पुन्हा बरसला श्रावण..भाग ६

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या एका श्रावणाची.. श्रावणाच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..
पुन्हा बरसला श्रावण..

भाग ६


बराच वेळ विनायक मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. रात्र उलटून चालली होती. त्यांच्या मनोमिलनाचा मुहूर्त कधीच टळून गेला होता. हळूहळू सर्वजण आपापल्या घरी परतू लागले. इतक्यात सद्या विनायकला म्हणाला,

“इन्या, पावशेर टाकतस काय? बायलेसमोर जाऊक जोर येतलो”

नाही.. हो करता करता विनायक त्याच्या सोबत जाण्यास तयार झाला. सद्या विनायकला घेऊन दारूच्या दुकानात आला. कोपऱ्यातल्या टेबलाजवळ मांडलेल्या खुर्चीत जाऊन बसले. सद्याने दोन ग्लास भरले. विनायकची पहिलीच वेळ होती. त्याने गटकन एक घोट गटकवला. त्याला जोरात ठसका लागला. त्याचं वेडंवाकडं केलेलं तोंड पाहून सद्या हसू लागला. दोन तीन पेग पोटात गेल्यावर विनायकच्या डोळ्यावर दारूची धुंदी चढू लागली. ग्लासवर ग्लास भरले जात होते. रिकामे होत होते.

इकडे अनघा त्याची वाट पाहून कंटाळली होती. हिरवा शालू ,हिरवा चुडा, गळयात मंगळसुत्र कपाळावर चंद्रकोर.. आधीच सुंदर असलेली अनघा अजूनच छान दिसत होती. हातावरच्या मेहंदीचा हलकासा सुगंध तिचा तिलाच जाणवत होता. वय अवघे तेरा वर्षं. भातुकली खेळण्याचं वय तिचं.. पण आता जणू तिचं आयुष्यच एक भातुकलीचा खेळ झालं होतं. नवरा म्हणजे कोण? संसार म्हणजे काय? पतीपत्नी मधील नाजूक नात्यांचा बंध एवढ्याश्या लहान जीवाला कसा कळणार होता?

बरीच रात्र झाली होती. विनायक घरी आला नव्हता. अनघा त्याची वाट पहात बसलेली.. खूप उशिरा मध्यरात्री झोकांड्या घेत नशेत विनायक घरी आला. सरळ त्याच्या खोलीच्या दिशेने चालू लागला. दारासमोर येताच त्याने दार ठोठावलं. अनघा पटकन पलंगावरून खाली उतरली आणि दार उघडलं. विनायकच्या तोंडाचा दारूचा घाणेरडा दर्प तिला अत्यंत जीवघेणा वाटला. त्याला त्या अवस्थेत पाहून अनघा खूप घाबरली. विनायक आत आला. अनघाला विचित्र नजरेने न्याहाळू लागला. त्याची वखवखलेली नजर तिच्या सर्वांगावर फिरू लागली. त्याने तिला खसकन जवळ ओढलं. ती वेदनेने कळवळली. विनायकने तिच्या दंडाला धरून ओढत पंलगाजवळ आणलं आणि धाडकन तिच्या अंगावर कोसळला.

”अहो काय करताय? दूर व्हा..”

अनघाला नेमकं काय चाललंय ते समजेना. तो काय करतोय तिला कळत नव्हतं. ती पूर्ण ताकतीनिशी विनायकला दूर लोटण्याचा खूप प्रयत्न करू लागली पण त्याच्या ताकदीपुढं तिचं काहीच चालेना. अनघाच्या अशा वागण्याने विनायक अजूनच चिडला. अनघाने असा विरोध करणं त्याला त्याला अपमानास्पद वाटत होतं. त्याच्या पुरुषार्थाला आव्हान जणू. तिच्या त्याला ढकलून देण्याने त्याचा अहंकार दुखावला गेला आणि त्याने रागाने जोरात तिच्या कानाशिलात मारली.

“आईई गं! नको.. नको..”

ती कळवळली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अनघाच्या अंगावरचे कपडे ओढून फाडून विनायक तिच्यावर तुटून पडला एखाद्या जनावरासारखा.. एक श्वापद.. शरीरातला सैतान शांत होईपर्यंत तिच्या देहाशी खेळत राहिला. एक अबोध कळी अमानुषपणे कुस्करली गेली. देहाबरोबर मनावरही जखमा झाल्या होत्या. तिच्या मनातल्या नाजूक भावनांचा चक्काचूर झाला होता.

अनघा रात्रभर तशीच निपचित पडून होती आणि तो शेजारी घोरत झोपला होता एक नवरा नावाचा पुरुष.. तिच्या हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या. बांगड्यांची काच लागल्याने रक्त येत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.

“काय होतं ते? का ते असं वागले माझ्याशी?”

अनघाच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातलं होतं. आजवर मोठ्या माणसांकडून, आई, आजीकडून प्रेमळ नवऱ्याबद्दल ऐकलेल्या साऱ्या कल्पनेच्या भ्रमाचा भोपळा कधीच फुटून गेला होता. रडून रडून डोळे सुजले होते. केव्हातरी पहाटे तिला डोळा लागला. सकाळ झाली. बाहेर पाखरांच्या किलबिलाटाने अनघाला जाग आली. तिचं सगळं अंग दुखत होतं. ती तशीच धडपडत उठली. साडी नेसली. दार उघडून बाहेर जाणार इतक्यात विनायकला जाग आली. अंथरुणातून उठून बसत तो जोरात तिच्यावर खेकसला.

“ थांब.. कुठे निघालीस?”

त्याच्या आवाजाने अनघा जागीच थांबली. विनायकचं डोकं भणभणत होतं. डोक्याला हात लावत तो तिच्यावर ओरडून म्हणाला,

“खबरदार.. माझ्या दारू पिण्याबद्दल कोणाला बोललीस तर.. कोणालाच बोलायचं नाही. आप्पा माईला तर नाहीच नाही आणि जर मला समजलं की तू हे घरात सांगितलंस तर तुझी जीभ हासडून हातात देईन.. समजलीस.. जा आता खाली.. चालती हो माझ्या नजरेसमोरून.. आधीच माझं डोकं खूप भणभणतंय. त्यात तुझी कटकट नकोय मला..”

अनघाच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. तिने होकारार्थी मान डोलावली आणि धावतच माईच्या खोलीत आली. माईच्या गळ्यात पडून रडू लागली. माई घाबरल्या.

“काय झालं अनू? काय रडतेस बाय?”

“माई मला परत त्या खोलीत जायचं नाही. मी तुमच्या सोबतच राहीन पण परत जाणार नाही.”

अनघाने रडत माईला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. माईंनी तिला मनसोक्त रडू दिलं. अनघा शांत झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“बयो, नवरा असाच असतो आणि यालाच सहजीवन म्हणतात. लग्नानंतर सर्व मुलींसोबत असंच घडतं सगळं. त्यात वावगं असं काही नाही. नको काळजी करू.. हळूहळू सगळं सवयीचं होईल तुला आणि आता तुला कायम तुझ्या नवऱ्यासोबतच राहायचं आहे. तो जिथे राहील तेच तुझं ठिकाण. तिथेच तुझं अस्तित्व.. समजलं ना बयो?”

माई अनघाच्या पाठीवरून मायेने हात फिरवत तिला समजावुन सांगत होत्या.

आता रोज रात्री तेच सगळं घडतं होतं. रोज होणारा समाजमान्य अत्याचार तिच्या अंगवळणी पडू लागला. तिला ओरबाडून चोळामोळा करणं त्यालाही सवयीचं झालं होतं. त्या गोष्टीला तिचा नकार आणि त्यामूळे त्याचं तिला मारहाण करणं अगदी रोज घडू लागलं पण अनघाने खोलीच्या चार भिंतीच्या आत घडणाऱ्या गोष्टी कधी बाहेर जाऊ दिल्या नाहीत. ती सोसत राहिली पण तोंडातून एक ब्र शब्द काढला नाही. इतकं मार खाऊन, रात्रभर जागे राहून सुद्धा अनघा सकाळी लवकर उठून स्वतःचं सगळं उरकून सर्वांसाठी स्वयंपाक घरात आपल्या जावांसोबत मदतीला हजर असायची. ‘रांधा.. वाढा.. उष्टी काढा’ आता रोजचाच नित्यक्रम झाला. हळूहळू नशिबाने वाढून ठेवलेल्या परिस्थितीशी जुळूवून घ्यायला अनघा शिकली होती. सुंदर देखणी बायको त्यात वयाने लहान. विनायकच्या डोक्यात कायम संशयाचं भूत. कायम तिच्यावर पाळत ठेवून असायचा. तशी अनघा फारशी कोणाशी बोलायची नाही. पण कधी ओळखीच्या लोकांशी बोललीच तर तेही त्याला आवडायचं नाही. घरी आल्यावर तो तिला बेदम मारायचा. इतकंच काय तर तिने माहेरी गेलेलंही त्याला रुचायचं नाही. त्यावरूनही तो तिला सतत बोलायचा. टोमणे मारायचा.

वसंतराव कधीच आपल्याला मुलांना काही बोलायचे नाही उलट मुलांनी त्यांच्या बायकांशी असं वागणं त्यांना भूषणावह वाटायचं. स्त्रियांवर हुकूम चालवणारा, आपल्या पायाखाली ठेवणाराच खरा सर्वोत्तम पुरुष अशीच त्यांची धारणा होती. कधी माई काही सांगायला गेल्या तर उलट त्यांनाच दरडावून गप्प बसायला सांगायचे.

“हे बघ, आपल्या दोघांच्या संसारात माझ्या आईवडिलांनी कधी लुडबुड केली का? मला कोणी काही सांगायला आलं का? नाही नां.. मग आपण कशाला दोघां नवरा बायकोच्यामध्ये बोलायचं. त्यांचं त्यांना कळतं. लग्न झालंय लहान नाही राहिली आता ती दोघं. त्यांचं त्यांना पाहू दे.. विनायक जे वागतो ते बरोबरच आहे. त्याचं काहीच चुकत नाही.”

वसंतराव असं काहीबाही बोलून माईंचं तोंड बंद करायचे. वसंतरावांच्या अशा बोलण्याने माईंचा नाईलाज व्हायचा. गप्प बसून उघड्या डोळ्यांनी नुसतं पाहत राहण्याखेरीज त्यांच्याकडे कोणताच मार्ग नसायचा.

ऋतुचक्र आपल्या नियमाने फिरत होतं. एकीकडे अनघा हळूहळू देशमुख वाड्यात रमू लागली तर दुसरीकडे विनायकचं शिक्षण सुरू होतं. विनायकने बारावीची परीक्षा दिली पण व्यसनाच्या आधीन गेलेला विनायक बारावीला जेमतेम गुणांनी पास झाला. त्याचं लग्न होऊनही आता पाच सहा महिने उलटले होते. आता त्याला मुंबईला जाण्याचे वेध लागले होते. त्याचे काही वर्गमित्र आधीच मुंबईला गेले होते त्यामुळे त्याचीही चुळबुळ सुरू झाली होती आणि एक दिवस वेळ पाहून विनायकने मुंबईला जाण्याचा विषय काढला.

पुढे काय होतं? वसंतराव आणि माई विनायकला मुंबईला जाण्याची परवानगी देतील का? अनघाच्या आयुष्यात काय नवीन घडणार? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all