पुन्हा बरसला श्रावण.. भाग ४

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या एका श्रावणाची.. श्रावणाच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..


पुन्हा बरसला श्रावण..

भाग ४

विनायकची नाराजी माईंपासून लपली नव्हती. विनायक एकटाच आपल्याला खोलीत उदास होऊन बसला होता. इतक्यात तिथे माई आल्या. आत येत त्या म्हणाल्या.

“येऊ का रे विनायका..”

“अगं माई ये ना.. असं का विचारतेस?”

विनायक सरकून बसत म्हणाला. माईं आत येऊन त्याच्या शेजारी बसल्या. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“विनायका, बाळा, असा तोंड पाडून का बसलायेस? तूला तुझं लग्न ठरल्याचा आनंद नाही झाला का? का असा उदास?”

माईंच्या प्रश्नांनी विनायकचा गळा भरून आला.

“माई, मला खूप शिकायचं आहे गं.. एकदा का लग्नाची बेडी हातात पडली की माझं शिक्षण कसं पूर्ण होईल? मला शिकून नोकरी करायची आहे. माझ्या सर्व मित्रांचं तसं ठरलंय.. शिकून नोकरीसाठी मुंबईला जायचं. मला इथे गावात नाही राहायचं.”

गावातल्या बऱ्याच तरुण मंडळींनी गावाकडून शहराच्या दिशेने आपला मोर्चा वळवला होता. तरुणाईला स्वप्ननगरी मुंबईचं आकर्षण वाटू लागलं होतं आणि आता विनायकलाही मुंबईची भुरळ पडू लागली होती. त्याचं बोलणं मधेच तोडत माई म्हणाल्या,

“अरे, असा कसा विचार करू शकतोस तू? इथे कसं होईल? दुसऱ्याच्या पदरी चाकरी केलेलं आप्पांना कसं रुचेल? शुद्ध वेडेपणा आहे हा तुझा.. लग्न तोंडावर आलंय आणि तुझ्या डोक्यात काय हे मुंबईचं खूळ शिरलंय? तुझ्या वडिलांनी शब्द दिलाय निंबाळकरांना.. सगळी तयारी पाण्यात घालवायची? मित्रांचं ऐकून तू हे काहीही काय बरळतोयस?”

“अगं माई, मग घेतलेलं शिक्षण इथे गावात कुजवायचं का? आणि मला इथं आवडत नाही. सगळीकडे आप्पांचा कायदा.. सारखं आप्पांचं बोलणं, त्यांची दहशत, ते म्हणतील तेच करायचं. अजिबात मोकळा श्वास घ्यायला जागा नाही.. मला इथे राहायचं नाही.. माई, माझा निर्णय झालाय.. माझ्या मनासारखं झालं नाही तर मी घर सोडून पळून जाईन.”

विनायक चिडून म्हणाला तसं माईच्या काळजात धस्स झालं. डोळ्यांत आसवं जमा झाली.

“मुलं मोठी झाली.. तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पाखरांना त्यांच्या पंखात बळ आल्याबरोबर लगेच आता घरटं सोडून जाण्याचे वेध लागलेत.. का रे बाळा?”

माईंच्या मनात विचारांनी गर्दी केली. काय बोलावं त्यांना समजेना. शब्दांची जुळवाजुळव करत त्या म्हणाल्या,

“विनायका.. असा चुकीचा विचार करू नको. तुझ्या एका निर्णयामुळे दोन घरांची इभ्रत चव्हाट्यावर येईल. लोक नावं ठेवतील आणि या सगळ्या गोष्टीत मला सांग, त्या नवऱ्या मुलीचा काय दोष? तिला कशासाठी शिक्षा? आणि का? तुला लग्न करायचं नाही म्हणून?”

“मग काय करू माई, आप्पांसाठी, त्यांनी पाहिलेल्या, पसंत केलेल्या मुलीशी लग्न करण्यासाठी मी माझ्या स्वप्नांना तिलांजली देऊ? मी मुबंईला जाणार म्हणजे जाणारच..”

विनायक ठामपणे म्हणाला. माई काकूळतीला येऊन म्हणाल्या,

“हे बघ विनायका, आता असं अडून बसण्यात काहीच तथ्य नाही. एकदा लग्न होऊन जाऊ दे. मी स्वतःहून आप्पांकडे तुझ्या मुंबईला जाण्याचा विषय काढेन. मग तर झालं.. पण हे लग्न निर्विघ्न पार पडू दे.. मी बोलेन यांच्याशी..”

“माई, तू मला वचन देतेस? लग्नानंतर तू आप्पांशी माझ्या मुंबईला जाण्याबद्दल बोलशील किंबहुना त्यांच्याकडून परवानगी घेऊन देशील? तरच मी लग्नाला तयार होईन.”

विनायकने प्रश्न केला. माई विचारात पडल्या.

“यांचा स्वभाव तर सर्वांना चांगलाच ठाऊक आहे. ते नाही म्हणाले तर? मुलाला समजावणं सोप्प आहे पण यांच्याकडून याच काय पण कोणत्याही गोष्टीची परवानगी घेणं महामुश्किल काम.. काय करावं?”

माईंना विचारात पडलेलं पाहून विनायक आपला उजवा हात पुढे करत म्हणाला,

“कसला विचार करतेस माई? दे वचन..”

माईंनी त्याचा हात हातात घेतला आणि हसून त्याच्याकडे पाहत म्हणाल्या,

“बरं बाबा.. दिलं वचन.. मी बोलेन आणि परवानगीही घेऊन देईन तुझ्या आप्पांकडून. मग तर झालं..”

विनायकची कळी खुलली. चेहऱ्यावरची उदासी एकदम कुठल्या कुठे पळून गेली होती. त्याने आनंदाने माईला घट्ट मिठी मारली.

“एवढा मोठा झालाय, लग्नाला आला तरी अजून बालिशपणा गेला नाही. उठा आता.. तयारीला लागा..”

विनायकने आनंदाने मान डोलावली. माई आपल्या पुढच्या कामाला निघून गेल्या. दोन्ही घरची मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त झाली. वसंतरावांनी शेवटचं लग्न म्हणून धूमधडाक्यात करायचं ठरवलं होतं. देशमुखवाड्याला रंगरंगोटी करण्यात आली. संपूर्ण वाड्याला फुलांच्या माळानी सजवण्यात आलं. गावातल्या सर्व लहानथोर मंडळींना आमंत्रणं देऊन झाली. जसजशी विनायक आणि अनघाच्या विवाहाची तारीख जवळ येऊ लागली तसा कामाला वेग येऊ लागला. हळदीच्या दिवशी आजूबाजूच्या बायका गोळा झाल्या. कासारणीला बोलवून गावातल्या बायकांना बांगड्या भरल्या. जात्यावर हळद वाटली गेली. नवऱ्याची उष्टी हळद निंबाळकरांच्या वाड्यावर पाठवण्यात आली. हळदीच्या दिवशी अगदी साऱ्या गावाला गावजेवण दिलं. सर्वांना मानपान, आहेर देण्यात आले आणि मग बैलगाडीच्या गाड्या भरून वऱ्हाड निंबाळकरांच्या वाड्याकडे निघालं. वसंतरावांनी चारचाकीची व्यवस्था केली. वसंतराव, माई आणि त्यांच्या सुना चौघंजण गाडीतून पुढे निघाले.

इकडे निंबाळकरांच्या उत्साहालाही उधाण आलं होतं. त्यांच्या लाडक्या लेकीचं, अनुचं लग्न होतं म्हटल्यावर थाटातच होणार यात शंकाच नव्हती. निंबाळकरांच्या वाड्यासमोर मांडव सजला. हार फुलांची तोरण चढली. सनई चौघड्यांचे स्वर उमटू लागले. दारात रांगोळीची उधळण झाली. देशमुखांच्या वाड्यातून नवऱ्याची उष्टी हळद घेऊन पाहुणा आला होता. त्याला जेवण करून आहेर करून परत पाठवण्यात आलं. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत अनघाचं रूप अजूनच खुलून आलं होतं. नाजूक गोऱ्या तळहातावर मेहंदी सजली होती. मेहंदीचा लालचुटूक रंग खुलून आला होता. अनघाला मांडवात आणण्यात आलं. हळद लावायला आजूबाजूच्या बायका जमल्या होत्या. जात्यावर हळद दळली जात होती आणि मग बायकांच्या ओठी हळदीची गाणी येऊ लागली.

मांडवाच्या दारी । उभा गणपती
नवऱ्या मुलाला गोत किती । गणराया
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण
नवऱ्या मुलाला केळवण । गणरायाला
मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी
मूळ ग वर्हाडी । आंबाबाई
मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो
चहूकडे चित्त देतो । गणराज
मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या
घाणा भरीला । सवा खंडी कणिक
मांडवी माणीक । आंबाबाई

जात्यावरच्या ओव्यानी वातावरण मंगलमय झालं होतं. अनघाला हळदी लागली आणि तिच्या आईच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. विश्वासरावांचा कंठ दाटून आला होता. मोठ्या मुश्किलीने त्यांनी डोळ्यातल्या आसवाना आवरलं होतं. धाकटी दोन भावंडं लाडकी बहीण सासरी जाणार म्हणून व्याकुळ झाली होती. देशमुखांकडील पाहुणेमंडळींना लग्नघरी पोहचायला संध्याकाळ झाली होती. वऱ्हाडी मंडळी निंबाळकरांच्या गावी पोहचली. वाड्याच्या बाहेरच्या बाजूला बैलगाड्या लावल्या.मोटरगाडीतून वसंतराव, माई आणि आणि बाकीचे खाली उतरून मांडवाच्या दिशेने चालू लागले. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मांडवाच्या प्रवेशद्वारापाशी विश्वासराव सपत्नीक हात जोडून उभे होते. त्यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं. विश्वासरावांच्या पत्नीने आलेल्या बायकांना हळदीकुंकू लावलं केसांत माळायला मोगरा आणि अबोलीच्या फुलांचे गजरे दिले. सर्वांच्या चहापाण्याची सोय केली. साग्रसंगीत व्याहीभोजन झालं. पाहुण्यांच्या रात्रीच्या जेवणाची छान व्यवस्था करण्यात आली. विश्वासरावांनी देशमुखांकडील पाहुण्यांच्या निवासाची उत्तम सोय केली होती.

दुसऱ्या दिवशी अनघा आणि विनायक यांना मांडवात आणण्यात आलं. हिरव्या शालू नेसलेली, हळदीच्या अंगांची गोरी गोमटी अनघा खूपच सुंदर दिसत होती. नाकातल्या नाजूक नथीचा भारीच तोरा होता. विश्वासरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. परकर पोलक्यातली घरभर वावरणारी अनघा डोळ्यासमोर आली.

“इवलीशी माझी लाडकी लेक.. क्षणार्धात इतकी मोठी झाली.”

डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी खांद्यावरच्या उपरण्याने टिपलं आणि ते लग्नकार्यात व्यस्त झाले. अनघाच्या मनात विनायकला पाहण्याची उत्सुकता आणि एक वेगळीच हुरहूर दाटून आली होती. लग्नविधी सुरू झाल्या. ‘शुभ मंगलं सावधान’ म्हणताच अंतरपाट दूर झाला. चोरट्या नजरेने अनघाने विनायककडे एक कटाक्ष टाकला. विनायकनेही तिच्याकडे पाहिलं. लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावर पसरली. तिने लाजून मान खाली घातली. वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या. डोईवर अक्षता पडल्या. अनघाच्या गळ्यात विनायकच्या नावाचं मंगळसूत्र घालण्यात आलं. पायात पैंजण आणि जोडवी सजली. देवाब्राह्मणाच्या साक्षीने हजारो लोकांच्या उपस्थितीत विधिवत कार्य निर्विघ्न पार पडलं. अनघा आणि विनायक यांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.

विवाह संपन्न झाला. अनघाला सासरी पाठवण्याची घटिका समीप आली. अनघाचे काळे टपोरे डोळे पाण्याने गच्च भरले. आता मात्र विश्वासराव आणि अनघाच्या आईला अश्रू आवरणं कठीण झालं. अनघाच्या मैत्रिणी, नातेवाईक, शेजारचे सर्वजण तिला निरोप देण्यासाठी जमले होते. सर्वांचे डोळे पाणावले. अनघाच्या आईने तिला पोटाशी घट्ट धरलं. कंठ दाटून आला होता. पदराने डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,

“अनू, आता तू सासरी निघालीस.. या पुढे तेच तुझं घर आणि तीच तुझी माणसं.. आता त्या घराचा उंबरठा कधीच ओलांडून जायचं नाही. त्या घरातून तू कायमचं बाहेर पडशील ते म्हणजे तुझ्या अंतिम यात्रेलाच.. तोपर्यंत त्या माणसांना सोडून कुठेही जायचं नाही. नवऱ्याची साथ सोडायची नाही.. तेच तुझं विश्व.. बाळा, सर्वांची काळजी घे.. तुझ्या चांगल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांची मनं जिंकून घे.. निंबाळकरांच्या नावाला धक्का लागेल असं मुळीच वागू नकोस. सुखी रहा पोरी..”

आईचे बोल ऐकून अनघा अजूनच रडू लागली. वऱ्हाडी खोळंबले होते. घरी जाण्यास उशीर होऊ लागला तसं वसंतरावांनी निघण्यासाठी खुणावलं. थोड्या वेळाने अनघा आणि विनायक मोटारगाडीत जाऊन बसले. वसंतराव आणि माई सुद्धा गाडीत येऊन बसले. भरल्या डोळ्यांनी सर्वांनी अनघाला निरोप दिला.

पुढे काय होतं? अनघा आणि विनायकच्या आयुष्यात काय नवीन घडणार? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all