पुन्हा बरसला श्रावण.. भाग ७

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या एका श्रावणाची.. श्रावणाच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..



पुन्हा बरसला श्रावण..

भाग ७

माईंनी सांगितल्याप्रमाणे विनायकने अनघाशी लग्न केलं होतं. आता माईंनी आपलं वचन पाळण्याची वेळ आली होती. लग्नानंतर आप्पांकडून मुंबईला जाण्यासाठी परवानगी काढून घेण्याची जबाबदारी त्यांची होती. माई मात्र लग्नाच्या गडबडीत ही गोष्ट पार विसरून गेल्या होत्या. आपल्या तिन्ही मुलांना एकाच वाड्यात एकत्र सुखी समाधानाने नांदताना पाहून माई खूप आनंदात होत्या. घराचं गोकुळ झालेलं पाहून त्या त्यांच्या भरल्या संसारात अगदी तृप्त होत्या पण का कुणास ठाऊक! त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. एक दिवस माई स्वयंपाक घरातली कामे उरकून बाहेर अंगणात तांदूळ निवडत बसल्या होत्या. विनायक तिथे आला.

“माई, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे.”

माईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि तांदळाचं सुप बाजूला ठेवत त्या म्हणाल्या,

“बोल ना विनायका.. काय म्हणतोस.?”

“माई, मला मुंबईला जायचं आहे. माझे इतर मित्र गेले सुद्धा.. उद्याच निघेन म्हणतो.”

विनायकने सरळ मुद्यालाच हात घातला. माईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या,

“उद्याच? इतक्या घाईने..? अरे तुझ्या आप्पांना विचारायला नको का? आप्पा आले की विचारू आणि ठरवू काय ते..”

“नाही.. मी उद्या जाणारच.. तू मला माझ्या लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस. मग इतके दिवस का नाही विचारलंस आप्पांना?”

विनायक चिडून म्हणाला.

“अरे, त्यांना असं घाईत विचारून कसं चालेल? त्यांचा मूड बघूनच बोलायचं की नाही ठरवावं लागेल ना.. आणि तू याविषयावर सुनबाईशी बोललास का? तिचं काय म्हणणं आहे मग? तिच्याशी बोललास का? काय करशील? कुठे राहशील? काही ठरवलं आहेस का?”

माई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

“तिचं काय? येईल नाहीतर राहील इथेच.. असंही तिला तुझ्यासोबतच राहायला आवडतं ना.. माझ्या मित्रांनी तिथे माझ्या राहण्याची सोय केलीय. नोकरीचीही व्यवस्था होईल. आता मला अडवू नकोस. मी कोणाचंही ऐकणार नाही. मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच..”

बाहेरून येणाऱ्या वसंतरावांच्या कानावर विनायकचं बोलणं पडलं. रागाने त्यांचा पारा चढला.

“काय म्हणालास? कुठे निघालायेस? मुंबईला..? कोणी ठरवलं आणि कोणाला विचारून? घरची शेती, एवढा मोठा वाडा सोडून हे कसले भिकेचे डोहाळे? कोणी कुठेही जाणार नाही. या घराबाहेर पाऊल टाकलंस तर खबरदार..! पाय तोडून हातात देईन. समजलं..”

वसंतराव रागाने थरथरत होते. माई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. आता घरातली बाकीची मंडळी गोळा झाली. विनायक रागाने माईकडे पाहत म्हणाला,

“माई, मी तुला आधीच सांगितलं होतं. आप्पांना तू सांगणार होतीस. त्यांच्याकडून परवानगी घेणार होतीस. मला तू मुंबईला पाठवणार म्हणूनच तर मी लग्नाला तयार झालो. नाहीतर मी कधी बोहल्यावर चढलोच नसतो आणि हा धोंडा माझ्या गळ्यात बांधून घेतला नसता.. आता झालं ते झालं पण यापुढे मी माझ्या भविष्याशी कोणालाच खेळू देणार नाही. मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच..”

“ विनायका…”

आप्पांचा हात वर उचलला गेला. आप्पा रागाने थरथरत होते.

“अहो, काय करताय हे? तरण्याताठ्या मुलावर हात उचलताय.”

माईंनी वसंतरावांना अडवलं.

“मग त्याला नीट सांग.. अजून मी जिवंत आहे आणि मी जिवंत असेपर्यंत माझाच कायदा चालेल. मी म्हणेल तसंच चालावं लागेल. नाहीतर कायमचं या घरातून चालतं व्हायचं आणि एकदा घराबाहेर पाऊल टाकलं तर या घराचे दरवाजे कायमसाठी बंद झाले म्हणून समजायचं.. ”

वसंतराव तावातावाने बोलत होते. विनायकचाही पारा चढला. शेवटी त्यांचाच मुलगा नं.. त्यांच्यासारखाच तापट, शीघ्रकोपी.. विनायक रागात पाय आपटत त्याच्या खोलीत गेला. दोन चार कपड्यांचे जोड ट्रँकेत कोंबले आणि तो बाहेर आला. बाहेर आसवं टिपत कोपऱ्यात उभी असलेल्या अनघाकडे रोखून पाहत म्हणाला,

“तुला यायचंय की मी जाऊ? नाहीतर जा तुझ्या माहेरी कायमचंच.. परत तोंड दाखवू नकोस..”

विनायक रागाच्या भरात तोंडाला येईल ते बडबडत होता. अनघाला आपल्या माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी देशमुखांच्या घरी येत असताना आपल्या आईचे शब्द आठवले. आई म्हणाली होती.,

“एकदा का लग्न झालं मुलीचं. तिने मरेपर्यंत तिथेच राहायचं. आता तेच तुझं घर.. तो उंबरठा हीच तुझी मर्यादा. तू उंबरठा ओलांडशील ते फक्त तुझ्या अंतिम प्रवासालाच”

दुसऱ्याच क्षणाला अनघाला आपल्या सासूबाईंचे, माईंचे शब्द आठवले.

“आपला नवरा हाच आपला परमेश्वर.. तो जिथं असेल बायकोने तिथेच रहायला हवं. तो म्हणेल तेच करायचं. तोच तिचा पत्नीधर्म.. नवऱ्यापासून दूर राहणाऱ्या बायकांना समाज फार विचित्र नजरेने बघतो, नावे ठेवतो आणि नवराही दुसऱ्या बाईच्या नादाला लागतो म्हणून नवऱ्याला एकटं सोडायचं नाही. नेहमी त्याच्या सोबतच राहायचं.”

अनघा जड पावलांनी तिच्या खोलीत गेली. तिने तिच्या मोजक्या साड्या पिशवीत भरल्या आणि देवघरात गेली. देव्हाऱ्यातल्या देवाला नमस्कार केला. माईंना, मोठ्या जाऊबाईना नमस्कार केला. माईंनी अनघाला जवळ कुशीत घेतलं. देव्हाऱ्यातल्या बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती अनघाच्या हातात देत पदराने आपली आसवं टिपत त्या म्हणाल्या,

“काळजी घे गं पोरी.. आता हाच जगदीश्वर तुझं रक्षण करेल. तुझ्यात ही अन्नपूर्णा वसेल.. सुखी रहा पोरी.”

अनघाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पुढे जाऊन ती आप्पांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या पायाशी वाकली. वसंतराव मागे झाले. तिच्याकडे पाठ फिरवून म्हणाले.

“सुनबाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मागे निघालात.. पण गोष्ट ध्यानात ठेवा एकदा का हा उंबरठा ओलांडला तर परत माघारी येता येणार नाही. या घरचे दार कायमसाठी बंद, समजलं?“

माई, अनघाच्या मोठ्या जाऊबाई दीर साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लहान मुलं “काकू तू जाऊ नको ना..” असं म्हणत होती. त्यांना सोडून जाऊ नये म्हणून आर्जवे करत होती. पोरांच्या मायेने अनघाचा जीव तुटत होता. विनायकच्या मोठ्या भावांनी विनायकला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण विनायक इरेला पेटला होता. मुंबईला जाण्याच्या निर्णयावर तो ठाम होता. अनघाला घरातच घुटमळताना पाहून विनायकने दारातूनच रागात मोठ्याने अनघाला आवाज दिला.

“येतेस का जाऊ मी?”

अनघाच्या देशमुख वाड्यातून पाय निघत नव्हता. विनायकचा आवाज ऐकून नाईलाजाने ती जायला निघाली. जाताना एकदा आपल्या दिराजावांकडे, माई आप्पांकडे, देशमुखवाड्याकडे डोळे भरून पाहिलं आणि भरल्या डोळ्यांनी तिने सर्वांना निरोप दिला आणि एक हसता खेळता परिवार विनायकच्या मुंबईला जाण्याच्या वेडापायी विखूरला गेला.

पुन्हा एकदा एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. वेंगुर्ल्याच्या एस. टी. स्थानकावर एका बाकावर अनघा विचार करत बसली होती.

“काय हे बाईचं जगणं.. कायम दुसऱ्यांच्या मनासारखं वागायचं.. आधी वडिलांच्या मग भावाच्या मग नवऱ्याच्या आणि त्यानंतर मुलांच्या.. ही पिता, पती, भाऊ, पुत्र या पुरुषी वलयातून स्त्रीची सुटका नाही. कधी स्वतःच्या मनाचा, इच्छांचा विचार नाही. किती स्वप्नं उराशी बाळगून मी देशमुखांच्या घरी आले होते आणि आता आयुष्य कोणत्या वळणावर आलंय, कुठे घेऊन जाणार आहे त्या सर्वसाक्षी ईश्वरालाच माहीत.. आपल्यासाठी तर सगळंच अकल्पित. नवऱ्याच्या पावलांमागून आपण चालत राहायचं. काहीही प्रश्न न विचारता.. फक्त चालत राहायचं..”

इतक्यात मुंबईला जाणारी एस. टी स्थानकावर लागली. विनायकने अनघाला आवाज दिला. दोघेही गाडीत चढले. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली. हळूहळू गाव मागे पडत चाललं होतं. नाती मागे पडत चालली होती. अनघाच्या डोळ्यातून मेघ झरत होते. हिरव्यागार वनराईने नटलेला गाव मागे पडला आणि स्वप्ननगरी मुंबईत गाडीने प्रवेश केला. हिरवीगार झाडी जाऊन उंच इमारती दिसू लागल्या. कधी गावची वेस न ओलंडलेली अनघा आज आपला गाव सोडून शहरात आली होती. दादर एस. टी. स्थानकावर गाडी थांबली. अनघा आणि विनायक उतरले. स्थानकवर त्याचा मित्र सदाशिव आधीच येऊन थांबला होता. दुरूनच त्याने विनायकला आवाज दिला.

“ए इन्या.. आरं इकडं..”

विनायकचं आवाजाच्या दिशेने त्याच्याकडे लक्ष गेलं. हसून वर हात करत त्याने त्याला जवळ बोलावलं. सदा धावतच त्याच्याजवळ आला. विनायकला मिठी मारत म्हणाला,

“आलास लेका.. बरं केलंस. प्रवासात काही त्रास झाला नाही नां?”

“नाही तसा फारसा काही त्रास नाही. आलो बरोबर.. वाटलं चुकतो की काय? एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आलोय नां.. थोडं बावरायला झालं बघ.”

विनायकने हसून उत्तर दिलं. इतक्यात सदाचं शेजारी उभी असलेल्या अनघाकडे लक्ष गेलं.

“अरे वहिनींनू नमस्कार.. बऱ्या असत नां? बरं चला.. आधी घरी जाऊ. घरी गेल्यावर निवांत गप्पा मारू..”

अनघाने सदाला हात जोडून नमस्कार केला. विनायक त्याच्या मागून चालू लागला. सदाने टॅक्सी बोलवली.

“वरळी कोळीवाडा..”

सदाने टॅक्सी ड्राईव्हरला विचारलं त्याने मान डोलावली तसं सदाने दोघांना मागच्या सीटवर बसायला सांगितलं. दोघांच्या हातातली बॅग्स टॅक्सीच्या डिकीत ठेवलं आणि तो स्वतः ड्राईव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला. टॅक्सी वरळी कोळीवाड्याच्या दिशेने धावू लागली. अनघा कुतूहलाने टॅक्सीबाहेर खिडकीतून नवीन शहर पाहत होती. उंचच उंच इमारती, रहदारी, फेरीवाले, माणसांची वर्दळ सारं काही तिच्यासाठी नवीन होतं.


पुढे काय होतं? विनायकचा मुंबईसारख्या ठिकाणी निभाव लागेल का? वसंतराव विनायकला माफ करतील का? अनघाच्या आयुष्यात अजून नवीन काय घडणार? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all