पुन्हा बरसला श्रावण.. भाग १७

ही कथा एका ईश्वरीची.. तिच्या संघर्षाची


पुन्हा बरसला श्रावण..

भाग १७

“आज ईशु आपल्याला पार्टी देणार आहे.” अर्चूच्या वाक्यासरशी ईश्वरीला दरदरून घाम सुटला. ‘पार्टी’ हा शब्द ऐकताच तिच्या डोळ्यांत भीती दाटून आली आणि त्या भयानक काळ्या दिवसाची आठवण झाली. तिच्या आयुष्यातला तो अतिशय वाईट दिवस.. दुसऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा त्या दिवशी संपली. शेवटचा पेपर देऊन सगळे वर्गाच्या बाहेर आले. इतक्यात राज म्हणाला,

“फ्रेंड्सलोक, परीक्षा झाल्या. आता सुट्टया सुरू होतील. किमान दोन महिने तरी आपण एकमेकांना भेटणार नाहीत. मी काय म्हणतो, आपण एक छोटीशी पार्टी करूया का? इथेच शेजारच्या कॅफेमध्ये.. खाऊ पिऊ मस्त आणि जाऊ घरी. तेवढ्याच आठवणी.. काय म्हणता?”

राजच्या बोलण्याला सर्वांनीच संमती दर्शवली. ईश्वरीने मात्र नकार दिला.

“सॉरी यार.. मला नाही जमणार. तुला माहित आहे ना.. आमच्या घरी असलं काही चालत नाही. उगीच दादा रागवेल. चला मी निघते.”

असं म्हणून ती निघणार इतक्यात तिला अडवत आस्था म्हणाली,

“अगं, असं काय करते गं ईशु? परत आपण दोन महिन्यांनी भेटणार.. चल ना प्लिज.. आम्ही सगळे आणि तू नसणार हे बरं दिसतं का?”

“नको गं.. घरी काय सांगणार? दहा पंधरा मिनिटं जरी उशीर झाला तरी आई काळजी करत बसते. माई दाराकडे डोळे लावून बसलेली असते. तुम्हां सर्वांना माहीतेय माझ्या घरची परिस्थिती तरीही तुम्ही.. नको मला तुम्ही जा.. मस्त एन्जॉय करा..”

ईश्वरी घरी जायला निघाली. इतक्यात श्लोक म्हणाला,

“घरी काय सांगायचं म्हणजे? सांग ना की, मी निघालेच होते पण ट्रेन लेट होत्या. येता येता उशीर झाला. त्यात काय एवढं..”

“नाही.. नाही.. घरच्यांशी खोटं बोलणं मला नाही जमणार.. सॉरी..”

ईश्वरीने उत्तर दिलं.

“चल ना ईशु.. एवढं सगळेजण म्हणताहेत तर.. आजचा एक दिवस फक्त. मित्रांसाठी इतकंही नाही करू शकणार का? आणि कुठे इथे वस्ती करायची आहे? तासाभराचा तर प्रश्न आहे..”

आराध्या ईश्वरीला विनंती करत म्हणाली. सर्वांनीच त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. सर्वजण तिच्याकडे आशाळभूत नजरेने पाहू लागले. आता मात्र तिला त्यांचं मन मोडवेना आणि ती कशीबशी पार्टीला यायला तयार झाली. सर्वजण शेजारच्याच कॅफेमध्ये गेले. सर्वांनी आपापल्या ऑर्डर्स दिल्या. ईश्वरीनेही एक व्हेज सँडविच आणि कॉफी सांगितली. ऑर्डर्स येईपर्यंत गप्पा रंगल्या. पेपर्स कसे गेले? कोणी काय सोडवलं? किती प्रश्न ऑप्शनला टाकले? किती मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवली? यावर चर्चा सुरू झाली. सर्वजण गप्पात दंग होते. ईश्वरी मात्र सारखी हातातल्या घड्याळाकडे पाहत होती. जसजशी वेळ पुढे सरकू लागली तशी तिची चुळबुळ सुरू झाली. चेहऱ्यावर भीती, चिंता दाटू लागली. इतक्यात वेटर ऑर्डर टेबलवर सर्व करून गेला. सर्वजण मस्त एन्जॉय करत खात होते कोणी आपापल्या मोबाईल मध्ये फोटो काढत होते. आराध्यानेही सर्वांचा ग्रुप फोटो काढला. पार्टी करतानाचे सगळे छान छान फोटो काढले आणि पटकन नेहमीच्या सवयीप्रमाणे ‘पार्टी विथ बेस्टीज’ असा हॅशटॅग टाकून फेसबुकवर अपलोड केले. सर्वजण आनंदात होते. हसत होते. इतक्यात ईश्वरीच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने पटकन पर्समधून मोबाईल बाहेर काढला. डिस्प्लेवर ‘दादा’ हे नाव आलं. नाव वाचून ती प्रचंड घाबरली होती. सारेजण शांत झाले. अर्चूने तिला कॉल घ्यायला सांगितलं. ईश्वरीने कॉल रिसिव्ह केला.

“हॅलो दादा.. ”

“कुठे आहेस ईशु?”

आदित्यने प्रश्न केला.

“हे काय निघालेच दादा.. आताच पेपर संपला आणि..”

ईश्वरीने चाचपडत उत्तर दिलं.

“आता कुठे आहेस?”

आदित्यने दरडावून विचारलं.

“मी.. मी.. दादा.. ऑन द वे आहे.. घाटकोपर रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर..”

भीतीने ईश्वरीच्या तोंडून निघून गेलं.

“ठीक आहे.. घरी आल्यावर बोलू..”

असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. ईश्वरी प्रचंड घाबरली होती. कसलाही विचार न करता ती तडक तिथून निघाली. तिने धावतच रस्ता क्रॉस केला आणि घाटकोपर रेल्वेस्टेशनच्या दिशेने झपाझप पावलं टाकत वाऱ्याच्या वेगाने निघाली. पटकन मिळेल ती ट्रेन पकडून ती घरी पोहचली. दारावरची बेल वाजवली. तिच्या आईने दार उघडलं.

“काय झालं ईशु? आज उशीर झाला तुला घरी यायला? पेपर कसा होता? छानच ना?”

आईने दारातच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

“अगं हो.. मला आत तर येऊ दे.. अगं त्याचं काय झालं…”

पुढचे सारे शब्द तोंडातच विरून गेले. समोर सोफ्यावर आदित्य वर्तमानपत्र वाचत बसला होता. आदित्य तिच्या आधीच घरी आला होता. आदित्यला समोर पाहून तिची भीतीने पाचावर धारण बसली होती. तरीही मनातली भीती लपवत चेहऱ्यावर शांत भाव आणत ती आश्चर्य व्यक्त करत म्हणाली,

“अरे दादा. आज लवकर कसा काय? ऑफिसमध्ये काम नव्हतं का जास्त?”

आदित्यने तिच्याकडे कटाक्ष टाकला तशी तिने नजर चोरत दुसरीकडे पाहिलं. आदित्य ईश्वरीच्या बाबतीत खूपच संवेदनशील होता. ईश्वरीच्या जन्मानंतर आपसूकच लहान वयातच आदित्यला समज आली होती. आपल्या धाकट्या बहिणीची काळजी घेणं, तिचं संरक्षण करणं हे त्याचं ध्येय बनलं होतं. पण त्याहीपेक्षा ती आपल्या घराण्याची इभ्रत आहे आणि इभ्रतीला कोणीही चुकूनही धक्का लावता कामा नये इतकंच त्याला ठाऊक होतं.

“ईशु, तू कुठे होतीस?”

जागेवरून उठून उभं राहत त्याने तिला विचारलं.

“अरे तुला सांगितलं नां.. मी घाटकोपर रेल्वेस्टेशनवर होते.. घरी येण्यासाठी निघालेच होते. मी..”

ईश्वरीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आदित्यने तिच्या कानाखाली जोरात लगावली. ईश्वरी कोलमडून खाली कोसळली. अचानक झालेल्या त्या आघाताने ती थरथरू लागली. गालावर हात चोळत तिने दादाकडे पाहिलं. तो रागाने फणफणत होता.

“आदी.. अरे काय झालं काय? तुला काही कळतं का? वयात आलेल्या बहिणीवर हात उचलतोस.. काहीच कसं वाटत नाही तुला? आवर स्वतःला.. असा काय गुन्हा केलाय तिने की तू तिच्यावर हात उचलतोयस?”

अनघा ईशुला जवळ घेत रागात आदित्यला म्हणाली.

“आई.. विचार तुझ्या लाडक्या लेकीला.. कॉलेजच्या नावाखाली कुठे कुठे गुण उधळत होती? आणि चक्क खोटं बोलतेय.. लाज वाटते का बघ तिला.. देशमुखांच्या नावाला काळिमा फासायला निघालीय.

आदित्य खूपच संतापलेल्या स्वरात बोलत होता.

“दादा, मी काहीही चुकीचं वागले नाही की ज्यामुळे देशमुखांच्या नावाला कलंक लागेल. घरीच येत होते पण सर्वांनी आग्रह केला म्हणून थांबले. कधीतरी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवला तर काय चूक झाली?”

ईश्वरी निग्रहाने म्हणाली.

“खोटं बोललीस माझ्याशी.. किती विश्वासाने मी तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला. बाबांचा, आजोबांचा विरोध असतानाही मी तुझ्यासोबत होतो. पण तू काय केलंस? माझ्याशीच खोटं बोललीस? माझाच विश्वासघात केलास? हिला वाटलं कोणाला काही कळणार नाही पण हिला कुठे माहित आराध्या आणि मी फेसबुकवर एकमेकांचे फ्रेंड्स आहोत. तिने पोस्ट केलेलं दुसऱ्या क्षणाला मला दिसतं. ही त्या लोफर मुलांसोबत पार्ट्या झोडत होती. तिथलेच पार्टीचे फोटो आराध्याने फेसबुकवर टाकले आणि हिचे गुण मला दिसले. कोणास ठाऊक अजून काय गुण उधळत फिरत असेल आणि घरात कोणाला खबर पण नाहीये.”

आता तिला सर्व गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. आदित्यला मधेच थांबवत ईश्वरीही चढ्या आवाजात म्हणाली,

“हो बोलले खोटं.. तुझ्याचमुळे.. तुझ्या भीतीमुळे.. कधीच मला मनमोकळेपणाने वागू दिलं नाहीस.. कायम बंधनं.. याआधी बाबांनी तुसडेपणाने वागवलं आणि आता तू बाबांसारखा वागायला लागलायस. कंटाळा आलाय मला अशा जगण्याचा.. मी करणार.. मला हवं तेच करणार.. माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगणार..”

ईश्वरीचं बोलणं आदित्यच्या जिव्हारी लागलं. तो खूप संतापला.

“ईशू, काय म्हणालीस? तुझी हिंमत कशी झाली तोंड वर करून बोलायची? बरंच तोंड आलंय वाटतं तुला.. थांब बघतोच तुझ्याकडे.. चुरूचुरू चालणारी जीभच हासडून टाकतो.”

ईश्वरीच्या उद्धट बोलण्याने तो चवताळला होता. तिच्या हाताला पकडून ओढतच तिला तिच्या खोलीत घेऊन आला. अनघा मागे धावत होती.

“आदी.. काय करतोयस? सोड तिला..”

अनघा जीवाच्या आकांताने त्याला ओरडत होती पण तो कोणाचंच ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता. खोलीत येताच त्याने ईश्वरीला आत ढकलून दार लावून घेतलं. कमरेचा पट्टा काढला आणि अंगावर आसूड ओढावेत तसं तो तिला मारत सुटला. ईश्वरीच्या मुखातून एकही किंकाळी आली नाही. ती निमूटपणे त्याचा मार खात होती. बेल्टचं हुक तिच्या पाठीला जोरात लागलं. जखमेतून रक्त वाहू लागलं. तो मारत राहिला. अगदी ईश्वरी बेशुद्ध पडेपर्यंत त्याचा हात चालूच राहिला. ईश्वरीची शुद्ध हरपू लागली.

“याद राख पुन्हा अशी काही थेरं केलीस तर? हात पाय मोडून गळ्यात अडकवीन. तुला काय वाटलं तुझे लाड पुरवतोय म्हणजे तू कशीही वागशील? लक्षात ठेव.. देशमुखांच्या इभ्रतीपेक्षा काहीच, कोणीच मोठं नाही. तूही नाहीस.. इज्जतीसाठी तुझा जीव गेला तरी बेहत्तर.. ”

त्याने दरवाजा उघडला आणि तो पाय आपटत घराच्या बाहेर निघून गेला. अनघा दारातच थांबली होती. दार उघडताच अनघा धावतच आत आली.

“ईशु..”

ईश्वरीला पोटाशी गच्च धरून रडू लागली. ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या बाटलीतलं पाणी तिच्या तोंडावर मारलं. ईश्वरी शुद्धीवर आली. अनघाने तिला उठवून बेडवर बसवलं. तिच्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी फर्स्ट एड बॉक्स काढला. अनघा ईश्वरीच्या अंगावर असलेला टॉप काढू लागली. ईश्वरी वेदनेने कळवळली. तिच्या अंगावरचा टॉप फाटला होता. रक्ताने माखला होता. अंगावरचे व्रण पाहून अनघाच्या अश्रूधारा वाहू लागल्या. अनघाने तिचं अंग पाण्याने स्वच्छ पुसून घेतलं. ड्रेसिंग टेबलच्या आरश्यात स्वतःच्या पाठीवरच्या जखमा पाहून ईश्वरीला रडू फुटू लागलं. अनघाने जखमांवर मलमपट्टी केली. पाठीला मात्र खोलवर जखम झाली होती. रक्त वाहणं थांबत नव्हतं. अनघा घाबरली. तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतलं. त्यांनी जखमेवर औषधोपचार केले. पेनकिलरचं इंजेक्शन दिलं तेव्हा कुठे ईश्वरी झोपी गेली.

“कसं झालं हे? खोटं बोलू नका. डॉक्टर आहे मी. हे मारल्याचे व्रण आहेत. कोणी मारलं? असं मुलींना मारणं म्हणजे.. अहो डोमेस्टिक व्हॉयलन्स आहे हा. तुमच्या यजमानांना चांगलीच ओळखून आहे मी. त्यांनीच केलं असणार.. हो नां मिसेस देशमुख?”

अनघा खाली मान घालून उभी होती. कोणत्या तोंडाने सांगणार होती की, हे कृत्य माझ्या नवऱ्याने नाही तर माझ्याच पोटच्या शिकल्या-सवरलेल्या मुलाने केलंय. अनघाच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं.

“तुमच्या असं गप्प बसण्यानेच असल्या पुरुषांचं फावतं. जाऊ दे..”

असं म्हणून त्या तिथून रागानेच निघून गेल्या. अनघा तिथेच तिच्या उशाशी बसून राहिली. काही वेळाने जेव्हा ईश्वरीला जाग आली तिने आईला पाहिलं. उठून बसण्यासाठी ती सरसावली पण सारं अंग वेदनेने ठणकत होतं. आईला रडताना पाहून तिला आणखीनच रडू फुटलं. आईच्या कुशीत शिरून ती हमसून हमसून रडू लागली.

“आई, काय चुकलं माझं? इतकं मरेपर्यंत मारण्याइतका मी काय गुन्हा केला होता? सांग आई.. खरंच सांग.”

ईश्वरीचं मन आक्रंदत होतं. अनघा काहीच बोलत नव्हती. फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत होते.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all