पुनर्जन्म - नात्यांचा...

पुनर्जन्म नात्यांचा...
रात्रीची जेवणं झाली आणि बाहेर शतपावली मारायला बाहेर पडलो. आजही माझं आणि माझ्या लहान बहिणीच, तन्वीच भांडण झालं होतं. कारण तस दर वेळेसारखं शुल्लक होतं. पण शब्दाने शब्द वाढला, आणि परत आमचं बिनसलं. तन्वीही माझ्या मागोमाग घरातुन चक्कर मारायला बाहेर पडली. आम्हाला एकमेकांचा राग तर इतका आला होता, की आम्ही एकमेकांकडे बघत पण नव्हतो.

नेहमीप्रमाणे १५ नंबर बिल्डिंगखालच्या बाकड्यावर बसलो. तो आमचा गप्पा मारायचा अड्डा होता. चक्कर मारायला जायच्या आधी सगळे तिकडेच एकमेकांची वाट बघत थांबायचे. आज आम्ही दोघेच जरा लवकर आलो होतो, त्यामुळे अजून मंडळी जमा व्हायची होती. नाही म्हणायला माझा मित्र मिहीर मात्र येऊन थांबला होता. त्याला यायच्या आधी फोन जो केला होता!

तनूकडे दुर्लक्ष करत मी मिहीर बरोबर पुढे निघालो.

" मग अन्या, आज परत वाजलं वाटत. "

" अर्थातच. त्यात काय नवीन आहे! ", मी.

" आज काय कारण? "

" दर वेळी प्रमाणे मला टी.व्ही. बघायचा असताना हिला हिच्या सीरिअल्स बघायच्या असतात. आईला काही सांगायला जावं, तर तिचं एकच म्हणणं, \"तिला तिच्या मनाप्रमाणे करू दे. लहान आहे ती अजून!\" शेवटी आईला सुद्धा सिरिअल्सच बघायच्या असतात. ती हिचीच बाजू घेणार. ", चिडलेला मी.

" साल्या, तुला कधी तिच्या बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचंच नसत ना? दर दोन दिवसांनी तुमची कोणत्या न कोणत्या कारणावरून भांडण होतातच. आता लहान आहात का तुम्ही? ", इति मिहीर.

" ए बाबा, आता तू नको चालू होऊस. घरातून हेच सगळं ऐकून बाहेर पडलोय. आणि माकडा, प्रत्येक वेळी ऍडजस्टमेंट मीच का करायची? तिला नाही का करत येत! "

" का रे बाबा? तुझ्यासाठी तिने दुपारी टी.व्ही. बघणं सोडलं, कारण तुला तेंव्हाच सी.आय.डी. बघायचे असते ते विसरलास वाटत. ", मिहिरचा टोमणा.

" हो, म.. मग काय झालं? त्यात फार मोठी गोष्ट काय केली तिने? एक साधा शो तर बघणं सोडलंय, कोणीही करून शकतो.. ", गडबडलेला मी.

" हो का? मग मगाशी टी.व्ही. बघू दिला नाही म्हणून प्रेशर कुकरच्या शिट्टीमधून निघतो, तसा धूर कोणाच्या कानातून निघत होता बर? ", मिहिरने मिश्किल हसत विचारलं.

" तुला नाही कळणार भावा, तुला अनुभवच नाहीये ना. शेवटी एकुलता एक आहेस तू. तुला काय माहित भाऊ किंवा बहीण असणं काय असतं ते. प्रत्येक गोष्टीत शेअरिंग, ऍडजस्टमेंट. चिडचिड, वैताग नुसता. ", मी चिडून म्हणालो.

आत्तापर्यंत हसत खेळत बोलणारा मिहीर अचानक शांत झाला. मला वाटलं, माझ्या युक्तिवादासमोर बोलण्यासाठी काही शब्दच नसतील, म्हणून गप्प बसला असेल. पण…

" दादा तुला असच वाटत ना, की एकुलत्या एक असणार्याच आयुष्य खूप सुखी असत? "

" हो, काही वादच नाही. "

" दोन वर्षांपूर्वी कोरोना आला, आणि काका काकूंना दुसऱ्या लाटेत तो झाला तेंव्हा ते दोघेही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. त्यावेळी तुला धीर कोणी दिला? "

" … ", मी.

" त्याच वेळी प्रत्येक ठिकाणी मंथली मेस बंद होत्या, लोकांच्या जेवायचे वांदे होत होते, तेंव्हा युट्युब वर बघून घराचा स्वयंपाक कोण करायचं? "

" … ", मी.

" काका आणि काकू दोघेही डॉक्टर आहेत. त्यामुळे कोविड आला होता तेंव्हाही त्यांना ड्युटीवर राहावं लागायचं, आणि कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा ते लगेच ड्युटीवर जॉईन झाले होते, त्यावेळी तू घरात तुझा सगळा वेळ कोणासोबत घालवायचास? "

" … ", मी.

" तुला जेंव्हा जेंव्हा काका किंवा काकू ओरडतात, तेंव्हा तुला वाचवायला लगेच मध्ये कोण पडत? मग भलेही तुझ्या वाटचा ओरडा सुद्धा तिला ऐकावा लागला तरी तिला प्रॉब्लेम नसतो.. "

" … ", मी.

" तुला आठवतय, मध्ये तू ट्रेकिंगला गेला होतास, आणि तिकडून एका कड्यावरून तुझा पाय निसटला होता, आणि तुझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेंव्हा स्वतःच सगळं शेड्युल मॅनेज करून तुझ्याबरोबर, तुला बोर व्हायला नको म्हणून कोण बसलं होत? "

" … ", मी.

" सगळ्यांना वाटत भावा, की एकुलता एक असण म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त लाडच होतात, कोणाबरोबर काही शेअर करायला नको, कोणाची काही कटकट नाही, लहान भावंडांबरोबर आपली बरोबरी नाही. आपल्या घराचे राजे आपणच.. "

" … ", मी.

" मला सुद्धा असच वाटायचं. नंतर समजलं की साला \"एकुलत्या एका\" मुलाचा \"एकटेपणा\" कोणी समजून घेतच नाही. लोकांना पटतच नाही की याला काय प्रॉब्लेम असू शकतो? सगळं याचंच तर आहे. याला प्रॉब्लेम असूच शकत नाही. "

" … ", मी.

" आधी खूप वाटत भावा, की एकुलता एक असणं खूप फायद्याचं आहे. पण नाही. एक वेळ अशीही येते, आणि आपल्याला वाटायला लागत, की सगळंच काय आई बाबांना सांगायचं! मला सांग अन्या, तू आज तुझ्या बरोबर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी काका काकूंना सांगतोस? "

" नाही, त्यातल्या ५०% गोष्टी तर फक्त तनूला आणि तुला माहीत आहेत. "

" नशीब लागत रे स्वतःकडे असा एक हक्काचा पार्टनर असायला. तुमची भांडणं काय रे; तुम्ही आज भांडता आणि उद्या विसरून जाता. थोड्या वेळाने परत एकत्र होता. भांडणात आणि मनवण्यात पण एक वेगळीच मजा असते रे. जी तू प्रत्येक वेळी एन्जॉय करतोस. ", मिहीर.

" हो रे, माझ्या मनात कधी असा विचारच नाही आला राव. "

" आत्ता कोविड मध्ये ऑनलाईन अभ्यास चालला होता जो तुला घंटा काही झेपत नव्हता. बर, हे काका काकूंना सांगायला गेल्यावर त्यांचं उत्तर होतं, की पुस्तक वाच, सगळं समजेल . "

" हो ना भाई, फार वैताग आणला होता रे ऑनलाईन ने. आधी मजा आली. नंतर समजलं हा तर स्कॅम आहे. नव्याचे नऊ दिवस आणि दुरून डोंगर साजरे. "

" तरीही आत्ता अकरावीत तुला ८५% आणि तिला ८७% कसे काय पडले रे? "

" अरे आम्ही एकत्र बसून, ऑनलाईन ला शिव्या घालत मज्जा मस्करी करत अभ्यास केला म्हणून… ", मी बोलता बोलता शांत झालो.

" मला सांग एवढी सगळी मजा, जी तुम्ही करता, ती मी कधी एन्जॉय करू शकलो असेन का? "

मी निःशब्द होतो.

" आपल्याला छोटा भाऊ किंवा बहीण असणं कटकट कधीच नसते रे. ती एक वेगळीच गोडी असते. ज्यांना अनुभवायला मिळते, त्यांना कधी त्याच काही अप्रूप नसत, आणि ज्यांना असत, त्यांना अनुभवायला नाही मिळत. "

" खर आहे तू बोलतोयस ते. मी कधी असा विचारच केला नाही बघ. "

" मग कर आता. चल सगळे आले आहेत. चल आता राउंड मारायला. ", मिहीर म्हणाला.

मी मागे बघितलं तर खरच सगळे जण मागे गप्पा मारत उभे होते. मिहिरच्या बोलण्याचा विचार करत मी सगळ्यांबरोबर राउंड मारायला निघालो.

● समाप्त ●