पुन्हा बरसला श्रावण.. भाग १६

ही कथा एका ईश्वरीची.. तिच्या संघर्षाची..



पुन्हा बरसला श्रावण..

भाग १६

अनघा तिच्या खोलीत आली. पलंगावर येऊन बसली. विनायक एका बाजूला तोंड करून डाराडूर झोपी गेला होता. अनघाने त्याच्याकडे पाहिलं.

“किती बिनघोर झोपी गेलेत.. ईशुच्या लग्नाचं किती टेन्शन घेतलं होतं यांनी.. आता त्यांची चिंता मिटली. तसा मुलगा छान आहे. माझ्या ईशुला शोभेल असा.. पण माझी ईशु.. तिच्या इच्छा? तिची स्वप्नं..? ती सुखात राहील ना?”

अनघाने मनात येणाऱ्या विचारांना जागीच थोपवलं. तिला माईंचे शब्द आठवले.

“देवा, माझ्या ईशुला सुखात ठेव.. सगळं तिच्या मनासारखं होऊ दे.. ”

नकळत तिचे दोन्ही हात जोडले गेले. आईचं मन आपल्या पिल्लांसाठी व्याकुळ होत होतं. तिने स्वतःचीच समजूत काढली.

“चल अनघा, झोपा आता.. उद्या सकाळी लवकर उठायचंय. ईशुला कॉलेजला जायचं आहे. तिला लवकर उठवलं पाहिजे. आदी, अर्पिता आणि यांचा टिफिन करायचा आहे. तेंव्हा कोणताही वाईट विचार मनात आणू नकोस. निश्चिन्त रहा.. सगळं चांगलं होईल.”

ती स्वतःशीच पुटपुटली आणि तिने डोळे मिटले. थोडयाच वेळात तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीच्या प्रहरी अनघाला जाग आली. सकाळचा सर्वांसाठी नाश्ता, आदी, विनायक अर्पिता सर्वांचे डबे करून, सर्व कामे आटोपून ती ईश्वरीच्या खोलीत आली.

“ईशु.. ए ईशु.. उठ बरं.. आज कॉलेजला जायचं आहे ना? उठ लवकर उशीर होईल..”

अनघाने आवाज देताच ईश्वरीची अंथरुणातच चुळबुळ सुरू झाली.

“ झोपू दे ना आई.. फक्त पाच मिनटं.. प्लिज..”

असं म्हणत ईश्वरीने पुन्हा पांघरून तोंडावर ओढून घेतलं आणि पलीकडे तोंड करून डोळे मिटून तशीच पडून राहिली. अनघाने खिडकीचा पडदा दूर सारला आणि खिडकी उघडली. सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत येत ईश्वरीच्या चेहऱ्यावर पडली.

“काय गं आई.. तू पण नां.. थोडं झोपू पण देत नाही. ”

त्रासिक मुद्रा करत ईश्वरी उठून बसली.

“घड्याळात बघा जरा किती वाजलेत ते? आठ वाजून गेलेत..”

“काय? आठ वाजले? काय आई तू पण.. मी म्हटलं होतं ना तुला लवकर उठव.”

बिछान्यातून ताडकन उठून बसत ईश्वरी म्हणाली. अनघाने हसून तिच्याकडे पाहिलं,

“बाळ, आता तुला सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे. प्रत्येकवेळी आई असणार आहे का सोबत तुला झोपेतून उठवायला?”

बेडवरच्या ब्लॅंकेटची घडी घालत ती हसून म्हणाली तशी ईश्वरीने कंटाळवाण्या आणि त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि काहीही उत्तर न देता ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. स्वतःचं आवरून ईश्वरी बाहेर हॉलमध्ये आली. अनघाने तिच्यासाठी कांदेपोहे बनवले होते. उभ्या उभ्याच दोन घास तोंडात टाकून ती कॉलेजला निघून गेली. विनायकचा नाश्ता टेबलवर ठेवला. माईंच्या हाती डिश दिली. विनायकने नाश्ता करता करता सरदेसाईंना फोन लावला. फोन लागताच विनायकने बोलायला सुरुवात केली.

“नमस्कार श्रीधरराव..”

“नमस्कार.. नमस्कार विनायकराव.. बोला..”

पलीकडून श्रीधरराव बोलत होते.

“सॉरी हं.. अगदी सकाळी कॉल केला तुम्हाला पण त्याचं झालं असं की स्वराज आम्हाला आवडला आहेच तर पुढची बोलणी करून टाकू. तुमच्या घरीच बोलाचाली करू. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवून टाकू. चांगल्या कामासाठी वेळ कशाला घालवायचा नाही का?”

विनायक हसून म्हणाला.

“हो.. अगदी खरंय तुमचं.. येत्या रविवारी या तुम्ही आमच्या घरी.. तेंव्हाच पुढच्या गोष्टी ठरवू. तसं ठरवण्यासारखं काही नाही. आम्हाला तुमच्याकडून काही नको. एक श्रीफळ आणि मुलगी द्या. इतकं पुरेसं आहे. सरदेसाईंच्या घरी ईश्वराच्या कृपेने भरपूर आहे. आम्हाला काहीही नको.”

श्रीधररावांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“हो.. बरोबर आहे तुमचं म्हणणं पण देशमुखांना शोभेल असाच मानपान करू आम्ही. आमच्या ऐपतीप्रमाणे आमच्या मुलीचं लग्न करू आम्ही. तुम्ही काळजी करू नका. येत्या रविवारी भेटूच आपण. ठेवतो बरं..”

विनायकने येत्या रविवारी भेटण्याचं आश्वासन देऊन त्यांचा निरोप घेतला.

“माई, मला ईश्वरीची जन्मपत्रिका दे बरं. स्वराजची मी आधीच मागवून घेतलीय. आजच आपल्या गुरुजींना पत्रिका दाखवून घेतो. तसे ते आधुनिक विचारांचे आहेत. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की त्यांचा या असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही पण आपण दाखवून घेऊ. मनात शंका नको रहायला आणि हो.. अजून एक महत्वाचं..या रविवारी आपल्याला सरदेसाईंच्या घरी जायचं आहे लग्नाची पुढची बोलणी करायला. साखरपुडा आणि लग्नाची तारीख काढून टाकू. आदी आला की त्यालाही सांग हे. त्याची बाकीची कामं बाजूला ठेवून यासाठी वेळ काढायला सांग जरा.. चल मी निघतो.”

असं म्हणत समोर ठेवलेल्या जेवणाच्या डब्याची बॅग उचलत माईना नमस्कार करून तो घराबाहेर पडला. माईंनी फक्त मान डोलवून होकार दिला. आदित्य आणि अर्पिता आपल्या खोलीबाहेर येताच माईंनी विनायकचा निरोप त्याला दिला तसे आदित्यचे डोळे आनंदाने चमकले.

“हो.. चालेल जाऊया आपण..”

असं म्हणून त्याने विनायकच्या बोलण्याला संमती दर्शवली. थोड्या वेळात आदी आणि अर्पिताही ऑफिससाठी घराबाहेर पडले.

इकडे ईश्वरी कॉलेजमध्ये आपल्या वर्गात पोहचली. अर्चना आधीच पोहचली होती. चार लेक्चर झाल्यानंतर ब्रेक झाला. सर्व मुलंमुली वर्गाच्या बाहेर पडू लागली. अर्चना ईश्वरीजवळ आली. एकदम तिच्या पाठीवर थाप टाकत मिश्किलपणे म्हणाली.

“काय ईशु डार्लिंग.. काल झोप लागली ना शांत? की स्वप्नात तो राजकुमार येऊन आमच्या प्रिन्सेसला काही त्रास..”

“अर्चू, मार खाशील हं.. जास्त फाजीलपणा केलास तर..”

तिचं बोलणं मधेच तोडत ईश्वरी म्हणाली.

“बरं.. सॉरी.. चला कॅन्टीनमध्ये जाऊया ना? बाकीचे तिथेच वाट पाहत असतील. वेळेत नाही गेलो तर आपल्यालाच सर्वांच्या नाश्त्याचं बील भरायला लावतील दंड म्हणून..”

ईश्वरीला हाताला धरून जागेवरून उठवत अर्चना हसत म्हणाली. थोड्याच वेळात त्या कॅन्टीनमध्ये पोहचल्या. बाकीचे मित्रमैत्रिणी आधीच येऊन बसले होते.

“हॅलो फ्रेंड्स.. कसे आहात?”

शेजारची खुर्ची ओढून खाली बसत अर्चना म्हणाली. ईश्वरीने सर्वांकडे हसून पाहिलं.

“आम्ही ठीक.. खरंतर हा प्रश्न ईशुला विचारायला हवा. कॉलेजमध्ये जास्त दिवस गैरहजर तीच असते. तरीही नेहमी टॉप असते प्रत्येक विषयात. एकदम छुपे रुस्तम आहे बुवा ही..”

सॅन्डविच खाता खाता राज म्हणाला. आस्था, आराध्यानेही त्याचीच री ओढली.

“गप रे.. तुझं आपलं काहीतरीच हं..”

ईश्वरीने त्याला गप्प रहायला सांगितलं. तसा दीपक तिला चिडवत म्हणाला.

“रोज बदाम खातेस का गं? एवढं कसं लक्षात राहतं तुझ्या?”

ईश्वरीने त्याच्याकडे डोळे वटारून रागाने पाहिलं तसा जीभ चावत तो गप्प झाला.

“नाहीतर काय.. आम्ही वर्षभर अभ्यास करूनही जेमतेम काठावर पास होतोय आणि ही..”

ईश्वरीकडे पाहत हरीश मजेने म्हणाला. अर्चनाने त्याच्या डोक्यावर टपली मारत त्याला गप्प रहायला सांगितलं.

“नका रे चिडवू तिला? आधीच का तिला त्रास कमी आहे त्यात भर म्हणून तुम्ही चिडवताय. शांत बसा बघू..”

अर्चना खोटं खोटं सर्वांना दरडावून म्हणाली. लटक्या रागाने ईश्वरीने तिच्याकडे पाहिलं. श्लोक मात्र शांतपणे सर्वांचं बोलणं ऐकत होता. त्यांची चेष्टा मस्करी एन्जॉय करत होता. ईश्वरी, श्लोक, आस्था आराध्या, अर्चना राज हरीश आणि दीपक यांचा छान ग्रुप होता. जिवाभावाचे मित्रमैत्रिणी अगदी शाळेत असल्यापासूनचे. कॉलेज बदलायला लागू नये म्हणून सर्वांनी मिळून एकाच कॉलेजात ऍडमिशन केली पण दोस्ती अजिबात तुटू दिली नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम पाठीशी उभे राहिले. कुठेही जा.. यांच्या दोस्तीचे चर्चे ऐकायला मिळणारच. श्लोक ईश्वरीला दुरूनच पाहत होता. जुन्या आठवणी जाग्या झाल्या तसा श्लोक एकदम जुन्या काळात गेला. शाळेतले दिवस डोळ्यासमोर फेर धरू लागले. ग्रुपमधले सारेचजण सामान्य कुटुंबात जन्मलेले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. सरकारी शाळेतला तो पहिला दिवस. श्लोक अजिबात कुरबुर न करता गेटवरूनच आईला बाय करून आत आला. बाकीचे आजूबाजूच्या परिसरातील इतर मित्र सोबतीला होतेच. श्लोक खुश होता. आईने त्याला सांगितलं होतं,

“शाळेत शहाण्यासारखं वागलास, नीट अभ्यास केलास तर बाई खाऊ देतात. खेळायला देतात खूप लाड करतात.”

मग काय स्वारी एकदम आनंदात, उत्साहात शाळेत हजर झाली होती. बाईंनी त्याला खाली मांडलेल्या बाकावर बसायला सांगितलं. तोही निमूटपणे जागेवर जाऊन बसला. इतक्यात दुरून त्याला एक छोटी मुलगी मोठमोठ्यानं भोकाड पसरून रडत वर्गाच्या दिशेने येताना दिसली. अंगावर शाळेचा युनिफॉर्म, पाठीवर दप्तर.. दोन वेण्या, गळ्यात अडकवलेली पाण्याची बाटली. तिच्या सोबत तिची आईच असावी बहुदा त्याने मनाशी कयास बांधला.

“आई.. नको ना जाऊ..”

आईच्या पोटाला घट्ट मिठी मारून ती रडत होती.

“ईशु, बाळा.. असं रडायचं नाही. इथे तुला नवीन मैत्रिणी भेटतील. तुझ्यासोबत खेळतील. बाई छान छान गोष्टी, कविता सांगतील आणि तू रडते कशाला तू वर्गात जाऊन बस. मी इथेच गेटच्या बाहेर तुझी वाट पाहत बसते तुझी शाळा सुटेपर्यंत.. आता डोळे पुसा आणि जा बरं आत.”

आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला समजावून सांगत होती. आई इथेच थांबणार म्हटल्यावर ईश्वरी बाईंसोबत वर्गात जायला तयार झाली. आईच्या हाताची पकड सैल होऊ लगली आणि आईचे डोळे पाण्याने डबडबले. तिने ईश्वरीला बाय केलं आणि ती बाहेर गेटजवळ येऊन थांबली. बाईनी तिला श्लोकच्या बाजूला आणून बसवलं. ती दबकतच त्याच्या शेजारी बसली पण ती त्याच्याकडे जरासुद्धा पाहत नव्हती. बाईंनी तासाला सुरुवात केली. सर्वांची ओळख करून झाली. मधल्या सुट्टीत श्लोक ईश्वरीला म्हणाला,

“ए ललुबाई, किती ललते.. मी ललतो का बघ? आई बोलते मी खूप स्ट्रॉंग आहे. हे घे खाऊ.. पण ललु नको.”

तिने त्याच्याकडे पाठ फिरवली. श्लोकने चिंचेचं बुटुक तिच्या समोर धरलं तशी ईश्वरीची कळी फुलली. तिने त्याच्याकडून ते बुटुक घेतलं पण परत गप्प. काहीच बोलेना. श्लोक हिरमुसला आणि तो इतर मित्रांशी बोलू लागला. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुलांना लवकरच सोडण्यात आलं. बाहेर गेटवर आईला पाहून ईश्वरीला किती आनंद झाला तिचं तिलाच माहीत! काळीज सुपाएवढं झालं. धावत येऊन तिने आईला घट्ट मिठी मारली. श्लोकचीही आई आली होती. मग हळूहळू ईश्वरीला शाळा आवडू लागली. इतर मुलींशी मैत्री झाली. आस्था, हरीश, दीपक, अर्चना राज यांच्याशी गट्टी जमली आणि रोज चिंचेच्या बुटुकाचा नित्यक्रम झाला.

“आजही तशीच आहे. शांत.. निरागस.. मितभाषी.. जशी शाळेत होती तशी. कोणात जास्त मिसळायची नाही. एकटीच असायची.. लाजरी.. बुजलेली. हिच्याशी मैत्री व्हावी म्हणून रोज एक चिंचेचं बुटुक द्यावं लागायचं लाच म्हणून.”

तो स्वतःशीच गालातल्या गालात हसत म्हणाला. अचानक सुरू झालेल्या हास्याच्या गडगडाटाने भानावर आला. इतक्यात अर्चू जोरात ओरडली.

“ऐका रे सर्वांनी.. आज ईशु आपल्याला पार्टी देणार आहे. का विचारा..”

सर्वांनी अर्चनाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. श्लोकचंही लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

अर्चना काय सांगेल? ईश्वरी लग्नाला तयार होईल का? पाहूया पुढील भागात.

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all