पुन्हा बरसला श्रावण भाग २७

पुन्हा बरसला श्रावण



पुन्हा बरसला श्रावण.. भाग २७

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराज आणि ईश्वरीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. लग्नाची तयारी सुरू झाली. ईश्वरी कॉलेजमधून पहिली आली. सर्वांना खूप आनंद झाला. सरदेसाई आणि देशमुखांच्या घरी लगीनघाई सुरू झाली. अनघा आपल्या मुलीला सासरी सर्वांशी मायेने वागण्याचे धडे देत होती. लग्नाची खरेदी, लग्नपत्रिका सारं उरकलं. ईश्वरीला स्वराजची उष्टी हळद लागली. संगीत मेहंदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडले आता पुढे..


भाग - २७

दुसऱ्या दिवशी पहाटे ईश्वरीला जाग आली ती म्हणजे कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी.. पाखराच्या किलबिलाटाने.. हातावरच्या मेहंदीचा रंग अजूनच खुलून आला होता. मेहंदीचा मंद सुगंध तिला मोहवत होता. ईश्वरीच्या हातावरच्या मेहंदीचा रंग अधिकच गडद झाला होता. ईश्वरी आपल्या तळाहाताकडे पाहत होती. तिला आठवलं, तिच्या हातावर मेहंदी काढताना स्वराजचं नाव काढलं होतं.

“ईशु, यात तुझ्या पतीपरमेश्वराचं नाव काढलं आहे. हनिमूनच्या रात्री त्याला सांग शोधायला..”

अर्चनाच्या या वाक्याने साऱ्याच जणी तिच्यावर हसल्या होत्या. ईश्वरी खुदकन लाजून हसली. ईश्वरी तिच्या हाताकडे पाहतच होती की इतक्यात अर्पिता आत येत म्हणाली.

“गुडमॉर्निंग ईशु.. बघू मेहंदी.. अरे व्वा कसली गोड रंगलीय! किती लालचुटूक झालीय ना..स्वराजचं किती प्रेम आहे बघ..”

“काहीही हं वहिनी.. मेहंदी रंगण्याचा आणि प्रेमाचा काही संबंध आहे का? उगीच आपलं..”

ईश्वरी हसून म्हणाली. इतक्यात अनघा ईश्वरीसाठी कॉफी घेऊन आत आली.

“अगं खरंच! हवंतर आईंना विचार. आई, मेहंदी जास्त रंगली तर नवऱ्याचं आपल्यावर खूप प्रेम असतं ना ओ?”

अनघा हसून मान डोलावत म्हणाली,

“हो असतं.. पण आता उठा बरं.. ईशु, तुझी कॉफी.. चल आवर पटकन.. अजून पुष्कळ कामं आहेत. आज सीमांत पूजन मग रात्री व्याही भोजन असेल. तिकडील पाहुणे मंडळी हॉलवरच येतील. पुढच्या सगळ्या विधी हॉलवरच करायच्या आहेत. आपल्याला हॉलवर जायचं आहे. पटकन तयारीला लागा. तुझे बाबा आणि दादा परत चिडतील. अर्पिता, आता ईशुला तयार करण्याची सगळी जबाबदारी तुझी.. अर्चना, आस्थाला हाताशी घे मदतीला.. चांगलं सजवा गं माझ्या परीला..”

भरल्या डोळ्यांनी अनघाने तिच्याकडे पाहिलं. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती तिच्या कामाला लागली.

“विनायका, जावईबापूंचे, आहेराचे कपडे घेतलेस नां? आणि सोन्याची चेन आणि अंगठी त्याच्या सोबतच ठेव बरं.. पुन्हा सापडायला वेळ लागायला नको. आणि आपल्या व्याही आणि विहीणबाई यांचे मानपानाचे कपडे सुद्धा त्याच्या सोबतच ठेव..”

माईं विनायकला सूचना देत होत्या. विनायकने मान डोलावली. आदित्यकडे पाहून माई म्हणाल्या,

“आदित्य, ते फुलवाल्यांना सांगितलंय नां? वेळेवर हॉलवर ये म्हणावं.. अनु, पाहुण्यांना द्यायच्या आहेराचा बस्ता नीट गाडीत ठेवलाय ना?”

“हो माई, सगळी तयारी झालीय.. तू उगीच टेन्शन घेऊ नकोस बरं.. चल मला थोडं पुढे जाऊन कॅटर्सवाल्यांना भेटायचं आहे. हॉलवर जाऊन बाकीची सोय करायची आहे. समीर व्हिडिओ शूट करेल सगळं मग तुम्ही सगळे बाबांसोबत या..”

असं म्हणून आदित्य पुढे निघून गेला. माई, विनायक आणि अनघा आपली कामे उरकत होती. अर्पिता अर्चना आणि आस्थाला सोबत घेऊन ईश्वरीला तयार करू लागले. व्हिडिओ शूटवाला सर्व विधी छान शूट करत होता. निघताना पाच सवाष्ण बायकांनी ईश्वरीचं औक्षण केलं. घरातून बाहेर पडताना एकदा ईश्वरीने आपल्या घरावर सर्वत्र नजर फिरवली. ज्या घरात लहानाची मोठी झाली. ज्या घराने मायेने तिला सांभाळलं होतं. मायेची ऊब दिली होती ते घर सोडून जायचं होतं. तिचा पाय निघत नव्हता. डोळ्यातून धारा वाहू लागल्या. साऱ्यांचेच डोळे भरून आले होते. माईंनी, अनघाने पदराने डोळे टिपले. ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवत तिला बाहेर घेऊन जाऊ लागले.

थोड्याच वेळात विनायक, आदित्य आपल्याला कुटुंबासहित, पाहुण्यारावळ्यांना घेऊन हॉलवर आले. अर्पिता तिच्या पार्लरवाल्या मैत्रिणीसोबत ईश्वरीला घेऊन आतल्या खोलीत आली. आणि तिची तयारी सुरू झाली. पुढच्या विधीसाठी तयार करत होते. लवकरच नवरा मुलगा, आणि मुलाकडची मंडळी येणार होती. विनायकने तसा सरदेसाईंना कॉल करून येण्याची वेळ विचारून घेतली होती. लग्नाच्या विधी सुरू झाल्या.

“अरे मुलाकडचे पाहुणे आले.. ”

कोणीतरी ओरडलं. विनायक आणि अनघा तत्परतेने बाहेर आले. सरदेसाईं आणि त्यांची पाहुणे मंडळी हॉलच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली. विनायक आणि अनघाने त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. पाहुण्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडून आत येण्यास सांगितलं. सीमांत पूजनाचा विधी सुरू झाला. सरदेसाई आणि त्यांच्या पत्नी शालिनीताईचे पाय धुवून हळदीकुंकू लावलं. व्याही आणि विहीणबाईंची पूजा केली. त्यांच्यासाठी घेतलेली वस्त्रे आणि भेटवस्तू त्यांना दिल्या. नवरदेव स्वराजचीही पूजा करण्यात आली.

“आमच्या सुनबाईना बोलवा..”

शालिनीताईनी ईश्वरीला बोलवायला सांगितलं. अर्पिता ईश्वरीला घेऊन बाहेर आली. शालिनीताईनी ईश्वरीला कुंकू लावलं. तिच्यासाठी आणलेलं पैंजण आणि सोन्याचा नेकलेस आणि उंची साडी तिला भेट केली.

“सुनबाईना छान सजवा. पूजेसाठी घेऊन या..”

थोड्याच वेळात ईश्वरीला तयार करून बाहेर आणण्यात आलं. पूजेसाठी पाटावर बसवलं. शालिनीताईनी दिलेल्या डाळिंबी रंगांच्या कांजीवरम साडीत ईश्वरी खूपच छान दिसत होती. नाकात नथ, गळ्यात नाजूक नेकलेस, कपाळावर चंद्रकोर, दंडावर बाजूबंद तिच्या सौन्दर्यांची शोभा वाढवत होतं. शालिनीताईनी ईश्वरीची हळदीकुंकू लावून पाच फळांनी ओटी भरली. त्यानंतर रात्री व्याही भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. देशमुखांनी पाहुण्यासाठी पंचपक्वान्नांचा बेत आखला होता. लग्नाचा दिवस उजाडला. अनघाचे डोळे राहून राहून बरसत होते. जीवाचा तुकडा तिला सोडून सासरी जात होता. ईश्वरीला तिच्या मैत्रिणी तयार करत होत्या. तेवढ्यात माई आत आल्या.

“ईशु, लवकर आवर बाळा, तुला आता गौरीहराची पूजा करायची आहे.”

माईंनी ईशुला आवाज दिला. त्या पूजेबद्दल ईश्वरीला काहीच माहित नव्हतं. गोंधळलेल्या नजरेने तिने अनघाकडे पाहिलं. तिची अवस्था अनघाच्या लक्षात आली. माई हसून म्हणाली,

“अगं बाळा, असं गोंधळून आईकडे काय पाहतेस? संसार सुखाचा व्हावा, नवऱ्याबरोबर छान मनोमिलन व्हावं म्हणून ही पूजा करतात. लग्नघटिका जवळ येऊ लागली की नवरीमुलीने गौरी-हराची म्हणजे शंकर-पार्वतीची पूजा करायची असते. त्याचबरोबर बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांचीही पूजा करायची असते. मी सांगते तुला. चल पूजेला सुरुवात करू.”

ईश्वरीने मान डोलावली. अनघाने ईश्वरीच्या मामांनी आणलेली ‘अष्टपुत्री’ नावाची पिवळी साडी ईश्वरीला नेसवण्यासाठी अर्पिताच्या हातात दिली. थोड्याच वेळात तयार होऊन ईश्वरी बाहेर आली. पूर्व दिशेला गौरीहरापुढे तोंड करून पाटावर बसली. माई ईश्वरीला पूजेचा विधी सांगू लागल्या.

“ईशु, तिथे तांदळाची एक छोटीशी रास बनव. आता त्यावर बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती मांड. ही तांदळाची रास म्हणजे इंद्रपत्नी \"शची’ प्रतीक आहे. ‘इंद्राच्या पत्नीला जसे विवाह भाग्य मिळाले, आरोग्य लाभले व पुत्रप्राप्ती झाली, तसेच मलाही मिळो’ अशी प्रार्थना तुला करायची आहे. आता मी म्हणते तसं म्हण,

‘देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी
विवाहं भाग्यम् आरोग्यम् पुत्रलभंच देही मे’

आता एक एक तांदूळ गौरीहराला अगदी सावकाश वाहत ‘गौरी गौरी सौभाग्य दे, दारी आलेल्या वराला त्याला आयुष्य दे‘ असं म्हणत रहा.”

ईश्वरीने माईच्या सांगण्याप्रमाणे गौरीहराची यथासांग पूजा केली. अनघा ईश्वरीकडे पाहत होती. ईश्वरीचे डोळे भरून येत होते. तिकडे विनायक, आदित्य आलेल्या पाहुण्यांच्या चहा नाश्ताची सोय पाहत होते. सरदेसाईच्या कुटुंबातली पाहुणे मंडळीही तयार होत होती. स्वराजचीही तयारी सुरू होती. मोती रंगाची शेरवानी त्याला खूप छान दिसत होती. स्वराजचं रुबाबदार व्यक्तिमत्व खुलून आलं होतं.

“किती गोड दिसतोय माझा स्वराज! कोणाची दृष्ट नको लागायला..”

शालिनीताईंनी प्रेमाने डोळ्यातल्या काजळाचा तीट लाडक्या लेकाच्या कानामागे लावला.

“आई, अहो तुमचा लेक आता लहान नाही राहिला तीट लावायला. आता तो त्याच्या लाडक्या बायकोचा लाडका नवरा होणार आहे बरं.. ”

स्वराजची वहिनी स्वराजला चिडवत म्हणाली. शालिनीताई खळखळून हसल्या. त्याचबरोबर जमलेल्या बायकांमध्ये हास्याचे कारंजे उडाले. स्वराजने किंचित हसून तिच्याकडे पाहिलं. इतक्यात सरदेसाई आत येत म्हणाले.

“चला झालं की नाही. मुहूर्ताची वेळ जवळ आलीय. स्वराजला बोहल्याकडे घेऊन जायचं आहे.”

सर्वजण पुन्हा स्वराजला तयार करण्याच्या कामाला लागले. लवकरच लग्नविधी सुरू होणार होता. स्वराजला बोहल्यावर आणण्यात आलं आणि ईश्वरीचा सदूमामा ईश्वरीला बोहल्याकडे घेऊन जाण्यासाठी आला.

“ताई, आवरलं का? नवरा बोहल्यावर आलाय. ईशुला घेऊन जावं लागेल. ”

सदूमामाने भरल्या डोळ्यांनी ईश्वरीला उचलून घेतलं आणि बोहल्याकडे आला. ईश्वरीच्या सोबत अर्चना, आस्था, विभा अर्पिता सगळ्या मैत्रिणी स्टेजवर आल्या.

“किती हॅन्डसम दिसतोय यार! ईशु, आज तुझं काही खरं नाही..”

अर्चना ईश्वरीच्या कानात पुटपुटली तशी ईश्वरी लाजली. डोळ्यानेच दाटावत तिला शांत राहण्यास सांगितलं. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. नकळत तो आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला. अंतरपाट सजला. दोघांच्या हातात पुष्पमाला देण्यात आल्या. लग्नविधी सुरू झाला. गुरुजींनी मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात केली. शेवटच्या घटिकेला “शुभ मंगल सावधान!” म्हणताच अंतरपाट दूर झाला आणि स्वराज आणि ईश्वरीने एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. ईश्वरीने एक चोरटा कटाक्ष स्वराजवर टाकला.

“खरंच किती देखणा दिसतो हा! रुबाबदार.. तेजस्वी..”

ईश्वरी लाजली. स्वराजचं पेहराव खूपच छान होता. लग्नाच्या पुढच्या विधी सुरू झाल्या. सप्तपदीचा विधी सुरू झाला. विधी सुरू असताना स्वराजच्या नकळत होणाऱ्या हवाहवाश्या वाटणाऱ्या अलगद स्पर्शाने ईश्वरी मोहरत होती. सुखावत होती. स्वराजच्या हातात हात घेऊन ईश्वरी प्रत्येक विधी मनोमन समजून, उमजून आणि श्रद्धेने करत होती. नंतर अनघाने वरमाईची, शालिनीताईची ओटी भरली. विनायक आणि अनघा यांनी कन्यादानाचा विधी पार पाडला.

“जावईबापू,माझ्या जीवाचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतेय. तिला नीट सांभाळा.. सुखात ठेवा..”

अनघा मनातल्या मनात स्वराजला आर्जवे करत होती. कन्यादानाच्या विधीनंतर मंत्रांच्या घोषात कंकणबंधन आणि मंगळसूत्र बंधनाचा विधी झाला. ईश्वरीच्या पायाच्या नाजूकश्या बोटात जोडवी सजली. आदित्यला स्वराजचा कान पिळायला लावून कानपिळीचा कार्यक्रम पार पडला. शालिनीताईनी आदित्य आणि अर्पिताला कपड्यांचा आहेर दिला. सुनमुख दर्शनाच्या कार्यक्रमाला शालिनीताईना मध्यभागी बसवलं. मांडीवर हलकेच स्वराज आणि ईश्वरीला बसायला सांगितलं. ईश्वरीला शृंगाराच्या वस्तू देत कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तिला आरश्यात पाहायला सांगितलं. सूनमूख कार्यक्रम पार पडला त्यानंतर चांदीच्या ताटात तांदूळ पसरवण्यात आले.

“स्वराज यात वहिनीचं नाव कोरायचं आहे तुला. छान नाव लिही. यापुढे तेच नाव राहिल तिचं.”

स्वराजच्या चुलत बहिणीपैकी एकजण हसून म्हणाली. हे ऐकून ईश्वरी काहीशी नाराज झाली.

“इतकी वर्षे माझी ओळख असलेलं माझं हक्काचं नाव बदलणार? माझी संपूर्ण ओळखच पुसली जाणार..”

ईश्वरी उदास झाली पण हा लग्नाच्या विधीचा एक भाग म्हणून निमूटपणे बसून राहिली. तांदळात स्वराज काय नाव कोरेल याची तिला उत्सुकता लागली. स्वराजने तांदळावर नाव कोरलं.

“राजनंदिनी”

कोरलेलं नाव वाचत शालिनीताईनी नावाची घोषणा केली.

“अच्छा म्हणजे स्वराजमधलं राज प्लस नंदिनी असं मिळून राजनंदिनी.. भारी आयडिया भावोजी..”

स्वराजची वहिनी म्हणाली. सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवून ईश्वरीच्या नव्या नावाचं स्वागत केलं.

“तसं इतकं काही वाईट नाही नाव. ईश्वरी नावाइतकंच छान आहे. तुझ्या नावाबरोबर कायमची मी जोडलेली असेन.”

ईश्वरी स्वतःशीच मनातल्या मनात स्वराजशी बोलत होती.

“किती सुंदर.. लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय.. शालिनीताई छान दिसते हो तुमची सून..”

जमलेल्या वऱ्हाडी मंडळीतल्या बायकां एकमेकांत बोलू लागल्या.शालिनीताईना स्वतःवरच अभिमान वाटत होता. लग्नपंगतीचा विधी सुरू झाला. देशमुखांच्या घरच्यांनी सरदेसाईंच्या मोठ्या आदराने जेवायला आमंत्रित केलं. सरदेसाई दांपत्यांच्या हाती चांदीच्या वाटीत पाच मोती, पाच सोन्याचे मणी आणि अक्षता घालून मोठया सन्मानाने भेट दिलं. जेवणाच्या पंगतीत मुलाकडील मानाच्या माणसांच्या ताटाभोवती रांगोळ्या काढल्या. चांदीचे ताट, उदबत्ती, पंचपक्वान्ने वाढून सनईच्या मंद सुरात भोजन समारंभ सुरू झाला. पंगतीत मधोमध स्वराज आणि ईश्वरीला बसवण्यात आलं. दोघांनी एकमेकांना गोडाचा घास भरवला. सगळ्यांनी हसून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं. जेवणानंतर अनघाने शालिनीताईना आणि इतर मानाच्या सुवासिनींना हात धुण्यासाठी गरम पाणी, हातावर साखर,चांदीची लवंग देऊन सन्मानित केलं. आदित्य विनायक पाहुण्यांकडे जातीने लक्ष घालत होते. हवं नको ते पाहत होते. देशमुखांच्या घरच्यांनी जेवणाची उत्तम सोय केली होती. बऱ्याच पंगती जेवून उठल्या. पाहुणे मंडळीनी लग्नात सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. स्वराज आणि ईश्वरीचा विवाहसोहळा थाटामाटाने पार पडला.

पुढे काय होतं? स्वराज ईश्वरीचा संसार फुलेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all