Login

पुढची पिढी घडवताना

This short story depicts how kids imitate actions and words of elders

रेश्मा आणि रेवती दोघी सख्ख्या बहिणी. आज रेवतीच्या मुलाचा, अर्जुनचा पाचवा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त रेश्मा सहकुटुंब आपल्या बहिणीकडे जेवायला आली होती. रेश्माला दोन मुली आणि  रेवतीला एक मुलगा, अर्जुन!

वाढदिवस सोहळा आटोपल्यावर रेश्मा घरी निघाली असताना तिच्या धाकट्या मुलीने अवनी ने अर्जुनच खेळणं  आपल्याबरोबर घरी घेऊन जाण्याचा हट्ट केला. अवनी देखील लहानच सहा वर्षांची आपल्यालाही अर्जुन सारखेच खेळणं हवं म्हणून ती हट्ट करू लागली.

"आई माझ्या कडे असं अर्जुन सारखं खेळणं नाहीये, मला पण असच हवय."

तिला रेशमाने समजावले " ते खेळणं अर्जुनच आहे, तू त्याच्या घरी आलीस की  खेळतजा त्या खेळण्याशी. आत्ता आपण ते खेळणं घेऊन नाही जाऊ शकणार"

"मग आई मला आत्ता असचं खेळणं आणून दे दुकानातून"अवनीचा हट्ट सुरुच होता तिला काही ऐकून घ्यायचे नव्हते.

"मला खेळणं हवच"  हा एकच सूर लागला होता.

रेश्मा ने तिला समजावले "अर्जुन सारखच खेळ हवा असेल तर मग तू अर्जुनच्या घरीच राहतेस का? इथे तुला अर्जुन सारख खेळणं, त्याच्या सारखे आई बाबा आणि तसेच कपडे सुधा मिळतील तुला. आम्ही सगळे घरी जातो तू आज पासून मावशीकडे रहा म्हणजे सगळी खेळणी मिळतील. चालेल का?"

"हे एकच खेळणं  काय अगं का अजून पण खूप खेळणी आहेत अजून कडे, मग दोघे मिळून खेळा तुम्ही"

असं बोलून रेश्मा दोन पावलं पुढे चालली. ते पाहताच अवनिने हातातलं खेळणं सोडलं आणि सरळ आपल्या आईच्या मागे निघाली.

त्या दरम्यान रेवती आपल्या बहिणीला रेश्माला सांगत होती घेऊन गेलीस तरी चालेल ते खेळणं. एवढी म्हणते तर घेऊन जा घरी खेळणं. पण रेश्मा आपल्या म्हणण्यावर ठाम होती. कारण असं प्रत्येक वेळेला खेळणं घेऊन जाऊ दिलं तर अवनीला त्याची सवय लागेल आणि ती प्रत्येकाच्याच घरी गेली की अशी खेळणी घेऊन यायचा हट्ट करेल म्हणून रेश्माला तिला समजवायचं होतं की असं आपण कोणाच खेळणं मागू नये.

रेवतीला बहिणीचं म्हणणं पटलं, तिने आपला आग्रह थांबवला. आपली आई काय सांगते हे जरी नीट कळलं नसलं तरी अवनी इथे अर्जुनच्या घरी राहायचं त्याचे आई-बाबा आपल्या बरोबर राहतील असं नको होतं म्हणून ती हातातलं खेळ सोडून, आपल्या आईच्या मागे निघाली. रेशमाचा ह्या सगळ्या मागची भूमिका, तिचा दृष्टिकोन एक पालक म्हणून, एक आई म्हणून रेवतिला खूप आवडला. आपल्या मुलाला कसं समजवायला हवं ते तिला आवडल. कारण मुलांना ओरडणं आणि मारणं तिला कधीच पसंत नव्हत.

असच एका रविवारी दुपारी दोघी बहिणी, रेश्मा आणि रेवती आपल्या माहेरी आई-वडिलांना भेटायला गेल्या. आईच्या हातचा आमरस पुरीचा बेत मस्त ताव मारुन लेकी नातवंड जेवले. हे पाहून आईचं, एका आजीच मन तृप्त झाले. जेवणानंतर आपल्या लेकींच्या गप्पा रंगलेल्या पाहून आई म्हणाली," मी जरा अर्धा एक तास वामकुक्षी घेते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला येते " आपल्या आजीला आत जाताना पाहून अवनी म्हणाली "ती बघ चालली एक्सेस बॅगेज ( जास्तीच समान)  झोपायला !" दोन मिनिटं कुणाला काही कळलंच नाही अवनी काय म्हणाली ते....

रेवती ने विचारले "अवनी काय बोललीस तू?"

अवनी म्हणाली "एक्सेस बागेची, अग मम्मा पण असच म्हणते माझ्या दुसऱ्या आजीला घरी म्हणून मी पण बोलले आत्ता ह्या आजीला की, एक्सेस बॅगेज चालली झोपायला."

अवनीच बोलणे ऐकून सगळेच थक्क झाले, सहा वर्षाची मुलगी, तिच आपल्या आईच्या बोलण्याकडे किती लक्ष असतं आणि लगेच ती आईच्या वागण्यात बोलण्याचे अनुकरण करते. रेश्माला आपल्या मुलीचे,  अवनीच हे बोलणं ऐकून ओशाळल्यासारखं झालं तिला काय बोलावं कळेना सगळे जरा शांत झाले.

रेवती ने विषय बदलला म्हणाली "चला आपण सगळे पत्ते खेळूया" तासभर पत्त्यांचा डाव छान रंगला....

खेळता खेळता गप्पा चालूच होत्या. रेशमाची मोठी लेक अमृता, पाचवीला शिकत होती. आज सकाळीच तिचा वार्षिक निकाल लागला होता. ८५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आपल्या लेकीचा निकाल रेशमा आपल्या बहिणीला रेवतीला सांगत होती. सांगताना तिचा सुर थोडा अपेक्षा भंग झाल्या सारखा रेवातीला वाटला. तिने रेश्माला विचारले का ग तुझा सुर असा , इतके छान मार्क मिळाले अमृताला तरी तू खुश नाहीस का?

" अगं अजून जरा अभ्यास केला असता तर नक्की ९०% मिळाले असते ग.खाल्ला सकाळच ओरडा अमृताने. नीट अभ्यास करायला नको, अजून काय"

"होना आणि अजून थोडा अभ्यास केला असता तर ९५% मिळाले असते, आणि अजून थोडा अभ्यास केला असता तर मग काय १००% नसते का मिळाले ??"

" तसं नाही ग, तिच्या बरोबरच्या क्लास मधल्या तिच्या मैत्रिणीला ९१% मिळाले, अमृताला मी बोलले. तिला मिळू शकतात तर तुला का नाही???"

रेवती "तुलना करतेस तू? अगं दोन मुलं किती वेगळे असतात, त्याचे स्वभाव, कला गुण, हुशारी सगळं भिन्न असतं! आणि तू असं बोलशील असं मला वाटलं नव्हतं रेश्मा!"

रेवती : "अगं त्या दिवशी माझ्या घरी, अर्जुनच्या वाढदिवसाच्या वेळेला तू अवनीला त्या खेलण्यावरून किती छान समजावलं न रागावता न चिडता. दोन मुलांकडे दोन वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतात. आणि जर अवनिला तसं अर्जुन सारखच खेळण हवं असेल तर तू तिला सांगितलं की तू इथे अर्जुनच्या घरी रहा. त्याची सगळी खेळणी मग तुला मिळतील. बोललीस ना तू?"

" एक साधं खेळणं, ह्यावरून तू छान समजावलं, मग आता काय झालं? अमृताला कशाला बोलावं, मार्क कमी पडले म्हणून?  आणि मैत्रिणीशी तुलना सुधा का केलीस? अगं ह्या तुझ्या वागण्यावरून आणि मार्कांच्या तुलने वरून जर उद्या  जर अमृता म्हणाली की माझ्या मैत्रिणीचे मार्क तुला जास्त आवडतात तर तू मैत्रिणीला घरी आण तिच तुला जास्त आवडते ....तर चालेल का??"

"आपण मुलांना एक शिकवण द्यायची आणि आपण एक वागायचं? अशी दुटप्पी भूमिका का?? हे चूक आहे!!"

"आणि मगाशी मी बोलले नाही, पण मला अजिबात आवडलं नाही ते....अवनी जे बोलली, एक्सेस् बॅगेज असं!!"

" ती निरागसपणे बोलली, पण तू तुझ्या घरी तुझ्या सासूबाईंना कधी बोलली असशील असं तेव्हा तिने ऐकलं आणि आज तिने तुझं अनुकरण केलं! मुलं आई वडील घरचे लोक कसे बोलतात, वागतात ते पाहून त्यांचं लगेच अनुकरण करता! अगं आपणच आपली पुढची नवीन पिढी घडवत आहोत....उद्या आपली मुलं आपल्याशी असं वागली तर? त्यांच्या ह्या वागण्याला जबाबदार कोण? आपणच ना!! विचार कर....!!"

रेवती : " आपण एक पुढची नवीन पिढी घडवत आहोत  तेव्हा त्यांना शिकवण म्हणून एक गोष्ट आपण सांगतो आणि आपल्या कृतीतून त्या विरुद्ध वागतो. मुलांनी नक्की काय आणि कस शिकायचं?"

रेश्मा आपल्या बहिणीचे बोलणं ऐकतच राहिली. आपल्या वागण्या बोलण्यातून मुलांवर कसा परिणाम होतो , ह्याचं प्रात्यक्षिक आत्ताच अवनीने दिले होते. वैतागून, रागात सासूला बोललेल अवनिने ऐकलं आणि आज चार चौघात ती ते नकळत बोलून गेली ....

मुलांवर संस्कार करताना त्यांना एखादी शिकवण देताना, तिच शिकवण आपण आपल्या वागण्या बोलण्यातून का दर्शवत नाही, ही आपली चूक रेश्माला कळली.....

रेशमाने आज अवनी आणि अमृता आपल्या दोघी लेकिंशी बोलायच आणि त्यांच्याशी वागताना आपली चूक झाली, ही कबुली द्यायची ठरवल!

©तेजल मनिष ताम्हणे