पुन्हा बरसला श्रावण भाग १०७

पुन्हा बरसला श्रावण

पुन्हा बरसला श्रावण भाग १०७


“असा काय हा? माझ्याशी बोलायला याला काय प्रॉब्लेम होता? असं का वागलास शिवराज? मंजिरी आणि दिनेश नंतर तुच तर सर्वांत जवळचा मित्र होतास मग काय झालं असं की, तू मला असं सोडून गेलास आणि तेही नं सांगता? मैत्रीत इतकंही मी तुझं नसावं? इतकी परकी होते मी?”

ईश्वरीला शिवराजच्या वागण्याचं खूपच नवल वाटत होतं. ईश्वरीचे डोळे पाण्याने गच्च भरले. डोळ्यातली आसवं पापण्यांचा काठ कधी ओलांडून ओसंडू लागतील याचा नेम नव्हता. तिचं मन शिवराजला जाब विचारत होतं. तिने त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या मोबाईलची रिंग जात होती. शिवराज कॉल्स घेत नव्हता. त्यानंतर तर फोन स्विच ऑफ आहे असं सांगण्यात येत होतं. आता मात्र ईश्वरी शिवराजवर प्रचंड चिडली आणि तिला त्याची थोडी काळजीही वाटू लागली.

इकडे अनघाच्या घर सोडून ईश्वरीकडे निघून जाण्याने देशमुखांच्या घराला जणू अवकळा आली होती. आदित्य अर्पिता किंबहुना विनायकलाही तिच्या घरात नसण्याने त्रास होत होता. प्रत्येक वेळीस ती कायम त्याच्या दिमतीला हजर असायची. त्याला सगळं हातात द्यायची; पण आता सुनेच्या राज्यात आणि अनघाच्या गैरहजेरीत कोण त्याची इतकी सेवा करणार होतं? अनघाला तर त्याने गुलामासारखं वागावलं होतं. अनघाच्या नसण्याने घरात एक प्रकारची उदासीनता आली होती. जणू काही घरातलं चैतन्य हरवून गेलं होतं. विनायकला त्याच्या आजवरच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला होता. आज सात दिवस उलटून गेले होते. अनघा इतके दिवस आपल्या नवऱ्यापासून, घरापासून कधीच दूर राहिली नव्हती. विनायकला तिची आठवण येऊ लागली. अखेर न राहवून त्याने आदित्यजवळ विषय काढलाच. आदित्य नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. स्वरा आणि शौर्य सोबत खेळत बसला होता. तेवढ्या वेळात अर्पिता स्वयंपाकघरात स्वयंपाकाची तयारी करत होती.

“आदी, मला काय वाटतं.. आता आपण..”

विनायक जरा दबकत बोलत होता.

“काय बाबा? काय म्हणत होतात?”

आदित्यने स्वराला उचलून घेत प्रश्न केला.

“अरे मी म्हणत होतो की, आता तुझ्या आईला घरी आणायला हवं. किती दिवस तिकडे राहील? बस्स झालं आता.. इथे सगळ्यांची तारांबळ होतेय. स्वरा तर सारखी आज्जी, आज्जी करत असते. तिची मुलांना इतकी सवय आहे की बघ बिचारी किती कोमेजून गेलीत! आणि अर्पिताही फार दमून जाते रे.. घर, ऑफिस सांभाळता सांभाळता तिची दमछाक होते बघ.. तेंव्हा आपण तुझ्या आईला परत घरी घेऊन येऊया.”

विनायक नजर चोरत म्हणाला.

“बाबा, फक्त एवढ्याचसाठी आईला परत आणायचंय? मुलांना सांभाळण्यासाठी? अर्पिताला घरकामात मदत करण्यासाठी? बाकी काही नाही ना?”

आदित्यने मुद्दामच प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नांवर अर्पितानेही वळून विनायककडे पाहिलं. गॅसचं बटण बंद करून बाहेर येत अर्पिता म्हणाली,

“बाबा, खरंच इतकंच कारण आहे? की तुम्हाला…”

तिचं बोलणं अर्धवट थोडत विनायक म्हणाला.

“अगदी तसंच काही नाही; पण तिच्या असण्याची मला सवय झालीय आता. तिच्याशिवाय जगणं म्हणजे फार चुकल्यासारखं वाटतं गं! खरंतर मला तिची क्षमा मागायची आहे. आता तुम्हां दोघांकडे पाहून, तुमचा फुललेला संसार पाहून, संसारात रमलेलं पाहून मला माझी चुक लक्षात येतेय. मी नवरा म्हणून तिच्यासोबत फार चुकीचा वागलो. आता मला माझी चुक सुधारायची आहे. फक्त मुलांना सांभाळण्यासाठी किंवा घरकामासाठी नव्हे तर मला माझ्या सहचारिणीशी गरज आहे. आमचं उर्वरित आयुष्य मला तिच्यासोबत सुखाने घालवायचं आहे. मला कळून चुकलंय, तिच्याशिवाय माझ्या आयुष्याला खरंच काही अर्थ नाही. आजवर मी तिच्यावर रागवत आलो, चिडलो, मारहाणही केली. फार चुकीचं वागलो. ती बिचारी निमूटपणे सहन करत राहिली. अजूनही सहन करत राहिली असती जर ईशू तिच्यासाठी उभी राहिली नसती. ईशूनेच माझे डोळे उघडले. तिच्यामुळेच मला माझी चुक लक्षात आली.”

“अगदी खरंय बाबा, ईशूमुळेच आज आपल्या सर्वांचे डोळे उघडलेत. खरंतर आईंनी कधीच मला सुन म्हणून वागावलं नव्हतं. त्यांनी नेहमी मला त्यांच्या मुलीप्रमाणे, ईशू इतकंच प्रेम केलं. पण मला त्यांच्या प्रेमाची किंमत कळली नाही. माझंही फार चुकलं बाबा.. मी आईंना खूप गृहीत धरलं. घर, मुलं सांभाळणं हे त्यांचं कामच आहे या अविर्भावात त्यांच्याशी वागत आले. त्यांना कमी लेखत आले. त्यांच्यावर चिडचिड केली. यापुढे असं घडणार नाही. यापुढे आईंना मी दुखावणार नाही. त्यांना त्यांचा मान देईन. यापुढे मी आईंना जमेल तशी मदत करेन. आम्ही दोघी सासूसुना नाही तर मायलेकीसारखं राहू. पण आदी, खरंच आता आईंना घरी घेऊन यायला हवं. मुलांनाच काय तर मलाही आता त्यांच्याशिवाय करमत नाही.“

हे बोलताना अर्पिताला गहिवरून आलं.

“आता मला अनघाला सोडून एक दिवस काय, एक क्षणही राहायचं नाहीये. चल ना आदी, आपण उद्या सकाळीच तिला आणायला जाऊ. जाऊया ना?”

आदित्यने मान डोलावली.

“हो बाबा, खरंतर थोड्या फार फरकाने सर्वांनीच आईवर अन्यायच केलाय. मीही कित्येकदा तिच्यावर खूप रागावलो. तिच्या मनाला लागेल इतकं बोललो. अर्पिता म्हणते तसं आपण तिला गृहीत धरलं. त्यामुळे आपण सगळेच चुकलो आहोत. आपण सर्वांनीच तिची माफी मागायला हवीय. आपण उद्याच पुण्याला जाऊ आणि आईला सन्मानाने परत घेऊन येऊ. पण आताच आईला काही सांगायचं नाही. इव्हन ईशूलाही काहीच सांगायचं नाही. उद्या समक्ष जाऊनच तिला सरप्राईज देऊया. आईलाही खूप आनंद होईल.”

आदित्यचं बोलणं ऐकून सर्वांनाच खूप आनंद झाला.

“ऐकलं का बाळांनो, आपली आज्जी घरी पलत येणाल आहे. आता तुमची मज्जाच मज्जा..”

अर्पिता तिच्या लहानग्या मुलांना बोबड्या बोलीत सांगत होती. आईला आणायला पुण्याला जायचं म्हणून आदित्य आणि अर्पितासह विनायकही खूप आनंदात होता. दुसऱ्याच दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून तयार झाले. आदित्यने आपली गाडी पार्किंगमधून बाहेर काढली. अर्पिता आपल्या मुलांसोबत मागच्या सीटवर बसली आणि विनायक आदित्यच्या शेजारी येऊन बसला. कधी एकदा पुण्याला पोहचतोय आणि अनघाला भेटतोय असं त्याला झालं होतं. आणि आदित्यने गाडी स्टार्ट केली. गाडी आपल्या वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली होती.

इकडे मुलांच्या ओढीने अनघाचा जीव कासावीस होत होता.

“आज आठ दिवस झाले. ईशूने सांगितल्याप्रमाणे मी एकदाही त्यांना कॉल केला नाही. त्यांच्याशी बोलले नाही. हे आठ दिवस म्हणजे एका एका युगासारखे भासत राहिले. पण नेमकं काय आहे ईशूच्या मनात? का तिने मला कोणाशीच बोलू दिलं नाही? जाऊ देत.. असेल तिच्याही काही मनात.. आपण उगीच कशाला प्रश्न विचारायचं? तिने अट ठेवली आणि मी ती मान्य केली. आज अटी पूर्ण होण्याचा शेवटचा दिवस. बघू काय आहे तिच्या मनात?

अनघा सकाळी जेवणाच्या टेबलजवळ उभी राहून विचार करत होती. तिने ईश्वरी आणि माईंना नाष्टा दिला. इडली चटणीची डिश पुढे सरकवत अनघा ईश्वरीला म्हणाली,

“ईशू, तुझ्या अटीप्रमाणे आज आठ दिवस झाले. या आठ दिवसांत तू सांगितल्याप्रमाणे मी कोणाशीही संपर्क ठेवला नाही. बोलले नाही. मला माहित नाही तुझ्या मनात काय आहे? पण आता तुझ्या अटीप्रमाणे आठ दिवस झाल्यावर मी मुंबईला जाऊ शकणार ना? बघ तू कबूल केलं होतंस. आता काही कारणं सांगू नकोस. मुलांना पाहण्यासाठी माझे डोळे व्याकुळ झालेत गं. मला मुंबईला जाऊ दे प्लिज ईशू समजून घे.”

असं म्हणून तिने डोळ्याला पदर लावला. ईश्वरी अनघाकडे पाहून शांतपणे म्हणाली,

“आई आठवडा संपायला आजचा पूर्ण दिवस बाकी आहे अजून. उगीच तू जाण्याची घाई करू नकोस. समजलं? आणि रडायचं तर मुळीच नाही. इथे काही तुला तुरुंगात डांबून ठेवलं नाही. अशी रडतेयस ती.”

“तुला कळणार नाही गं एका आईची व्यथा..”

“आई, मला कळणार नाही असं म्हणतेस? अगं तुझ्याचसाठीच तर मी धडपडतेय. तुझ्या कष्टाची, त्यागाची सर्वांना जाणीव व्हावी म्हणूनच तर मी इतकी संयमी वागतेय. कळत कसं नाही तुला?”

ईश्वरीचं मन आक्रंदत होतं. आधीच शिवराजच्या अचानक जाण्याने ती दुखरी झाली होती आणि आता अनघाच्या बोलण्याने ती अजूनच हळवी झाली. ती आईला काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आता कोण आलं?”

असं म्हणत डोळ्यातलं पाणी पुसत अनघाने दार उघडलं. आणि समोर पाहते तर काय? साक्षात विनायक आदित्य आणि अर्पिता आपल्या मुलांसमवेत दारात उभे होते. त्यांना असं अचानक समोर पाहून अनघाला प्रचंड आनंद झाला होता.

“अरे, तुम्ही? असं अचानक, काहीही नं सांगता? पण बरं केलंत आलात ते. असं अचानक येऊन आम्हा सर्वांना सुखद धक्का दिलास. दारातच थांबा दोन मिनटं. भाकरीचा तुकडा ओवाळून टाकते. आलेच मी. तुम्ही इथेच थांबा हं..”

असं म्हणून अनघा घाईघाईने आत किचनमध्ये गेली आणि भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन बाहेर आली. तिने सर्वांवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला आणि तिने सर्वांना आत घेतलं. आपल्या सासूबाईंना असं समोर पाहून अर्पिताच्या डोळ्यात पाणी तरळलं. शौर्यला अर्पिताच्या हातातून घेतलं आणि त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं.

पुढे काय होतं? शिवराजचं काय झालं? ईश्वरीची आणि त्याची पुन्हा भेट होईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all