब विचारत होती. का कोणास ठाऊक! तिच्यात इतकं बळ कुठून आलं होतं. संयमाचा बांध फुटू पाहत होता.

“तोंड फोडीन तुझं.. पुन्हा असं काही अभद्र बोललीस तर.. तुझ्या हातून असं काही घडलं असतं ना तर मी तुला जिवंत गाडून टाकलं असतं.. काय समजलीस? एक लक्षात ठेव, आपल्या समाजात पुरुषांनी लाख लफडी केलेली चालतात पण मुलींचं पाऊल वाकडं पडता कामा नये. मुलींनी कायम आपली पायरी ओळखूनच राहायचं. कुठं तोंड काळं करण्याआधी आपल्या घराण्याचा विचार करायचा. मुलीची इभ्रत म्हणजे काचेचं भांडं.. एकदा तडा गेला की संपलं सगळं.. यापुढे हा विषय इथेच संपला. पुन्हा घरात चर्चा नकोय.. आलीयेस माहेरी.. चार दिवस सुखाने, आनंदाने रहा आणि जा आपल्या सासरी.. समजलीस?”

इतकं बोलून आदित्य तिच्या खोलीचं दार आपटत खोलीबाहेर पडला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली.

“किती निर्वाणीचं बोलून गेला हा! असमानतेचा धडा पुन्हा एकदा गिरवून गेला.. मुलगा आणि मुलीतला भेद सांगून गेला.. पुरुषी अहंकाराला खतपाणी घालत.. आपल्या बाबांसारखा.. पुन्हा एकदा इतिहासाची पुनःरावृत्ती.. आजवर मी खूप सोसलं आणि आईने सुद्धा पण यापुढे नाही.. कदापिही नाही.. मुक्या जनावरासारखं सगळं सोसत राहायला.. मी दावणीला बांधलेलं मुकं जनावर नाहीये.. मी पुन्हा त्या घरी जाणार नाही.. काही झालं तरी..”

ईश्वरीने मनाशी पक्का निर्धार केला. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पर्समधला मोबाईल काढला आणि श्लोकचा नंबर डायल केला. इकडे दादा ईश्वरीच्या खोलीतून बाहेर पडला. अनघा त्याची बाहेर वाटच पाहत होती.

“काय झालं रे? काय बोलली ईशु?”

अनघाने काळजीने प्रश्न केला.

“काही नाही गं आई, काही विशेष नाही. सगळं ठीक आहे.. तू विनाकारण काळजी करू नको. अरू माझ्यासाठी कॉफी बनव ना.. थोडं डोकं दुखतंय.”

आदित्य अर्पिताकडे पाहून सोफ्यावर बसत म्हणाला. अर्पिता पटकन उठून कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली.

“अरे पण ईशु अशी का वागतेय? आणि तिने तुला आतमध्ये का बोलवलं? काय म्हणाली ती? मी पाहतेय, तिकडून येताना पण पूर्ण रस्ताभर ती गप्प बसून होती. एक चकार शब्दही बोलली नाही. आपल्याच विचारात गुंग.. काय झालंय नेमकं? सांग मला..”

अनघा चिंतीत होऊन म्हणाली.

“आई, किती प्रश्न विचारतेय तू? मी सांगतोय न तुला काही झालं नाही म्हणून.. ती पहिल्यांदा आपल्यापासून दूर राहिलीय. अनोळखी माणसात वावरताना थोडी गोंधळलेली असेल ना? नवीन घराशी जुळवून घ्यायला तिला वेळ लागेलच ना? होईल सगळं ठीक. तू टेन्शन घेऊ नकोस.”

आदित्य चिडून म्हणाला.

“ठीक आहे.. आता तू चिडू नकोस.. मी बोलेन तिच्याशी..”

अनघा किचनकडे वळत म्हणाली. अर्पिता आदित्यसाठी कॉफी घेऊन बाहेर आली.

“नाही.. काही गरज नाही. उगीच तिला काही विचारायला जाऊ नकोस. आलीय घरी.. तिचे लाड कर..खाऊ पिऊ घाल.. आणि आनंदाने तिच्या घरी पाठवून दे..“

कॉफीचा घोट घेत आदित्य म्हणाला.

श्लोकने रात्रीचं जेवण उरकलं आणि झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या डिस्प्लेवर ईश्वरीचं नाव पाहून किंचित आनंदाची लकेर चेहऱ्यावर उमटली. त्याने पटकन कॉल घेतला.

“हाय ईशु, कशी आहेस? आठवणीत आहोत म्हणजे आम्ही.. मला वाटलं नवऱ्याच्या नादात विसरलीस आम्हाला?”

श्लोक हसून म्हणाला.

“श्लोक, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. उद्या अर्चूच्या घरी येशील? मी जाणार आहे तिच्याकडे..”

ईश्वरीने विचारलं.

“का गं? काय झालं? काही अर्जंट काम? सगळं ठीक आहे ना ईशु?”

श्लोकने काळजीने विचारलं.

“तू ये आल्यावर बोलू..”

असं म्हणून तिने कॉल कट केला.

पुढे काय होतं? ईश्वरी श्लोकला सर्व सांगेल? स्वराज आणि ईश्वरी एकत्र येतील? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)


🎭 Series Post

View all