प्रोफाइल पिक -भाग १

He finds an interesting profile picture of a girl resembling his ex girlfriend .

प्रोफाइल पिक- (भाग -) # मखमली  कवडसा

लेखिका - स्वाती  बालूरकर , सखी


विहान युट्युब स्क्रोल करत बसला होता.
खूप दिवसानंतर आज निवांत वीकेंड मिळाला होता, ऑफिसची काही काम घरी आणली नव्हती.

शिवाय एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बायको आणि मुलं तिच्या माहेरी गेले होते.
कितीतरी दिवसां नंतर तो असा एकटाच घरी होता .

सकाळपासून खूप वेळ पर्यंत त्याने निवांत लोळत वेळ घालवला.

बाहेरून नाश्ता आर्डर केला होता .
आता एखादा तास करमणूक करावी म्हणून सिनेमा बघण्याचा विचार आला .

पण आज बाहेर जायचे नाही असे त्यानेच ठरवले होते .

युट्युब सारखी करमणूक नहीं म्हणून बघायला लागला.

सहजच आवडती गाणी शोधायला लागला . मनात जुनी प्लेलिस्ट वाजत होती.

ह्ल्ल्लीच्या नवीं गाण्यांपैकी काहीच श्रवणीय असतात त्यामुळे पूर्वीची जुनी गाणीच नेहमी आवडायची, त्यातली गोडी कशी निराळीच असते.

त्याने प्लेलिस्ट उघडली आणि त्यात गझल फोल्डर !

किती तरी दिवसात त्याने हे क्लिक केलं नव्हतं. म्हणजे गाणे ऐकायला वेळ तरी मिळायला हवा की नको.

फोल्डर काढलं, अचानक व्हिडिओ प्ले झाला.

ते गाणं होतं

"और आहिस्ता कीजिए बातें, धडकने कोई सुन रहा होगा!"
"लफ़्ज़ गिरने न पाएँ होठोंसे. . . और आहिस्ता कीजिए बातें"

पंकज उदास यांच्या रेशमी आवाजातलं हळुवार गाणं.

ज्या क्षणी गझल ऐकली. . . कानावर पडली त्याक्षणी अनाहुतपणे तिचा चेहरा नजरेसमोर आला.

तो तिचा चेहरा आठवायला लागला. वासवी- त्याची बालमैत्रिण!

नजरेसमोर ती निरागस शाळेपासून पाहिलेली मैत्रिण दिसायला लागली. लांब केसांसाठी प्रसिद्ध असलेली. जेव्हा जेंव्हा हा विडिओ पहायचा त्यावेळी त्या हिरोईनला पाहून ही आठवायची.
तो विचारात गढला-
कुठे असेल आता ?
किती वर्ष झाले, तिची भेट नाही . . . . इतकंच काय तिला आठवायचं ही विसरलो मी , या जीवनाच्या धावपळीत असं वाटायला लागलं.

ती जीवनातून अलगद निसटून गेली.
त्याकाळी हे फोन किंवा सोशल मीडियाची सुविधा नव्हती.
एकदा माणसं आयुष्यातून गेली . . . की . . ती गेलीच.
आतापर्यंत गेल्या पाच वर्षात शंभर वेळा तरी विहानने तिचं नाव इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वर टाईप करून शोधण्याचा प्रयत्न केला होता.

पण ती कुठे सापडली नाही.

त्याचा एक गावातला मित्र म्हणायचा \"जगाच्या पाठीवर शाळा शिकलेला प्रत्येक माणूस फेसबुक वर सापडतो, ती पण असलच की कुठेतरी. . . शोध की मर्दा!\"

पण ती सापडली नाही.
नाव काय शोधायचं, लग्न तर झालं असेलच, आडनाव बदलले असेल पण नाव तरी?

पण जर नाव पण बदलले असेल तर ? आयुष्यभर ती सापडणारच नाही.

कसे समजू शकेल मला ? जुना एखादा धागा तरी?

शाळेचा वॉट्स अॅप ग्रुप बनला , कॉलेजचाही बनला पण ती कुठेच नाही.

तिला एकदा पाहण्याची इच्छा विहानच्या मनात जागली. . . या गाण्यानंतर तर अजूनच तीव्र इच्छा!

विहानच्या आयुष्यात कमी असं काहीही नसलं तरीही तिची आठवण त्या मनाच्या रेशमी कप्प्यात कुठेतरी दडलेली होती.

त्याने सुखाची जी स्वप्न तरूणपणी पाहिली होती त्या स्वप्नात नेहमीच जोडीदार म्हणून तिचा चेहरा होता.

आज त्या एका गाण्याने जणु रिलॅक्स होण्याऐवजी तो बेचैन झाला.

आज सगळी सुखं पायाशी लोळण घेतायत, ठरवलेली लक्ष्य पूर्ण झालीयत.

मुळात तो समाधानी वृत्तीचा माणूस होता, उगीचच पैशाच्या मागे धावणं त्याला रूचत नव्हतं आणि या बाहेरच्या रॅट रेस मधे तर तो कधीच नव्हता.

मनात अन अचेतन मनात तिचा तो सुटलेला हात आठवत होता. आता ती भेटूनही काय होणार होतं , पण एक हुरहुर राहून गेली होती.

तिच्या त्या वेगवेगळ्या मुद्रा , मोकळ्या लांब केसातल्या , शाळेतल्या दोन वेण्यांवरचा अन कॉलेजमधे असताना लांबसडक एक वेणी घालून मिरवणारी. . . मनातली रेखाच जणु!

बायको लेकरं घरी नसायला अन हा विचार यायला एकच वेळ झाली. त्याला खूप एकटं वाटायला लागलं.

अॅक्चुअली मानसिक उलाढाल समोरच्या व्यक्तिला सहजासहजी कळत नाही म्हणून बरं आहे.
तो विषय मनातच रेंगाळत राहिला.

योगायोग म्हणावं की सुदैव?

दोन दिवसानंतर अचानक त्याला फेसबुक वर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, नाव "जी. विशाखा !"

प्रोफाइल चेक केली तर कुणीच म्युच्युअल फ्रेंड नव्हतं .

प्रोफाइल फोटो मात्र खूप सुंदर होता , अगदी वासवीचाच चेहरा वाटावा असा!
हिला पाहताच पुन्हा तिची आठवण झाली, का ? माहिती नाही. ही तीच असेल का असा भासही झाला काही क्षण. . . पण ती पुन्हा तरूण कशी होईल!
हिचे केस तर बॉब की स्टेपकट काय म्हणतात ते पण तिच्यात आणि वासवीत कमालीचे साम्य आहे.

माहिती चेक केली तर शाळा कॉलेज अन शहर सगळंच वेगळं, काहिच साधर्म्य आढळलं नाही. मग?

मनात एक विचार आला तिची मुलगी असेल का ? नाही नाही , तिची मुलगी इतकी मोठी कशी असेल? मग हे साम्य कसं ?

त्याच्या विचारांचंच त्याला हसु आलं. काही वर्षांपूर्वी \"काहे दिया परदेस\" मालिका आईसोबत सहज पाहिली होती तेव्हा पहिल्यांदा सायली संजीव ला पाहिलं.
मग तर ती निवेदिता -अशोक सराफची च मुलगी आहे असं वाटून मित्रांशी वाद घातला होता.
नंतर माहिती कळाली तेव्हा खूप हसू आलं होतं.
आजही असंच वाटतंय.

तिची फ्रेंड रिक्वेस्ट पुन्हा पुन्हा पाहिली अन एक आढळलं की त्याच्या प्रेयसी मध्ये आणि हिच्यात कमालीचं साम्य होतं या एक कारणाने त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.
मुली आय मीन बायका स्वतःहून रिक्वेस्ट पाठवत नाहित कुणाला, आपण पाठवलेली स्वीकार केली तरीही खूप झालं. पण समोरून आलेली रिक्वेस्ट म्हणजे खास होती.

तिचा फोटो त्याने दोन -तीनदा पहिला. . . काहीतरी स्पार्क होता त्यात!
मग काय त्याला नादच लागला होता हिचा फोटो पहायचा.

दिवसातून चार-पाच वेळा तरी फोन अन लॉक करायचा , फेसबुकला क्लिक करायचं आणि \"जी.विशाखा\"- तिचा प्रोफाइल फोटो मोठा करुन पहायचा .
विशेष म्हणजे हिला कसले वेड कोण जाणे, लोक व्हाट्सअप ला आठ -पंधरा दिवसाला फोटो बदलत असावेत किंवा नसावेत पण ही मात्र फेसबुकला पण फोटो बदलत राहायची.

रविवारी फोटो बदललेलाच असायचा.
पोस्ट विशेष रेग्युलर नसायच्या, पण ती होती.

मग काय , आता प्रोफाइल फोटो बघण्याचा हा नवा छंदच जडला जणू !
बदलला असेल का तिने फोटो? आणि तो नोटीफिकेशन येण्याची सुद्धा वाट पाहत नव्हता .

हिच्याशी बोलावे किंवा विचारावे असे त्याला वाटे. ती वासवी ला ओळखते का ? मला तिने का रिक्वेस्ट पाठवली ? किंवा तिला मेसेज तरी टाकावा का मग ? नको तसा असभ्यपणा नको म्हणून आवरते घेई .

दरम्यान त्या फोटो पाहण्यावरून तिच्या बद्दल त्याच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होत गेली.
एकतर्फी का असेना पण प्रचंड आपुलकी वाटायला लागली.
सगळा मनाचा खेळ.

छोटे-मोठे लिखाण तो कॉलेज पासून करायचा . काहीतरी लिहायचा पण मित्र वाहवाही करायचे . आता मात्र तिचा फोटो पाह्यला की याला दोन ओळी सुचायच्या. कुठेतरी लिहून ठेवायचा. कधी विकेंडला मित्रांसोबत बसला अन दोन तीन पेग चढलेले असले आणि त्यात तिचा प्रोफाइल पिक पाह्यला की . . . मग तर हिन्दी , उर्दु , अरबी , फारसी शब्द असं काही बाही सुचायचं. त्यावेळी ते खरंच रम्य वाटायचं.
वासवी नंतर कुणीतरी आली होती आयुष्यात,जी त्याच्या लिखाणासाठी
प्रेरणा बनली होती.
आता तर त्याला वाटायला लागलं की आपण हिच्यासाठी लिहावंच. . . पण मग हिच्यापर्यंत कसं पोहोचेल?
मित्र म्हणाला ," सगळं जग कथा कादंबर्‍या छापतंय फेसबुकवर. . . तू एक कविता टाकायला भितोस काय?"
" अरे पण. . ."
"फार तर काय होईल, तुझी कविता कुणीतरी ढापणारा त्याच्या प्रेयसीला पाठवेल. . . अजून तू काय लोणचं घालणार का डायरीत लिहून?" भूतकाळात तरुणपणी प्रेमात पडल्या तेव्हाच्या जुन्या ओळी. . . फेसबुक वर पोस्ट पडली अन सार्वजनिक झाली.

मग हिच्यावर शेर- शायरी, चारोळ्या कधी गद्य की पद्य . . . या मधलं काहीतरी सुचायचं. लिहित गेला अन जमत गेलं. हरवलेला मनातला कवि पुन्हा गवसला होता, तिच्या येण्याने. . . !

अजूनही फेसबुक वर मात्र तिला स्वतंत्र शेअर करण्याची किंवा मेसेज टाकण्याची हिंमत मात्र होत नव्हती.
कधी कधी तिने काही ओळी लाईक केल्या असं नोटिफिकेशन यायला लागलं. म्हणजे ती खरच वाचतीय की पोस्ट दिसली म्हणून लाइक करतीय?

बरं वाचलं असतं तर प्रतिक्रिया जरूर नोंदवली असती. असो.

आज विहान ने तिचा केरळी साडीतला गेट अप अन दाक्षिणात्य हिरोईन सारखे मोगऱ्याचे गजरे माळलेला प्रोफाइल फोटो पाहिला आणि एखाद्या अप्सरेला पाहिल्यागत भारावून गेला.

पेन घेतलं आणि वाटेल ते लिहित राहिला. शब्दसाठा संपला अन त्याने कविता वाचून पाहिली.

स्वतःलाच त्यावर विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम रचना त्याच्या मनातून उतरली.

कवितेच्या शास्त्रात त्याला किती उत्तम कविता म्हणतील की मुक्तछंद की ललित म्हणतील माहित नाही.
पण कविता एवढ्यासाठी अप्रतिम झाली होती की त्याला मनात जे काही वाटलं होतं ते तसच्या तसं शब्दात मांडू शकला होता.

त्याची हिंमत होत नव्हती पण रोहितने . . म्हणजे जवळच्या मित्राने
त्याच्या फेसबुक वर डायरेक्ट टाइप करायला लावली, वाचायला लावली अन विहानच्या नावाने वॉलवर टाकायला ही लावली.

एक केलं की कॉलेजच्या व शाळकरी मित्रमंडळींना टॅग केलं.

कविता सुपर हिट!
कमेंट्स चा पाऊस!

चिडवण्याला ऊत आलेला पण
तिच्या एका लाईकची वाट तो पहात होता.
एक कमेंट तिनेही(वासवीने)टाकावी असं! जगात जिथे असेल तिथून !

किंवा मग हिने (विशाखाने)तरी वाचावी अन कौतुक करावं प्रतिक्रिया देवून जिच्यासाठी लिहीली होती .

"तुझा प्रोफाइल फोटो -
हो तुझा प्रोफाईल पिक,
मला सतत आठवण करून देतो तिची. . . त्या नशीबातून निसटलेल्या स्वप्नसुंदरीची!
काय असेल गं असं तुझ्यात?
असा कोणता एलिमेंट ज्यामुळे मनात जागते ती. . . नेहमीच!

शास्त्रोक्त सौंदर्याच्या व्याख्येत
बसवावं असं तुझं रूप नसेलही कदाचित. . .पण असेल ना काहीतरी, अलौकीकच!

तुझा फोटो कमालीची आकर्षक
काहीतरी अवर्णनीयच तुझ्यात,
नाद लागलाय मला फोटोतल्या तुला पाहण्याचा. . .
पण एक सांगू का?
प्रोफाईल मधली तू मला
आवडायला लागलीयस !

पण फोटोत कळत नाही ना ,
की प्रत्यक्ष तू दिसतेस कशी ?
तू बघतेस कशी, तू चालतेस कशी ?
तू थबकतेस कशी?
तुझी उंची किती?
तू वळून पाहिल्यावर कशी दिसतेस?
तू रागात आल्यावर कशी दिसतेस?
किंवा तू कमालीची आनंदी असलीस तर . . . कशी दिसतेस?
कशी हसतेस?
कसं हसू दाबतेस?
आणि हो रुसल्यावर तू कशी दिसतेस?
लटकं रागावल्यावर हसू चमकतं का, तुझ्याही डोळ्यात तिच्यासारखं!
मला पाहून आलेल्या स्मितहास्यात
चमकतील का डोळ्यात दोन मोती?
तिच्यासारखेच?
पण तुझा प्रोफाइल फोटो
माझ्या इतका जवळचा
जितकी तू ही प्रत्यक्षात नसावीस!

ही तुझी सगळी रूपं . . .
आता पाहावीशी वाटतायत !
तुझ्या डोळ्यातला तो स्पार्क पहावासा वाटतोय!
किंवा मग तिचा कुठला एलिमेंट
तुझ्यात दिसतोय. . . पहावसं वाटतय.
फोटोत व माणसात
फरक असतो न गं!
एकदा प्रत्यक्ष दर्शन देशील?"

मनातून हलका झालेला विहान. . .
या वयातही. . . !
ही सगळी कुणाला थिल्लर कामं वाटू देत . . पण त्याला कमालीचा आनंद मिळत होता.

तिला कविता आवडल्याची पावती मिळाली आणि सुंदर प्रतिक्रियाही!
आता तर विहान उडालाच!

मेसेंजरला तिचा पर्सनल मेसेज होता,
" सर कविता काल्पनिक आहे, असं लिहायचं विसरलात का?"

आता मात्र त्याला काय उत्तर द्यावं कळेना!

"काल्पनिकच समजा मॅडम ! क्रियेटीविटी पहा नाहीतर या वयात "ती" थोडीच असणार?"

ती मेसेजमधून हसली व टाकलं "म्हणजे आहे कुणीतरी? एक "ही" व एक "ती" सुद्धा!"

आता तर विहानची विकेट पडलीच.

"कल्पनेत आहे असं समजा! मॅडम गुडनाईट "

फोन बाजूला ठेवला अन रोहितला मेसेज टाकला.

"हुशार बायकांशी डोकं लावणं फार कठिण असतं यार. . . म्हणून म्हणत होतो की असं पब्लिकली पोस्ट नको करायला, पण तू मला भरीस पाडलंस.
हे हळू हळू चालत राहिलं.

क्रमशः 

लेखिका  - स्वाती  बालूरकर देशपांडे,सखी


🎭 Series Post

View all