Login

पुन्हा बरसला श्रावण भाग १९

ही कथा एका ईश्वरीची.. तिच्या संघर्षाची



पुन्हा बरसला श्रावण..

भाग १९

ईश्वरीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिला लगेच अतिदक्षता विभागात पाठवण्यात आलं. प्राथमिक उपचाराला सुरुवात झाली. अनघा बाहेर रडत उभी होती. घाईघाईत ती पर्ससुद्धा आणायचं विसरली होती. तिच्यासोबत शेजारचे आदित्यचे मित्र कुणाल आणि अभिषेक आले होते.

“कुणाल, मी घाईघाईत माझी पर्स घरीच विसरले. जरा आदित्यला फोन करतोस का?”

तिने कुणालला विनंती केली.

“हो.. हो काकू, लगेच लावतो. तुम्हीच बोलून घ्या.”

असं म्हणत कुणालने आदित्यला कॉल केला आणि त्याने अनघाच्या हातात मोबाईल दिला. मोबाईलची रिंग वाजत होती.

“हॅलो, बोल रे कुणाल..”

समोरून आदित्यचा आवाज ऐकू आला.

“आदी.. मी आई.. आपली ईशु हॉस्पिटलमध्ये..”

भरल्या गळ्याने अनघा इतकंच बोलू शकली.

“काय? काय सांगतेस? काय झालं तिला? कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस तू आता?”

आदित्यने एका पाठोपाठ प्रश्नांचा भडीमार केला.

“डॉ. वसुधा यांच्या वरद हॉस्पिटलमध्ये.. माईंसोबत शेजारच्या सानेकाकू आहेत. तू इकडेच ये लवकर.. तुझ्या बाबांनाही कळव. लवकर ये आदी, मला खूप भीती वाटतेय.”

अनघा रडू लागली.

“तू शांत हो बघू.. रडू नकोस.. मी आलोच..”

असं म्हणत त्याने पटकन कॉल कट केला आणि रिक्षा पकडून वरद हॉस्पिटल मध्ये पोहचला. जाता जाता त्याने त्याच्या वडिलांना, विनायकला ही बातमी सांगितली. थोड्याच वेळात विनायकही तिथे पोहचला.

“काय झालं आई?”

आदित्य पुढे काही विचारणार इतक्या डॉ. वसुधा आय. सी. यू. मधून बाहेर आल्या.

“मिसेस देशमुख.. नाऊ शी ईज आऊट ऑफ डेंजर. काळजी करू नका. अजून ती शुद्धीवर आलेली नाहीये. खूप रक्त वाहिलं आहे. रक्त चढवावं लागेल. आपल्या हॉस्पिटलच्या ब्लडबँकमध्ये तिच्या रक्तगटाचं रक्त उपलब्ध आहे का ते पाहावं लागेल. नसेल तर मागवून घेऊ. तुम्ही चिंता करू नका पण तिने असं का केलं? हा प्रश्न अजूनही तसाच आहे.”

डॉ. वसुधांनी रागाने एक कटाक्ष विनायकवर टाकला पण त्याच्या नजरेत बेफिकीरपणा स्पष्टपणे दिसत होता.

“म्हणजे? काय केलंय तिने? आम्हाला नीट सांगाल का डॉक्टर?”

आदित्यने त्यांना विचारलं.

“तिने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हांला कळतंय? हे किती चुकीचं आहे ते. पोलीस केस होऊ शकते आणि पोलीसकेस करणंही काही चुकीचं नाही. गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी.”

डॉक्टर वसुधांनी त्यांना संपूर्ण वृत्तांत सांगितला. आदित्यच्या कपाळावर चिंतेची रेष उमटली आणि विनायकच्या डोळ्यात प्रचंड संताप.. रागाने त्याच्या मुठी वळल्या जात होत्या.

“आम्ही तिला भेटू शकतो?”

डोळ्यात पाणी आणत अनघाने डॉक्टरांना विचारलं.

“नाही.. आता लगेच नाही. फार फार तर तुम्ही तिला पाहू शकता. पण भेट एक दोन दिवसांनीच..”

डॉक्टरांनी त्यांना बजावून सांगितल्यावर अनघाने मान डोलावली. त्यांचा निरोप घेऊन डॉक्टर वसुधा आपल्या केबिनच्या दिशेने चालू लागल्या. थोडं अंतर पार केल्यावर मागून अनघाने त्यांना आवाज दिला. त्या जागीच थांबल्या. अनघा धावतच त्यांच्याजवळ पोहचली.

“डॉक्टर, तुम्ही माझ्या ईशुचे प्राण वाचवलेत. खूप खूप उपकार झाले तुमचे.”

अनघाने भारावून कृतज्ञपणे हात जोडले आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. तिला थांबवत डॉ. वसुधा म्हणाल्या,

“अहो, हे काय करताय मिसेस देशमुख? मी काही उपकार वैगरे केले नाहीत. मी एक डॉक्टर आहे आणि मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही आता ईश्वरीची काळजी घ्या.”

अनघा पुन्हा हात जोडून म्हणाली,

“अजून एक उपकार कराल? ईश्वरीची ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. पोलीसकेस होऊ देऊ नका. हात जोडते मी. असं काही झालं तर तिचे बाबा परत तिलाच मारतील. देशमुखांची इभ्रत धुळीस मिळवली म्हणून तिला खूप त्रास देतील. तिच्यासाठी तरी तुम्ही हे पोलीस प्रकरण थांबवा.”

डॉ. वसुधांनी थोडा विचार केला. अनघाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या तिथून निघून गेल्या. अनघा पुन्हा आदित्य आणि विनायकजवळ आली.

“पाहिलंत.. कसे रंग उधळतेय तुमची लेक? हेच संस्कार केलेत का तुम्ही तिच्यावर? झालं आता साऱ्या पंचक्रोशीत देशमुखांच्या नावाने शिमगा होईल. आतापर्यंत जपलेली सगळी इज्जत मातीत गेली. का केलं हिने असं? आत्महत्या करण्याचं कारण काय? कुठे बाहेर काही..? अशा प्रश्नांना सामोरं जावं लागेल आता..”

विनायक अनघावर चिडून बोलत होता.

“अहो, पण यात आदीची चुकी आहे. एका शुल्लक कारणावरून त्याने आपल्या तरण्याताठ्या बहिणीवर हात उचलला. जनावराला मारावं तसं त्याने तिला गुराढोरासारखं मारलं. तुम्ही आदीला काहीच बोलत नाही आहात..”

हिंमत करून अनघा म्हणाली.

“त्याने उगीचच मारलं नसणार. त्याला काय वेड लागलंय का? तिनेच माती खाल्ली असणार.. म्हणूनच नको म्हणत होतो मी आदी, हिला शिकवायला. जास्त शिकली की ही डोक्यावर मिऱ्या वाटणार ठाऊक होतं मला..”

त्याचा आवाज चढला. इतक्यात एक नर्स बाहेर येऊन गोंगाट नको म्हणून तोंडावर बोट ठेवत शांत रहायला सांगून गेली.

“बाबा, शांत व्हा.. हे हॉस्पिटल आहे. आई, आपण घरी गेल्यावर बोलू. वाटल्यास तुम्ही दोघं घरी जा. मी थांबतो इथे..”

आदित्यने विनायकला समजावलं.

“नको आदी, तुम्ही जा.. घरी माई एकट्या आहेत. मी ईशु शुद्धीवर आल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मी इथेच बसून राहीन.”

अनघा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

“बराच पुळका आलेला दिसतोय तुम्हाला, तुमच्या लाडक्या लेकीचा..”

विनायक रागाने तिच्यावर धावून जात म्हणाला.

“बाबा.. शांत व्हा.. तुम्ही जा घरी.. मी आणि आई थांबतो.”

आदित्यने विनायकला समजावून घरी पाठवलं. अनघा तिथेच बाहेर खुर्चीत बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर आय.सी.यू. मधून एक नर्स त्यांच्या जवळ आली.

“ईश्वरी,..”

अनघा लगेच जागेवरून उभी राहिली.

“पेशन्ट शुद्धीवर आलाय. डॉ. वसुधा आहेत सोबत.. काळजी करू नका. ”

इतकं बोलून ती पटकन आत निघून गेली. अनघाने दोन्ही हात जोडून देवाचे आभार मानलं. त्यांना तिला फक्त पाहण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली. अनघा आणि आदित्यने दुरूनच ईश्वरीला पाहिलं. अनघाचे डोळे बरसू लागले. आदित्यलाही वाईट वाटलं.

दोन तीन दिवसांनी तिला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. अनघा तिच्यासोबतच होती. एकक्षणही ती ईश्वरीला सोडून राहिली नाही. ईश्वरीच्या प्रकृतीत सुधारणा होत होती पण ती आता खूप अबोल झाली होती. आईला समोर पाहताच तिच्या डोळ्यातलं पाणी वाहू लागायचं. जणू ते डोळ्यातलं पाणी आईला जाब विचारत होतं.,

“का वाचवलंस मला? अजून किती भोग भोगायचे आहेत? या नरकवासातून सुटका झाली असती माझी. का जगवलंस मला?”

थोड्या दिवसांनी तिला घरी सोडण्यात आलं. घरातलं वातावरण अधिकच गंभीर झालं. विनायक आणि आदित्यने तिच्याशी पूर्णपणे बोलणं टाकलं होतं. जणू तिच्यावर बहिष्कारच टाकला होता. ती पूर्ववत होत होती पण मनाने खचत चालली होती. एक दिवस माई तिच्या खोलीत आल्या. माई आल्याचं पाहताच ईश्वरी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. माईंनी खुणेनेच तिला पडून रहायला सांगितलं. त्या तिच्या उश्याशी येऊन बसल्या. ईश्वरीने आपलं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं. माईंनी बोलायला सुरुवात केली.,

“ईशु, कशी आहेस आता? बरं वाटतंय ना? खूप अशक्तपणा आलाय बघ तुला. डोळ्याखाली काळी वर्तुळं आलीत. आता तुझी आई तुला छान पदार्थ बनवून खाऊ घालील मग होशील पुन्हा पहिल्यासारखी..”

ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत माई बोलू लागल्या.

“ईशु, बाळा.. जे झालं ते अतिशय चुकीचं होतं. आदी जे वागला ते योग्य नव्हतं पण त्यावर स्वतःला संपवणं हा तोडगा असू शकत नाही. मान्य आहे मला, तू आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहचलीस म्हणजेच तुझ्या सहनशीलतेचा अंत झाला असेल पण बेटा, मृत्यूला कवटाळणं सोप्प असतं. खरी हिंमत लागते ती जगण्याला. त्या जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाला. संघर्षाच्या वाटेवर अग्नीफुले तुडवत जाऊन ध्येय गाठण्याला हिंमत लागते ईशु.. प्रत्येक संकटाला तोंड देण्याला, त्यातून मार्ग काढण्याला खरा कस लागतो. बाळा, जे घडून गेलंय ते सारं आता विसरून जायचं. नव्याने सुरुवात करायची. भूतकाळाची सारं जळमटं साफ करून टाकायची. नव्या दमानं पुन्हा उभं राहायचं. चला उठा आता.. असं सारखं बिछान्यात पडून राहायचं नाही. काहीच घडलं नाहीये. तू पूर्वीचीच गोड हसरी ईशु आहेस. तुला पुढे जायचं.. खूप मोठं व्हायचं आहे. अशा छोटया मोठ्या संकटाना घाबरायचं नाही तुला. ऊठ बाळा..”

माईच्या बोलण्याने ईशुला थोडं बरं वाटलं. तिला माईचं बोलणं पटलं होतं. तिने डोळे पुसले. माईचा हात हातात धरून ईशु म्हणाली,

“माई, माझं चुकलं.. मला क्षमा कर.. असा अविचार माझ्या मनात यायला नको होता. जे झालं ते मी बदलू शकत नाही पण यापुढे मी कधीच असं वागणार नाही. जीव देण्याचा अविचार कधीच करणार नाही. सॉरी माई..”

ईश्वरीचे डोळे पुन्हा बरसू लागले. माईंनी पुन्हा तिला कुशीत घेतलं.

“गुणाची गं माझी बाय..”

असं म्हणत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ईश्वरीने नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. तिने सारं विसरायचं ठरवलं. खरंतर खूप कठीणच होतं ते पण तिने प्रयत्न करणं सोडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफीचा ट्रे घेऊन ती आदित्यच्या खोलीत आली. तिला पाहताच आदित्यने दुसरीकडे नजर वळवली.

“गुडमॉर्निंग दादा, हे बघ मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलेय. मी बनवली आहे. कशी झालीय सांग बरं?”

ईश्वरीने टेबलवर कॉफी ठेवली आणि ती पलंगावर येऊन बसली.

“आय एम सॉरी दादा, चुकलं माझं.. मी असं पाऊल उचलायला नको होतं पण रागाच्या भरात मी ते अपकृत्य करून बसले. माफ कर मला. एक वेळ नाही का माफ करणार तुझ्या लाडक्या बहिणीला?”

ईश्वरीचा गळा भरून आला. आदित्यही थोडा नरमला. त्याने कॉफीचा मग हातात घेतला. कॉफीचा एक घोट घेताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले.

“एकदम फर्स्ट क्लास झालीय कॉफी.. आता तुझं लग्न ठरून तू सासरी जात नाही तोपर्यंत माझ्यासाठी तूच कॉफी बनवायची. आईने नाही.. समजलं का?”

आदित्यच्या बोलण्याने ईश्वरीचे डोळे आनंदाने चमकले. खळकन डोळ्यातून दोन आनंदाश्रू ओघळले. तिने हसून होकरार्थी मान डोलावली. तिचा हात हातात घेत आदित्य म्हणाला,

“ईशु, आपल्या घराण्याची इभ्रत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. माझ्यासाठी त्याहून दुसरं काही मोठं नाही. त्या इभ्रतीला धक्का लागेल असं काही वागू नकोस.. प्लिज.. मला वचन दे.. यापुढे तू घरातल्या मोठया माणसांच्या मनाविरुद्ध काही वागणार नाही. त्यांचं म्हणणं ऐकशील. प्रॉमिस कर..”

आदित्यने तिच्यापुढे हात धरला. ईश्वरी आपल्या दादाच्या हातात हात देत म्हणाली,

“दादा, मी तुला वचन देते. मी कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही. तुम्ही सांगाल तसंच वागेन.. प्रॉमिस.. पक्कावाला प्रॉमिस..”

ईश्वरीने भावाच्या प्रेमापोटी, आईवडिलांसाठी, घराण्याच्या इभ्रतीसाठी आदित्यला वचन दिलं.

पुढे काय होतं? ईश्वरीचा संघर्ष संपेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all