पुन्हा बरसला श्रावण भाग ११२

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग ११२

ईश्वरी बोलत होती. डोळ्यातून श्रावणधारा झरू लागल्या.

“बाबा, शिवराज आणि माझ्यात फक्त मैत्री नाही. तो माझा फक्त मित्र नाही किंवा तो माझा फक्त ऑफिसमधला एक सहकारीही नाही. शिवराज माझ्यासाठी माझा मित्र तर आहेच पण त्याचबरोबर माझा हितचिंतक, माझा गुरू, दिपस्तंभ, माझा कृष्णसखा, माझा सुखदुःखाचा साथीदार, माझा भक्कम आधार आहे. शिवराजच माझ्या मनातल्या भावना समजू शकतो. त्या भावनांचा आदर करू शकतो आणि तोच मला सुखात ठेवू शकतो.”

ईश्वरी निग्रहाने म्हणाली.

“कशावरून शिवराज तुला सुखात ठेवू शकतो? काय आहे त्याच्याकडे? नंदिनी, ना त्याच्याकडे राहायला घर आहे ना पुरेसा पैसा. इथेच कुठेतरी साध्या सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहतोय म्हणे! स्वतःचं असं काहीच नाहीये अजून त्याच्याकडे. आईवडिलांनी तो भारतात परत आल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळवेल, सुखाचे दिवस येतील या आशेवर कर्ज काढून त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवलं. शिकवून स्वतःच्या पायावर उभं केलं. आपल्या इथे त्याला चांगली नोकरीही मिळाली होती; पण तीही त्याने काही दिवसांपूर्वीच सोडली आणि आता नव्याने कोणतातरी बिझनेस सुरू केलाय. नवा स्टार्टअप आहे. जम बसायला किती वेळ लागेल देव जाणे! जम बसेलच अशी शाश्वती नाही. तो जाताना तुला सांगूनही गेला नाही. अशा बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवून तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणार आहेस? त्याच्या त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये तू राहू शकणार आहेस? तो तुझ्या मूलभूत गरजा तरी पूर्ण करू शकेल का? याची खरंच मला शंका वाटते.”

केळकरसरांनी शंका उपस्थित केली. सर्वांना त्यांचं म्हणणं योग्य वाटलं. ते पुढे म्हणाले,

“नंदिनी, माझा मुलगा म्हणजे कोणी मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा नाहीये. तो एका कोट्याधीश संप्पतीचा एकमेव वारस, कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. इतकी गडगंज श्रीमंती, नावावर टूमदार बंगले, दोनशे एकर बागायती शेती. सोनंनाणं, शेअर्समधली कोट्यांची गुंतवणूक तर विचारूच नकोस. त्यामुळे तू माझ्या मुलाचा विचार करावा असं मला वाटतं. लग्नांनंतर सारी सुखे तुझ्या पायाशी लोळणं घालतील. आपल्या सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती असताना हे तुला कसले भिकेचे डोहाळे लागलेत नंदिनी?”

काहीसं चिडून त्यांनी ईश्वरीला प्रश्न केला. आदित्यने केळकरसरांच्या बोलण्याला दुजोरा दिला,

“अगदी खरंय ईशू.. केळकरसरांच्या कुटुंबात सुन म्हणून गेलीस तर आयुष्यभर तू सुखात राहशील. तुला कधी नोकरी करावी लागणार नाही. फार दगदग करावी लागणार नाही. उभं आयुष्य सुखासमाधानाने, ऐश्वर्यात काढशील.”

ईश्वरीने केळसरांकडे पाहिलं. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,

“सर, मला खरंच तुमचा अवमान करायचा नाही. पण मला सांगा, तुम्ही एका शून्यातून इतका मोठा पसारा वाढवला, जपला. त्या शून्याच्या शोधापासून तुम्ही सुरुवात केलीत. तुम्ही सर्वांत मोठे उद्योगपती झालात. नावलौकिक, प्रतिष्ठा, संपत्ती सारं तुम्ही स्वबळावर कमावलंत. तुमच्या पत्नीलाही याचा रास्त अभिमान वाटत असेल. तुमच्याविषयी कौतुकाचे दोन शब्द जेंव्हा त्या इतरांकडून ऐकत असतील तेंव्हा अभिमानाने त्यांची मान ताठ होत असेल. हो नां मॅडम?”

मिसेस केळकरांनी होकारार्थी मान डोलावली.

“सर, हे सारं वैभव तुम्ही कमावलंत. मग यात तुमच्या मुलाचं काय कर्तृत्व आहे? त्याने स्वबळावर काय कमावलंय?”

तिच्या प्रश्नांसरशी केळकरसरांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. त्यांनी गोंधळून तिला विचारलं,

“म्हणजे? हा काय प्रश्न आहे? माझं जे काही आहे ते माझ्या मुलाचंच आहे ना? माझ्या कुटुंबासाठीच मी हे सारं कमावलंय. यावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या मुलाने नुकतंच आपल्या कंपनीला जॉईन केलंय तर तोही स्वबळावर आपला बिझनेस नक्की वाढवेल. माझ्या नावलौकिकासोबत तो स्वतःच्या प्रतिष्ठेचीही उंची नक्की उंचावेल. मला खात्री आहे माझा मुलगा माझ्या नावप्रतिष्ठेला कधीच धक्का पोहचू देणार नाही.”

“फारच छान.. देव करो आणि असंच होवो. पण सर याचाच अर्थ त्याचीही ही सुरवातच आहे. त्याचंही करियर नुकतंच सुरू झालंय. त्याचाही नवीन स्टार्टअप आहे. मग त्याच्यात आणि शिवराजमध्ये फरक तो काय? सर, आईवडिलांच्या संपत्तीवर आपला हक्क सांगत आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या मुलाशी माझा संसार कसा होईल? तुम्हांला सांगते, माझ्या दादाने सगळं स्वकष्टाने कमावलंय. त्याचं शिक्षण, नोकरी सारं त्याने स्वतः मिळवलंय. आज त्याचं स्वतःचं घर आहे. माझी वहिनीही माझ्या आईबाबांना, मुलांना सांभाळून नोकरी करते. हे किती छान आहे नां सर! काडी काडी जमवून स्वतःचं घरटं सजवणं यात जे सुख आहे नां सर ते कशातही नाही. आणि ती मजा, ते सुख मी माझ्या आई बाबांच्या, दादा वहिनीच्या संसारात पाहिलं. ते सुख मला अनुभवायचंय सर. माझ्या आईबाबांसारखं, दादावहिनीसारखं माझ्या संसारातली प्रत्येक गोष्ट ही आम्ही दोघांनी स्वकष्टाने मिळवलेल्या कमाईतूनच असायला हवी असं मला वाटतं. स्वकष्टातून मिळवलेल्या संपत्तीचा आनंद काय असतो हे मी तुम्हाला काय सांगणार सर? तो आनंद तुम्ही आणि मॅडमनी स्वतः अनुभवलेला आहे.”

ईश्वरीचं बोलणं ऐकून मिसेस केळकरांना तिचं खूप कौतुक वाटलं. केळकरसरांनाही तिच्या प्रगल्भ विचारांचं अप्रूप वाटलं. माई, अनघा, विनायक, आदित्य, अर्पिता, मंजिरी आणि दिनेश सर्वचजण तिच्या विचारांनी प्रभावित झाले होते.

“चल नंदिनी, काहीअंशी मी तुझं म्हणणं मान्य करतो, दोघांच्याही करियरला नुकतीच सुरुवात झालीय. दोघांचाही नवीन स्टार्टअप आहे; पण मग शिवराजच का? माझ्या मुलाची निवड तू का केली नाहीस? एकदा फोटो पाहिला असतास तर तुही राजीखुशी त्याचा स्वीकार केला असतास; पण तू त्याच्याबद्दल काही ऐकून न घेता फक्त आणि फक्त शिवराजचाच जप करतेयस. असं का?”

केळकरसरांनी जणू काही सर्वांच्याच मनातला प्रश्न विचारला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर शिवराजच का असा प्रश्न स्पष्टपणे दिसत होता. सर्वांचे कान ईश्वरीच्या बोलण्यावर लागले होते. क्षणभर थांबून ईश्वरीने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“सर, मी शिवराजची निवड केली, याचं पहिलं कारण म्हणजे मी त्याला आता चांगलं ओळखू लागलीय. तो माझी काळजी घेतो. संकटात, दुःखात तो माझ्यासोबत असतो. तो मला आदराने, सन्मानाने, स्वतःच्या बरोबरीने वागवतो. स्त्री पुरुष असा भेद तो करत नाही. तो माझ्यासोबत बाकीच्या स्त्रियांचाही सन्मान राखतो. माझं ऐकून घेतो. स्वतःच्या मतांबरोबर तो माझ्या मतांचाही मान ठेवतो. माझ्या आनंदासाठी तो काहीही करू शकतो. सर, शिवराजच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की, तुमचा मुलगा वाईट आहे. त्याच्याशी कोणतीही सुंदर संस्कारी मुलगी मिळेल पण सर, मला पुन्हा शिवराजसारखा किंबहुना शिवराज भेटणार नाही. सर, तो मला आवडू लागलाय. आणि मला जाणवतंय की, मी त्याच्या प्रेमात पडलेय.”

तिचं बोलणं ऐकून सर्वचजण आवाक झाले.

“अगं पण शिवराज…”

मिसेस केळकर काही बोलणार इतक्यात केळकर सरांनी त्यांचा हात दाबला आणि तोंडावर बोट ठेवत शांत राहायला सांगितलं. इतक्यात मंजिरी म्हणाली,

“नंदिनी, तुला वाटतंय की, तो तुला आवडतो. तुझं शिवराजवर प्रेम आहे; पण त्याचं तुझ्यावर प्रेम नसेल तर? त्याच्या मनात फक्त मैत्री असेल तर? उगीच तोही नाही भेटला आणि तू त्याच्या भरवशावर केळकरसरांच्या मुलाला नकार दिलास तर? पुढे काय? तुझी ओंजळ रिकामीच?”

ईश्वरी गालातल्या गालात हसून म्हणाली,

“मंजू, मला कधीपासून ओळखतेस गं? तुझ्याइतकं तर मला दुसरं कोणीच ओळखत नाही. मी अशी आहे का? अगं मंजू, प्रेम म्हणजे व्यवहार नाही गं.. शिवराजशी जमला नाही म्हणून दुसऱ्यासोबत करून टाकला किंवा तडजोडही नाही की, शिवराज नाही म्हणून मी केळकरसरांच्या मुलाला होकार द्यावा. मंजू, माझं शिवराजवर प्रेम आहे हे मला आताच जाणवतंय. याची मला आताच कल्पना आलीय. मनातला त्याच्याविषयीचा प्रेमांकुर मला असाच जपायचा आहे. कदाचित तू म्हणतेस तसंही होईल. त्याचं माझ्यावर प्रेम नसेलही; पण मग एकतर्फी प्रेम असू शकत नाही का? त्याने माझ्या प्रेमाचा स्वीकार करो अथवा ना करो; पण मला माझ्या मनातलं प्रेम त्याच्याजवळ व्यक्त करायलाच हवं. जर मी हे नाही केलं तर आयुष्यभर मला टोचणी लागेल. मी माझ्या त्याच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर तो त्याचा निर्णय घ्यायला मोकळा आहे आणि मी त्याच्या निर्णयाचा मनापासून आदर आणि स्वीकार करेन. ”

ईश्वरीचं बोलणं ऐकून विनायकने दीर्घ सुस्कारा टाकला. त्याने दोन्ही हात जोडून खाली मान घालून केळकरसरांना पाहत बोलायला सुरुवात केली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया.

🎭 Series Post

View all