पुन्हा बरसला श्रावण..
भाग १८
माई ईश्वरीच्या खोलीत आल्या. ईश्वरीला कुशीत घेऊन रडू लागल्या.
“श्रीरंगा.. भगवंता.. कसले रे हे भोग? अजून किती दिवस असंच सुरू राहणार आहे? असा कसा पाषाणहृदयी झालास? माझ्या पोरीची दया येत नाही का तुला?”
माईचं मन देवाला जाब विचारत होतं. अनघाने माईंना डोळ्यांनीच शांत राहण्यास खुणावलं आणि ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,
“ईशु, आदी चुकीचंच वागला. त्याने असं तुला मारायला नको होतं. देशमुखांची परंपरा तो बरोबर चालवतोय. आधी आप्पा, नंतर तुझे बाबा आणि आता हा.. वारसा सुरूच आहे. जाऊ दे.. बाईच्या जातीला जन्माला येऊनच चूक झालीय आपली. आराम कर बेटा.. मी तुझ्यासाठी हळद टाकून गरम दूध घेऊन येते. बरं वाटेल तुला.. माई, ईशुसाठी काढा बनवतेय. जरा तुम्ही मला कसा करायचा सांगता का?”
माईंनी मान डोलावली. त्या ईशुच्या माथ्यावर ओठ टेकवून बाहेर आल्या.
“ईशु, मी आलेच हं बाळा..”
असं म्हणत अनघाने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. डोळयात आलेलं पाणी पुसत ती दुघ आणण्यासाठी बाहेर स्वयंपाक घरात आली. ईश्वरीच्या मनात विचारांचं वादळ घोंगावू लागलं. मनातला आक्रोश स्वस्थ बसू देत नव्हता.
“काय चूक होती माझी? खोटं बोलले म्हणून इतकी मोठी शिक्षा? एखाद्या जनावराला मारावं तसं त्याने मला मारलं. अंगावर काळे निळे डाग पडेपर्यंत. का दादा? तू तोच नं.. माझा दादा जो लहानपणी कायम माझ्या सोबत असायचा. मला कधी काही लागलं, खुपलं तर आधी वेदना तुला व्हायची. अंधाऱ्या खोलीत मला खूप भीती वाटायची. मी तुझं बोट माझ्या चिमुकल्या हातात गच्च पकडून ठेवायचे. किती आधार वाटायचा तेंव्हा मला तुझा. तू आहेस इतकंच पुरेसं असायचं मला. बाबा कितीही रागवले तरी तू मायेने जवळ घ्यायचा. माझं सांत्वन करायचा. डोळ्यात आलेलं पाणी पुसायचा तू.. किती छान होतास तू.. एका छत्रीत आपण दोघे शाळेत जायचो तू अर्धा भिजून जायचा पण मला पाऊस लागू नये म्हणून माझ्या डोक्यावर छत्री धरायचास.. दादा.. कुठे रे हरवलास तू? माझा प्रेमळ, मायाळू दादा कुठे निघून गेला?”
ईश्वरीचे डोळे वाहू लागले.
“दादा, लहानपणी तूझ्यामुळे मी चालायला, बोलायला शिकले. तुझ्या आधाराने मी उभं रहायला शिकले. तुझ्या नजरेतून हे जग पहायला शिकले किंबहुना तूच तर माझं जग होतास. तू म्हणशील ती प्रत्येक गोष्ट मला पटू लागायची.. आवडायची.. माझा दादा मला कधीच चुकीचं सांगणार नाही. तो माझ्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतो यावर माझा ठाम विश्वास होता. दादा, एकदा तू मला म्हणाला होतास.
“ईशु.. लोक म्हणतात, आपले बाबा व्यसनी आहेत. अश्या व्यसनी माणसाची मुलं काय वायाच जाणार.. त्याचं कुठे घरात लक्ष? त्याची मुलगी कोण्या लफंग्याचा हात धरून पळून जाणार.. त्याचा मुलगाही असाच व्यसनी होणार.. बाळा, एक लक्षात ठेव.. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. लोकांचे ग्रह चुकीचे ठरवायचे आहेत आणि हे जर बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. सुशिक्षित होतो. म्हणून आपल्याला खूप शिकायचं आहे. त्या शिक्षणासाठी कितीही कष्ट पडले तरी ते सोसायचे. शिक्षणासाठी कितीही संघर्ष करावा लागला, प्रसंगी आपल्याच माणसांशी झगडावं लागलं तरी ते करायचं पण शिकायचं.. शिकून समाजात एक स्थान निर्माण करायचं. ईशु, हे सगळं करत असताना तुझं पाऊल कधीही चुकीचं पडता कामा नये. देशमुखांच्या नावाला कलंक लागेल असं वागायचं नाही इतकंच फक्त लक्षात ठेव.”
“दादा.., किती भारी वाटलं होतं त्या दिवशी.. माझा दादा किती विचार करतो असं वाटलं आणि अभिमानाने ऊर भरून आला होता. त्याचक्षणी ठरवलं होतं मी, यापुढे दादा सांगेल तेच करायचं. तो म्हणेल तसंच वागायचं. कधीही चुकीचं वागायचं नाही. मला आठवतं आपल्या शिक्षणाचा भार आई बाबांवर पडू नये म्हणून आपण किती लहान वयात काम करायला सुरुवात केली होती. पहाटे लवकर उठून तू आपल्या परिसरातील प्रत्येक सोसायटीत जाऊन वर्तमानपत्र टाकायचा. पाच सहा मजली इमारतीच्या पायऱ्या चढून तू धावत जाऊन पेपर्स टाकून यायचा. काही दिवसांनी तू घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचवायला लागलास. मी म्हणायचे,
“दादा, किती रे कष्ट करतोस! दमत असशील ना? पायऱ्या चढून उतरून पाय दुखत असतील ना? थांब हं दादा, मी तुझे पाय चेपून देते.”
“माझ्या चिमुकल्या हातांनी मी तुझे पाय चेपायचे. कधी तुझ्या पाठीवर उभी राहून पाठ चेपायचे. मायेने जवळ घेत तू म्हणायचास,
“बाळा, काळजी करू नकोस. तुझा दादा खूप स्ट्रॉंग आहे आणि आता तर इतक्या इमारतीच्या पायऱ्या चढून मी अजूनच स्ट्रॉंग झालोय. माझा चांगला व्यायाम होतो. वेगळं जीमला जाण्याची गरजच पडत नाही.”
“आणि तू मोठ्याने हसायचास. किती सहजपणे तू आपल्या वेदना लपवायचास. दादा, मी सातवीत होते. तू मला चौथी पर्यंतचे क्लासेस घ्यायला सांगितलंस. मी क्लासेस घेऊ लागले. मुलं घरी येऊ लागली. शिकवणी चांगली सुरू झाली. शिकवणीतून मिळालेली माझी पहिली स्वकमाई तुझ्या हातावर ठेवताना मला किती आनंद झाला होता म्हणून सांगू! आणि तुझ्या डोळ्यातले आनंदाश्रू माझ्या नजरेतून सुटले नव्हते. त्याच वेळेस तू माझं बँकेत खाते उघडून दिलं होतंस. थोडे पैसे बँकेत माझ्या खात्यावर टाकून बाकीचे तू आईकडे दिले होतेस. इतक्या लहानवयात तू मला बचतीची सवय लावलीस. ती आजपर्यंत मी पाळत आले. दादा, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे करत होते. तुला जे आवडेल तेच करत होते. अरे अगदी माझे ड्रेस, एरिंग्स, हातातल्या बांगड्या, कॉस्माटिक्स सगळं तुझ्याच पसंतीने होतं. माझी अशी वेगळी आवडच उरली नव्हती. दादा, मला सायन्सला जायचं होतं. इंजिनियर व्हायचं होतं पण तू म्हणालास वाणिज्य शाखेत ऍडमिशन घे.. नोकरीच्या संधी खूप असतात. लवकर नोकरी लागेल. स्वतःच्या पायावर उभी राहशील. ऐकलं मी तुझं.. मी निमूटपणे ऍडमिशन घेतलं. तू मला तुझ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलं. मी स्वखुशीने तयार झाले. कारण विश्वास होता मला.. माझा दादा माझ्या बाबतीत कधीच चुकीचं वागणार नाही. मग दादा सांग मला.. आता माझा तो दादा कुठे हरवला? आता नेमकं काय झालं की तू इतका बदललास? म्हणतात की नात्याला इतकंही आवळून ठेवू नये रे की ते गुदमरून जाईल. आणि नेमकं तेच तू केलंस. दादा, माझी काळजी घेता घेता तू मला पिंजऱ्यात डांबून ठेवलंस. मायेचं नातं कधी अधिकारात बदललं कळलंच नाही. आता तुझ्या प्रेमापेक्षा मालकी हक्काची भावना जास्त तीव्र होत चाललीय. माझ्यावर तू मालकी हक्क सांगू लागला आहेस, दाखवतो आहेस.. पण दादा, मी एक माणूस आहे रे.. भावना, संवेदना असलेला हाडामांसाचा देह आहे रे.. घरातली कुठली तरी निर्जीव वस्तू नाही की तुझी प्रॉपर्टी नाही की, तू मला हवं तसं वागवायला. मी हे मुळीच सहन करणार नाही.”
मनातला संताप ईश्वरीच्या अश्रूवाटे बाहेर पडू लागला.
“दादा, माझ्या एका शुल्लक चुकीसाठी तू मला इतकं मारलंस? लहानपणापासून कधी बाबांनी मला प्रेमानं जवळ घेतलं नाही. आप्पांनी कधी दोन शब्दांनी कौतुक केलं नाही. अगदी आप्पांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी माझा फक्त दुस्वासच केला. आई आणि माईशिवाय कोणीच मला समजून घेतलं नाही. त्या दोघीनंतर तूच तर होतास माझ्यासाठी.. माझं सर्वकाही.. पण दादा तू आज काय केलंस? घराणं, परंपरा हे सर्व सांभाळण्याच्या नादात तू मला, तुझ्या लाडक्या बहिणीला विसरून गेलास. तूच असं वागलास? काय अर्थ आहे माझा अश्या वेदनादायी जगण्याला. नकोच मला हे असलं जगणं.. असं जगण्यापेक्षा मी मरून जाईन. मला जगायचंच नाहीये.. मी संपवून टाकेन स्वतःला.. नाहीच जगायचं मला.. ”
ईश्वरी स्वतःला संपवण्याच्या निर्णयापर्यंत पोहचली होती. ‘बाईच्या जातीला जन्माला येऊनच चूक झालीय आपली.’ आईचं हे वाक्य तिच्या डोक्यात सारखं फिरू लागलं. चूक बरोबर हा विचार करण्याची विवेकबुद्धी लोप पावत चालली होती. अविचाराने मनात जागा घेतली. ड्रेसिंगटेबलच्या कप्प्यातला कटर तिने बाहेर काढला. मागचा पुढचा कसलाही विचार न करता सरर्कन डाव्या मनगटावरून फिरवला. रक्ताची चिळकांडी उडाली. हळूहळू ईश्वरीचे डोळे मिटले जाऊ लागले. डोळ्यापुढे अंधार पसरला आणि ती भोवळ येऊन खाली पडली. जमिनीवर लटकणाऱ्या हातातून रक्ताची धार वाहू लागली.
अनघा स्वयंपाकघरात आपल्याच विचारात गर्क होती. ईश्वरीच्या शरीरावर झालेल्या जखमा तिला आठवत होत्या. रडू फुटत होतं. इतक्यात माई स्वयंपाकघरात आल्या. गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं दूध ऊतू जाऊ लागलं तरी तिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ईशुच्या विचारांनी ती अस्वस्थ झाली होती. माईंनी पटकन पुढे येऊन गॅस बंद केला.
“अगं, कुठे लक्ष आहे तुझं? ऊतू गेलं असतं ना.. एक काम कर तू. हे हळदीचं दूध तू ईशुसाठी घेऊन जा. मी काढा बनवते. अनू, काळजी करू नकोस सगळं ठीक होईल. आदीला त्याची चूक कळेल. तू ईशुच्या तब्बेतीची काळजी घे. तिला तुझी गरज आहे.”
माई अनघाला समाजावणीच्या सुरात म्हणाल्या.
“हो माई, बरोबर बोलताय तुम्ही.. माझ्या ईशुला तिच्या आईची, माझी गरज आहे. मी तिला एकटं कधीच सोडणार नाही. माझ्या लेकीला मी कायम साथ देईन. माई, मी आलेच हं तिला दूध देऊन.”
असं म्हणून अनघाने ग्लासात हळदीचं दूध भरलं आणि ग्लास ट्रेमध्ये ठेवला. ती ईश्वरीच्या खोलीजवळ आली. ईश्वरीला आवाज दिला आणि खोलीचं दार पुढे ढकललं. समोरचं दृश्य पाहून तिच्या हातातून दुधाचा ट्रे निसटून खाली पडला आणि ती जोरात किंचाळली,
“माई.. माईई.. पटकन या..”
तिने मोठ्याने हंबरडा फोडला. भीतीने, दुःखाने ती थरथरू लागली. ती धावतच ईशुजवळ आली. ईश्वरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रक्ताचा लोंढा वाहत होता. माई घाबरून पटकन ईश्वरीच्या खोलीत आल्या.
“ईशु, बाळा उठ गं.. डोळे उघड राजा.. हे काय करून घेतलंस? ईशु.. ए ईशु..”
अनघा धाय मोकलून रडत होती. ईश्वरीला उठवत होती. आपल्या नातीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून माईना काहीच सुचेना. डोळ्यांपुढे अंधार दाटू लागला. तश्या अवस्थेतही माईं धीराने घेत ईश्वरीजवळ आल्या. तिच्या नाकाजवळ बोट ठेवून पाहिलं. श्वास सुरू होता. आता तिच्यावर ताबडतोब इलाजची गरज होती. माई अनघाला म्हणाल्या,
“अनू, आधी तिच्या जखमेला पट्टी बांध. रक्तस्त्राव थांबला पाहिजे आणि पटकन आपल्या डॉक्टरांना फोन लाव. त्यांना ताबडतोब यायला सांग.”
घाबरलेल्या अनघाने पटकन तिच्या मनगटावर कापड गुंडाळलं आणि डॉक्टर वसुधांना फोन लावला.
“डॉक्टर.. डॉक्टर.. ईशु..”
इतकेच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले.
“काय झालं मिसेस देशमुख? सगळं ठीक आहे नाही.”
डॉक्टर वसुधांनी काळजीपोटी प्रश्न केला.
“काही ठीक नाही.. तुम्ही लवकर या डॉक्टर.. ईशु.. माझं बाळ..”
अनघा रडू लागली.
“तुम्ही काळजी करू नका मिसेस देशमुख.. मी आलेच..”
असं म्हणून त्यांनी पटकन रिसिइव्हर ठेवून दिला आणि त्यांच्या क्लिनिकच्या पार्किंगमधली कार बाहेर काढून त्या देशमुखांच्या घरी पोहचल्या. ईश्वरीच्या खोलीत येताच तिची अवस्था पाहून त्या अवाक झाल्या. त्यांनी तिला तपासलं आणि म्हणाल्या.
“मिसेस देशमुख, ईश्वरीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल.”
असं म्हणत पटकन शेजाऱ्यांच्या मदतीने अनघा आणि डॉक्टर वसुधांनी ईश्वरीला उचलून कार मध्ये मागच्या सीटवर झोपवलं. कार त्यांच्या हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव वेगाने धावू लागली.
पुढे काय होतं? ईश्वरीचा जीव वाचेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा