Feb 23, 2024
नारीवादी

पुन्हा बरसला श्रावण भाग २५

Read Later
पुन्हा बरसला श्रावण भाग २५
पुन्हा बरसला श्रावण.. भाग २५

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, विनायक आपल्याला कुटुंबियांसमवेत सरदेसाईंच्या घरी स्वराज आणि ईश्वरीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आला होता. ईश्वरीची पदवीची फायनल परीक्षा तोंडावर आली होती. आईच्या प्रोत्साहनामुळे ईश्वरी पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी तयार झाली. ईश्वरी आणि स्वराज यांचा नियोजित वेळेत साखरपुडा संपन्न झाला. आता पुढे..

भाग २५

स्वराज आणि ईश्वरीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. हळूहळू सर्व पाहुणे मंडळी देशमुखांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतली. सरदेसाई कुटुंबीय सुद्धा देशमुखांनी केलेल्या पाहुणचाऱ्यामुळे आनंदी होते. शालिनीताई पण खुश होत्या. स्वराजला त्यांच्या मनाजोगी देखणी, सुस्वरूप, शिकलेली जोडीदारीन मिळाली होती. देशमूख घराणं तोलामोलाचं होतं. समाजात मान होता शिवाय सरदेसाई आणि विनायक खास मित्र असल्याने दोघांनाही अवघडल्यासारखं झालं नाही. काय हवं नको ते हक्काने सांगितलं गेलं. विनायकही त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवून होता. कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर सर्वजण हॉलमधून आपापल्या घरी परतले. माईने दारातच ईश्वरीला थांबवलं.

“थांब मनू.. तिथेच थांब.. माझ्या बाळाची दृष्ट काढते. अनु.. मीठमोहऱ्या घेऊन ये बाय.. ”

अनघा पटकन आत गेली. माईंच्या हाती मीठमोहऱ्या दिल्या. माईंनी ईश्वरीच्या अंगावरून मीठमोहरी ओवाळून टाकली. भाकरीचा तुकडा तिच्यावरून उतरवून टाकत माई मोठ्याने म्हणाली,

“दृष्ट मिष्ट, आल्या-गेल्याची, नात्यागोत्याची भुताखेताची, पापी चांडाळाची, वेताळ काताळाची, कुण्या स्त्रीची, पुरुषाची, काळ्याची, कुण्या गोऱ्याची, घरातल्याची, दारातल्याची, पारोशा केराची.. दृष्ट दूर होवो..”

अनघाने ईश्वरीला आत यायला सांगितलं. सर्वजण आत आले.

“खरंच आई, बरं झालं माईंनी ईशुची दृष्ट काढली. खूपच छान दिसत होती ईशु.. मला तर वाटत होतं माझीच नजर होते की काय! ”

असं म्हणत हसून अर्पिताने ईश्वरीच्या कानामागे काजळाचा काळा तिट लावला.

“चल गं वहिनी.. तुझं आपलं काहीतरीच.. ”

ईश्वरी लडीवाळपणे म्हणाली. तिच्या या वाक्यासरशी बसलेल्या सर्वात एकच हशा पिकल्या. कार्यक्रमात झालेल्या धावपळीमुळे सारेच दमले होते. बाहेरच्या खोलीत पाहुण्यांच्या विश्रांतीची व्यवस्था करून अनघा ईश्वरीला घेऊन ईश्वरीच्या खोलीत आली. पलंगावर बसवत अनघा म्हणाली.

“मनू, आज साखरपुडा झाला.. लवकरच तू आता तुझ्या सासरी जाणार.. सरदेसाईंची सून होणार.. माझा पदर पकडून माझ्या मागे मागे फिरणारी माझी इवलीशी परी.. किती लवकर मोठी झालीस गं.. तू खुश आहेस ना बाळ?”

ईश्वरीने मान डोलावली. अनघाचा हात हातात धरून ईश्वरी म्हणाली,

“आई, तू खुश आहेस ना? तुझ्या आनंदापलीकडे माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही. तू आजवर माझ्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्यास, परिश्रम घेतलेस, कष्ट सोसलेस त्याची या जन्मात तरी मी उतराई नाही होऊ शकत. तू खुश तर मीही खुश..”

ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“ईशु, मला माहित आहे, या लग्नामुळे तू फारशी खुश नाहीये. तुला अजून खूप शिकायचं आहे. तुला तुझ्या करियरवर फोकस करायचा आहे पण बेटा, शिक्षण, करियर यापेक्षाही महत्वाच्या गोष्टी असतात गं बायकांच्या आयुष्यात.. आणि त्यासाठी कायम आपल्या आनंदाला, इच्छेला तिलांजली द्यावी लागते. आपल्याच सुखाचं बलिदान द्यावं लागतं. स्त्रियांचा जन्म असाच गं, स्त्रीचं दुसरं नाव म्हणजेच बलिदान. तिच्या नशिबात फक्त त्याग करणंच लिहलेलं असतं. ईशु, एक पत्नी म्हणून माझे हात जखडलेले आहेत. एक आई म्हणून मी तुझ्यासाठी फारसं काही करू शकले नाही पण एक स्त्री म्हणून मी तुला इतकंच सांगेन, आपली स्वप्नं आपली ध्येय यापेक्षाही स्रीजातीला महत्वाचं असतं ते म्हणजे सरंक्षण.. आधी पिता, भाऊ मग नवरा आणि मुलगा अश्या अनेक रूपात ही संरक्षण कवचे स्त्रियांभोवती ढाल बनून उभी असतात किंबहुना आपला तसा समज समाजाने करून दिलाय. मुलीचं लग्न योग्य वेळेत करून दिलं, ती तिच्या सासरी सुखात नांदू लागली की जबाबदारी संपली. आईवडिलांची अशीच भावना असते. त्यामुळे बेटा, वाईट वाटून घेऊ नकोस.. इथंपर्यंत आलीस, शिकलीस फार छान झालं. तुझ्यात मी स्वतःला पाहत आले. तुझ्यात माझं जगणं जगत आले. आईपण जगले.. ते सुख मला तू दिलंस.. माझं शिक्षणाचं स्वप्नं तू जोपसलंस. पूर्ण केलंस.. तुझ्या सारखी मुलगी माझ्या पोटी जन्मास आली.. ईश्वराचे आभार कसे आणि किती मानू!”

अनघाच्या डोळ्यातून मेघ बरसू लागले.

“आई, असं बोलू नको ना.., आज मी जे काही आहे., जे काही चार सुखाचे क्षण मी पाहू शकतेय ते फक्त आणि फक्त तुझ्या आशिर्वादामुळे. तू माझ्या पंखात बळ निर्माण केलंस आणि ही गरुडझेप घेण्यास सक्षम बनवलंस. तुझ्या या मायेची, प्रेमाची या उपकारांची मी कधीच उतराई होऊ शकत नाही पण आई एक सांगू? प्रत्येक जन्मी मला तुझ्याच पोटी जन्म घायचा आहे. आई, खरंच ग तुझ्यासारखी आई मला लाभली हे माझं भाग्यच. अशीच कायम माझ्या सोबत राहा.आशीर्वाद बनून.. कधी माझा श्वास बनून.. लव्ह यू आई!”

असं म्हणत ईश्वरीने अनघाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहत होते अनघा तिला मायेने कुरवाळत होती. आता दोघीही शांत होत्या. कोणीच काही बोलत नव्हतं पण मौनातला संवाद सुरू होता.

दिवस सरत होते. देशमुख आणि सरदेसाईंच्या घरी लग्नाची धांदल सुरू झाली. जसंजसं दिवस पुढे जात होते तसं तसं कामांना वेग आला होता. दागिन्याची, कपड्यांची खरेदी सुरू झाली. देशमुखांनी सरदेसाईंच्या कुटुंबियांना बोलवून नवरदेवाच्या, मुलाकडच्या पाहुण्यांच्या कपड्यांची खरेदी केली. लाखो रुपयांचा बस्ता बांधला गेला. एकीकडे लग्नाची तयारी सुरू होती आणि दुसरीकडे ईश्वरीला पदवी परीक्षेच्या निकालाचे वेध लागले होते. तिचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गांवर होतं. पेपर्स तर चांगले गेले होते पण तरीही ईश्वरीच्या मनात धाकधूक होती. काळजी वाटत होती. दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार होता. विद्यार्थी साईटवर जाऊन सारखे चेक करत होते. अर्चना, विभा ईश्वरीच्या घरी जमल्या होत्या. साऱ्यांनाच निकाल पाहण्याची घाई झाली होती. ईश्वरीसह साऱ्यांच्या नजरा लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळून होत्या आणि अचानक लाईट गेली.

“शीट.. सत्यानाश यार.. हिला पण आताच जायचं होतं.. आता कसा निकाल पाहायचा ईशु?”

आस्थाने निराश होऊन म्हटलं.

“अरे थांबा रे.. येईल लाईट लगेच.. तोपर्यंत मोबाईलवर पाहूया.. थांबा..”

असं म्हणून ईश्वरी मोबाईल घेण्यासाठी वळली. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली.. मोबाईलच्या स्क्रीनवर श्लोकचं नाव झळकलं. ईश्वरीने कॉल घेतला.

“हॅलो श्लोक, बोल काय झालं?”

ईश्वरीने प्रश्न केला.

“काँग्रट्स डिअर.. तुम्ही कॉलेजमधून पहिल्या आल्या आहात.. आहात कुठे मॅडम? आता तर नक्की पार्टी हवीय..”

श्लोक आनंदाने म्हणाला.

“काय सांगतोस? खरंच? तू नीट पाहिलंस ना?” - ईश्वरी

“अगं हो.. तू पहिली आलीस. मी नीट चेक केलंय.. अभिनंदन मैतरणी..”

श्लोक मिश्किलपणे म्हणाला.

“थँक्यू रे.. आणि तुम्ही सगळे? तुझं काय झालं? अरे नेमकी आमच्या इथली लाईट गेली. मी, अर्चना आणि विभा रिसल्टसाठीच थांबलो होतो. चेक करत असतानाच लाईट गेली. बरं झालं तू फोन करून कळवलंस.. थँक्यू वन्स अगेन.. तुझं काय..?”

“मी पण पास झालो. फर्स्ट क्लास.. बाकी आस्था पण पास झालीय माझ्या सोबतच आहे. तू अर्चना आणि विभाचा हॉल तिकीट नंबर शेअर कर.. मी चेक करतो. चल बाय..”

“अरे थांब नां.. मला बोलू दे..”

आस्था मागून ओरडली. श्लोकच्या हातातला मोबाईल ओढून घेत जोरात ओरडली.

“काँग्रॅच्यूलेशन ईशु.. पार्टी हवीय.. ”- आस्था

“हो देईन गं.. तुमच्या दोघांचेही अभिनंदन.. चल बाय..,”

ईश्वरीने फोन ठेवून दिला आणि आनंदाने अर्चनाकडे पाहिलं. आतापर्यंत अर्चना आणि विभाला ईश्वरी कॉलेजमधून पहिली आल्याची खबर लागली होती. अनघाच्या मोबाईलवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी कॉल करून अभिनंदन केलं होतं. ईश्वरीच्या शिक्षकांचे कॉल सुरू झाले. अनघा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होती.

“आई, तुझं स्वप्न पूर्ण झालं.. मी पदवीधर झाले.. तुझ्या कष्टाचं चीज झालं. थँक्यू सो मच आई..”

ईश्वरीने आईला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. आईने मायेने तिला जवळ घेतलं.

“जा बाळ.. देवापुढे साखर ठेव.. त्याचीच कृपा.. तो पाठीशी आहे म्हणूनच हा दिवस तुझ्या आयुष्यात आला. सुखी रहा बेटा..”

अनघा सद्गदित होऊन म्हणाली. ईश्वरीने मान डोलावली आणि ती देवघरात गेली. घरात आनंदीआनंद होता. ईश्वरीने पटकन आईच्या आणि माईंच्या पाया पडल्या. अनघाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिची ईश्वरी कॉलेजमधून पहिली आली होती. अनघाने आदित्य आणि विनायकला ही गोड बातमी सांगितली. सर्वांनाच आनंद झाला होता. आयुष्यातला एक टप्पा पार पडला होता. ईश्वरीने जिद्दीने तो पार केला होता.


पुढे काय होतं? ईश्वरीच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ दबा धरून बसलं होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//