Sep 26, 2020
कविता

वस्ती पलिकडची

Read Later
वस्ती पलिकडची

वस्ती पलिकडची

पाऊलवाट भिन्न त्यांची
नाईलाजास्तव पत्करलेली
हौस का असते कुणाला
शरीराचे प्रदर्शन मांडण्याची

गरिबीपुढे हरलेल्या त्या
वैश्यावस्तीत भरती झाल्या
वखवखल्या शरीरांची
भूक त्या भागवू लागल्या

कशासाठी?कोणासाठी?
चालले होते पोटासाठी
शरीराचा बाजार मांडून
कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी

विषाणूच्या भितीने आताशी
पावलं तिकडं वळत नाहीत
पिसाटलेली शरीरं आताशी
वस्तीत त्या फिरकत नाहीत

बंद झालेय रात्रीची मेहफिल
ओठांची भडक लाली, 
भरलेले मद्याचे प्याले अन् 
तालावर चालणारी नाचगाणी

डोळ्यांपुढे अंधार त्यांच्या
पुढचा मार्ग दिसत नाही
किती दिवस चालणार असं
जगायचं कसं सुचत नाही

माणूसच आहेत त्याही
हेच मुळी विसरतो समाज
देऊनी त्यांना दूषणं हजार
चेहऱ्यावर मिरवतो सज्जनभाव

-----सौ.गीता गजानन गरुड.