Nov 23, 2020
मनोरंजन

वचन ( संपूर्ण कथा)

Read Later
वचन ( संपूर्ण कथा)

  रीया आणि सिया, प्रतापरावांच्या मुली. दोघी जुळ्या बहिणी. सिया हि रिया पेक्षा दोन मिनिटांनी मोठी होती त्यामुळे रिया प्रेमाने तिला सिया-दि असं म्हणायची. दोघींचं लहानपणापासूनच एकमेकींवर खूप प्रेम होतं. त्या दोघी एकमेकिंशिवाय राहत नसतं, कधीही कुठेही एकत्र असतं. दोघी जुळ्या होत्या, दिसायला अगदी सारख्या, काडीमात्र फरक नव्हता त्यांच्यात तरीही त्यांच्या स्वभावात बरेच अंतर होते, सिया दोन मिनिटांनी का असेना पण रिया पेक्षा मोठी होती त्यामुळे रिया ची जबाबदारी आपल्यावर आहे असं तिला वाटायचं, ती नेहेमी रियाची लहान बहिणीसारखी काळजी घ्यायची कारण रिया स्वभावाने थोडी भोळी होती, ती सगळ्यांना मदत करायची, पटकन कुणावरही विश्वास ठेवायची. तिला फार लवकर कुणाचीही दया यायची. मात्र स्त्रियांचा अनादर करणारे, व्यसनाधीन आणि आपल्या श्रीमंतीचा माज असणाऱ्या लोकांचा तिला फार तिटकारा होता. त्यांना ती कधीही जवळहि फिरकू देत नसे. परंतु सिया मात्र प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायची नाही. तीही अनेकांना मदत करायची पण पूर्ण खात्री करूनच. तिच्यामध्ये चांगली निर्णय क्षमता होती. तिला माणसाची पारख होती. रिया बऱ्याचवेळा सियावर अवलंबून असायची, तिचे छोटे छोटे निर्णय देखील ती सियाला विचारूनच घेत असे. या गोष्टीला कारणही तसेच होते, लहानपणापासूनच सियाचा समजूतदारपणा बघून, मरताना त्यांच्या आई म्हणजे मीनाने, रिया आणि सिया कडून एक वचन घेतले होते कि सिया कायम रियाच्या पाठीशी उभी राहील, तीला योग्य मार्गदर्शन करेल, त्या कधीच एकमेकींची साथ सोडणार नाहीत आणि प्रसंगी एकमेकींच रक्षणहि करतील.

  प्रतापराव शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांचे बालपण लोणावळ्यात गेले. तिथे त्यांचा बबन नावाचा एक जिवलग मित्र होता, ते एकत्र शाळा शिकले होते. त्यानंतर प्रतापराव उच्च शिक्षणासाठी मुंबई मध्ये आले आणि बबन लोणावळ्यात एका कारखान्यात कारकून म्हणून रुजू झाला. खरंतर त्यालाहि अजून शिकायचे होते पण त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याला नोकरी करून पोट भरणे भाग होते. इकडे प्रतापरावांना शहरात अजून एक मित्र मिळाला , हिरामण… तोहि चांगल्या स्वभावाचा असल्यामुळे त्या दोघांची चांगली मैत्री जमली. यथावकाश शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रतापरावांनी  लोणावळ्यात एक कारख्नाना सुरु केला आणि बबनला तिथे चांगल्या पगाराची आणि हुद्द्याची नोकरी दिली. बबन प्रामाणिक असल्यामुळे प्रतापरावांचा  त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. यथावकाश सर्व स्थिरस्थावर झाल्यावर प्रतापराव आणि मीना यांचे लग्न झाले. तसेच बबन हि वासंतीशी विवाह करून आपल्या आयुष्यात स्थिरावला. काही काळाने प्रतापरावांनी मुंबईला देखील आपल्या कारखान्याचा विस्तार वाढविला, हळूहळू तिथेही त्यांचा चांगला जम बसला, त्यामुळे आता ते मुंबईला मोठा बंगला बांधून मीना सहित आपले आयुष्य कंठू लागले. कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर सिया आणि रिया नावाची दोन जुळी आणि सुंदर फुल उमलली. तर इकडे बबनला देखील पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्याने निलेश असे ठेवले. सर्व काही सुरळीत सुरु असतांना नियतीला त्यांचे सुख बघवले नाही. एका साथीच्या आजारात वासंती, बबन आणि निलेशला सोडून गेली तर इकडे मीनाला एका दुर्धर आजाराने ग्रासले, आपला अंत निकट असताना तिने रिया आणि सिया कडून एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतले आणि कायमचे डोळे मिटले. एकाकी झालेल्या प्रतापरावांनी बबनला आपल्याकडे राहावयास बोलावून घेतले, तेवढाच त्याचाही एकटेपणा दूर होईल आणि मुलांना देखील एकमेकांची सोबत होईल या उद्देशाने.

 आता सिया, रिया आणि निलेश एकत्र मोठी होवू लागली. प्रतापरावांनी निलेशला देखील सिया आणि रिया च्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, फी जास्त असल्याने, आधी बबन नाही म्हणत होता पण प्रतापरावांनी, पैशाची काळजी तू नको करूस, फक्त मुलाला चांगले शिकव असे म्हणत त्याची फी भरली. बबनने मनापासून प्रताप्रवांचे आभार मानले. त्यानंतर बबन अनेकदा निलेशला सांगत असे कि, “निलेश, बघ… तूहि असाच मोठा हो, यशस्वी हो, खूप पैसे कमव, म्हणजे तुलाही खूप मान मिळेल, लोक तुझ्या मागे-मागे करतील, मग तुला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. उलट लोकच तुझ्याकडे मदतीसाठी येतील. मलापण खूप शिकायचे होते पण हा पैसाच आडवा आला, तुझी आई आजारी असतांना माझ्याकडे पुरेसा पैसा असता तर तिला मोठ्या दवाखान्यात नेली असती आणि ती आज आपल्या सोबत असती, त्यामुळे तू खूप पैसा कमाव, खूप पैसा कमाव……….. ”

निलेशही होकारार्थी मान हलवत सिया आणि रिया सोबत खेळायला पळत असे. एकदा एका छोट्या कारणावरून निलेश आणि सियाचे भांडण झाले, हे ऐकताच बबनने निलेशला खूप मारले आणि प्रतापराव आणि सिया नको म्हणत असतांना देखील सियाची नाक घासून माफी मागायला सांगितली, निलेशने रडत रडत तिची माफी मागितली, सियानेही त्याला सॉरी म्हटले आणि दोघात पुन्हा मैत्री झाली. नंतर एकांतात बबन निलेशला म्हणाला कि “ तू नेहेमी सिया,रिया आणि प्रतापरावकाकांशी चांगलाच वागलं पाहिजेस, त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर, त्यांनीच मला नोकरी दिली, आधार दिला, चांगल जीवन दिल, तुला शिक्षण देत आहेत, त्यामुळे त्याचं मन कधी दुखवू नकोस, तू प्रत्येकवेळी त्यांच्यासमोर नमतं घेत जा, त्यांची मर्जी राखलीस, त्याचं प्रेम मिळवलसं आणि त्यांचा विश्वास संपादन केलास तरच तुझा फायदा होईल नाहीतर कुणीही तुला विचारणार नाही… लक्षात ठेव….”.        

बबनची हि शिकवण निलेशने कायम डोक्यात ठेवली आणि तो सियाशी आता खूप चांगला वागायला लागला इतका कि कधीकधी सियाला तो खरचं चांगला वागतोय कि नाटक करतोय असा प्रश्न पडत असे… पण रिया आणि निलेशची मैत्री सहज फुलत होती, रिया आणि निलेश सतत सोबत राहत असत, रियाचे कुठलेही काम सियाशिवाय होत नसे, पण निलेशही तितकाच तिला सोबत करत असे.

 

             प्रतापरावांचा कारभार मोठा होत होता, आता ते शहरातील अत्यंत श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात होते. बबन सतत त्यांच्या सोबत असे, त्यांना काय हवे नको ते बघत असे, त्यांच्या कामात त्यांना काही मदत हवी असल्यास ती करत असे…. घरी मुलांच्या अभ्यासातही ते मदत करीत असत. सिया आणि रिया त्यांना बबनकाका अशी हाक मारीत. आता सिया, रिया, निलेश यांना शहरातल्या प्रतिष्ठित कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता, तिथे अनेक श्रीमंतांची मुले होती. आणि त्यातच एक मुलगा जो या तिघांचा सिनियर होता, संजीव ….. खूप हँड्सम, ऐटीत आपल्या महागड्या गाडीवरून फिरणारा, सतत मित्रांच्या घोळक्यात, एकदम बेफिकीर, मौजमजेवर खूप पैसे उडवणारा …..ज्याच्यामागे कॉलेज मधल्या अनेक मुली लाळ घोटत मागेमागे फिरत पण हा कधीही कुठल्याही मुलीकडे ढुंकूनही न पाहणारा असा…… त्याची हि कीर्ती या तिघांच्याही कानावर आली होती, रियाला तर आधीच अशा लोकांचा तिटकारा येत असे, त्यामुळे कधीही संजीवचा विषय निघाला किंव्हा कुठली मुलगी त्याच्याविषयी काही सांगू लागली कि रिया तिथे एक क्षणहि थांबत नसे…. वडिलांच्या पैश्यावर जगणारा, मौजमजा करणारा, ‘बडे बाप का बिगडा हुवा लडका’ हिच त्याची प्रतिमा तिच्या मनात तयार झाली होती, त्याउलट तिला निलेशचा फार अभिमान वाटायचा कि तो स्वताच्या पायावर उभं राहण्यासाठीउभ राहण्यास्ठी इतकी मेहनत घेतोय, दिवसा अभ्यास आणि घरी गेल्यावर तिच्या वडिलांना कारखान्याच्या कारभारात मदत आणि बबनकाकांना त्यांच्या कामात मदत करतो. निलेशलाहि रियाचा मनमिळाऊ, मोकळा स्वभाव, सगळ्या लोकांना मदत करण्याची तिची तयारी, त्याच्यासोबत अगदी सहजपणे तिचे वावरणे हे सगळे त्याला खूप आवडायचे.   याउलट सिया त्याच्याशी बोलतांना त्याच्या हृदयाचा ठाव घेतल्यासारखी त्याच्याकडे निरखून बघत बोलायची, त्यामुळे त्याला अवघडल्यासारखे वाटायचे. एकदा कॉलेजच्या वार्षिक महोत्सवामध्ये रियाने आवड म्हणून नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता, त्यात नाचतांना संजीवने तिला पहिले, कुठल्याही मुलीकडे न पाहणारा संजीव दुसऱ्या दिवशी तिला कॉलेज मध्ये शोधत होता, त्याला कॅन्टीनमध्ये ती बसलेली दिसली, ती तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या प्रोजेक्ट संबंधी काहीतरी काम करत होती. संजीव तिच्या टेबलाजवळ जावून उभा राहिला, तिचे लक्ष नव्हते, त्याने तिच्या लॅपटॉपमध्ये काहीवेळ बघितले, मग तो तिला म्हणाला, “ हाय रिया, मी संजीव, तुला दोन वर्ष सिनियर आहे, काल तुझा डान्स बघितला, तू खूप छान नाचलीस, तुझे हावभाव अप्रतिम होते, तुला पहिले बक्षीस मिळाले त्याबद्दल तुझे अभिनंदन, काल नाव अनाऊन्स झाल्यावर तू स्टेजवर गेलीस तेव्हा मला तुझे नाव कळले, तुला तुझ्या प्रोजेक्ट साठी काही मदत लागली तर नक्की संग, मी पण याच विषयावर प्रोजेक्ट करत आहे, ”. तिने शांतपणे त्याचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि त्याला म्हणाली, “हाय संजीव, तू केलेल्या अभिनंदनाबद्दल धन्यवाद, पण सॉरी, मी रिया नाही, मी तिची जुळी बहिण सिया आहे, रिया आज कॉलेजला आलेली नाहीये पण घरी गेल्यावर तुझा हा निरोप मी तिला नक्की देईल, आणि हा प्रोजेक्ट मी करत्येय, रियाचा विषय वेगळा आहे.” संजीवला खूप आश्चर्य वाटले, तो म्हणाला, “ किती साम्य आहे तुम्हा दोघींत ! बर ठीक आहे, या प्रोजेक्ट साठी तुलाहि काही मदत लागली तर नक्की सांग आणि तुला भेटूनहि खूप आनंद झाला सिया”. त्यानंतर त्याने तिला प्रोजेक्ट संबंधी थोडक्यात माहिती सांगितली आणि उद्या भेटूच एवढे बोलून आणि तिच्याशी हसून तो निघून गेला. आणि कुणावरही पटकन विश्वास न ठेवणारी, लगेच मैत्री न करणारी सिया त्याच्या इतक्या छान बोलण्याने त्याच्याकडे बघतच राहिली. तिने घरी येवून हे सर्व रियाला सांगितले, रीयालाही कळत नव्हते कि सियाला त्याचे बोलणे इतके का आवडले? तिने सियाला समजावले कि संजीव एक लाडावलेला आणि बिघडलेला मुलगा आहे पण सिया प्रत्यक्ष त्याच्याशी बोलली होती त्यामुळे तिने रियाला सांगितले कि संजीव वाटतो तसा नाहीये, तो स्वभावाने खूप चांगला आहे आणि अभ्यासातही खूप शार्प आहे. तीच बोलन ऐकून रियाने तिचे हात हातात घेतला आणि म्हणाली  “ठीक आहे, तुला योग्य वाटतंय तर आपण करू त्याच्याशी मैत्री, आईला वचन दिलयं ना… कि आपण एकमेकींची साथ नाही सोडणार ते…” आणि दोघी हसायला लागल्या. दुसऱ्या दिवशी सियाने संजीवची ओळख रिया आणि निलेश बरोबर करून दिली, संजीवने अदबीने रीयाशी हात मिळवला आणि छान हसला…… आता चौघे बऱ्याचवेळा एकत्र राहू लागले पण रिया मात्र संजीव सोबत अंतर राखून होती, तिला त्याचे श्रीमंतीचे शौक पसंत नव्हते, उलट ती निलेश बरोबरच राहणे जास्त पसंत करत असे. वर्ष संपल्यावर संजीव त्याच्या वडिलांच्या कामात मदत करू लागला. रिया, सिया आणि निलेशने आपापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तरी वेळ मिळेल तेव्हा संजीव कॉलेजला येवून त्यांना भेटत असे, कधी फोन करत असे पण त्याच्याशी सियाच जास्त बोलत असे, रिया आणि निलेश त्याला टाळत असत. एकदा चौघे गप्पा मारत असतांना प्रेमाचा विषय निघाला तेव्हा सिया , सध्या मला फक्त अभ्यास महत्वाचा आहे अस म्हणाली पण रियाने मात्र तिच्या स्वप्नांच्या राजकुमाराचे भरभरून वर्णन केले जे तंतोतंत निलेशशी जुळत होते हे सिया आणि संजीवलाही समजले. निलेश रीयाकडे पाहून फक्त हसला आणि म्हणाला कि मी माझ्या प्रेमाबद्दल वेळ आल्यावर सांगेल. संजीव काहीसा उदास वाटत होता आणि तो म्हणाला कि मला प्रेमावर विश्वास नाहीये आणि तिथून निघून गेला…… त्यानंतर त्याचे कॉलेज मध्ये येणे, फोन करणेही हळूहळू बंद झाले. सियाला त्याची बऱ्याचवेळा आठवण येत असे पण तिला आत्तातरी फक्त तिचा अभ्यास आणि करीयरच महत्वाचे होते. बघता बघता कॉलेज संपले आणि आता ते तिघे प्रतापरावांना त्यांच्या कामात, कारखान्यात मदत करू लागले. सियाने अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या तर रिया फक्त छोटे छोटे कामच करत होती. कारण मोठे निर्णय ती एकटी कधीच घेत नव्हती, निलेशला प्रतापरावांनी लोणावळ्याच्या कारखान्याची जबाबदारी सोपवली होती.

 

प्रतापरावांनी लोणावळ्यातील कारखान्याची जबाबदारी आता निलेशला दिली होती त्यामुळे बऱ्याचवेळा तो लोणावळ्यातच राहत असे, तिथे आता त्याची बऱ्याचलोकांशी ओळख झाली होती. पण आज तो खास रिया आणि सियाला भेटायला घरी आला होता त्याला कारण हि तसेच होते, आज त्या दोघींच्या पंचविसाव्व्या वाढदिवसानिमित्त प्रतापरावांनी घरी पार्टी आयोजित केली होती, त्यांचा हेतू होता कि आता रिया,सिया मोठ्या झाल्या आहेत त्यांचे कामही सुरु झाले आहे त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पुढचा विचार करायला हरकत नाही, त्यांच्या ओळखीत असलेल्या मुलांना त्या भेटल्या, त्यांना कुणी आवडले तर प्रतापरावांनाहि पुढे विचार करायला वेळ मिळणार होता त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी अनेक लोकांना आमंत्रित केले होते. त्यातच एक होते प्रतापरावांचे कॉलेज मधील जुने मित्र हिरामण, जे अनेक बिझनेस मिटिंगमुळे त्यांच्या आणि आता रिया-सियाच्या संपर्कात येत होते. ते देखील त्यांच्या मुलासोबत या पार्टीसाठी आलेले होते, सगळे लोक गप्पा मारत पार्टीचा आस्वाद घेत होते, इतक्यात रिया आणि सिया अगदी एकसारख्या तयार होवून त्याठिकाणी आल्या आणि म्हणाल्या “ बाबा, सांगा बर… आमच्यात कोण रिया आणि कोण सिया ?”, सगळे लोक गोंधळून प्रतापारावांकडे बघू लागले पण ते स्वतः, बबन, आणि निलेशही त्यांना कोण रिया आणि कोण सिया ते ओळखून सांगू शकत नव्हते. इतक्यात जमलेल्या लोकांमधून एक आवाज आला “ मी सांगू शकतो… उजव्या बाजूची सिया आणि डाव्या बाजूला रिया …. बरोबर ना?”  सगळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले, “ संजीव!!!!!!” सिया आनंदाने म्हणाली …. “ तू इथे?..... किती छान सरप्राईज दिलस आणि हो …. अगदी बरोबर ओळखलस तू आम्हाला..” रीयालाही त्याला बघून आश्चर्य वाटल आणि त्याहून जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं कि जी गोष्ट त्यांचे वडीलहि नाही ओळखू शकले ती संजीव ने कशी ओळखली….! तिने संजीवला तसे विचारले, तर तो म्हणाला कि ते माझे सिक्रेट आहे आणि नेहेमीप्रमाणे तिच्याशी फक्त छान हसला…. इतक्यात हिरामण पुढे आले आणि ते प्रतापराव आणि सिया-रियाला म्हणाले “ हा माझा मुलगा, संजीव…. आणि हे तर उत्तमच झाले कि सिया -रिया आणि संजीव एकमेकांना ओळखतात … माझ पुढचं काम सोप्प झाल. पार्टी संपल्यावर हिरामण, प्रतापराव, बबन, निलेश, संजीव आणि सिया-रिया एका सोफ्यावर बसून गप्पा मारत होते, इतक्यात हिरामणरावांनी विषय काढला , ते म्हणाले,” प्रताप, तू मला आधीपासून ओळखतोस, माझा बिझनेस तसा चांगला सुरु आहे, संजीवहि त्यात मला मदत करतो पण जेव्हा मी तुझ्या मुलींना काम करतांना बघतो त्यावेळी मला अस वाटत कि जर त्यांच्यापैकी कुणीही माझ्या घरी सून म्हणून आली तर ती माझ्या संजीवला तर सांभाळेलच पण माझा बिझनेसहि अजून पुढे नेईल… आणि शिवाय कधी अडचणीत तुझी मदतही मला हक्काने मागता येईल……” आणि ते हसू लागले. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले पण संजीव तर उडालाच…. त्याला काहीही कल्पना न देता हिरामणने हा प्रस्ताव मांडला होता. प्रतापरावांना खूप आनंद झाला कि इतक्या चांगल्या मुलाचं स्थळ स्वतःहून मुलींसाठी चालत आले. ते म्हणाले कि माझ्या मुलींना मान्य असेल तर माझी काहीच हरकत नाही. त्याचं हे बोलण ऐकून सिया शांत होती पण रिया मात्र अस्वस्थ झाली आणि नीलेशकडे भरल्या डोळ्यांनी बघू लागली, तोही अवस्थ वाटत होता त्यामुळे न राहून ती म्हणाली,  “ बाबा…. मी तुम्हाला कधी सांगितलं नाही पण माझ निलेशवर खूप प्रेम आहे, आणि त्याचही माझ्यावर तेवढच प्रेम आहे अशी मला खात्री आहे पण संकोचून तो हे कधीही मला सांगणार नाही… पण आता मी त्याच्या बोलण्याची वाट पाहू शकत नाही … आज हिरामण काकांनी इतक्या सहजपणे हा प्रस्ताव तुमच्यापुढे ठेवला, उद्या अजून कुणी येईल, आणि कदाचित तेव्हा तुम्ही माझ काही ऐकून न घेता निर्णय घेतला तर मात्र माझ्यावर पश्चातापाची वेळ येईल म्हणून मी आज हे बोलत आहे…. तुमची परवानगी मिळाली तरच मी निलेशशी लग्न करेल पण जर तुम्ही नाही म्हणालात तर मी तुमच्या इच्छेविरुद्धच काय पण मग कुणाशीही लग्न करणार नाही. आयुष्यात पहिल्यांदाच रियाने सियाला न विचारता एखादा निर्णय घेतला होता आणि तो हि तिच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय होता. तीच बोलण ऐकून सगळे अवाक्क झाले, स्वतःला सावरत प्रतापरावांनी सियाकडे बघितले, तिने हातानेच त्यांना शांत राहायला सांगितले , आणि हिरामण कडे बघून बोलू लागली, “काका रियाने तिचा निर्णय सांगितला, मी, बाबा रिया, बबनकाका आणि निलेश मिळून पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवूच पण आत्ता जर संजीवला मान्य असेल आणि बाबांनी परवानगी दिली तर मी संजीवला साथ द्यायला तयार आहे.” आता पुन्हा संजीव उडाला कारण सिया कुठलाच निर्णय पूर्ण विचार केल्याशिवाय घेत नसे हे त्याला माहित होते, पण आत्ता समोर आलेल्या आणि पूर्ण आयुष्य अवलंबून असलेल्या प्रस्तावावर तिने लगेच शिक्कामोर्तब केले होते. हे सगळ बोलण ऐकून हिरामण आणि बबनला खूप आनंद झाला होता मात्र प्रतापराव थोडे शांत-शांत होते, ते सगळ्यांकडे बघून म्हणाले, “ माझ्या दोन्ही मुलींनी त्यांचा निर्णय सांगितला आहे पण मी काही निर्णय देण्या पूर्वी माझी एक आत सांगतो कि लग्नानंतर माझ्या संपत्तीवर माझ्या जावयांचा काही अधिकार असणार नाही , माझ्या मुली माझी संपत्ती फक्त स्वतःसाठी वापरू शकतील, पण त्यालाही काही बंधन असतील, फक्त पैश्यांसाठी माझ्या मुलींशी कुणी लग्न करू नये तसेच त्यांना फसवू नये म्हणून हा उपाय मी करत आहे, तसे कागदपत्र हि मी बनवत आहे, त्यामुळे सर्वांनी पुन्हा विचार करा आणि मग आपले निर्णय सांगा”. त्याचं बोलण ऐकून सिया रिया समाधानी दिसत होत्या. सिया सर्वांचे चेहेरे वाचण्याचा प्रयत्न करत होती हिरामण आणि बबन जरा उदास वाटले, संजीव आणि निलेश वर या बोलण्याचा काही परिणाम दिसत नव्हता. हिरामण आणि संजीव घरी जाण्यास निघाले , संजीव सियाला थोड थांबवून म्हणाला, “ सिया… तू कस लगेच हो म्हणून सांगितलस…तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाही.. आणि असही माझ्या बाबांनी या गोष्टीची मला कल्पनाही दिली नव्हती, नाहीतर मी त्यांना अस बोलूच दिल नसत… माझ कॉलेज मध्ये असतांना एका मुलीवर खूप प्रेम होत, पण तीच दुसऱ्या मुलावर प्रेम असल्यामुळे मी कधीच तिला माझ्या मनातले सांगितले नाही, तुला मला अंधारात ठेवायचे नाही कारण मी तिला अजूनही विसरलो नाहीये, त्यामुळे तू परत विचार कर आणि निर्णय घे” सिया त्याला म्हणाली, “ मला आणि रियाला तू पार्टी मध्ये अगदी बरोबर ओळखलेस कि जे फक्त आमची आईच ओळखत होती, मग तूच सांग असा जोडीदार मी कसा नाकारू…. आणि राहील तुझ्या भूतकाळाच तर मी तुला वचन देते कि तुला तुझ्या हक्काच प्रेम मी नक्की देईल.” तीच बोलन ऐकून संजीव फक्त उदास हसला आणि निघून गेला. रात्री सिया आणि रिया ने आपापल्या निर्णयाबद्दल एकमेकींना विचारले तर दोघींना जाणवले कि त्यांचा निर्णय एकमेकींना अजिबात मान्य नव्हता, सियाला निलेशबद्दल विश्वास वाटत नव्हता कि तो रियाला नेहेमी सुखात ठेवेल, तर रियाला वाटत होत कि संजीव सियाशी प्रतारणा करेल,  आपापल्या मनाशी काहीतरी ठरवून त्या झोपी गेल्या.

 

दुसऱ्या दिवशी रिया उठली तेव्हा सिया घरात नव्हती, प्रतापरावांना तिने विचारले तर ते म्हणाले कि सियाला काहीतरी महत्वाचे काम होते म्हणून ती सकाळीच ऑफिसला गेलीये. त्यानंतर स्वतःचे सगळे आवरून प्रतापराव आणि रिया सुद्धा ऑफिसला पोहचले पण सिया तिथे नव्हती, रियाने तिला फोन केला, कॉल लागला पण काहीच आवाज येत नव्हता, तिने पुन्हा प्रयत्न केला पण आता तिचा फोन कव्हरेज क्षेत्राबाहेर येत होता, त्यांनी भीमा शिपायाकडे विचारणा केली तर तो म्हणाला कि ती सकाळीच आली होती ऑफिसमध्ये, तिने कुठल्यातरी दोन-तीन फाईल बघितल्या आणि ती संजीवच्या ऑफिस मध्ये जातेय अस सांगून निघून गेली. हे ऐकून रिया आणि प्रतापराव जरा विचारात पडले कि सिया सकाळी सकाळी संजीवच्या ऑफिसला का गेली? त्यांनी संजीवला फोन केला तर तो म्हणाला कि ती आली तेव्हा मी ऑफिस मध्ये नव्हतो, त्यामुळे ती निघून गेली आणि निलेशला फोन करून विचारले पण आपल्याला काहीच माहित नाही असे त्याने सांगितले. त्यानंतर एक-दीड तासात प्रतापरावांना एक फोन आला, त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनला बोलावलं होत, रिया आणि ते लगेच तिथे पोहचले. तर तिथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना बसायला सांगून त्यांच्या समोर काही तुटलेल्या, अर्धवट जळलेल्या वस्तू ठेवल्या आणि तुम्ही या ओळखतात का म्हणून विचारले…. “हि पर्स, ऑफिस बॅग हे तर सियाच आहे पण हे सगळं अशा अवस्थेत आणि तुमच्याकडे कसं?” रियाने विस्मयतेने विचारले… ते अधिकारी म्हणाले, “प्रतापराव थोड धीराने ऐका, काही वेळापूर्वी लोणावळा पोलिसांनी आम्हाला या अपघाताची माहिती सांगितली, एक गाडी आपल्या शहराच्या दिशेने येत असतांना मागून भरधाव येणाऱ्या एका दुसऱ्या गाडीने तिला टक्कर दिली, तो रस्ता घाटाचा असल्यामुळे आणि गाडीचा वेग जास्त असल्यामुळे पुढची ती गाडी सरळ खोल दरीत जावून पडली, हा अपघात इतका भीषण होता कि गाडीने खाली पडल्यावर पेट घेतला, गाडी पूर्णपणे जळली आहे, गाडी चालकाची बॉडी देखील ओळखू येत नाहीये, या वस्तू गाडीजवळ सापडल्या, गाडीच्या नंबर वरून आम्ही माहिती काढून तुम्हाला फोन केला. मागून टक्कर देणारी ती गाडी अपघात ठिकाणावरून लगेच पसार झाली पण लोणावळा पोलीस पुढचा शोध घेत आहेत.” हे सगळ ऐकून आणि त्या सगळ्या जळलेल्या वस्तू बघून प्रतापरावांना आणि रियाला खूप मोठ्ठा धक्का बसला, रियाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तर प्रतापरावांच्या डोळ्यापुढे अचानक अंधारी आली, त्यांना पोलिसांनी लगेच पाणी प्यायला दिले. रिया आणि प्रतापरावांना आता अश्रू आवरत नव्हते, सगळं होत्याचं नव्हतं झाल होत, काल पर्यंत आपल्यात असणारी, हसणारी, बोलणारी सिया आता आपल्यात नाही याचा कुणालाच विश्वास वाटत नव्हता. प्रतापराव तर पूर्णपणे खचले होते, मात्र रिया त्यांना सावरण्यासाठी खंबीरपणे वावरत होती. त्यांची काळजी घेत होती, ऑफिस सांभाळत होती, खरतर सिया तिच्यासाठी फक्त बहिणीपेक्षा खूप काही होती पण आत्ता तिला कणखरपणे वागणं गरजेच होत, नाहीतर प्रतापराव अजूनच कोलमडले असते. हि बातमी आल्यापासून निलेश सतत रीयासोबतच राहत होता, तो आणि बबनहि प्रतापरावांची काळजी घेत होते. दोन – तीन दिवसांनी हिरामण आणि संजीव त्यांना भेटायला आले होते. त्यांच्या सोबत संजीवचा एक मावसभाऊ ‘राघव’ देखील होता. तिथे रिया, प्रतापराव, बबन आणि निलेश सर्वच होते, त्यावेळी प्रतापराव आपल्या मित्राजवळ खूप रडले, हिरामणने त्यांचे सांत्वन केले, इतक्यात तिथे ऑफिसचा अकौंटंट आला, आणि प्रतापरावांना म्हणाला, “माफ करा साहेब, मी अशावेळी आलो, आम्ही सर्वजण तुमच्या या प्रसंगात तुमच्या सोबत आहोत, पण कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे पगार थकीत आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीये त्यामुळे जर तुम्ही या चेक वर सही केलीत तर मला त्यांचे पगार देता येतील म्हणून मी आलो, माफ करा.” प्रतापराव त्याला म्हणाले, “ कामगारांमुळेच तर आज आपलं ऑफिस आहे, जे झाले त्यात त्यांचा काय दोष, त्यांची मुले-बाळे उपाशी असतील, त्यांचे कुटुंब आपल्यावर अवलंबून आहेत, आण तो चेक इकडे मी सही करतो.” त्यांनी चेक न बघताच सही केला, हि गोष्ट संजीवच्या लक्षात आली, अकौंटंट गेल्यावर संजीव प्रतापरावांना म्हणाला, “काका तुम्ही थोडे दिवस आराम करायला हवा, ऑफिसची सगळी जबाबदारी आता रियाला घेवू द्या. तिला सह्यांचे अधिकार द्या”. हे ऐकून रिया थोडी घाबरली पण आता तिच्या वडिलांसाठी तिला हे काम करावच लागणार होत, आणि तयार झाली, जातांना संजीव तिला म्हणाला, “रिया एक बिझनेसमन म्हणून तुला सांगतो, कुठलाही कागद वाचल्याशिवाय त्यावर सही करू नकोस. कुठलाही निर्णय घेताना घाबरू नकोस, सिया नेहेमी तुझ्या आसपास आहे हे लक्षात ठेव, तुला कधी काही मदत हवी असेल तर नक्की सांग”. आज पहिल्यांदा तिला संजीवच्या बोलण्यात आपलेपणा जाणवत होता, तिने त्याला मानेनेच होकार दिला. आता निलेशने लोणावळ्याच्या कारखान्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवली होती, तो आता रीयासोबत तिच्या मदतीसाठी ऑफिसमध्ये येत होता.निलेशने लवकरात लवकर सगळी धावपळ करून सर्व कागदपत्र तयार केले, प्रतापरावांनी त्यावर सह्या केल्या आणि रियाला ऑफिस विषयक सर्व अधिकार प्राप्त झाले. दुसऱ्याच दिवशी निलेश काही कागद तिच्याकडे सह्यांसाठी घेवून आला, जशी ती कागद वाचू लागली तो तिला म्हणाला कि मी हे सर्व वाचलंय, सर्व बरोबर आहे, तू फक्त सह्या कर. पण रिया त्याला म्हणाली,” नाही निलेश, आता माझ्यावर संपूर्ण ऑफिस ची जबाबदारी आहे, बाबांनी ती खूप विश्वासाने मला दिलीये, त्यामुळे सगळ काम मी त्याच पद्धतीने करणार ज्या पद्धतीने बाबा आणि सिया-दि करायचे.” तीच बोलण ऐकून निलेश हसून म्हणाला, “सियाने छान तयार केलाय तुला, मला आनंद झाला”, त्याने ते सर्व कागद उचलले आणि तिला म्हणाला, “मी येतो थोड्या वेळाने, अजून काही पेपर्स आहेत, ते सगळे वाचून मग एकदम सह्या कर तू.” तिला जरा आश्चर्य वाटल. ऑफिसमधून घरी आल्यानंतर प्रतापरावांनी तीला सांगितलं कि संजीव आज पुन्हा आला होता त्यांना भेटायला, त्याचा भाऊ पण सोबत होता, राघव, छान बोलका मुलगा आहे, मी जरा उदास होतो म्हणून त्याने मी नको म्हणत असतांना हट्टाने आत जावून स्वतःच्या हाताने माझ्यासाठी आणि बबनसाठी कॉफी बनवून आणली, बऱ्याच वेळ बसले ते, माझा वेळही चांगला गेला. रियाला हे ऐकून छान वाटले कि तिच्या बाबांचा वेळ त्यांच्यामुळे छान गेला. आता सियाला जावून पंधरा दिवस झाले होते. रियाला त्यांच्या घराच्या आजूबाजूला काही नवीन माणसे फिरतांना दिसू लागली होती, काही भाजीवाले उगाच त्यांच्या घराच्या आसपास खुपदा भाजी विकत, एक-दोन भिकारी तिथे फिरतांना दिसत, संजीव आणि राघव दिवसाआड घरी येत होते. कधी कुणी पत्ता विचारायला तर कुणाच पार्सल चुकून त्यांच्या घरी येत होत.

या सगळ्यामागे काही खास कारण होत का, सियाने रियाचे रक्षण करण्याचे, तिची साथ देण्याचे वचन दिले होते त्याचे पुढे काय होणार……….

आज सकाळी रिया ऑफिस मध्ये आल्यानंतर लगेच निलेश हातात काही फोल्डर्स घेवून आला होता, सोबतच त्याने एक डीश, सुरी आणि सफरचंद आणले होते. तो रियाला म्हणाला,” तू तुझ्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीस, तू हे कागद एकदा वाचून घे, आणि सह्या कर, तोवर मी तुझ्यासाठी हे सफरचंद कापतो”. रियाला खूप समाधान वाटल कि निलेश तिची किती काळजी घेतो. कागद वाचून झाल्यावर ती सह्या करणार इतक्यात निलेश जोरात विव्हळला, तिने पहिले तर त्याच सफरचंद कापतांना बोट चिरल होत, बरीच जखम झाली होती, खूप रक्त येत होत, ती पटकन उठली, वॉशरूम मध्ये असलेले प्रथमोपचाराचे किट घेवून आली, त्याच्या बोटाला मलम लावून पट्टी लावली आणि पुन्हा कागदांवर सह्या करण्यासाठी खुर्चीवर बसली, निलेश म्हणाला, “माझ्यामुळे तुझा वेळ वाया गेला, आता मी पटकन कागद उलटे करतो तू पटापट सह्या कर.” काम झाल्यावर, “मी जरा बाहेर जाणार आहे,थोड काम आहे.” अस बोलून तो कागद घेवून निघून गेला. संध्याकाळी सहा वाजता तिला प्रतापरावांचा फोन आला, ते म्हणाले, “अग रिया, आपल्याकडे संजीव आला आहे आणि आज हिरामणचा वाढदिवस आहे अस म्हणतोय, हिरामण चा मी जुना मित्र आहे म्हणून आग्रहाने त्याने मला घरी जेवायला बोलावले आहे, , फक्त त्याच्या घराचे,मी, आणि बबन बस इतकेच जण आहेत अस म्हणतोय, मी नाहीच म्हणतोय पण हा ऐकताच नाहीये” रिया म्हणाली, “बाबा तुम्ही नक्की जा, तुम्हालाही बर वाटेल आणि हिरामण काकानासुद्धा, बबनकाकांनाही घेवून जा.मी आणि निलेश घरीच जेवू”. प्रतापराव म्हणले, “ठीक आहे, मी सोबत घराची चावी घेवून जातो, तू दमून येशील त्यामुळे जेवण झाल कि तू झोप, आमची वाट पाहू नकोस.” ती ऑफिस मधून घरी आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते, त्यांच्या स्वयंपाकी काकूंनी जेवण बनवलं होत, रियाला सांगून त्या निघून गेल्या. रिया पुढचे दार लावून फ्रेश व्हायला गेली तर तिला दरवाजा उघडल्याचा आवाज आला, कदाचित निलेश आला असेल म्हणून ती तिच्या रूम च्या बाहेर आली तर कुणीच नव्हते, भास झाला असेल म्हणून तिने पुन्हा एकदा दरवाजा चेक केला आणि ती रूम मध्ये जावून जेवणासाठी निलेशची वाट बघत एक मासिक चाळू लागली. थोड्या वेळाने तिला परत तसाच आवाज आला, ती पुन्हा बाहेर आली पण कुणीच नव्हते, आता दहा वाजत आले होते… तिने निलेशला फोन केला तर तो म्हणाला कि त्याला अजून वेळ आहे घरी यायला, तू जेवून घे, त्याने प्रतापराव आणि बबन झोपले का म्हणून विचारले, तर तिने ते हिरामण काकांकडे गेले असल्याचे सांगितले. फोन ठेवून ती डायनिंग टेबलकडे जायला वळली, आणि कुणीतरी मागून गेल्याचा तिला भास झाला, एक क्षण ती घाबरली, तिने आजूबाजूला बघितलं पण कुणीच नव्हत, खरतर त्या क्षणी ती घरात एकटीच होती, पण तिला सारख अस वाटत होत कि घरात अजून कुणीतरी आहे, कसबस आपल जेवण पूर्ण करून ती आपल्या खोलीत गेली,तिने झोपायचा प्रयत्न केला पण तिला झोपच येत नव्हती, आज सियाची खूप प्रकर्षाने आठवण येत होती तिला, वडिलांसमोर धीराने वागतांना आपले अश्रू लपवावे लागत होते, पण आज एकटी असताना खूप रडू येत होत तिला, इतक्यात बाहेर गाडीचा आवाज आला मागोमाग घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला, तिला वाटल तिचे बाबा आणि बबनकाकाच आले, ती पटकन आपले रडलेले डोळे आणि चेहरा धुवायला वॉशरूम मध्ये गेली, रूम बाहेर आली तर घरात कुणीच नव्हते, इतक्यात फोन वाजला, पलीकडून प्रतापराव बोलत होते, “ अग रिया, आपला ड्रायव्हर रामू, तो मला काही न सांगताच गाडी घेवून निघून गेला, हिरामणचा ड्रायव्हर हि नाहीये, आणि संजीव, राघव दोघेही घरी नाहीयेत, त्यामुळे आज आम्हाला इथेच मुक्काम करावा लागेल, तू झोप, आम्ही उद्या सकाळी येतो घरी.” फोन हो म्हणून रियाने फोन ठेवला, खिडकीतून बाहेर बघितले तर त्यांचीच गाडी बाहेर उभी होती, पण मग दरवाजा कुणी उघडला? हा विचार ती करत असतांनाच पुन्हा एकदा फोन वाजला… पलीकडून निलेशचा आवाज आला, तो म्हणाला, रिया मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, मी घरी येतोय दहा मिनिटात, बाबा आणि काका झोपलेत का?, रियाने त्याला सांगितलं कि ते आज हिरामण कडे मुक्कामी थांबणार आहेत म्हणून. त्याने ठीक आहे, पण तू जागी राहा, आपण बोलू अस म्हणून फोन ठेवला. आणि मागे वळली तर पुढच दृश्य डोळे विस्फारून पाहू लागली, तिच्या समोर साक्षात सिया उभी होती, डोळे थोडे खोल गेलेले, डोळ्यात पाणी दाटून आलेलं, हात थरथर करत होते, एकमेक्कींना बघून त्यांच्या ओठातून शब्द फुटत नव्हते, अखेर रिया हळूहळू पुढे जात रडत रडत तिला म्हणाली….. “सिया-दि…. सिया-दि.. तू कुठे होतीस.. तू खरच आलीयेस ना परत कि मला भास होतोये.. बोल ना… तू माझी सिया-दि च आहेस ना????” आणि तिला बिलगून जोरजोरात रडू लागली.. सियालाही खूप रडू येत होते पण तिने स्वतःला सांभाळले आणि रियाचा हात पकडून तिला पटकन आपल्या रूम मध्ये घेवून गेली, तिथे जावून तिने रीयाचा ड्रेस घातला, आणि रियाला म्हणली, “चल माझ्यासोबत, आपल्याकडे वेळ नाहीये, आत्ता तुला जे दिसेल ते फक्त शांतपणे, कुठलाही आरडओरडा न करता बघ…” अस बोलून ती तिला स्टोर रूम मध्ये घेवून गेली, तिथे बसवलेला छोटा स्क्रीन आणि स्पीकर तिने ऑन केला, रियाला काहीच काळात नव्हत, काय सुरु आहे? ती सारखी सियाला विचारात होती पण सिया फक्त पटापट हालचाली करत होती, आणि अचानक रियाला न सांगताच ती रूम बाहेर पडली आणि बाहेरून रूमची कडी लावून घेतली, रिया जोरजोरात दरवाजा वाजवत होती, पण सियाने दरवाजा उघडला नाही,, इतक्यात रियाला स्क्रीनवर बैठकघरातले दृश्य दिसू लागले, सिया एक मासिक घेवून खुर्चीवर बसली होती, आणि पुढच्या सेकंदाला घराचा दरवाजा उघडला गेला, तिथून निलेश, ऑफिसचा शिपाई भीमा, आणखी अगदी भक्कम शरीरयष्टी असलेले तिघेजण घरात आले, सियाने त्यांच्याकडे विस्मयतेने बघितले, इकडे रीयालाही स्क्रीन वर सगळे दिसत असल्याने, निलेश इतक्या रात्री या सगळ्यांना घेवून का आला हा प्रश्न तिला पडला, काही कळायच्या आताच भीमाने सियाचे मागून हात पकडले, आणि सोबत आणलेल्या दोरीने बांधले, इकडे दुसऱ्या माणसाने तिच्या तोंडात कापडाचा बोला घुसावला, आणि निलेश तिच्या समोर बंदूक घेवून उभा राहिला, छद्मीपणे हसत तो तिला म्हणाला, “ रिया, रिया…. माझी प्रेमळ आणि बावळट रिया, तुला आठवत? कॉलेजमध्ये एकदा मी म्हणालो होतो कि वेळ आली कि माझ्या प्रेमाविषयी सांगेल .. मग ऐक, माझ प्रेम म्हणजे पैसा, पैसा आणि फक्त पैसाच… त्यासाठीच इतकी वर्ष मी तुझा आणि तुझ्या बाबांचा विश्वास मी जिंकत राहिलो, ऑफिस मध्ये भीमा सारखी माझी माणस तयार केली, लोणावळ्यात ओळखी वाढवून असे मित्र बनवले जे पैश्यांसाठी काहीही करू शकतील, पण त्यादिवशी तुझ्या बाबांनी सांगितलं कि ते तुझ्या नवऱ्याला त्यांची काहीच संपत्ती देणार नाहीत….. मग तुझ्याशी लग्न करून माझा काय फायदा… आता पुढे काय करू हा विचारच करत होतो तेव्हा मला भीमाचा ऑफिस मधून फोन आला कि तुझी लाडकी बहिण सिया ने लोणावळ्याच्या त्या कारखान्याचे अकौंटं चेक केले आहेत, ज्यात मी खूप पैसा खाल्ला होता… मी घाबरलो, आता हि माझ बिंग म्हाताऱ्याजवळ फोडणार अस मला वाटल, म्हणून मी भीमाला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, ती तिथून सरळ संजीवच्या ऑफिस मध्ये गेली आणि तिथून लोणावळ्याच्या दिशेने निघाली असा निरोप मला भीमाने दिला, मी माझं प्लानिंग तयार केल, ती लोणावळ्यात शिरण्याच्या आधीच तिला रस्त्यातून हटवायच… आम्ही लांबून तिच्यावर लक्ष ठेवून होतो, तिची लाल कार लांबून दिसली आम्हाला, आम्ही सर्व एक मोठा ट्रक घेवून तिचा अपघात घडवून आणण्यासाठी तयार होतो….. पण तिची कार मधेच थांबली, आणि एक-दोन मिनिटातच ती टर्न घेवून पुन्हा शहराच्या दिशेने वेगाने जावू लागली, मला सगळच बिघडताना दिसत होत , मी वेळ न घालवता माझ्याच गाडीने तिच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. आणि एका ठिकाणी तिच्या गाडीला मागून जोरात टक्कर दिली आणि ती पार ढगात उडून गेली…”… हे बोलून तो पुन्हा मोठ-मोठ्याने हसायला लागला……. रियाला सगळ ऐकून खूप मोठा धक्का बसला, ती खूप रडू लागली… इकडे सियाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. निलेश पुढे बोलू लागला, “आता मी तुमच्या सोबतच राहून सगळी संपत्ती माझ्यानावावर करून तुम्हाला दोघांना मार्गातून दूर करणार होतो, आणि जेव्हा तुला सह्यांचे अधिकार मिळाले मला खूप आनंद झाला कारण तुझा माझ्यावर खुप विश्वास होता त्यामुळे तुझ्या सह्या घेण मला सोप्प होत, मी तसे कागदपत्र बनवून आणले पण तू ते वाचून सही करण्याचा हट्ट केलास त्यामुळे मी आज नवीन शक्कल लढवली, सकाळी मुद्दाम माझ बोट कपाळ, आणि तू जेव्हा फर्स्ट-एड बॉक्स आणायला गेली तेव्हा मी वरचा कागद तसाच ठेवून खालचे कागद बदलले, आणि तू सह्या केल्यास, ऑफिस चे सगळे हक्क मला मिळाले, त्यात एक कागद तुझी सुसाईडनोट होती ज्यात तू तुझ्या बहिणीच्या दुक्खात आत्महत्या करत आहेस अस लिहिलंय, मी आज दिवसभर त्याच कामात तर फिरतोय किती वेळ, मी विचार केला होता कि त्या दोन म्हाताऱ्यांना त्यांच्या खोलीत कोंडून मग हे काम कराव पण त्यांनी तर आधीच बाहेर राहून माझ काम सोप्प केल …. आता तू घराच्या टेरेस वरून उडी मार म्हणजे मग मी रडायला मोकळा…” आणि तो पुन्हा छद्मीपणे हसायला लागला…. इकडे रिया खूप घाबरली कि आता तो सियाला जिवंत सोडणार नाही, ती मोठ्याने ओरडू लागली पण तिचा आवाज बाहेर ऐकू येत नव्हता, पण इतक्यात चमत्कार झाला……. कुठून तरी अचानक निलेशवर आणि त्याच्या साथीदारांवर काही माणसांनी हल्ला केला, एकाने  भीमावर हल्ला चढवला, इतर दोघां-तिघांनी बाकीच्या तिघांना खाली पाडल, सियानेही तिच्या पायांनी निलेशच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली आणि त्याला खाली पाडल आणि लगेच आपल्या गुडघ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला केला, कुणीतरी पडलेल्या निलेशला मागून धरल आणि त्याचे हात बांधले, त्या सगळ्यांवर बंदुका ताणल्या गेल्या आणि त्यांना अटक झाली, इकडे रियाला काही कळतच नव्हते काय होतंय…..तिने निट बघितले तर सियाच्या मदतीसाठी संजीव आणि राघव आले होते, त्यांच्या सोबत अजून काही माणसे होती….. इतक्यात कुणीतरी रियाच्या रूमचा दरवाजा उघडला, ती धावत पुढच्या रूम मध्ये आली, आणि सियाला जावून बिलगली, “ तू ठीक आहेस ना सिया-दि, तुला लागलं नाही ना कुठे….” अस म्हणत रडू लागली, इकडे निलेशचे डोळे मात्र पांढरे झाले, म्हणजे सिया जिवंत आहे???? त्याला काहीच कळत नव्हते, रियाने निलेशच्या गालात जोरात एक चापट मारली ,इतक्यात राघवने बाकीच्या माणसांना सांगितले, “चला रे यांना पोलीस स्टेशन ला घेवून चला..”…      

सकाळीच प्रतापराव, बबन, हिरामण, संजीव घरी आले होते, रिया आणि सिया सोफ्यावर एकमेकींचे हात घट्ट धरून बसल्या होत्या. बबन मन घाली घालून एखाद्या अपराध्याप्रमाणे एका बाजूला खुर्चीत बसले होते. सगळे सियाकडे प्रश्नार्थक नजराणे पाहत होते कि नक्की काय झाल होत? अपघातात तर एक मृतदेह गाडीत जळलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता…. मग सिया परत आली कशी? सियाने सांगायला सुरुवात केली, “बाबा, मी त्या दिवशी सकाळी लवकर ऑफिसला गेली, कारण कुणी नसतांना मला अकाऊंटच्या काही फाईल्स चेक करायच्या होत्या, कारण निलेश लोणावळ्याच्या कारखान्याच्या कामात काहीतरी फेरफार करत असल्याची कुणकुण मला लागली होती, आणि रियाने आदल्या रात्री जाहीर केल होत कि तिला निलेश सोबत लग्न करायचं आहे, त्यामुळे मी ठरवलं कि जर काही गडबड असेल तर निलेशला जरा समजावून सांगू आणि मग त्याच वागण बघून रिया आणि त्याच्या लग्नाविषयी विचार करू, मी घरातून निघाल्यावर संजीवला लोणावळ्याला सोबत घेवून जाण्याचा विचार करून त्याला तसा निरोप दिला, तो म्हणाला कि तू माझ्या ऑफिसला ये, तिथून आपण सोबत जावू, म्हणून आपल्या ऑफिसमधून त्याच्या ऑफिसला गेले, तो अजून आला नव्हता म्हणून मी वाट बघत त्याच्या केबिनमध्ये जावून बसले, तिथे माझी नजर टेबलवर ठेवलेल्या त्याच्या डायरी वर पडली, तसा तर मी कधीच त्याच्या पर्सनल डायरीला हात लावला नसता पण त्यातून आमचा कॉलेज मधला एक फोटो बाहेर आलेला होता, म्हणून तो नीट आत ठेवण्यासाठी मी ती उचलली आणि त्यातून तसे अनेक फोटो चुकून खाली पडले, ते सगळे रियाचे फोटो होते, आणि जे ग्रुप फोटो होते त्यातून फक्त रियाचा फोटो कापून तो जपून ठेवला होता… त्यावरून मला कळल कि संजीवच कॉलेज मध्ये ज्या मुलीवर प्रेम होत ती दुसरी तिसरी कुणी नाही तर रियाच होती, पण तीच निलेशवर प्रेम आहे हे त्याला कळल्यावर त्याने रियाला स्वतःच्या प्रेमाची कबुलीच दिली नाही. हे सगळ बघून मला जरा वाईट वाटल आणि मी तशीच माझी गाडी घेवून त्याच्या ऑफिसमधून लोणावळ्याला जायला निघाले, मी लाल गाडी घेवून तिथे जात आहे हे भीमा शिपायाने निलेशला फोन करून कळवल आणि तो पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये कामावर आला, त्यामुळे माझ्यामागे संजीव त्याची गाडी घेवून निघाला हे त्याला माहित नव्हत, गाडीतून संजीव ने मला फोन केला आणि विचारलं कि तू एकटीच का निघाली आहेस, मी आलो आणि तुझी गाडी जातांना पाहिली म्हणून तुझ्या पाठोपाठ मीही निघालो, मला त्याचा थोडा राग आलेला होता, त्यामुळे मी त्याला सांगितलं कि आपण वेगवेगळ्या गाड्या घेवून जावू म्हणून आणि फोन ठेवला. लोणावळ्याला पोहचायला काहीच अंतर राहिले असतांना वाटेत एका मुलीने, कॉलेजला जायची बस सुटली असं सांगून मला लिफ्ट मागितली, तिने तीच आय-कार्ड दाखवलं, मीही ते बघून तिला लिफ्ट दिली. थोड पुढे गेलो तर इतक्यात रियाचा मला फोन आला, पण फोनला रेंज नव्हती त्यामुळे मला काहीच ऐकायला आल नाही, आपण घरी काहीच सांगितलं नाही हे मला आठवलं म्हणून तुम्हाला फोन करण्यासाठी मी गाडी बाजूला थांबली आणि खाली उतरून कॉल लावला, तर त्या मुलीने चक्क माझी गाडी सुरु करून लगेच टर्न घेतला आणि मला काही कळायच्या आत गाडी घेवून ती सुसाट परत शहराच्या दिशेने निघाली, मी तिला जोर-जोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत होती इतक्यात पुढून संजीवची गाडी मला येताना दिसली…. मला बघून त्याने लगेच गाडी थांबवली, आणि आम्ही दोघे त्या मुलीचा पाठलाग करू लागलो, पण थोडाच वेळात मागून एक गाडी अगदी सुसाट आमच्यापुढे निघून गेली, ती गाडी निलेशची होती, आणि पुढच्या मिनिटाला त्याने माझ्या गाडीला मागून धक्का दिला आणि गाडी त्या मुलीसहित दरीत कोसळली. आमची गाडी जरा मागे होती त्यामुळे निलेशला गाडीत आम्ही आहोत हे दिसले नाही. संजीवने जागीच गाडी थांबवली, एक क्षण मला वाटल कि हे चुकून झालं निलेशकडून, पण नंतर तो आणि अजून दोघे गाडीतून उतरले, गाडी जळत असतांना पाहून त्यांनी एकमेकांना आनंदाने टाळ्या दिल्या आणि पुन्हा सुसाट वेगात निघून गेले. निलेश इतक्या खालच्या थराला जायील अस मला कधीच वाटल नव्हत पण त्याने हे सगळ केलय याचा आमच्याकडे काहीच पुरावा नव्हता, शिवाय त्याला जर हे कळल असत कि मी जिवंत आहे तर तो पळून गेला असता किंव्हा तुम्हाला काही अपाय करायचा त्याने प्रयत्न केला असता, त्यामुळे मी लपून राहायचं ठरवलं, प्रकरणाचे गांभीर्य बघून संजीवने त्याच्या मावसभाऊ राघवला बोलावून घेतले जो नाशिक क्राईमब्रांच मध्ये पोलीस ऑफिसर आहे, आम्ही त्याला सगळ सविस्तर सांगितलं आणि त्याने निलेशला पुराव्यासहित पकडण्यासाठी हा सापळा रचला. घराभोवती वेगवेगळ्या वेशात त्याने माणसे नेमली, ऑफिसमध्ये आपल्या विश्वासपात्र माणसांना हाताशी घेवून निलेशवर बारीक लक्ष ठेवले, त्याच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेतला, तुमचे सगळ्यांचे आणि ऑफिसचे सर्व फोन ट‌‍ॅप केले, संजीव आणि राघव घरी येवून स्क्रीन, स्पाय कॅमेरे ठिकठिकाणी लपवून गेले, काल रियाच्या त्या कागदांवर निलेशने सह्या घेतल्या आणि त्याने तिला संपवायचे ठरवले, दिवसभरात त्याने त्याच्या मित्रांना फोन करून जमवले, त्याच्या फोन वरून आम्हाला त्याच्या पुढच्या हालचालींविषयी समजले, म्हणून बाबा आणि बबनकाकांना सुरक्षिततेसाठी संजीव त्याच्या घरी खोट कारण सांगून  घेवून गेला आणि आपल्या ड्रायव्हरलाही त्यानेच गाडी घेवून परत पाठवून दिल, काल आम्ही रात्री हळूहळू असे घरात लपून बसलो, आणि निलेशने तुला मी येतो अस फोन करून सांगितल्यानंतर मी तुझ्या जागी थांबण्यासाठी तुझा ड्रेस घालून बसली आणि तुला रूम मध्ये लॉक केल. कारण तुझ रक्षण करण्याच मी वचन दिल होत ना, नंतर जे झाल ते रियाच्या समोरच झाल, तुम्हला मी जिवंत असल्याच सांगितलं असत तर निलेश सावध झाला असता आणी पळून गेला असता, म्हणून हे सगळ नाटक कराव लागल….. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला… मला माफ करा बाबा, रिया…” हे सगळ ऐकून बबन प्रतापरावांच्या पायाशी बसून छाती ठोकून रडू लागला, “माफ कर मित्रा मला, मी त्याला पैसा कामाव म्हणून सांगितलं पण तुझा असा विश्वासघात कर अस कधीच सांगितलं नाही, मी हि त्याच्या इतकाच तुमचा गुन्हेगार आहे ….. मला करा सिया-रिया…”. प्रतापराव म्हणाले, “अस नको बोलूस बबन , तू आमच्यासाठी अजूनही तोच जुना बबन आहेस.”  रिया म्हणाली, “सिया-दि, या सगळ्याला मी कारणीभूत आहे, मी जर निलेशशी लग्न करायचा विचार नसता केला तर हे सगळ झालाच नसत.” सिया म्हणाली,” नाही ग रिया, बाबांनी आधीच निलेशला त्या कारखान्याची जबाबदारी दिली होती, त्याने कुठल्याही मार्गाने का असेना पण शेवटी हेच केल असत…कारण त्याला पैसा हवा होता, आणि उलट नकळत तू माझ रक्षण केलस, तू तेव्हा मला फोन केला म्हणून मी गाडीतून खाली उतरले आणि वाचले नाहीतर कदाचित त्या मुलीने मला काही अपाय केला असता नाहीतर पुढे निलेश ट्रक घेवून उभा होताच. शिवाय तू प्रत्येक कागद स्वतः वाचून सही करणार होतीस त्यामुळे निलेशला पुढचा प्लान करायला वेळ लागला आणि आम्हाला आमचा प्लान आखायला वेळ मिळाला. तू आता सगळ विसर आणि संजीवच प्रेम स्वीकार कर. संजीव तुलाही मी वचन दिल होत ना कि तुला तुझ हक्कच प्रेम नक्की देईल, ते मी आज पूर्ण करत्येय.” संजीव म्हणाला, “ रिया, मी तुमच्या दोघीत फरक कसा ओळखतो माहित्येय? कारण तू हसत्येस तेव्हा तुझ्या डोळ्यात एक वेगळी चमक असते. फक्त पहिल्यांदा एकदा चुकलो होतो आणि सियाला रिया समजलो, पण त्यानंतर तुला ओळखायला मी कधीच चुकलो नाही, तू माझा स्वीकार करशील का? मी तुला भूतकाळाची कधीच आठवण होवू देणार नाही, वचन देतो तुला.” रिया म्हणाली “पण सिया-दि तुझ प्रेम आहे ना संजीव वर?” सिया तिला हसून म्हणाली, “मलाही असाच माझ्याकडे बघून ओळखणारा नक्की मिळेल एकदिवस रिया…. संजीव फक्त तुझाच आहे.”  इतक्यात “ मी आत येवू का?” अस म्हणत राघव आत आला,  “सिया, तुझ्या गुन्हेगारला पोलीस कोठडी मिळाली आहे, सर्व काही आपल्या नियंत्रणात आहे”.  रियाने आश्चर्याने राघवला विचारले कि तुम्ही कसं ओळखल कि हीच सिया आहे ते? राघव हसून म्हणाला, “मागचे जितके दिवस आम्ही सोबत होतो तेव्हाच मला कळल कि सिया जेव्हा आनंदी असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास असतो.. त्यावरून ओळखल.” त्याच हे बोलण ऐकून सगळे एकमेकांकडे बघून आनंदाने हसू लागले. सियाने हळूच राघव ला विचारले, तुमच लग्न झालय का? तिच्या या अनपेक्षित प्रश्नाने राघव खूप लाजला आणि नाही अजून अस म्हणाला आणि तिचा हात हातात घेवून म्हणाला, “ तू तुझे सगळे वचन आतापर्यंत पूर्ण केले आहेत. आज मी तुला कायम सोबत राहण्याचं वचन देवू इच्छितो, बोल, देशील मला साथ?”. सियाने प्रतापराव, संजीव आणि रीयाकडे बघितले त्यांच्या आनंदी डोळ्यांकडे बघत राघव  च्या हातात हात दिला, कायमसाठी.

समाप्त. कथा वाचण्यासाठी सर्व वाचकांचे मनापासून आभार.            

Circle Image

Kranti Bhoi Fulpagare

Laboratory scientific officer

I am kranti, working at health dept. I am here because I like to read and write stories.