Login

पुन्हा बरसला श्रावण भाग २८

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण.. भाग २८

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराज आणि ईश्वरीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. जेवणाच्या शे पाचशे पंगती उठल्या. संपूर्ण पंचक्रोशीत असा विवाह सोहळा झाला नसेल इतका सुरेख विवाहसोहळा संपन्न झाला आता पुढे..

भाग २८

ईश्वरी आणि स्वराजचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. ईश्वरी आता ईश्वरी देशमुखांची राजनंदिनी सरदेसाई झाली. तिला सासरी पाठवण्याची वेळ झाली होती. मुलीकडची मंडळी सरदेसाई कुटुंबीयांना आदराने निरोप देत होती. आदित्य, विनायकने हात जोडून नमस्कार केला.

“काका-काकू, लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. कुठेही गालबोट लागलं नाही. तरी लग्नात घाईगडबडीत आमच्याकडून आपली व्यवस्था करण्यात काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा. ईश्वरीला नीट सांभाळून घ्या. लहान आहे, अजून तितकी संसाराची समज नाही. काकू, तुम्ही तिला समजून घ्याल प्लिज.”

आदित्य शालिनीताईंना हात जोडून म्हणाला.

“तुम्ही अजिबात काळजी करू नका. नंदिनी सरदेसाईच्या कुटुंबातली सर्वात धाकटी सून जरी असली तरीपण ती सून म्हणून नाही तर आमच्या घरी मुलगी म्हणूनच राहील. अनघाताई तुम्ही नंदिनीची अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना.. आणि उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. तुम्ही सर्वांनी यायचंय बरं का.. ”

शालिनीताईं अनघाचा हात हात घेत म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याने सर्वांनाच आधार वाटत होता. अनघाचे डोळे बरसत होते. आदित्यलाही भरून आलं होतं. अनघा, माई, अर्पिता, आस्था, अर्चना, मित्रमैत्रिणी, जमलेले पाहुणेमंडळी साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. ईश्वरी साऱ्यांच्या गळ्यात पडून रडत होती. काळजी घ्या असं सांगत होती. ती तिच्या मैत्रिणींजवळ आली तशी साऱ्याजणी तिच्या गळ्यात पडून रडू लागल्या. त्यांची जवळची मैत्रीण त्यांना सोडून दुर जाणार होती. वातावरण फारच भावुक झालं होतं. अर्चनाजवळ येताच ईश्वरीला अजूनच रडू कोसळलं.

“अरे ईशु, हा काय वेडेपणा! असं रडायचं नाही.. आणि मी तूझ्यासोबत येणार आहे. ईशु, आता तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे. स्वराजच्या रूपाने तुझ्या आयुष्यात तुझा श्रावण तुला भेटायला आलाय. त्याला जपून ठेव. आता फक्त त्याच्या प्रेमाच्या चिंब बरसातीत तुला मुक्तपणे न्हाऊन निघायचं आहे. तुझ्या श्रावणाला तुलाच जपायचं आहे. डोळे पूस बरं..”

अर्चना तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला समजावत होती. अनघा समोर येताच तिच्या आसवांचा बांध फुटून वाहू लागला. ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली.

“आई..काळजी घे स्वतःची.. तब्बेतीची हेळसांड करू नकोस.. मी नाही म्हणून रडत बसू नकोस.. माईची काळजी घे हं..”

ईश्वरी अनघाला समजावत होती. डोळ्यातलं पाणी पदराने पुसत अनघा ईश्वरीला म्हणाली,

“ईशु, बाळ आमची काळजी करू नकोस. तू सर्वांची काळजी घे सासूसासऱ्यांची सेवा कर. नवऱ्याला आनंदी ठेव आणि स्वतःचीही काळजी घे. आता तेच तुझं घर आणि तीच तुझी माणसं.. ते दुखावले जातील असं वागू नको पोरी..”

ईश्वरीने मान डोलावली. अर्पिताजवळ येताच ईश्वरी तिला नमस्कार करण्यासाठी खाली वाकली. अर्पिताने पटकन तिच्या दोन्ही खांद्याला धरून वर उचललं.

“वहिनी, आई बाबांची काळजी घे.. मी तिथे तुमच्या जवळ नसेन.. आता तूच त्यांची लेक आहेस. माईंचं पथ्यपाणी बघशील.. वहिनी दादाला नीट सांभाळ त्याची काळजी घे.. थोडा तापट आहे पण खूप प्रेमळ आहे तो. तूच समजू शकतेस त्याला. स्वतःचीही काळजी घे..”

असं म्हणून ईश्वरीने माईंना, विनायक, आदित्य अर्पिता, इतर पाहुण्यांना नमस्कार केला आणि साश्रुपूर्ण नेत्रांनी सर्वांचा निरोप घेतला. बाकीचे पाहुणेमंडळी सर्वांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतली. काही वऱ्हाडीमंडळी मागील बसने घरी येणार होती. फुलांनी सजवलेल्या आलिशान कारमध्ये स्वराज, ईश्वरी आणि करवली म्हणून आलेली अर्चना मागे बसली.त्या मागच्या सीटवर स्वराजची वहिनी आणि भाऊ बसले. पुढे स्वराजची आई, शालिनीताई बसल्या. सर्वांचा निरोप घेऊन स्वराजची कार सरदेसाईंच्या सोसायटीच्या दिशेने वेगाने निघाली. थोड्याच वेळात सर्वजण सोसायटीपासून थोड्या अंतरावर मागे उतरले. नवरा नवरी कारमधून उतरून चालू लागली. वरात निघाली. सर्व वऱ्हाडीमंडळी वरातीत नाचू लागले. मोठ्या आनंदाने वाजत गाजत जल्लोषात ईश्वरीचं नव्या घरी स्वागत होत होतं. सर्वजण घरी पोहचले. सरदेसाईचं प्रशस्त सोसायटी समोर सारेजण थांबले. काही नातेवाईक आधीच पुढे गेले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती. दारावर आंब्याच्या पानांचं, झेंडूची फुले असलेलं तोरण सजलं होतं. स्वराजच्या काकूंनी धान्याचं माप भरून दारात ठेवलं. दोघांचंही हळदीकुंकू लावून औक्षण केलं. भाकरीचा तुकडा ओवाळून दृष्ट काढली.नवऱ्या मुलीला, ईश्वरीला ओल्या कुंकवाच्या हातांचे ठसे दारावर उमटवायला सांगितलं. आणि ते ताट ईश्वरीच्या पायाशी ठेवण्यात आलं.

“राजनंदिनी, आता हे माप ओलांडून तुला सरदेसाईंच्या घरात प्रवेश करायचा आहे. आता तू या घरची सून आहेस. या कुंकवाच्या पाण्यात पाय उमटवून त्याच पावलांनी तुला देवघरापर्यंत जायचं आहे. सावकाश माप ओलांडून आत ये. चल बाळ.”

ईश्वरी म्हणजेच नंदिनी माप ओलांडून आत येणार इतक्यात स्वराजच्या चुलत बहिणींनी त्या दोघांना गरडा घातला.

“दादा वहिनी आधी नाव घ्या मगच आत प्रवेश मिळेल. नाहीतर तसंच ताटकळत बाहेर उभं राहावं लागेल.”

सर्वजण मोठ्याने हसले. वहिनींनी नंदिनीला नाव घेण्यास सांगितलं. नंदिनीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने नाव घ्यायला सुरुवात केली.

“सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात
स्वराजरावांचे नाव घेते, सरदेसाईंच्या घरात.”

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

“आता दादा तू घे”

स्वराजची चुलत बहीण म्हणाली. तो आढेवेढे घेऊ लागला. हळूच स्वराजच्या भावाने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि सर्वांच्या उपस्थितीत स्वराजने नाव घेण्यास सुरुवात केली.

“मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, राजनंदिनीसोबत बांधली मी आयुष्यभराची जीवनगाठ.”

सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. नंदिनीने सावकाश माप ओलांडलं आणि तिने आत प्रवेश केला. कुंकवाचं पाणी असलेल्या ताटात तिने तिची पाऊले बुडवली आणि ओल्या पावलांनी ती देवघरापर्यंत गेली. लक्ष्मीच्या पावलांनी नंदिनीने सरदेसाईंच्या घरात प्रवेश केला. लग्नाच्या गडबडीमुळे सारेच दमले होते. शालिनीताईंनी नंदिनी आणि अर्चनाला स्वराजच्या बेडरूममध्ये विश्राम करण्याकरीता पाठवलं. आणि सर्वजण आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. घरात पूजेची गडबड सुरू होती. नंदिनीला पहाटेच जाग आली. पहिल्यांदाच आईला सोडून राहिल्याने आणि नवीन जागा असल्याने रात्रभर तिला तशी निवांत झोप लागली नव्हती. तिला आईची आठवण झाली. मायेने केसांवरून हात फिरवत आई झोपेतून उठवायची. बेडवरच गरमागरम कॉफी हातात द्यायची. आईच्या आठवणीने ती व्याकुळ झाली. डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं. इतक्यात तिला आईचे बोल आठवले.

“भरल्या घरात डोळ्यात पाणी आणायचं नाही. अपशब्द बोलायचे नाहीत. वास्तू ‘तथास्तु’ म्हणत असते.”

तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. इतक्यात स्वराजची वहिनी चहा घेऊन आत आली.

“गुडमॉर्निंग नंदिनी, उठलीस? झोप लागली ना? हे घे चहा..”

असं म्हणत तिने चहाचा ट्रे पुढे केला.

“नाही वहिनी चहा नको, आधी फ्रेश होते. मग घेईन काहीतरी..”

नंदिनी बेडवरून खाली उतरत म्हणाली.

“बरं.. तू आवर पटकन.. परत पूजेला बसायचं तुला. उशीर होईल.”

नंदिनीने मान डोलावून हो म्हटलं. सर्वजण पूजेच्या तयारीला लागले. सत्यनारायणाची पूजा झाली. स्वराज आणि नंदिनी पूजेच्या विधीला बसले. गुरुजींनी पूजा सांगितली. देशमुखकुटुंबीय त्याचबरोबर थोड्याच पाहुणेमंडळींच्या उपस्थितीत पूजा यथासांग पार पडली. स्वराज आणि नंदिनी दोघां उभयत्यानी वडीलधाऱ्या पाहुण्यांना वाकून नमस्कार केला. जेवणाची पंगत उठली आणि सर्वजण सरदेसाईं कुटुंबियांचा निरोप आपापल्या घरी निघून गेले.

“नंदिनी, जा बाळ.. तुझ्या खोलीत जाऊन आराम कर.. दमली असशील ना?”

तिने मान डोलावली आणि अर्चना सोबत ती तिच्या म्हणजेच स्वराजच्या खोलीत आली. तिने खोलीत सर्वत्र नजर फिरवली. साऱ्या खोलीभर पसारा पडला होता. खाली कपड्यांची सुटकेस पडली होती.

“बापरे, किती पसारा! अर्चू आपण खोली आवरूया का? मला अश्या पसाऱ्यात काही सुधरत नाही बघ. तू कपड्यांच्या घड्या घालून दे.. मी कपाट लावून घेते..”

एक एक कपडे उचलत नंदिनी अर्चनाला म्हणाली. अर्चना आणि ती पसारा आवरून लागल्या. अर्चना कपड्यांच्या घड्या घालत होती. नंदिनीने स्वराजची बॅग आवरायला घेतली. तिने त्याच्या कपड्याच्या व्यवस्थित घड्या घातल्या आणि बॅगेत भरून ठेवल्या. इतक्यात तिचं लक्ष खाली पडलेल्या फाईलवर पडलं. तिने फाईल चाळायला सुरुवात केली.

“अर्चू, हे बघ काय? स्वराजची फाईल.. कसलेतरी डॉक्यूमेंट्स आहेत. बहुतेक स्वराजची सर्टिफिकेट्स.”- नंदिनी

नंदिनीने फाईल चाळायला सुरूवात केली. फाईलमध्ये त्याचे शैक्षणिक प्रगतीपुस्तकं, बोर्ड सर्टिफिकेट्स,त्याला मिळालेली प्रशस्तीपत्रे, नोकरीचे पाठवलेले अर्ज होते. ती सारं मनःपूर्वक वाचत होती आणि वाचता वाचता ती क्षणभर थबकली. त्या सर्टिफिकेटच्या कागदांसोबत तिला एक चिट्ठी मिळाली. ती जसजशी चिट्ठी वाचत होती तसंतसे तिच्या चेहराचा रंग उडू लागला. डोळ्यात पाणी दाटू लागलं.

नंदिनीला काय सापडलं? काय होतं त्या चिट्ठीत? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
0

🎭 Series Post

View all