पुन्हा बरसला श्रावण.. भाग २३

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या तिच्या एका श्रावणाची.. त्याच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..

पुन्हा बरसला श्रावण.. भाग २३


पुन्हा बरसला श्रावण..

पूर्वाध: आतापर्यंत आपण वाचलंत की, स्वराजच्या अचानक येण्याने विनायक आणि आदित्यला आश्चर्य वाटलं. स्वराजला ईश्वरीशी एकांतात काही महत्वाचं बोलायचं होतं. ही गोष्ट विनायकला रुचली नव्हती पण तरीही आदित्यच्या सांगण्यावरून नाराजीनेच तो त्यांना बोलू देण्यास तयार झाला. अचानक आलेल्या कॉलमुळे स्वराजच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत गेले. तो ईश्वरीशी काहीही न बोलता तिथून निघून गेला त्यामुळे ईश्वरी थोडी अस्वस्थ झाली. ईश्वरी लग्नासाठी तयार नसल्याने ती अनघाला हे लग्न थांबवण्याची आर्जवे करत होती आणि अनघा आपल्या लेकीला स्वराज कसा चांगला आहे हे समजावून सांगत होती. आता पुढे…

भाग -२३

ईश्वरी आपल्या आईचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होती. स्वराजविषयी आईच्या मनात असलेली खात्री तिला समाधान देत होती. ज्या आईने तिला आजवर कायम आधार दिला. तिच्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिली. कायम तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली; ती तिची आई कधीच चुकीचं सांगणार नाही. कधी तिचं वाईट चिंतणार नाही ईश्वरीला खात्री होती. तिला तिचं म्हणणं पटू लागलं होतं. अनघाने आपल्या मुलीला कुशीत घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

“बाळ, तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपण कोणाचं वाईट केलं नाही तर देव का आपल्या बरोबर वाईट वागेल? तेंव्हा निर्धास्त रहा.. शांतपणे झोप आता. मी जाते उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. उद्यासाठी भेंडी चिरून ठेवते.. तू झोप.. कसलाच विचार करू नको.”

असं म्हणून अनघा उठून उभी राहिली आणि तिथून निघणार इतक्यात ईश्वरीने तिच्या पोटाला घट्ट मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं. आई तिला प्रेमाने गोंजारत होती. नंतर अनघा तिला झोपण्यास सांगून बाहेर निघून आली.

दुसऱ्या दिवशी रविवार असूनही सर्वचजण लवकर उठले होते. नाश्ता, चहापाणी उरकून ते सरदेसाईंच्या घरी जाण्याची तयारी करू लागले. माईने आणि अनघाने मानपानाचं सर्व साहित्य घेतलं. आदित्यने पुन्हा एकदा सरदेसाईंना कॉल करून ते सर्वजण घरातून निघाल्याचं कळवलं. घरात सर्वांची लगबग दिसत होती.

“बाबा, आपण सदाकाकांना त्यांच्या घरून घेवून जाणार आहोत. काकू पण येणार आहे. मी आधीच बोलून ठेवलं होतं. सर्व गोष्टी नीट सविस्तर आणि स्पष्टपणे बोलणारी निदान एक दोन माणसं तर हवीतच नां? म्हणून त्यांनाही सोबत घेतलं. चला निघूया आपण.. नाहीतर उशीर होईल.”

भिंतीवर अडकवलेली गाडीची चावी घेत आदित्य म्हणाला. सर्वांनी माना डोलावल्या. सर्वांच्या आधी विनायक आणि आदित्य खाली पार्किंगमध्ये येऊन थांबले. बायका घरातून निघायच्या बाकी होत्या. घरातून निघताना अनघाने देवाला नमस्कार केला आणि मनोमन प्रार्थना केली.

“ईश्वरा, आजवर माझ्या नवऱ्यावर, मुलांवर, कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर तू कायम तुझी मर्जी बहाल केलीस. माझ्या आदीची मनोकामना जशी तू पूर्ण केलीस. त्याला त्याच्या मनाजोगती आयुष्याची जोडीदारीण मिळवून दिलीस तसंच माझ्या ईशुच्या आयुष्यातही स्वराजसारखा मुलगा येऊ दे. तिला कायम हसत, सुखात ठेव. तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. माझ्या लेकीचं चांगलं होऊ दे रे देवा.. ”

जाता जाता अनघाने ईश्वरीला आवाज दिला.

“ईशु, आम्ही निघतोय..कदाचित उशीर होईल. तू जेवण करून घे. हवंतर शेजारच्या विभावरीला सोबतीला बोलवून घे. छान गप्पा मारत बसा.. नाहीतर जाता जाता मीच सावंत वहिनींना विभाला पाठवून द्यायला सांगते. ईशु मी कॉल करत राहीनच तुला.. मोबाईल जवळच ठेव.. चला माई लवकर.. उगीच हे चिडतील. अर्पिता सगळं साहित्य सोबत घेतलंयस ना? पुन्हा एकदा तपासून बघ. उगीच आदी तुझ्यावर रागवायला नको..चल ईशु निघतो आम्ही.. तुझ्या लक्षात राहील नं सगळं?”

“हो आई, जा तुम्ही.. किती सूचना देशील? काही काळजी करू नकोस. मी विभाला बोलवून घेते. तुम्ही येईपर्यंत ती असेल माझ्या सोबतीला.”

ईश्वरी हसून म्हणाली. सर्वजण घरातून बाहेर पडले आणि जिना उतरून खाली आले. आदित्यने आधीच पार्किंगमधून त्याची फोरच्यूनर काढली होती. अनघा, माई, अर्पिता गाडीत जाऊन बसले. विनायक आदित्यसमवेत पुढे बसला. गाडी तिच्या वेगाने धावू लागली.विलेपार्ल्यात आल्यावर आदित्यने सदाकाका आणि काकूंना सोबत घेतलं आणि आता गाडी सरदेसाईंच्या घराच्या दिशेने धावू लागली. तासाभरात गाडी दादरला सरदेसाईंच्या सोसायटीच्या आवारात येऊन थांबली. सर्वजण गाडीतून खाली उतरले. मुंबईसारख्या शहरात मोठी श्रीमंत उच्चभ्रू सोसायटी.. बाराव्या मजल्यावर थ्री बीएचके फ्लॅट.. खाली वॉचमनने रजिस्टरवर आदित्य देशमुख असं नाव नोंदवून घेतलं आणि तिथूनच सरदेसाईंना फोन करून पाहुणे आल्याचं सांगितलं. खात्री करून घेतली आणि त्यांना आत सोडलं. लिफ्टजवळ उभे असलेल्या लिफ्टमॅनने मोठ्या अदबीने त्यांना लिफ्टमध्ये प्रवेश दिला आणि बारावं बटन दाबलं. लिफ्ट बाराव्या मजल्यावर येऊन थांबली. सर्वजण बाहेर आले समोरच सरदेसाई उभे होते. त्यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि आत घेऊन गेले.

सरदेसाईचं घर म्हणजे आलिशान महालच, स्वच्छ, टापटीप, सर्व वस्तू जागच्या जागी.. एअर कंडिशनर, महागडं फर्निचर, उंची चैनीच्या वस्तू, घरात दिमतीला नोकरचाकर.. सारंच नावीन्यपूर्ण.. एकंदरीत देशमुख कुटुंबियांना सरदेसाईंचं घर, माणसं सारं काही आवडलं होतं. त्यांचं ऐश्वर्य पाहून सारेच भारावून गेले होते. सरदेसाईंच्या पत्नीने नाश्त्याची तयारी केली होती. सर्वांचा चहापाणी, नाश्ता झाला आणि लग्नाची बोलणी सुरू झाली. सरदेसाईची जास्ती काही मागणी नव्हतीच. त्यांना ईश्वरी पसंत होती. श्रीफळ आणि मुलगी इतकीच त्यांची मागणी पण विनायकने शब्द दिला.

“सरदेसाई साहेब, तुम्हाला जरी काही नको असेल तरी आम्ही आमच्या स्वइच्छेने मुलीच्या अंगावर दागिने घालू. देशमुखांची मुलगी आहे ती. आमच्या घराण्याच्या नावाला धक्का लागेल असं काही आम्ही करणार नाही. आम्हाला, आमच्या नावाला साजेसा मानपान आम्ही करू.”

सर्वांनी आपली संमती दर्शवली. सरदेसाईंकडच्या लोकांनाही सर्व गोष्टी मान्य झाल्या. हुंडा न मागताही व्हाईट कॉलर लोकांनी वस्तूंच्या स्वरूपात हुंडा घेण्याचं किंबहुना देशमुखांनी स्वखुशीने देण्याचं मान्य केलं. सर्वजण खुश होते. स्वराजच्या आईने सर्वांना मिठाई देऊन सर्वांचं तोंड गोड केलं. शेवटी ईश्वरी आणि स्वराजचं लग्न ठरलं. साखरपुड्याची तारीख काढण्यात आली. सरदेसाईंच्या गुरुजींनी साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त काढला. आठ दिवसांनी साखरपुडा आणि त्यानंतर एक महिन्याच्या मुहूर्तावर लग्न करायचं ठरलं. सरदेसाईंनी आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. स्वराजची आई आग्रहाने वाढत होती आणि सर्वांनी यथेच्छ जेवणावर ताव मारला.

इकडे ईश्वरी घरात कुठलीशी कादंबरी वाचत बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. ईश्वरीने दार उघडलं. समोर विभावरी उभी होती.

“अरे विभा? ये ना, आत ये.. मी तुलाच बोलवायला येणार होते. बरं झालं आलीस.”

दारातच ईश्वरी म्हणाली,

“अगं हो, काकू सांगून गेल्या होत्या तू एकटी आहेस म्हणून आले सोबतीला.”

विभा आत येत हसून म्हणाली.

“माझी आई पण नां.. उगीच काळजी करत राहते. जशी काय मी कुकूलं बाळ आहे.. बरं ते जाऊदे.. चल, आपण माझ्या खोलीत गप्पा मारत बसू..”.. ईश्वरी

“हो चालेल.. ”

विभा ईश्वरीसोबत तिच्या खोलीत आली. विभा वयाने ईश्वरीच्या बरोबरीची. दोघीही फायनलच्या शेवटच्या वर्षाला. फक्त शाखा वेगळी.. ईश्वरी कॉमर्स तर विभा कला शाखेत.. विभा अतिशय बोलघेवडी, मनमोकळ्या स्वभावाची. स्पष्ट बोलणारी, सर्वांशी हसून खेळून वागणारी.. तिच्या घरातलं वातावरण सुद्धा तिच्या सारखंच प्रसन्न, मोकळं. विभाच्या मोकळ्या बेधडक स्वभावामुळे विनायकला तिचं ईश्वरी सोबत असणं रुचायचं नाही. तो ईश्वरीला तिच्याशी फारसं बोलू द्यायचा नाही. मुलांशी बोलणाऱ्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या, फिरणाऱ्या मुली त्याला वाईट चालीच्या वाटायच्या आणि विभाचं मुलांसोबत उठणं,बसणं फिरणं असायचं. तिचे मित्र तिच्या घरी यायचे. गॅलरीत त्यांची चेष्टा मस्करी पाहून त्याला प्रचंड राग यायचा. स्त्री पुरुष हा भेद कायम डोकं वर काढून असायचा. मुलींनी त्यांच्या मर्यादेत असावं असं त्याला नेहमी वाटायचं. म्हणूनच ईश्वरी कधीही मुलांशी जास्त बोलायची नाही. कॉलेजचे मित्र घरापर्यंत कधी आलेच नाहीत. तो शक्य तितकं ईश्वरीला विभापासून दूर ठेवत होता पण ईश्वरीला ती आवडायची. तिच्या मोकळ्या स्वभावाचं, स्वछंदी जगण्याचं कौतुकही वाटायचं.

विभा आणि ईश्वरीच्या गप्पा छान रंगत चालल्या होत्या. परीक्षा, कॉलेज, करियर, नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संध्या, चित्रपट, नायक-नायिकांवर गोसीपिंग सारं काही बोलून झालं आणि मधेच विभाने विषय काढला.

“काय गं ईशु? तुला पहायला पाहुणे येऊन गेले कां? माझ्या कानावर पडलं म्हणून विचारलं.

ईश्वरीने होकारार्थी मान डोलावली. चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. विभा म्हणाली,

“ईशु, एक विचारू?

“बोल नां विभा..”

ईश्वरी तिच्याकडे पाहत म्हणाली.

“म्हणजे सॉरी हं.. मी तुला पर्सनल प्रश्न विचारतेय. पण मला जाणून घ्यायचंय की तुला विश्वास आहे या अरेंज मॅरेज या संकल्पनेवर?”.. विभा

“का नाही? का असू नये? विभा, मुळात माझा माझ्या आईवडिलांवर प्रचंड विश्वास आहे. ते माझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेतील.”... ईश्वरी

“नाही.. ते बरोबरच आहे तुझं पण एका अनोळखी व्यक्तीला एका भेटीत कसं पसंत करायचं? तो चांगला, वाईट कसं ठरवायचं? त्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार म्हणून कसं निवडायचं?”

विभाच्या प्रश्नांनी ईश्वरी विचारत पडली. विभाचे प्रश्न अगदी योग्यच होते. ईश्वरीने थोडा विचार करून उत्तर दिलं.

“विभा, खरं सांगू? कॉलेजला जाणाऱ्या सर्व सामान्य मुलींसारखं मलाही वाटायचं कुणाला तरी आपण आवडावं.. कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं. त्या उमलत्या वयात ज्या भावना निर्माण होतात त्या माझ्याही मनात यायच्या. मान्य करते आणि मला वाटतं ते चुकीचंही नसावं. पण विभा, आई वडिलांचं काय? त्यांनी माझ्यावर वीस वर्षे केलेल्या प्रेमाचं काय? ज्या आईने माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेत. माझ्या शिक्षणासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली; त्या आईला मी नाही दुखवू शकत. माझ्या घरच्यांनी माझ्या भल्याचा विचार करूनच निर्णय घेतला असेल. मी जरी एकदाच त्याला पाहिलं असेल पण दादा, बाबा त्याला चांगलं ओळखतात. मग झालं तर.. माझ्या ओळखण्याचा प्रश्न येतोच कुठे?

ईश्वरी हसून म्हणाली.

“पण ईशु, ज्या मुलाचं आपल्यावर प्रेमच नाही अश्या मुलासोबत संपूर्ण आयुष्य काढायचं? कसं शक्य आहे हे?”

विभाने प्रश्न केला.

“का नाही? विभा, खरंतर नात्यांची मज्जा हळुवारपणे उलगडण्यातच असते गं.. आधीच सगळं माहिती असण्यात काय गंमत आहे सांग बरं? आणि प्रेमाचं म्हणशील तर इथे माझ्या आईची फिलोसोफी कामी येते. ती म्हणते, सहवासाने प्रेम वाढतं.. जोपासतं.. सो हळूहळू प्रेम होत जाईल.”

ईश्वरीच्या बोलण्याने विभा निरुत्तर झाली.

“पण ईशु..”

विभा काहीतरी बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आले वाटतं सगळे..”

असं म्हणत ईश्वरीने दार उघडलं. माई आणि आई आत आल्या. मागून आदित्य अर्पिता आणि विनायक घरात आले. विभाला घरात पाहताच विनायकच्या कपाळावर आटी पडली.

“ही कशाला इथे थांबलीय?”

जणू असा प्रश्नच त्याच्या मनात आला. ही गोष्ट विभाच्या लक्षात आली. अनघाकडे पाहून विभा म्हणाली,

“चला काकू, तुम्ही आलात.. आता मी निघते.. उगीच कोणाचा तरी पारा नको चढायला..”

विभा विनायककडे पाहून मिश्किलपणे म्हणाली आणि वाऱ्याच्या वेगाने निघून गेली सुद्धा..

पुढे काय होतं? ईश्वरी आणि स्वराजचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all