Login

पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५५

पुन्हा बरसला श्रावण
पुन्हा बरसला श्रावण.. भाग ५५

ईश्वरीला आपल्या सासूच्या, शालिनीताईंच्या निर्णयामुळे खूप आनंद झाला होता. तिने आनंदाने स्वराजकडे पाहिलं. स्वराज आईशी बोलण्यात गुंग होता. त्याचंही लक्ष ईश्वरीकडे गेलं. नजरानजर झाली. ईश्वरीच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. तिने नजर झुकवून त्याचे आभार मानले. ईश्वरी खूप आनंदात होती. तिच्या सगळ्या इच्छा स्वराजच्या साथीनं पूर्ण होणार होत्या.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला येताच ईश्वरीने ही आनंदाची बातमी अर्चना आणि श्लोकला सांगितली. घरात घडलेला सारा वृत्तांत ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला.

“अरे व्वा! ग्रेट यार.. तुझ्या सासूबाई तर खूपच ग्रेट आहेत गं.. नशीबवान आहेस इतक्या समजूतदार सासूबाई तुला मिळाल्यात.. अशीच प्रेमळ सासूबाई मलाही हवी.. ईशु तुला अजून एखादा लहान दीर आहे कां गं? तुझी धाकटी जाऊबाई होण्याचा मी विचार केला असता.. इतक्या चांगल्या, हौशी सासूबाईंची सुन होण्याची संधी कोण सोडेल?”

अर्चना मिश्किलपणे म्हणाली.

“चल, काहीही बोलते..”

ईश्वरी खोटे रागे भरत म्हणाली.

“अगं तू लाख म्हणशील, मला ईश्वरीची जाऊबाई व्हायचंय.. त्यांची सुन व्हायचं पण तुझ्यासारख्या बॅटरी लावलेल्या, तिरळं पाहणाऱ्या डेंजर मुलीला त्यांनी पसंत करायला हवं ना?”

श्लोक अर्चनाला चिडवत म्हणाला तसं अर्चना त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली. श्लोक तिचा मार चुकवत मोठमोठ्याने हसत होता. थोडा वेळाने चेष्टा मस्करी करून झाल्यावर गंभीर चेहरा करत तो म्हणाला,

“पुरे, आता मस्करी पुरे झाली. कामाचं बोलू? ईशु, तुझं नोकरी करण्याचं फायनल झालंच आहे तर मला काय वाटतं आता आपण वेळ नको घालावायला. मी आताच त्यांच्याशी बोलून घेतो आणि मग आपण पुढचं कसं करायचं तेही ठरवून घेऊ..”

ईश्वरीने मान डोलावली. श्लोकने खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि सीएच्या ऑफिसला कॉल केला. दोघांचं बोलणं संपल्यावर श्लोक कॉल कट करत ईश्वरीला म्हणाला,

ईशु, आपल्याला आजच त्यांच्या ऑफिसला जावं लागेल. अगं पुढे काही दिवस ऑडिटच्या निमित्ताने बाहेरगावी जाणार आहेत ते म्हणून मग त्यांनी आजच यायला सांगितलंय. आज तुझा इंटरव्हिव्ह असणार आहे.. लेक्चर्स झाले की, कॉलेज संपलं की निघूया आपण.”

“पण माझे सर्टिफिकेट्स? माझी फाईल घरी आहे.,”

तिने चिंतीत होऊन विचारलं.

“फिकर नॉट डिअर, त्याची एक झेरॉक्स कॉपी माझ्या मोबाईलमध्ये आहे. तू आता फक्त रिझ्यूमे लिहून ठेव मग आपण निघू..”

ईश्वरीने आनंदाने होकार दिला. कॉलेज सुटल्यावर श्लोक, अर्चना आणि ईश्वरी कॉलेजबाहेर पडले. अर्चनाने ईश्वरीला शुभेच्छा दिल्या आणि त्या दोघांचा निरोप घेऊन ती तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. श्लोकने झेरॉक्सच्या दुकानात जाऊन तिच्या सर्टिफिकेटची एक फाईल बनवली. त्यात सर्वात वर तिचा रिझ्युमे ठेवला आणि मग टॅक्सी बुक केली. ती दोघे टॅक्सीत बसून दादरच्या दिशेने निघाले. श्लोकने तिला सीएच्या ऑफिसचा ऍड्रेस मेसेज केला. ईश्वरीने स्वराजला कॉल करून इंटरव्हिव्ह बदल सांगितलं. दोघे सीएच्या ऑफिसला पोहचले.तिथे पोहचल्या पोहचल्या तिने स्वराजला लोकेशन पाठवून दिलं.

‘शांती प्रेस्टिज’ नावाच्या एका मोठ्या इमारतीत ते दोघे शिरले. लिफ्टने चौथ्या मजल्यावर एक छान प्रशस्त ऑफिस होतं. बाहेर ‘शशांक लिमये अँड असोसिएट’ नावाचा बोर्ड दिसला. ती आत आली. तिने सभोवार नजर टाकली. मोठं कॉर्पोरेट ऑफिस.. टेबल, फर्निचर, शिस्तीत मांडलेल्या सर्व वस्तू जागच्या जागी पाहून ती बावरून गेली होती. आपल्याला हे जमेल का? उगीचच हा विचार तिच्या मनात चमकून गेला. रिसप्शनिस्टने त्यांना बाहेर विझिटिंग कक्षेत बसवलं आणि तिने कॉल करून आत त्यांच्या येण्याबद्दल सांगितलं. थोड्याच वेळात ती मोठ्याने म्हणाली,

“ईश्वरी देशमुख..”

तिचं नाव ऐकताच ईश्वरी उठून उभी राहिली. तिने ईश्वरीला मुलाखतीसाठी आत जायला सांगितलं.

“मे आय कम इन सर?”

ईश्वरीने केबिनच्या दारावर टकटक करत विचारलं.

“येस प्लिज.. प्लिज कम..”

ती आत आली. तिच्या समोरच्या खुर्चीत एक उंच, धिप्पाड, डोळ्यावर नाजूक फ्रेम असलेला चष्मा, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट.. साधारण तिशी- बतीशी दरम्यानची व्यक्ती तिच्या समोर बसली होती. डोक्यावरचे केस किंचित विस्कटलेले, शर्टच्या हातांच्या बाह्या त्याने वर सारलेल्या होत्या. करारी डोळे, ओठांवर मिशीची महिरप..सावळा रंग.. तिने केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांनी तिला बसायला सांगितलं. ईश्वरी समोर मांडलेल्या खुर्चीत बसली. ईश्वरी घाबरलेली होती. पहिलीच नोकरी आणि पहिलाच इंटरव्हिव्ह.. तिने तिची फाईल त्यांच्या समोर सरकवली. ते फाईलमधले सर्टिफिकेट्स पाहत होते. काही जुजबी प्रश्न विचारले. अचानक त्यांचं लक्ष तिने गळ्यात घातलेल्या छोट्या मंगळसूत्राकडे गेलं. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“सो ईश्वरी देशमुख, तुम्ही इथे काम करू इच्छिता? तुमचा शिक्षणाचा आतापर्यंतचा आलेख पाहता तुमची निवड करायला काही हरकत नाही खरंतर.. पण तुम्हाला जमेल इथे काम करणं? खूप जबाबदारीचं काम आहे. ऑडिट, अकाउंटिंग आरओसी फायलिंग.. बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. जमेल तुम्हाला?”

“हो सर, मी नक्की प्रयत्न करेन..”

तिने उत्तर देताच ते मोठ्या आवाजात म्हणाले,

“प्रयत्न? इथे प्रयत्न नाही फक्त रिझल्ट हवा असतो. तोही शंभर टक्के.. काम पूर्ण व्हायलाच लागतं.. आपण एक टार्गेट घेऊन काम संपवतो. प्रयत्न, नंतर करू, बघून सांगते असली कारणं चालत नाहीत इथे. कसं जमणार आहे तुम्हाला? एकतर तुम्ही फ्रेशर आहात. सगळं शिकवावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं लग्न झालंय. मग काय! काम न करण्याची शंभर कारणे शोधून काढाल तुम्ही. घरातल्यांची आजारपणं, सणसमारंभ, पैपाहुणे अशी काही ना काही कारणं सांगून सुट्टया घ्याल. ऑफिसकडे दुर्लक्ष कराल.. कुटुंबाची जबाबदारी सांभाळाल की ऑफिसची? सॉरी मॅडम, मला वाटतं तुम्हाला इथे काम करणं जमणार नाही.. तुम्ही येऊ शकता..”

त्यांच्या बोलण्याने ईश्वरीचे डोळे पाण्याने गच्च भरले. मोठ्या कष्टाने तिने त्यांना पापण्याच्या आड बंदिस्त केलं आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली.

“सर, तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. एका विवाहित स्त्रीला नोकरी करायची असेल तर आधी आपलं कुटुंब आणि मग बाकीच्या गोष्टी पाहाव्या लागतात. दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं थोडं कठीणच. मान्य आहे मला पण सर तुम्ही माझं काम न पाहता कसं ठरवू शकता की मला जमणार नाही? फक्त माझं लग्न झालंय म्हणून मी योग्य नाही हा निकष कसा लावू शकता तुम्ही? सर, तुमच्या माहितीसाठी सांगते, एक स्त्रीच सर्व गोष्टी छान सांभाळू शकते. मल्टीटास्किंगचा गुण तिच्यात आधीपासूनच असतो. म्हणूनच ती सर्व स्थरावर चांगली काम करू शकते. माफ करा सर, पण कामाची काहीही पडताळणी न करता एखाद्याविषयी आपलं मत बनवणं योग्य नाही. ठीक आहे तुमच्या निर्णयाचा मी मान ठेवते. अर्थात कंपनी तुमची आहे त्यामुळे निर्णयही तुमचाच. थँक्यू सर.. ”

असं म्हणत ती जागेवरून उठली आणि अखेरीस इतका वेळ दाबून ठेवलेल्या आसवांनी पापण्याचा उंबरठा ओलांडलाच. ती केबिनमधून बाहेर पडणार इतक्यात त्यांनी आवाज दिला.

“थांबा मॅडम..”

ती जागीच थबकली.

“आय ऍम सॉरी.. मी तुमच्याशी या शब्दात बोलायला नको होतं. मला पाहायचं होतं की तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकता की नाही? खरंतर काहीही न पाहता असं जजमेंट पास करणंही चुकीचं.. तुमचा आत्मविश्वास आवडला मला. तुम्ही आमच्या सोबत काम करू शकता.. उद्यापासून येऊ शकाल?”

लिमये साहेब आपल्या जागेवरून उठून पुढे आले. हात पुढे करत ते म्हणाले,

“अभिनंदन ईश्वरी, तुम्ही बाहेर बसा.. अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा.. आणि उद्या वेळेत या..”

ईश्वरीला काय बोलावं काहीच सुचेना. तिच्या डोळ्यात आनंद, आश्चर्य दोन्ही भाव दाटून आले. डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगू पाहत होतं.

“थँक्यू सर.. थँक्यू सो मच..”

धन्यवाद व्यक्त करून ईश्वरी केबिनच्या बाहेर पडली. बाहेर श्लोक तिची वाट पाहत बसला होता. ती बाहेर येताच तो उठून उभा राहिला. ती आनंदाने म्हणाली,

“श्लोक.. माझं सिलेक्शन झालं.. उद्यापासून यायला सांगितलंय. अपॉइंटमेंट लेटर देणार आहेत. थोडं थांबावं लागेल आपल्याला.. थँक्स यार.. हे फक्त तुझ्याचमुळे शक्य झालं रे..”

“अरे व्वा! मस्तच.. काँग्रॅच्यूलेशन ईशु.. खूपच आनंदाची बातमी दिलीस..आणि थँक्स काय म्हणतेस? फ्रेंड्स आहोत ना आपण?”

श्लोकच्या बोलण्याने ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला. आंनदाचा, उत्साहाचा तिचा चेहरा पाहून श्लोकही खूष झाला. थोड्याच वेळात एच आर विभागातून एक मुलगी बाहेर आली आणि तिने ईश्वरीच्या हातात तिचं अपॉइंटमेंट लेटर दिलं. ते स्वीकारताना ईश्वरीचे हात थरथरले. आनंदाने तिला सारं आकाश ठेंगणं वाटू लागलं. ऑफिसमधून बाहेर पडताच तिने स्वराजला कॉल केला. स्वराजने कॉल उचलला.

“हं बोल नंदिनी, काय म्हणतेस? पोहचलीस का घरी?”

त्याने प्रश्न केला. पलीकडून मुसमूसण्याचा आवाज येत होता.

“काय झालं नंदू? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही नं? तू रडतेयस का? अगं बोल ना, मला फार टेन्शन येतंय. काय झालं? कसा झाला इंटरव्हिव?”

तो काळजीने विचारत होता.

“स्वराज, इंटरव्हिव चांगला झाला आणि नं माझं सिलेक्शन पण झालं. उद्यापासून यायला सांगितलंयय. आताच लेटर दिलं. तुम्हाला हे सांगण्यासाठी मी कॉल केलाय. हे फक्त तुमच्या प्रोत्साहनामुळे, सपोर्टमुळे साध्य झालंय..”

ती डोळ्यातलं पाणी ओढणीने टिपत म्हणाली.

“आई शपथ! ग्रेट न्यूज.. काँग्रॅच्यूलेशन नंदू.. एकदम ग्रेट आहेस यार तू!”

तो आनंदाने म्हणाला. थोडं बोलून त्याने फोन ठेवून दिला.

ईश्वरी घरी आली. दारातूनच तिने शालिनीताईंना आवाज दिला.

“आई.. अहो आई.. कुठे आहात?”

“काय झालं? कशाला मोठमोठ्याने ओरडतेयस? आणि हे काय? काल रात्री सासूबाईंनी बाजू काय घेतली की लगेच दुसऱ्या दिवसापासून उशिरा यायला सुरुवात केलीस? कमाल आहे बाई तुझी! ऊस गोड लागला म्हणून लगेच मुळासकट खाऊ नये गं..”

गायत्रीच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.

“गायत्री तोंड आवर जरा.. तिने मला उशिरा येण्याबद्दल कॉल करून सांगितलं होतं. त्यामुळे तुला जास्त बोलण्याची गरज नाही..”

शालिनीताई गायत्रीकडे आणि ईश्वरीकडे पाहत म्हणाल्या. ईश्वरीने त्यांना वाकून नमस्कार केला. मिठाईचा बॉक्स पुढे करत ती म्हणाली.

“आई माझं सिलेक्शन झालं. मोठी सीए फर्म आहे. खूप शिकायला मिळेल. आई, तुमच्यामुळे मला हे सुख मिळालं ओ. थँक्यू आई..”

शालिनीताईंनी तिला कुशीत घेतलं डोक्यावरून हात फिरवला.

“जा देवापुढे ठेव.. त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही. अभिनंदन बाळ..”

शालिनीताईं हसून म्हणाल्या. ईश्वरीने मान डोलावली आणि ती देवघरात गेली. देवापुढे मिठाई ठेवली आणि दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला.

ईश्वरी यशाच्या दिशेने एकेक पाऊल टाकत निघाली होती. ध्येयाच्या दिशेने तिचं पाऊल पुढे पुढे पडत होतं. ईश्वरी आता कॉलेज सांभाळून नोकरी करू लागली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
0