पुन्हा बरसला श्रावण.. भाग २६

पुन्हा बरसला श्रावण..पुन्हा बरसला श्रावण.. भाग २६

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराज आणि ईश्वरीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. लग्नाची तयारी सुरू झाली. ईश्वरी कॉलेजमधून पहिली आली. सर्वांना खूप आनंद झाला आता पुढे..


ईश्वरी पदवीधर झाली. तिच्या कॉलेजमध्ये पहिली येण्याने अनघाला, घरातल्या सर्वांनाच खूप आनंद झाला होता. नाही म्हटलं तरी विनायकची मान चारचौघात,नातेवाईकांत उंचावली होती. सरदेसाईंना ही बातमी कळाली तेंव्हा त्यांनाही आनंद झाला. इतकी हुशार मुलगी आपली सून आहे या गोष्टीचा त्यांनाही खूप अभिमान वाटला. आता लग्नाची तयारी सुरू झाली. पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. खरेदी, हॉल बुकिंग, कॅटर्स साऱ्याचं नियोजन आदित्यने केलं होतं. लग्नपत्रिका छापून घरी आल्या. आदित्यने घरात सर्वांना पत्रिका दाखवली. सर्वांना खूप आवडली. अर्पिताने ईश्वरीला आवाज देऊन बाहेर बोलावलं. ती बाहेर येताच ईश्वरीच्या हातावर लग्नपत्रिका ठेवत मिश्किलपणे अर्पिता म्हणाली,

“ईशु, हे बघ तुझ्या लग्नाची पत्रिका.. कशी आहे सांग? आमच्या नवरीबाईला आवडली पाहिजे ना.. नाहीतर उगी रुसून बसायच्या.”

“चल गं वहिनी.. त्यात काय इतकं रुसण्यासारखं.. पत्रिका तर आहे. तुम्ही सर्वांनी, आपल्या दादाने पसंत केली म्हणजे चांगलीच असणार.. मलाही आवडेल.”

ईश्वरी अर्पिताकडे हसून पाहत म्हणाली. पण मनात मात्र पत्रिका पाहण्याची इच्छा प्रबळ झाली होती. अर्पिताने ते बरोबर ओळखलं होतं आणि म्हणूनच तिने पत्रिका ईश्वरीच्या पुढ्यात सरकवली. उत्सुकतेने ईश्वरीने पाहिलं. जाळीदार पिंपळपानावर गणपती बाप्पाच्या सुंदर फोटो शेजारी आमंत्रणाचा मजकुर छापला होता. पत्रिकेवर स्वतःचं आणि स्वराजचं नाव पाहून ईश्वरीचा चेहरा खुलला होता. मनात आनंदाचे लाडू फुटत होते. लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावर पसरली.

“खूपच छान.. सुंदर आहे पत्रिका.. हो ना ईशु?”

अनघाने ईश्वरीला विचारलं. तिने मान डोलावली. इतक्यात माई अनघाकडे पाहत म्हणाल्या,

“अनु, आपल्याला गावच्या ग्रामदैवतेच्या पायावर पहिली लग्नपत्रिका ठेवली पाहिजे. गावातल्या लोकांना पत्रिका वाटल्या पाहिजेत. सवाष्ण वाढायला हवीत. गावाजेवण घालायचं बाकी आहे. आपण उद्याच सर्वजण दोन दिवसांसाठी गावाला जाऊ आणि ही सगळी कामं उरकून टाकू. देवाचं काही मागे राहायला नको नं..”

अनघाने मान हलवून होकार दिला. दोन दिवसांनी गाडीने सर्वजण गावाला गेले. सर्व सोपस्कार पार पाडून परत आले. लगीनघाई सुरू झाली. आदित्य आणि अर्पिताने ईश्वरीच्या लग्नासाठी ऑफिसमधून पंधरा दिवस आधीच सुट्टी घेतली होती. लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपलं होतं. अनघाचे डोळे सारखे बरसत होते. तिची लाडकी लेक, काळजाचा तुकडा सासरी जाणार होता.

“काय जगाची रीत आहे नाही! कसं असतं स्त्रियांचं आयुष्य! नऊ महिने उदरात वाढवून मुलींना जन्म द्यायचा. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं, त्यांना वाढवायचं, शिकवायचं, मोठं करायचं आणि एक दिवस लग्न लावून दुसऱ्यांच्या घरी पाठवून द्यायचं. काळजाचा तुकडा किती सहजपणे दुसऱ्याच्या हवाली करायचा..”

अनघा स्वतःच्या मनाशीच बोलत होती. राहून राहून उमाळे दाटून येत होते. इतक्यात ईश्वरी आत आली. आईचे पाणावलेले डोळे पाहून तिलाही भरून आलं.

“आई, काय करते?”

“काही नाही बाळा, स्वयंपाक करते.”

पदराने डोळे पुसत अनघा म्हणाली. आपल्या आईचे भरलेले डोळे ईश्वरीच्या नजरेतून सुटले नाहीत. आईला बिलगत ईश्वरी म्हणाली.

“हे काय गं आई! अशी डोळ्यात पाणी का आणते? तुझी म्हणजे ना कमालच आहे.. मी नको नको म्हणत असताना मी लग्न करावं म्हणून माझ्या मागे लागलीस आणि आता स्वतःचं मी सासरी जाणार म्हणून रडत बसतेस? काय हे आई? तू अशीच डोळ्यातून पाणी काढणार असशील तर जातच नाही ना मी! तुझ्यासाठी स्वराजला घरजावई व्हायला सांगू?”

ईश्वरी आईला हसवण्याचा प्रयत्न करत होती. तिचं बोलणं ऐकून अनघा स्मित हास्य करत म्हणाली,

“मनू तितकं सोप्पं असतं तर मी आधीच नसतं का केलं? पण काय करणार! सगळ्यां सोनपऱ्यांना एक ना एक दिवस आपल्या आईवडिलांना सोडून जावंच लागतं ग सासरी.. जशी काही वर्षांपूर्वी मी या घरात आले होते तुझ्या माई आजोबांना सोडून.. आता तुला हे घर सोडून जावं लागेल. जनरीतच आहे तशी..आता यापुढे तेच तुझं घर तीच तुझी माणसं. सासू सासरे आता तुझे आईबाबा आणि दीर, नणंद आता भाऊबहीण आणि दुसरी गोष्ट मनू, निदान पुढचे चार दिवस तरी मला स्वयंपाक करायला मदत कर बरं.. नंतर हळदी, मेहंदी, संगीत असे कार्यक्रम सुरू होतील मग वेळ नाही पुरायचा. एक लक्षात ठेव मनू, कितीही शिकलीस तरी मुलीच्या जातीला भाकरी बनवता आलीच पाहिजे.. तिच्यात अन्नपूर्णा वसलीच पाहिजे.. समजलं?”

ईश्वरीने निमूटपणे मान डोलावली. अनघा पुढे बोलत होती.

“मनू, तुळशीमाई दारात सदैव नांदायला हवी बरं! सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावला गेला पाहिजे. सासरच्या माणसांची मनं जिंकता यायला हवी. मनू, एक गोष्ट लक्षात ठेव.. तुझ्या रूपाने तुझी आईच तिथे नांदणार आहे. तिच्या संस्कारांना बोल लागेल असं वागू नकोस. सासरी गेल्यावर उंबरठ्याचं भान असावं. आपला पदर ढळू देऊ नकोस कधीच.”

“काय ग आई, जीन्सवर कुठला आलाय पदर?”

ईश्वरी हसून म्हणाली.अनघाने पोळ्या लाटता लाटता तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली,

“मनू, पदर विचारांचा, पदर संस्कारांचा, पदर संयमाचा, पदर चांगल्या वर्तणुकीचा, पदर मर्यादेचा.. हा पदर जर ढळला तर बाईच्या जातीला काहीच अर्थ नाही. हे कधीच विसरू नकोस..”

अनघा बोलत होती आणि ईश्वरी आईकडे आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होती.

“किती छान बोलतेय आई.. अगदी थोर विचारवंतांसारखं.. फक्त सातवी पास असलेली आई तू कोणत्याही मोठ्या विद्यापीठात न जाता कोणत्याही पुस्तकात शोधून मिळणार नाही असं जीवनाचं तत्वज्ञान मला सांगतेय. आई तू ग्रेट आहेस..”

अनघाचं बोलणं ऐकून ईश्वरी भारावून गेली होती. ईश्वरी आईचं बोलणं नीट कान देऊन ऐकत होती. आईकडून सासरी गेल्यावर कसं वागायचं याचे धडे घेत होती. अनघाही ईश्वरीला पत्नी, सून, भावजय म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सांगत होती. दिवस भरभर पुढे सरत होते. दोन दिवसांवर लग्न आलं होतं.

संपूर्ण सोसायटीला लायटिंग करण्यात आली. सोसायटीच्या प्रांगणात मांडव घालण्यात आला. दारात बँजो लावला. पाहुण्यांनी घर गजबजून गेलं होतं. आज ईश्वरीला हळद लागणार होती. देशमुखांच्या घरी सरदेसाईंच्या घरून स्वराजला लागलेली उष्टी हळद घेऊन पाहुणा आला. देशमुखांनी त्याचं स्वागत केलं. व्यवस्थित आहेर पाहुणचार दिला. थोड्या वेळाने पाहुणा निरोप घेऊन निघून गेला. एका ठिकाणी बायकांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. सर्वात आधी ईश्वरीला हिरवा चुडा भरला गेला. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला.

“किती गोड दिसतोय ना ईशुला हिरवा चुडा!”

ईश्वरीच्या हिरव्या बांगड्या भरलेल्या हाताकडे पाहून अनघा माईंना म्हणाली.

“हो गं अनु, मुलीच्या हातात हिरवा चुडा भरला की तिचं रूप पार बदलून जातं बघ.. मुलीची एकदम बाई होऊन जाते.”

डोळ्यात आलेलं पाणी आवरत माई म्हणाली. ईश्वरीला स्वराजची उष्टी हळद लावण्यात आली. ईश्वरीचा गोरा रंग हळदीच्या रंगाने अजूनच खुलून आला. पिवळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. बँडबाजाच्या तालात पाहुण्याची पाऊलं थिरकली. एकीकडे पाहुण्याचं नाचगाणं सुरू होतं तर दुसरीकडे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. आदित्य आपल्या भावांसोबत जातीनं लक्ष घालून सोय पाहत होता. सर्वजण मस्त एन्जॉय करत होते. अर्पिता अनघा सोबत बायकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहत होती.

दुसऱ्या दिवशी मेहंदी आणि संगीत कार्यक्रम होता. ईश्वरीला मेहंदी काढण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी अर्पिताने पार्लरवालीला म्हणजेच तिच्याच मैत्रिणीला बोलावलं होतं. सर्वजण हॉलमध्ये मेहंदीच्या कार्यक्रमासाठी जमले होते. एकीकडे संगीत सुरू होतं. काही मुलींनी हिंदी फिल्मी गाण्यांच्या तालावर ताल धरला होता. माई, अनघा, गावावरून आलेल्या काकी आणि इतर पाहुणे मंडळी, बायका पार्लर मधून आलेल्या मुलींकडून मेहंदी काढून घेत होत्या. ईश्वरीच्या मैत्रिणी ईश्वरीच्या हातावर मेहंदी काढत होत्या. ईश्वरीला चिडवत होत्या. कोणी मध्येच ईश्वरीला सल्ले देत होत्या. मेहंदी काढता काढता मध्येच माई म्हणाल्या.,

“मनू, सासूसासऱ्यांची सेवा कर हो.. आपल्या संसाराला त्यांचे आशीर्वाद खूप महत्वाचे..”

“हो, अगदी खरंय.. त्यांचे आशीर्वाद हवेच. आणि एक लक्षात ठेव नवऱ्याच्या आनंदाचा मार्ग हा त्याच्या पोटाकडूनच जातो.. चांगला स्वयंपाक करता यायला हवा. स्वादिष्ट जेवण करून घाशील तर नवरा खुश..”

ईश्वरीच्या काकूंच्या बोलण्यावर साऱ्या बायका हसल्या. इतक्यात ईश्वरीची लग्न झालेली मैत्रीण मैथिली म्हणाली,

“ए मला माहितीये नवऱ्याला खुश कसं ठेवायचं? त्याची एक ट्रिक आहे?”

“कसली?”

साऱ्याजणी एकदम ओरडल्या.

“सांगते सांगते.. किती आरडाओरडा करता..”

कानावर हात ठेवत त्रासिक मुद्रा करत मैथिली सांगू लागली.

“सी, होणाऱ्या नवऱ्याचं पहिलं प्रेम म्हणाल तर ही त्याची आई असते. तो तिच्यावर खूप प्रेम करत असतो म्हणून जी त्याच्या आईवर प्रेम करेल तो त्या मुलीवर नक्की प्रेम करेल. तिचंच सगळं ऐकेल.. कशी वाटली आयडिया? मीही तेच करते..”

हसून मैथिलीने अर्पिताकडे पाहिलं.

“अगदी बरोबर आहे मैथिलीचं..हे सगळं छान जुळून आलं ना नवरोबालाच कळतच नाही तो मिठीतून मुठीत कधी आला..”

अर्पिता मिश्किलपणे म्हणाली तसं हास्याचं कारंजं उडालं.

“आता तुझं तू ठरव ईशु, तुला स्वराजला मिठीत ठेवायचंय की मुठीत?”

अर्चनाने संधीचा फायदा घेत विनोद केला तसे सर्वजण खळखळून हसले. ईश्वरी लाजेने गोरीमोरी झाली.

“चल लबाड कुठली..”

ईश्वरी अर्चनावर लटक्या रागाने हात उगारत म्हणाली.

“बाय द वे ईशु, तुम्ही हनिमूनला कुठे जाणार आहात? गोवा.. सिमला की कुलू मनाली?”

मैथिलीने चेष्टेने विचारलं. ईश्वरीने लाजून मान खाली घातली. अर्चना तिला चिडवत म्हणाली,

“पण मैथिली, त्या आधी ईशुला म्हणजेच पर्यायाने आम्हालाही सांगशील का हनिमून म्हणजे काय?”

“काय बावळट आहेस गं अर्चू तू! इतकंही तुला माहित नाही? दूर दूर मस्त फिरायला जायचं, हॉटेलिंग, शॉपिंग करायची.. मस्त नवनवीन शहरं पाहायची.. अजून दुसरं काय असतं हनिमून म्हणजे?”

आस्था अर्चनाच्या डोक्यात टपली मारत म्हणाली. ते ऐकून मैथिली जोरजोरात हसू लागली.

“हसतेस काय यार! सांग ना मग काय असतं हनिमून?”

अर्चना डोकं चोळत म्हणाली. आस्था, अर्चना मैथिलीला विचारू लागले. अर्पिता हसत होती. ईश्वरीनेही कान टवकारले.

“वेड्या रंभा नुसत्या! ती वेळ आली की कळेल सगळं? आधीच काय जाणून घ्यायचं तुम्हाला? तरीपण सांगते हनिमूनच्या रात्री नवऱ्याला नाही म्हणायचं नाही. जे होतंय ते होऊ द्यायचं..”

असं म्हणूत तिने अर्पिताला हसून हातावर टाळी दिली.

“तरीपण तू सांगच आम्हाला? काय असतं ते? काय होतं नेमकं?”

अर्चना तिची पाठ सोडत नव्हती.

“मी काही सांगणार नाही. तुमचं लग्न झालं की तुम्हांला कळेल आपोआप.. आता शांत बसा.. मेहंदी काढून घ्या आणि अर्चू, आपण ईशु हनिमूनवरून परत आली की विचारूच काय झालं?काय असतं?”

मैथिली ईश्वरीकडे पाहत चेष्टेने म्हणाली. साऱ्याजणी खळखळून हसल्या. ईश्वरी लाजेने चूर झाली. बरीच रात्र झाली तरी सगळे जागे होते. गप्पा रंगल्या होत्या. संगीत मेहंदीचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता.

पुढे काय होतं? ईश्वरीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all