मनातली अढी - प्रेम कथा - ( पूजा - पारस आणि समीर )

Love Story


"अग पूजा लक्ष कुठे आहे तुझे ? कुठं एवढी रमली आहेस ?" पारस ने पूजा ला हलवून विचारले.

"काही नाही हो. असंच बसले होते शांत." पूजा ने उगाच म्हटले त्याला तसे आणि विषय टाळला.

आता पारस ला कसे सांगू की, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते? पूजा स्वतः शीच बोलत होती..

"बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण" हि दोन असून नसलेली नाती आहेत; ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही. समाजच काय तर? आपणही कधी मान्य करत नाही; करणार नाही..

उगाच घडला कालचा प्रसंग. कोण तो? कुठुन आलेला? माझ्याच समोर उभा का राहिला? पूजा विचारात बोलत स्वतः शी च बोलत होती..

वाऱ्याने माझीच ओढणी का उडवावी, उडवावी ती उडवावी . वर तेव्हाच त्याचे लक्ष माझ्याकडे का जावे?

चला गेलेच लक्ष. मला कळलेय की तो बघतोय आणि मला कळलंय हे कळल्यावर त्याने नजरही फिरवली.

फिरवली तिथपर्यंत ठिक होते. पण माझा रागावलेला चेहरा बघूनही त्याने मला सॉरी बोलायची हिंमत दाखवावी?

आणि असा न आवडलेला काल कामावर जाताना बस मध्ये घडलेला प्रसंग असूनही तो विसरून न जाता मी तो सारखा सारखा का आठवावा? पूजा खूप वेळ स्वतः शीच बोलत होती.

माझे खूप प्रेम आहे पारस वर. तो हि खूप जपतो मला.

पण का माहित नाही बसमधला तो जो कुणी होता तो डोक्यातून जातच नाहीयेय माझ्या. उद्या पुन्हा दिसेल का तो? उद्या नाही. नंतर कधी तरी दिसेल का?"

दोन-तीन दिवस तसेच गेले. पूजा ला तो काही दिसला नाही. पण तिसऱ्या दिवशी मात्र, 

"तोच आहे का तो? होय. तोच. तोच आहे तो. तसा दिसायला ठिकठाक आहे. . सर्वसाधारण दिसतो. कपड्यावरून कमावत असेल चांगला असेही वाटतेय. असो ना? मला काय करायचंय? त्यादिवशी खूप राग आला त्याचा. पण आज काहीच वाटत नाहीयेय. बोलावसं वाटतंय त्याच्याशी. पण असं कसं बोलणार? अरे! तो चक्क हसला माझ्याकडे बघून! तो हसला पण, मी का म्हणून त्याला हसून साद द्यावी? हे काय होतंय मला?" पूजा विचार करत होती 

थोड्या दिवसांपूर्वी ज्याचा प्रचंड राग आला होता; आज त्याच्याच बाजूला पूजा बसली होती. त्याचे नाव समिर होते 

पण दोघांमध्येही अंतर होते. त्या मधल्या अंतरात \"संस्कार\" बसले होते

" समीर मला एक सांगशील?"

"..." नजरेनेच समीर ने होकार दिला 

दोन माणसं पुरतील इतकी जागा नसते का रे मनात? कुणी दुसरा आवडला म्हणजे पहिल्यावर अन्याय केला असे असते का रे?

लग्न झालं म्हणजे माणूस कधी पुन्हा प्रेमात पडूच शकत नाही असे असते का? सांग ना रे समीर...

मी पारस ला फसवतेय का रे, 

सांग ना लवकर. बस येईल आता. पुन्हा हे सगळे विचारायला एकांत मिळेल कि नाही शंकाच आहे."

"सांग ना रे समीर . चुकतेय का मी?"

"तू माझ्यासोबत येशील? पळून जावूया का आपण? माझ्याकडे तिकीट पण आहेत बँगलोरची." पूजा म्हणाली 

"म्हणजे?"  समिर म्हणाला 

"इतके कठीण वाक्य बोललो का मी? तुला प्रश्न नाही कळला? की कळला पण ऐकलेल्यावर विश्वास नाही बसला?" समीर म्हणाला 

पूजा दचकली, 

आणि म्हणाली.

"नाही येऊ शकत मी. माझे पारस वर खूप प्रेम आहे."

"आणि माझ्यावर?"

"माहित नाही."

"छान. प्रेम नाहीयेय मग तू इथे माझ्या बाजूला यावेळी का बसली आहेस?"

"माहित नाही."

समीर च्या  चेहऱ्यावर हसू होते. 

"पूजा , तुझ्या या माहित नसण्यातच उत्तरं लपली आहेत. तुझीपण आणि माझीपण.

तू हलके केलेस मला. तुझे उत्तर हो असे असते ना; तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. समीर म्हणाला...

विचित्र होती ना आपली भेट? तुझी ओढणी  उडाली होती . एक पुरुष म्हणून मी तिथे पाहिले.

तुझ्या ते लक्षात आल्यावर तू ओढणी ओढून घेतलीस ही तुझी शालीनता होती. माझी चूक मला कळली नि मी नजर फिरवली हा माझा सभ्यपणा होता.

पण तरीही तुला सॉरी बोलावं असं मनापासून वाटलं मला. तुझ्या ढळत्या ओढणीपेक्षा तुझ्या सावरत्या ओढणीमुळे आवडलीस तू मला."

"समीर 

माफ कर मला."

"त्या दिवसापासून खूप स्वप्नं पाहिली मी तुझ्यासोबत. स्वप्नात तू दिसलीस पण, नंतर नजर तुझ्या गळ्यातल्या मंगळसुत्रावर गेली. स्वप्नांचा बंगला पत्याच्या घरासारखा तुटला. आपलीच स्वप्नं कधीकधी आपल्या मालकीची नसतात. एकवेळ अशी आली की, वाटू लागलं, तुझा हात धरावा आणि पळून जावं.

मी विचार केला.वाटले की, तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझे मंगळसूत्र येतंय. 

थोडा वेळ विचार केला, पारस च्या जागेवर उभं राहून पाहिलं, सहन नाही झालं.

संपूर्ण आयुष्यात माणूस खूप स्वप्नं बघतो. त्यातली काहीच स्वप्नं पूर्ण झालेली पाहण्याची संधी त्याला मिळते.

पण स्वतःच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या या स्वप्नांचा चुराडा झालेला कसा बघवेल त्याला?

आयुष्यात इतकी माणसं येतात, पण एखादाच मनाला वेड लावतो. एखाद्यामुळेच आपल्याला जगणं आवश्यक वाटू लागतं. असा काळजाचा तुकडा आपण हिरावून न्यायचा? का? कशाला? कुणी हक्क दिलाय आपल्याला हे करायचा?"

"आता या क्षणी तुला खूप राग येत असेल ना रे पारस माझा ?"पूजा म्हणाली 

हे मन किती विचित्र असतं ना पूजा ?

मला तू हवी आहेस. पण 

तुझा हात माझ्या हाती यावा म्हणून मी दुसऱ्या कुणाचा हात मोकळा कसा करू?

तू हवी आहेस मला. खूप खूप हवी आहेस. 

त्रास होतोय खूप दूर सारताना तुला. पण तू माझ्या हक्काची नसतानाही मला इतका त्रास होऊ शकतो तर, तुला गमावल्यावर पारस चे काय होईल?

काय त्याची चूक? इतकीच ना की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो? प्रेमाच्या बदल्यात प्रेम फार कमी वेळा मिळतं. तुला मिळालं हे तुझं भाग्य समज."

थोडा वेळ दोघे शांतच बसले. बोलणे सुचत नव्हते.

समीर म्हणाला,  पूजा 

एक मन सांगतंय की, तुला घेऊन जावं कुठे तरी दूर. संसार थाटावा.

पण तेच मन हेही सांगतंय की, स्वत:च्या घरात तुळस लावण्यासाठी दुसऱ्याच्या वृंदावनातली माती काढायची नसते. पावित्र्य देण्यात असतं, मिळवण्यात असतं; पण हिसकावण्यात नसतं."

थोडा वेळ शांततेतच गेला.

" आता यापुढे मी तुझी आयुष्यात कधीच नाही येणार. मी हैदाराबाद ला जातोय. कायमचा. एकटाच. मी एकच तिकीट काढले होते.

तू हा बोलली असतीस तर माझी निवड चुकली असे समजून हरून गेलो असतो आणि "नाही बोललीस तर निवड योग्य ठरली असे समजून जिंकून गेलो असतो. पण एकटाच गेलो असतो हे मात्र नक्की."

" पूजा , प्रत्येक युद्धात ज्याची त्याची जिंकण्याची व्याख्या वेगळी असते. तू जिंकवलंस, मलाही आणि पारस लाही.

बघ ना, पारस  इथे नसूनही तू त्याची बाजू संभाळतेयस, त्याची बाजू लढवतेयस. आपलं खरं अस्तित्व आपण नसताना असतं.

काळजी घे स्वत:ची आणि पारस ची . तू दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मनापासून आभारी आहे." समीर म्हणाला..

समीर जातं होता. पूजा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती

पारस जिंकला होता की हरला होता?  समीर कुणाला जिंकवून गेला होता? स्वत:ला की पारस ला ?

वादळ संपलं होतं का? की पुजाच्या मंगळसूत्राने ते जखडून ठेवलं होतं? वादळ असं कधी बांधून ठेवता येतं का?

मनात वादळ घेऊन पूजा घरी पोहोचली.

"आज उशीर झाला यायला तुला? काम जास्त होते का ऑफिसमध्ये?" पारस ने विचारले.

"हम्म. काम जास्त होतं."

पारस मनातल्या मनात म्हणाला,"हल्ली कामं बसस्टॉपवर करतात वाटतं पूजा बाई.... कोण असेल बरं तो पूजा सोबत.....पारस ने आज पूजा आणि समीर ला बघितले होते एकत्र, पण पूजा काहीतरी सांगेल असं मनातल्या मनात  बोलून तॊ गप्प राहिला, पण पारस च्या मनात ती अढी राहिलीच कि कोण होत पूजा बरोबर.

पूजा एका विलक्षण भावनिक संबंधांमधे गुंतली होती, तरीही खर्‍या अन तितक्याच खोट्याही.

पती-पत्नी यांमध्ये आपण विश्वास  हा शब्द वापरतो.पण आपल्या साथीदाराला कुणातरी दुसऱ्याबरोबर पाहील्यावर क्षणभरासाठी का होईना पण मनात नकळत संशय येतो.माणसाचा स्वभाव च असतो तॊ......

नमस्कार.. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख  - रत्नागिरी )