पुन्हा बरसला श्रावण भाग २९

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण.. भाग २९

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराज आणि ईश्वरीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. देशमुख कुटुंबियांनी ईश्वरीची पाठवणी केली. सरदेसाईंच्या घरचा उंबरठा ओलांडून ईश्वरी आता नंदिनी सरदेसाई झाली. पूजेच्या दिवशी विधी पार पडल्यानंतर नंदिनी स्वराजची खोली आवरत होती. त्यावेळीस स्वराजच्या कागदपत्रांच्या फाईलमध्ये एक चिट्ठी सापडली. आता पुढे..

भाग २९


नंदिनी चिठ्ठी वाचू लागली.

“प्रिय राज,

आजवरच्या प्रवासातलं कदाचित हे शेवटचं पत्र.. पुन्हा कधी मी तुला पत्र लिहू शकेन की नाही माहित नाही. ‘संपलं सगळं.. आपल्यातलं नातं, ते प्रेम.. सारं संपलं. तुला सांगू! हे लिहताना सुद्धा डोळे भरून येताहेत. कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं, हे अश्या पद्धतीने आपलं नातं संपुष्टात येईल आणि अश्या पद्धतीचं पत्र लिहण्याची वेळ माझ्यावर येईल पण काय करायचं? नशिबाचा खेळ कोणाला उमजलाय.. ना तुला ना मला.. हे सगळं मान्य करूनच मी तुला हे शेवटचं पत्र लिहतेय. फक्त तुझ्या सुखासाठी.. आपल्या भविष्यासाठी..

राज, मला माहित आहे, दोन दिवसांनी तुझं लग्न आहे. तुझ्या मनाविरुद्ध का होईना कोणीतरी तुझ्या आयुष्यात माझी जागा घेईल. खरं सांगू? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असणं आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात यायला सुद्धा भाग्य लागतं रे.. पण मी तितकी नशीबवान कुठे? बघ ना.. आपलं एकमेकांवर इतकं प्रेम असूनही आपण एकमेकांच्या नशिबात नाही. कसलं हे दुर्दैव! दोघांनी मिळून पाहिलेली स्वप्नं आपल्याच डोळ्यांनी तुटताना पहायची.. किती रे वाईट! मला सांग हे कसं रे सहन करायचं? तुला कसं विसरून जायचं?

राज, आज आपण दोघे अश्या वळणावर आहोत जिथून मागे फिरणं अशक्य आणि एकमेकांशिवाय जगणंही मुश्किल पण जीवनाच्या या प्रवासात चालावं तर लागेलच ना? मान्य आहे मला आपले मार्ग बदलले आहेत पण तरीही प्रेम तर आहेच ना?

राज, मी तुझ्यासोबत असो किंवा नसो माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, आहे आणि कायम राहील. मी जिवंत असेपर्यंत किंबहुना माझ्या मृत्यूनंतरही माझं प्रेम तुझ्यावरच, तुझ्यासोबत राहील. मला कोणीही तुझ्या मनातून काढू शकलं नाही आणि यापुढेही ते कोणालाच शक्य नाही.

एक वचन देशील? तुझ्या मनातलं माझं स्थान, जी जागा आहे, ती तू कोणालाही देणार नाहीस. आयुष्याच्या संध्याकाळी एकदा तरी येऊन मला भेटशील. माझ्या मृत्यूनंतर माझ्या रक्षेला तू एकदा तरी स्पर्श करशील. त्या शिवाय माझ्या आत्म्यास शांती मिळेल असं वाटत नाही. तू ते स्पर्शसुख मला देशील. करशील ना राज? माझ्यासाठी इतकं.. 

मला माहित आहे. या सगळ्या गोष्टींचं तू खूप टेन्शन घेशील. तब्बेतीची हेळसांड करशील. राज, तुला शपथ आहे माझी. तू स्वतःची काळजी घेशील. झुरत राहणार नाहीस. राज, आपल्याला समोर आलेली परिस्थिती स्वीकारावी लागेलच नां. त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेलच नां.. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा आहेस फक्त माझा आणि मी फक्त तुझीच.. आय लव्ह यू राज, लव्ह यू सो मच..

तुझी फक्त तुझीच.. 
नंदिनी..

नंदिनीच्या हातातलं पत्र आपोआप गळून पडलं. डोळ्यातला अंगार अश्रूवाटे बाहेर पडू लागला. तिने पुन्हा फाईलमधली कागदपत्रं चाळायला सुरुवात केली. अजून दोन चार गुलाबी सेन्टेड पेपरातली प्रेमपत्रं तिच्या हातात पडली. ती प्रेमपत्र वाचताना नंदिनीचा पारा चढू लागला. काय करावं तिला समजत नव्हतं. स्वराजचा भूतकाळ दत्त म्हणून तिच्या पुढ्यात उभा राहिला. आता तिला सर्व गोष्टींचे अर्थ लागत होते.

“काय आहे हे? कोण आहे नंदिनी? स्वराजचं पहिलं प्रेम? मग माझी फसवणूक का केली त्याने? आता मला कळतंय तो असा का वागत होता? पाहायला आल्यापासून त्याने एकदाही मला कॉल का केला नाही? तो या लग्नामुळे अजिबात खुश वाटत नव्हता. मग का लग्न केलं त्याने माझ्याशी? त्याला काय वाटलं, मी शांत राहीन. सगळं निमूटपणे सहन करेन.. मुळीच नाही.. मी त्याला याचा जाब नक्की विचारणार.. मी त्याला सोडणार नाही..”

नंदिनीचं मन आक्रंदत होतं. अर्चनाची बडबड तिच्या कानावर तर पडत होती पण मनापर्यंत पोहचत नव्हती. तिला असं स्तब्ध झालेलं पाहून अर्चना धावत तिच्या जवळ आली. 

“काय झालं ईशु, एकदम गप्प का बसलीस? ए ईशु बोल नां..”

अर्चनाने तिचे दोन्ही खांद्यावर हात ठेवत तिला जोरात हलवलं. नंदिनी भानावर आली. अर्चनाच्या कमरेला विळखा घालून हमसून हमसून रडू लागली.

अगं ईशु, काय झालं? का रडतेय तू? सांग नां..”

अर्चनाला काहीच समजत नव्हतं. इतक्यात शालिनीताईंनी आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकताच नंदिनीने पटकन फाईल बंद केली आणि डोळ्यात आलेलं पाणी पुसलं पण शालिनीताईंनी तिला रडताना पाहिलंच. शालिनीताई तिच्याजवळ येऊन बसल्या. मायेने डोक्यावरून हात फिरवत, प्रेमाने गोंजरत त्यांनी तिला विचारलं,

“काय झालं नंदिनी? आईची आठवण आली का? होतं असं बाळा.. पण आता रडायचं नाही. आता हे तुझं घर आहे. या घरातली माणसं तुझी आहेत. असं रडरड केलीस तर तुझ्या आईला तरी आवडेल का? काळजी करू नकोस तू. आम्ही आहोत नां तुझ्याबरोबर.. पूस बरं डोळ्यातलं पाणी.. उद्या आपल्याला देवदर्शनाला जायचंय. झोप आता तू, उद्या लवकर उठावं लागेल.. झोपा दोघी.. मी पण झोपते. काही लागलं तर आवाज दे.. गुड नाईट..”

नंदिनीने मान डोलावली. शालिनीताई जागेवरून उठल्या आणि आरामासाठी त्यांच्या खोलीच्या दिशेने 
जाऊ लागल्या. नंदिनीने बंद केलेली फाईल पुन्हा उघडली. त्यातली एक चिट्ठी अर्चनाच्या नकळत तिच्या पर्समध्ये टाकली.

“उद्याच मी त्याला याचा जाब विचारेन. त्याला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.”

नंदिनी स्वतःशीच बडबडली. दुसऱ्या दिवशी स्वराज, नंदिनी आणि घरातली बाकीची मंडळी कुलदैवतेच्या देवदर्शनासाठी तूळजापूरला निघाली. तुळजापुरला पोहचल्यावर सर्वांनी कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं. मनोभावे पूजा केली. तिथे थोडा वेळ थांबून सर्वजण पुढे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेले. पूर्ण रस्ताभर नंदिनी शांतच होती. कधी एकदा स्वराजला एकटं गाठून या सगळ्या गोष्टींचा जाब विचारतेय असं तिला झालं होतं पण सर्वजण सोबत असल्याने तिला स्वराजशी बोलता येत नव्हतं. गाडी स्वामींच्या मठाजवळ येऊन थांबली. सर्वजण आत आले. नंदिनी मठाच्या गाभाऱ्यात स्वामींसमोर डोळे मिटून बसली.

“स्वामी, आजवर आयुष्यात कितीतरी कठीण प्रसंग आले, संकटं आली पण मी कधीच डगमगले नाही. घाबरले नाही कारण मला ठाऊक होतं, तुम्ही आणि आई कायम माझ्या पाठीशी उभे होतात आणि सदैव माझ्या सोबतच असाल याचा मला पूर्ण विश्वास आहे पण स्वामी, यावेळी मात्र माझा धीर सुटत चाललाय. मला काहीच समजत नाहीये मी काय करू स्वामीं? का तुम्ही मला अश्या विचित्र संकटात टाकलंय? का ईश्वरा.. का हा असा पेचप्रसंग माझ्या समोर आणून ठेवलात? स्वामीं, आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांसाठी धावून या.. मला मार्ग दाखवा.. या संकटाशी लढण्याचं बळ द्या.. स्वामी माझं रक्षण करा..”

नंदिनी हात जोडून स्वामींना आर्जवे करत होती. डोळ्यातून आपोआप पाण्याच्या धारा वाहत होत्या. इतक्यात तिच्या बंद डोळ्यांसमोर एक दिव्य प्रकाश प्रकटला आणि आवाज आला. 

“मुली, घाबरू नकोस. ही वेळही निघून जाईल. मन शांत ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे.”

नंदिनीने मिटलेले डोळे सावकाश उघडले. आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. मात्र समोर स्वामींची मूर्ती मंद हसताना तिला भासली.

“कुठून आला आवाज? कोण बोललं असेल? हा माझा भास तर नव्हता? भासच असावा..”

ती स्वतःशीच पुटपुटली. तिने डोळे पुसले आणि मठाच्या बाहेर असलेल्या श्वेत पायऱ्यावर येऊन बसली. बाकीचे दर्शन घेत होते. स्वराज नामस्मरण करण्यास बसला होता. त्याचं झाल्यावर तोही उठून बाहेर आला. देवदर्शन झालं.. परतीचा प्रवास सुरू झाला. एका रेस्टोरंट समोर जेवण करण्यासाठी गाडी थांबली.

“नंदिनी, तू आणि स्वराज त्या टेबलावर बस. तुम्हांला निवांत बोलता येईल. अर्चना तू आमच्या सोबत ये.. चालेल ना तुला?”

स्वराजची वहिनी हसून म्हणाली. अर्चना वहिनीसोबत जेवायला बसली. 

”हीच वेळ आहे स्वराजशी बोलण्याची.”

नंदिनी मनातल्या मनात पुटपुटली. ती स्वराज सोबत शेजारच्या टेबलावर बसली.

“स्वराज, मला थोडं बोलायचंय..”

“हो.. बोल ना..”

तिने बोलायला सुरुवात केली.

“स्वराज तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं का? कोणाच्या सांगण्यावरून बळजबरीने हे लग्न झालंय का?”

“नाही.. तसं काही नाही..”

तिच्यापासून नजर चोरत तो म्हणाला.

“मग हे काय आहे?”

पर्समधली चिट्ठी बाहेर काढत नंदिनीने विचारलं.

“हे तुमच्या फाईलमध्ये मला सापडलं. तुमचं प्रेमपत्र..”

तिचे शब्द ऐकताच त्याने समोर पाहिलं. तिच्या हातातली घडी घातलेली गुलाबी पेपरमधली चिट्ठी पाहून तो चांगलाच हादरला होता. चेहऱ्यावरचा रंग उडू लागला. माथ्यावर जमा झालेले घामाचे थेंब रुमालने टिपत, शब्दांची जुळवाजुळव करत स्वराजने बोलायला सुरुवात केली.

“हे बघ नंदू, तू समजतेस तसं..”

“खबरदार.. मला या नावाने बोलवलंत तर..”

नंदिनी त्याच्यावर कडाडली.

पुढे काय होतं? स्वराज आणि नंदिनीमध्ये काय बोलणं होतं? नंदिनी पुढे काय निर्णय घेईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all