पुन्हा बरसला श्रावण.. भाग २०

ही कथा आहे एका ईश्वरीची.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका मुलीची.. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेल्या एका विरांगणेची.. ही कथा आहे पुन्हा बरसणाऱ्या तिच्या एका श्रावणाची.. त्याच्या ओढीने तळमळणाऱ्या एका विरहिणीची..

पुन्हा बरसला श्रावण..

पूर्वाध: आतापर्यंत आपण पाहिलंत की, ईश्वरी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी.. समाजाच्या आणि परिस्थितीच्या मानसिकतेला बळी पडलेल्या एका ईश्वरीची कहाणी. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाला दिलं गेलेलं अवास्तव महत्व आणि परकं धन म्हणून झटकलेलं स्त्रीत्व. वंशाचा दिवा म्हणून पुरुषाने ढाल बनून पुढे येत असताना आलेल्या संकटाला तेजस्वी तलवार बनून प्रतिकार करणाऱ्या तरीही कायम पडद्याआड राहिलेली एक विरांगणा.. संस्काराच्या नावाखाली चुकीच्या जुन्या चालीरिती, परंपरा यांना चिटकून बसलेले देशमुख कुटुंबीय.. आणि तो वारसा पुढे चालवणारा वंशाचा दिवा, आदित्य घराण्याच्या इभ्रतीच्या नावाखाली आपल्या बहिणीवर कायम दबाव टाकत राहिला. सुरक्षिततेच्या सबबीखाली ईश्वरीच्या विचारांना दाबून टाकत राहिला आणि ईश्वरी ते निमूटपणे सहन करत राहिली. शिकण्याची इच्छा असतानाही निव्वळ आई वडिलांच्या, मोठ्या भावाच्या सांगण्यावरून ईश्वरी पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली. मुलाकडच्या लोकांची पसंती आल्यावर ईश्वरीच्या घरचे लग्नाच्या पुढच्या तयारीला लागले. कॉलेज कँटीनमध्ये मित्रामैत्रिणींच्या सोबत असताना अर्चनाच्या तोंडून ‘पार्टी’ हा शब्द ऐकताच ईश्वरीच्या डोळ्यासमोर विस्मृतीत गेलेल्या भूतकाळातल्या कटू आठवणी जाग्या झाल्या. आता पुढे..


भाग २०

“अगं कुठे हरवलीस ईशु?”

अर्चनाच्या हलवण्याने ईश्वरीची तंद्री भंग पावली. गतकाळातल्या आठवणींनी तिला स्वतःचाच विसर पडला होता. ईश्वरी भानावर आली तशी भांबावून अर्चूकडे पाहू लागली.

“अं.. काय झालं? तू मला काही म्हणालीस का?”

“आम्ही कधी पासून बडबडतोय. लक्ष कुठेय तुझं? का आतापासूनच.. उनके खयालोमें..”

अर्चू तिला चिडवत मिश्किलपणे हसत म्हणाली.

“गप्प बस हं अर्चू.. तुझं आपलं काहीतरीच.. शांत बस नाहीतर फटके देईन.” - ईश्वरी

“असं कसं? आपल्या मित्रांना कळायला नको? ये बहोत नाइंसाफी है.. मी सांगणारच..”

ईश्वरीच्या दटावण्याला न जुमानता अर्चना सर्वांना बातमी देण्यास पुढे सरसावली.

“तर फ्रेंड्स, बातमी ही आहे की, आपली जिवलग मैत्रीण ईशु लवकरच बोहल्यावर चढणार आहे.”

“म्हणजे?”

दिपकच्या प्रश्नासरशी सर्वांनी आश्चर्याने अर्चनाकडे पाहिलं.

“अरे, आपली लाडकी मैत्रीण आता ईश्वरी देशमुख न राहता लवकरच मिसेस ईश्वरी स्वराज सरदेसाई होणार आहे बरं..”

“म्हणजे? आपली ईशु.. लग्न ठरलंय? काय सांगतेस! हे कधी घडलं? नीट सांग नां यार.. ”

राज उतावीळ होत म्हणाला तशी अर्चना पुढे बोलू लागली.

“हो.. हो.. थांब जरा.. किती घाई.. सगळं सांगते. अरे, आपल्या ईशुचं लग्न ठरलंय. गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. मी होते ना तिथेच. काय सांगू तुम्हाला! मुलाकडच्या लोकांनी पाहताक्षणी ईशुला पसंत केलं आणि तिला लग्नासाठी मागणीही घातली. आहे की नाही आनंदाची बातमी!”

एका दमात अर्चना सांगून मोकळी झाली. तिचं बोलणं ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंद उमटला.

“व्वा गं ईशु तू तर छुपेरुस्तम निघालीस.. लग्नसुद्धा ठरवलंस आणि कोणाला कानोकान खबर सुद्धा नाही.. खूप अभिनंदन डिअर..”

आनंदाने तिला कडकडून मिठी मारत आस्था म्हणाली. सर्वजण तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करू लागले. एकदम मित्रमैत्रिणींनी तिच्याभोवती घातलेला घेराव पाहून ईश्वरी भांबावली.

“अरे यार, थांबा.. हिचं काय ऐकता? अर्चू माहित आहे नां तुम्हाला.. संयम नाहीच.. अजून कशात काही नाही तरी हिचा गोंधळ सुरू झालाय..”

लटक्या रागानं अर्चूकडे पाहत ईश्वरी म्हणाली.

“अरे म्हणजे काय! मुलाच्या घरच्यांनी तुला पसंत केलंय. काका काकू दादा वहिनी सुद्धा किती खुश होते. आणि तुलाही तो आवडला आहेच ना? मला तर तो खूप आवडला. इतका हँडसम आहे ना स्वराज काय सांगू! मी तर त्याच्याकडे पाहतच राहिले.”

अर्चना स्वराजच कौतुक करण्यात गुंग झाली आणि ईश्वरीच्या अंगावरून आनंदाची हलकीच लहर सळसळून गेली. अर्चना निरंतर बडबडत होती. तिला थांबवत ईश्वरी म्हणाली.

“ पुरे.. पुरे.. बस झालं त्याचं कौतुक.. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरू दे मग पार्टीचं बघू. चला आत निघूया आपण. घरी जायला उशीर होईल. भेटू उद्या..बाय..”

सर्वांनी माना डोलावल्या. ईश्वरी आपली पर्स उचलून निघणार इतक्यात श्लोक हात पुढे करत म्हणाला,

“काँग्रट्स ईशु, मस्त बातमी..”

ईश्वरीने श्लोककडे स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्यासमोर धरलेला हात हातात घेत त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेऊन ती आणि अर्चना तिथून निघाल्या. बाकीचेही एकमेकांना उद्या भेटण्याचे आश्वासन देऊन आपापल्या घरी परतत होते. श्लोक मात्र तिथेच बसून ईशुच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.

“श्लोक.. ए श्लोक.. यायचं नाहीये का?”

आराध्याच्या आवाजाने श्लोक भानावर आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळयांत दाटून आलेलं पाणी तिच्यापासून लपलं नाही. घाईने बॅग उचलून उभं राहत तो म्हणाला,

“हो.. हो.. चल निघूया.. ”

त्याचा हात पकडून खाली बसवत आराध्या म्हणाली,

“थांब श्लोक, काय झालं? डोळ्यात पाणी का?”

“नाही.. नाही.. कुठे काय? वेडी आहेस का?”

त्याने तिच्याकडे पाहणं टाळलं.

“श्लोक, आपण शाळेपासून एकत्र आहोत. तेंव्हा पासूनची आपली मैत्री.. मी तुला ओळखत नाही का? काय झालं सांग?” - आराध्या

“अरू, ईशुचं लग्न ठरतंय. लवकरच ती लग्न करून तिच्या घरी, सासरी जाईल. तिच्या सुखी संसारात रममाण होईल. आनंदाची गोष्ट आहे ही.. पण ती सोडून जाईल याचं वाईट वाटतंय. इतकी वर्षे एकत्र होतो आपण आणि आता..” - श्लोक

“खरंय तुझं.. आपली जिवाभावाची मैत्रीण सोडून जाणार म्हटलं की वाईट वाटणारच पण श्लोक, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ येतेच. मुलीला कधी ना कधी आपल्या आई-वडिलांना, सगे सोयऱ्यांना, मित्रमैत्रिणींना सोडून सासरी जावंच लागतं. जनरीत आहे बाबा ही.. करावं तर लागेलच ना.. पण श्लोक ईशु जरा लवकर चाललीय नाही का? फारच घाई होतेय असं नाही वाटत तुला?”- आराध्या

“हो गं फारच लवकर होतंय.. अजून शिक्षणही पूर्ण झालं नाही आणि तिचं लग्न ठरलं. तुला आठवतं अरू? ती नेहमी म्हणायची, खूप शिकायचं आहे. सी एस बनायचं आहे. माझं स्वप्न आहे ते पण हे सगळं असं अचानक..” - श्लोक

“श्लोक, तिच्या घरचे कसे आहेत, किती जुन्या विचारांचे आहेत हे आपल्याला माहित नाही का? एका अर्थी बरंच झालं. तिची सुटका तरी होईल एका नरकवासातून.. कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं. तिचे बाबा, तिचा दादा शिकले सवरलेले असूनही असे कसे? तिचं काहीच कसं चालत नाही घरात? ती इतकी भित्री का?” - आराध्या

“नाही हं अरू.. ईशु भित्री नाही. तुला आठवतं ना.. कॉलेजच्या आवारात सर्वांसमोर तिने जावेदच्या कानाखाली लगावून दिली होती. तिचा तो रुद्र अवतार आठवतोय ना.. रणचंडीकाच संचारली होती तिच्यात..” - श्लोक

आराध्याला तो प्रसंग आठवला. कॉलेजमध्ये ईश्वरीच्या सौन्दर्याने भाळलेल्या कॉलेज मजनूची कमी नव्हती. जावेदही त्यातलाच एक. जावेद गेली दोन वर्षापासून तिच्या मागे लागला होता. तसं ‘आदित्य देशमुख’ याची बहीण म्हणून बरेचजण ईश्वरीला ओळखत होते. आदित्यला कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरीही त्याचा वचक कायम होता. कॉलेजमध्ये सगळेच त्याला वचकून होते. त्यामुळे फारसं कोणी ईश्वरीच्या वाटेला जात नव्हतं पण जावेदच्या डोक्यावर प्रेमाचं भूत चढलं होतं. तिच्या मैत्रिणीकरवी त्याने तिला प्रपोज करण्याचा प्रयत्नही केला होता. वर्गात तिच्यावर कमेंट करणं, ती आल्यावर मोठमोठ्यानं सिनेमांतली गाणी म्हणून तिला चिडवणं, तिची छेड काढणं रोजचं झालं. ईश्वरीचं त्याच्या यां फालतू वागण्याकडे मुळीच लक्ष दिलं नव्हतं. कॉलेजमध्ये आपण शिकायला येतो मौजमजा करण्यासाठी नव्हे. असं तिचं ठाम मत होतं त्यामुळे तिने तिचा फोकस कधीच ढळू दिला नव्हता. म्हणूनच तिने जावेदच्या आजवरच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण एक दिवस जावेदने कहरच केला. लेक्चर्स संपल्यानंतर सर्व मुलेमुली वर्गाच्या बाहेर पडत होती. अर्चना आणि ईश्वरी बाहेर पडल्या. कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडणार इतक्यात बाहेर आपल्या मित्रांसोबत तिची वाट पाहत उभा असलेल्या जावेदने तिला अडवलं.

“ईश्वरी रुको.. मुझे तुमसे बात करनी है..”

“मला वेळ नाहीये. तुझ्या सोबत गप्पा मारायला.. बाजूला हो.. जाऊ दे मला.”

ईश्वरीने त्याला ठणकावलं पण जावेद मागे हटला नाही. तिचा हात पकडून अडवत म्हणाला,

“ईश्वरी, मै तुमसे बहुत प्यार.. ”

त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच एक जोरदार चपराक त्याच्या गालावर येऊन बसली. भरदिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकून गेले. त्याने आजूबाजूला पाहिलं. कॉलेजची इतर मुलं तिथे जमा होऊ लागली. त्यांच्याकडे पाहत होती. ईश्वरीच्या डोळ्यात अंगार बरसत होता. तिने रागाने जावेदचा हात झटकला आणि त्याची कॉलर पकडून त्याच्यावर जोरात खेकसली.

“परत जर माझ्या वाट्याला गेलास तर याद राख.. सारी मजुनूगिरी बाहेर काढीन.. प्रिन्सिपॉलकडे कंप्लेंट करेन.. पोलिसांना बोलवेन. तुला काय वाटलं तुझ्या या वागण्याला मी बळी पडेन. तुला घाबरून जाईन. मूर्ख आहेस.. देशमूख आहे मी.. इतर मुलींसारखी लेचीपीची समजू नकोस मला.. हलक्यात तर आजिबात घेऊ नकोस.. तुझ्यासारख्यांना कसं सरळ करायचं मला चांगलंच माहित आहे. पुन्हा जर असं वागलास तर तुझा दुसरा गालही रंगवायला कमी करणार नाही.. समजलं..”

जावेद गाल चोळत आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. नेहमी नाकासमोर चालणाऱ्या, सरळ साधी शांत दिसणाऱ्या ईश्वरीचं हे नवीन रौद्र रूप पाहून तो अचंबित झाला होता. काय करावं त्याचं त्याला समजत नव्हतं. तो तसाच स्तंभीत होऊन तिच्यासमोर मान खाली घालून उभा होता. ती त्वेषाने बोलत होती. इतक्यात श्लोक, राज, आराध्या आणि ईश्वरीचे बाकीचे मित्रमैत्रिणी तिथे आले.

“ईशु काय झालं? इतकी का चिडलीयेस? याने काही..? काय झालंय सांग.”

श्लोकने ईश्वरीवर प्रश्नांचा भडीमार करत जावेदकडे रागाने पाहिलं.

“नक्कीच याने काहीतरी केलं असेल.. तुझ्यातर आता..”

श्लोक रागाने जावेदच्या अंगावर धावून गेला. जावेद मागे सरकला. राज आणि दीपक त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण श्लोक भयंकर चिडला होता.

“श्लोक थांब.. तू मधे पडू नकोस.. याच्यासारख्या मजूनला वठणीवर आणायला मी एकटी समर्थ आहे. मी त्याला चांगलीच समज दिलीय. आता नाही परत तो माझ्या वाट्याला जाणार आणि गेलाच तर त्याला माहित आहे मी काय करेन..चल जाऊया इथून..”

ईश्वरीने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि अर्चनाचा हात धरून तिथून निघून गेली. बाकीचेही आजूबाजूला पांगले गेले. नंतर काही वेळाने अर्चनाने सारा वृत्तांत त्यांना सांगितला. ईश्वरीच्या धाडसाचं सर्वांनाच आश्चर्य आणि कौतुक वाटलं होतं. कोणाशी फारसं न बोलणारी अबोल ईश्वरी प्रसंगी दुर्गारूप घेऊ शकते. याची खात्री पटली. श्लोकने त्या प्रसंगाची आठवण काढताच आराध्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. आणि अनेक प्रश्नही उभे राहिले. ओठांवर आलेलं हसू आवरत ती म्हणाली,

“हो रे, किती चिडली होती ना ती? जावेदला गिळू की खाऊ असं तिला वाटत होतं तिला. तिचा रौद्र रूप पाहून मी खूप घाबरले होते. अरे, पण मग ती अशी का वागते? कधी डॅशिंग तर कधी भित्री भागुबाई..घरच्यांचा विषय आला तर का ती शरणागती पत्करते?”

“याचं कारण एकच तिचं घरचं वातावरण? परिस्थिती माणसाला घडवत जाते. ईश्वरी ज्या वातावरणात वाढली आहे ना त्या वातावरणाचा परिणाम तिच्या मनावर झालाय. म्हणून ती आपल्याला थोडी बुजलेली वाटते पण मुळात ती तशी नाहीये. तिच्या या अबोल स्वभावामुळे मला तर कधी कधी फार विद्रोही, बंड करणारी वाटते.”

श्लोकच्या या वाक्यावर आराध्या खळखळून हसली.
.
“अरू, तुला आठवतंय? आपल्या दुसऱ्या वर्षीच्या फायनल जवळ आले होते. परीक्षेची फी भरायची होती आणि माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तेंव्हा ईशुने मदत केली होती. क्षणाचाही विचार न करता तिने सोनाराकडे जाऊन स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन गहाण ठेवून मला फीचे पैसे दिले होते.. आठवतंय? अशी आपली मैत्रीण.. प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारी, काळजी घेणारी..”

श्लोक बोलता बोलता थांबला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेने पाणी दाटून आलं.

“हो रे, आठवतंय सगळं.. ईशु खरंच खूप गुणी मुलगी.. बाप्पा तिला कायम सुखी ठेवो. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.”

त्या आठवणीने आराध्यालाही भरून आलं. दोघेही जुन्या आठवणीत रंगून गेले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all