पुन्हा बरसला श्रावण भाग १०५

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १०५

आदित्यने आपल्या बाबांना सोबत येण्यासाठी खूप विनवण्या केल्या; पण विनायक तयार झाला नाही. मग आदित्यचा नाईलाज झाला आणि तो अर्पिता आणि मुलांसोबत बाहेर जाण्याची तयारी करू लागला.

“किती हट्टी आहेत बाबा! कधीपासून चला म्हणतोय तर यांचं आपलं ‘न’ चा पाढा सुरूच आहे. कायम स्वतःचंच खरं करणार. कधी कोणाचं ऐकणार नाहीत. आजवर आईशीही असंच वागत आलेत. इतकं वय झालं तरी तोच तऱ्हेवाईक स्वभाव.. निदान आता तरी आपला हट्ट सोडा.”

आदित्य स्वतःशीच पुटपुटला. विनायक हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. खरंतर पेपर वाचणं हे एक निमित्त होतं. अधून मधून पेपरमधून डोकं वर काढून आदित्य आणि अर्पिता यांना तो पाहत होता. आदित्यने स्वराला उचलून घेतलं होतं. तो तिला शांत करत होता.

“काय झालं बाबू? कशाला रडते शोना? आजी हवीय? येईल हं.. ए आजी लवकर ये गं, स्वराला भुर्र घेऊन जा.”

त्याच्या बोबड्या बोलाने स्वरा हसू लागली. रडणं थांबलं होतं. मग आदित्यने दूध गरम केलं. थोडं थंड करून दुधाची बाटलीत ओतलं आणि दुधाची बाटली त्याने स्वराच्या तोंडाला लावली. स्वरा शांतपणे दूध पीत होती. त्यांने तिला खाली बसवलं. आणि मग आपला मोर्चा शौर्यकडे वळवला. आदित्य त्याला पटकन बाथरूममध्ये घेऊन गरम पाण्याने स्वच्छ हातपाय धुवून पुसून घेतलं. त्याचे कपडे बदलले. आदित्यने स्वराचीही तयारी केली. आता दोन्ही बाळं छान फ्रेश वाटत होती. आदित्यने पटकन किचन ओट्यावरचा पसारा आवरला. ओटा धुवून पुसून स्वच्छ केला. त्यानंतर त्याने हॉलमध्ये मुलांनी पसरवलेली त्यांची खेळणी गोळा करून एका बॉक्समध्ये भरून ठेवली. त्यानंतर आदित्य हातात झाडू घेऊन केर काढू लागला. अर्पिता तिची तयारी करत होती. तिने छान शिफॉनची गडद निळ्या रंगांची साडी नेसली. साडी नेसता नेसता तिने आदित्यला आवाज दिला.

“आदी, ए आदी.. इकडे ये ना जरा..”

“बाबा, तुम्ही जरा मुलांकडे पाहता का? मी आलोच..”

बाबांकडे पाहून असं म्हणत आदित्य त्यांच्या खोलीकडे वळला. त्याला समोर पाहून अर्पिता म्हणाली,

“ऐक ना, जरा माझ्या साडीच्या निऱ्या एकसारख्या कर ना प्लिज.”

“हो, करतो.. आवर पटकन. किती उशीर लागतो तयारी करायला तुम्हा बायकांना.”

तो तिला मिश्किलपणे म्हणाला तशी ती लटक्या रागाने त्याच्याकडे पाहू लागली. विनायक अर्पिता आणि आदित्यचं वागणं बोलणं न्याहाळत होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले.

“हा माझाच आदी आहे ना? किती वेगळा वागतोय! बायकांसारखी घरातली सर्व कामं करतोय. मुलांना न्हाऊ माखू काय घालतोय! बायकोशी प्रेमाने काय वागतोय! आणि तेही तो सगळं आनंदाने करतोय. खरंच, किती बदलला आहे आदी!”

विनायकच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. त्याच्या आणि अनघाच्या संसाराची सगळी वर्षे डोळ्यांसमोरून तरळून गेली. मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने चौफेर उधळू लागले. अनघा नववधूच्या रूपाने देशमुखांच्या घरचा उंबरठा ओलांडून आली त्या दिवसांपासून ते आतापर्यंतचा सारा प्रवास झरकन डोळ्यांसमोर आला.

“मी तर तिच्याशी कधीच असं प्रेमाने वागलो नाही. कधी प्रेमाचे, मायेचे चार शब्दही बोललो नाही. तिने एकटीने दोन्ही मुलांना वाढवलं, लहानाचं मोठं केलं. आणि मी? मुलांच्या संगोपनात साधा हातभारही लावला नाही. आज जे सुख आदी अनुभवतोय; ते माझ्या वाट्याला येऊनही मी त्या सुखाला झिडकारत राहिलो. ती मुलांचं बालपण भरभरून जगली; पण मी इतका दुर्दैवी की, त्या सुखापासून स्वतःच दूर राहिलो. व्यसनापाई अनघाला, मुलांना छळत राहिलो. अनघाला कायम तुच्छ लेखत आलो. तिला मारहाण करत राहिलो. माझ्यातल्या पुरुषी अहंकाराला गोंजारत राहिलो. पुरुषी अहंकाराने पछाडलं होतं मला.”

“बाबा, अहो बाबा.. कुठे हरवलात? कधीपासून आवाज देतेय, लक्ष कुठेय तुमचं?”

अर्पिताने आवाज देताच विनायकची विचारांची शृंखला खळकन तुटली. त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. अर्पिता विनायकला म्हणाली,

“बाबा, आम्ही जाऊन येतो. तुम्ही पण जेवून घ्या. दुपारचा वरणभात, बटाट्याची भाजी पोळी थोडी शिल्लक आहे. फ्रिजमध्ये ठेवलंय. तुम्ही खाऊन घ्या. उपाशी राहू नका. आम्ही लवकरच येतो.”

अर्पिताच्या बोलण्यावर त्याने फक्त मान डोलावली आणि पुन्हा आपलं डोकं पेपरात खुपसलं. इतक्यात आदित्य बाहेर आला. त्याने शौर्यला एका हातात उचलून घेतलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या हातात मुलांच्या छोटया कपड्यांची, दुधापाण्याची बॅग होती. अर्पिताने स्वराला उचलून कडेवर घेतलं आणि ती दोघे घराबाहेर पडले. आता विनायक एकटाच घरात राहिला. पहिल्यांदाच त्याला तो एकटेपणा खायला उठला होता. नाही म्हटलं तरी सतत अनघाचा वावर आजूबाजूला असायचाच. सतत त्याच्या मागे पुढे करणारी, हवं नको ते विचारणारी अनघा आता तिथे नव्हती. त्याचा राग, त्याचा त्रागा निमूटपणे सहन करायला अनघा घरात नव्हती. आता जुन्या आठवणींनी त्याच्या मनात रुंजी घालायला सुरुवात केली. चांगल्या आठवणी विचारात येतच नव्हत्या. जणू त्या सर्वांनी त्याच्यावर बहिष्कारच टाकला होता. अनघाच्या आठवणींनी तो अस्वस्थ झाला.

“कॉल करू का तिला? निदान माईला तरी?”

विनायकने कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला.

“नाही.. नको. मी का तिला फोन करू? तिला नाही का होत माझी, मुलांची, नातवंडांची आठवण? तिलाही नवऱ्याची काळजी असायला हवी ना? मोठ्या तोऱ्यात गेली होती. आली मोठी नाकाने वांगी सोलणारी! बघूया किती दिवस लेकीच्या घरी राहतेय? कधी ना कधी तर यावंच लागेल ना?”

तो स्वतःशीच बडबडला. आदित्य आणि अर्पिताला बाहेर जाऊन बराच वेळ झाला होता. एकट्याला घरात बसूनही कंटाळा आला होता. कितीवेळ टीव्ही पाहणार! त्याच त्याच, पुन्हा पुन्हा दिसणाऱ्या शिळ्या बातम्या.. त्याच साससुनांच्या भांडणांच्या रटाळवाण्या मालिका.. तो वैतागला होता.

“चला जेवून घेऊ.. निदान एक काम तरी संपवू..”

असं स्वतःशीच पुटपुटत तो जेवणाचं ताट करण्यासाठी उठला. फ्रिजमधली वरणभाताची, बटाट्याची भाजीची भांडी बाहेर काढली. जेवण गरम करण्याचा आळस करत त्याने ताटात पोळी भाजी आणि वरणभात वाढून घेतला. थंडगार भाजीपोळीचा घास तसाच तोंडात टाकला.

“आता अनघा असती तर कधीच असं दुपारचं थंडगार जेवण ताटात वाढलं नसतं. काहीतरी गरम गरम करून खाऊ घातलं असतं..”

अनघाच्या विचारांनी विनायक अस्वस्थ झाला. कसेबसे दोन घास पोटात ढकलले आणि तो हॉलमध्ये फेऱ्या मारू लागला. बरीच रात्र झाली होती. अजून आदित्य आणि अर्पिता घरी परतले नव्हते. बराच वेळ वाट पाहून झाल्यावर शेवटी विनायकला त्यांची काळजी वाटू लागली. दोन लहानगी मुलं सोबत होती. उगीचच त्याचं मन चिंतेने भरून गेलं. आदित्यला कॉल करून पाहावा या विचाराने त्याने टेबलवरचा मोबाईल उचलला. इतक्यात दारावरची बेल वाजली. स्वरा, शौर्यचा आवाज त्याच्या कानावर पडला.

“आले वाटतं..”

असं म्हणत पटकन तो दाराच्या दिशेने धावला. आदित्य अर्पिता आपल्या मुलांसमवेत दारात उभे होते. दोघेही आदित्य आणि अर्पिता दोघंही प्रचंड खूष होते. दोघं नवराबायको आत शिरली आणि सोबत मोगऱ्याचा सुगंधही. विनायकचं लक्ष अर्पिताकडे गेलं. अर्पिताच्या केसात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता. ती सरळ तिच्या खोलीत गेली. तिच्या मागोमाग आदित्यही खोलीत आला. अर्पिताने स्वराला बेडवर ठेवलं. तिचे कपडे बदलले. शौर्यला बेडवर बसवत तो शौर्याकडे पाहत हसत म्हणाला,

“काय चॅम्प, आज तुमची मम्मा भारीच गोड दिसत होती. क्या बात है? क्या राज है जो तुम्हारी मम्मा आपल्यापासून लपवतेय?”

“काही नाही आज त्यांचे बाबा भारीच खूष दिसत होते. आज त्यांनी चक्क माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेतला आणि हो, तो गजरा स्वतःच्या हातांनी माझ्या केसांत माळलाय. आहात कुठे बाळांनो! ”

अर्पिताने आदित्यकडे सहेतुक नजरेने पाहिलं आणि ती गोड हसली. आदित्यच्याही चेहऱ्यावर लबाड हसू पसरलं. त्यांचं बोलणं बाहेर फेऱ्या मारणाऱ्या विनायकच्या कानावर पडलं तसा तो एकदम ओशाळला.

“आमच्या लग्नाला इतकी वर्षे लोटली; पण आजवर मी कधीच अनघासाठी काही घेतलं नाही. भेटवस्तू सोडा पण निदान दोन चार रुपयांचा गजराही तिच्यासाठी आणला नाही. अनघा माझ्यासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी झिजत राहिली; पण मी बायको म्हणून कधीच तिच्या आनंदाचा विचार केला नाही. आता लेकसुनेचा संसार पाहून उपरती होतेय पण आयुष्यातली इतकी वर्षे मी अनघाला त्रासाशिवाय, दुःखाशिवाय काहीच दिलं नाही.“

विनायकच्या मनात एकदम अपराधीपणाची भावना दाटून आली. अनघाची उणीव भासू लागली.

पुढे काय होतं? ईश्वरीच्या प्रयत्नांना यश येईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all