प्रोफाइल पिक - भाग-५

A profile pic helps him to find his friend.


कथा पुढे-


लेखिका- स्वाती  बालूरकर,सखी

विहान आणि रोहित हैद्राबादला उतरले खरे, नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळच हॉटेलची रूम बुक केली.
मग एकदमच रोहित म्हणाला "अरे तिला भेटायचे कुठे ? किती वाजता काय ठरलंय?"
विहान म्हणाला "मॅडम चा मेसज येईल ना, मेसेंजर वर येईल !"
" याला काय अर्थ विहान ? हे असं बरोबर नाही. तिचा फोन नंबर माहीत नाही की तिचा पत्ता माहीत नाही, ती ये म्हणाली म्हणून तू आलास, वर मलाही घेऊन आलास . असं नको करत जाऊ यार !"

"तुला सगळं माहीत आहे ना रोहित? मेसेज करेल रे ती बरोबर. या म्हणालीय ना आपल्याला!"
आणि तितक्यात मेसेंजर चा मेसेज टोन वाजला. उघडून वाचला.
" गुडमॉर्निंग विहान आलात का? नंबर देतीय कॉल करा म्हणजे कुठे भेटायचे ते ठरवता येईल ."

रोहितने पाहिलं "यस बॉस ! तुझ्या मैत्रिणी बाकी भारी असतात बरं का! काय प्रॉम्प्ट आणि पंक्च्युअल !"

"ए जनरलाईज बोलू नको बरं रोहित. मैत्रिणी मैत्रिणी काय? एक मैत्रिण आहे जी गेली तर अजून भेटत नाहीय. हो ही जी. विशाखा मात्र पंक्चुअल आहे , प्राॅम्प्ट आहे ." गडी खुश!
फ्रेश झाल्यावर ते विहानने फोन केला आणि तिला सांगितलं की "आम्हाला हैदराबादमधला विशेष माहीत नाही त्यामुळे कुठे भेटायचे ते ठरवा आणि त्याचे लोकेशन पाठवा. आम्ही वेळेत पोहचू."
मग तिने एक दोन हॉटेलची नावं सुचवली पण विहान म्हणाला "एक सांगू का ? आपण लंचसाठी भेटतोय तर इथे एखादं महाराष्ट्रीयन थाळीचं हॉटेल मिळेल का? अगदी राजस्थानी किंवा गुजराती पण चालेल."
"का हो काय झालं?"
" आम्ही तुमच्या इतका भात नाही खाऊ शकत त्यामुळे आंध्रा मिल्स किंवा दाक्षिणात्य हॉटेलमध्ये आम्हाला बोलवू नकाना प्लीज!"
विशाखा मजेने हसली.
" ठीक आहे पत्ता पाठवते तिथे पोहोचा १२ वाजेपर्यंत !"
दोघे वेळेत पत्त्यावर पोहोचल.
साधारण हॉटेलचं वातावरण खूप छान होतं, क्लासिक!
मंद इंन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू होतं.
बहुतेक सगळ्या प्रकारचं -मल्टि कुझिन रेस्टॉरंट होतं.
विहान आत आला समोर ती जी विशाखा सुंदर स्टिफ साडीत टेबलजवळ उभी होती.
विहानला पाहून विचारलं, "विहान सर एकटेच आलात की कुणी सोबत आहे?"
" माझा जवळचा मित्र आहे रोहित , मुद्दामच सोबत आणलंय आणि हो त्याला सगळं माहीत आहे, म्हणजे आत बोलावू ना?"
"काय सर ? माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे, बोलवा आत, भेटूयात."
विहान ने रोहितला आत बोलावलं. परिचय झाला. लंच साठी मेन्यू दाखवला. मग स्टार्टर्स ऑर्डर केले आणि गप्पा सुरू झाल्या.
रोहितला तिने ओळखलं, बिरला मंदिर ची आठवण होती.
इकडचं तिकडचं सांगण्याच्या ओघात तिच्याबद्दल बरीच माहिती विहानला मिळाली.
आज त्याने तिला प्रत्यक्ष पाहिलं होतं. . . म्हणजे इतकं जवळून अगदी समोरच्या खुर्चीवर !
त्याला एक जाणवलं की आजही सतत तिच्या हसण्यात किंवा तिच्या खाली पाहण्यात त्याला वासवीची झलक दिसत होती. तिचा जॉब , त्यांचा जॉब , राहण्याचं ठिकाण वगैरे सहज झालं . पण विहान बेचैन झाला.
" जनरल बोलणं खूप झालं विशाखाजी, मुद्द्याचं बोला ना! त्यासाठी इतका लांब आलोय मी! वासवी चा जुना फोटो तुमच्याकडे कसा आला? किंवा तुम्ही तो का ठेवलात ?"
" वासवीचा फोटोच काय? वासवीचा पूर्ण अल्बमच माझ्याकडे आहे. आणि का प्रोफाइल पिक ठेवला म्हणाल तर तो तुमच्यासाठीच !"
"माझ्यासाठी ? काय कारण?"

"तुम्ही माझे प्रोफाईल फोटो पाहत होतात. त्यात तुम्हाला कुणाची तरी झलक दिसते हे कवितेत कळालं होतं. मग प्रत्यक्षात तिचाच फोटो ठेवल्यावर तुम्ही काय कराल किंवा काय रिअॅक्शन द्याल हे पाहण्यासाठी? "
"हो पण कोणाच्या सांगण्यावरून असं केलं तुम्ही?"
"वासवीच्याच!" ती थंड आवाजात म्हणाली पण विहान एकदमच तावात आला "काय? कुठे आहे वासवी?"
"विहान सर , फक्त एवढंच सांगेन की वासवी माझ्या घरी आहे आणि माझ्यासोबत राहते त्यामुळे तिचे अल्बम माझ्याकडेच आहेत."
हे ऐकल्यावर मात्र विहान चक्क जागेवरून उठला आणि तिथून निघून गेला.
विशाखाला कळेचना नेमकं काय झालं?
रोहितने हाताने इशारा केला की असू द्या "तो जेव्हा जेव्हा खूप जास्त भावनिक होतो किंवा त्याला एखादा धक्का बसतो, तेव्हा तो कधीच लोकांसमोर ते एक्स्प्रेशन देत नाही. तिथून उठून जातो."
"अरे पण इतकं इमोशनल? पुरूष इतके हळवे नसतात असा माझा समज होता."
"मॅडम ,तो दाखवत नाही पण आहेच खूप हळवा. वासवीच्या बाबतीत तर त्याचं हळवेपण फक्त मला माहित आहे."
"ते कसे काय?"
"आम्ही सोबत होतो ना शिकायला . चार वर्षे इंजिनिअरिंग केलंय आम्ही सोबत. वासवी पण मला ओळखते. "
"अच्छा म्हणजे तेव्हाची मैत्री आहे तर ही. मला वाटलं कलिग असाल विहान सरांचे."
"मॅडम जे असेल ते सांगून टाका त्याला. तो खूप काळजीत असतो हल्ली!" रोहित जणु शिफारस करत होता.
"घ्या ना काहीतरी. जेवण पण मागवायचंय." विशाखा डिश समोर करत म्हणाली.
थोडावेळाने विहान आत आला. चेहर्‍यांवर औपचारिक हसू आणले पण डोळे वेगळच सांगत होते.
"विहान सर घ्या ना काहीतरी!"
"कशी आहे वासवी?" विहान ने विचारलं.
"म्हणजे आता तशी ठीकच आहे. "
"विशाखा जी , म्हणजे नेमकं काय ? जर वासवी तुमच्यासोबत आहे तर मग त्यांनी सांगितलंच असेल नं कधी न कधी विहानबद्दल ?तुम्ही स्पष्ट सांगा ना!" रोहितने विहानकडे पहात विनंती केली.

"म्हणजे तिने तसं सांगितले आहे काहीतरी! पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, सगळंच ! "
"विशाखा मॅडम तिच्यासाठी विहान कितीदा बेचैन झालेला पाहिलाय मी. तुमच्या त्या कोण व तुमच्यासोबत कशा? इतके दिवस कुठे होत्या ? खूप प्रश्न आहेत मनात. तो तर विचारूही शकत नाहीय!"
"आता ताणत नाही, सांगते पण. . . काही गोष्टी तुम्ही जास्त जाणत असाल असं वाटतं. योगायोग घडतात आयुष्यात! खरं सांगू. . . वासवी माझी मोठी बहिण!"
आता विहानच्या डोक्यात प्रकाश पडला. का दोघींमधे साम्य आहे. पण प्रश्न असा होता की वासवी ने कधीच बहिणीचा उल्लेख केला नव्हता.
"बहिण? सख्खी ? कसं शक्य आहे? "

"का? ती कधी बोलली नाही?"
"नाही ना. कितीदा तिच्या घरी वगैरे पण गेलो होतो सोडायला किंवा भेटायला पण. . . आणि तिच्या आईवडिलांना देखील ओळखत होतो मी. काही तरी गल्लत होतीय."
"विहान सर, गल्लत नाही पण पडद्यामागची कहाणी आहे. सांगते. पण एक विचारायचं होतं. . . मन सिनेमा पाहिलाय का अमीर खानचा?"
रोहित पटकन म्हणाला , त्याचा आवडता पण आता नाही आवडत त्याला."
"आम्ही दोघांनी एकत्र पाहिलेला शेवटचा चित्रपट . . . कसा विसरेन! भेटू शकतो का वासवीला ? म्हणजे तिच्या फॅमिलीची हरकत नसेल तर?"
विहान पुन्हा इमोशनल झाला.
"लेट मी टेल यू, तिची फॅमिली नाहिय आणि भेटावं असं वाटत असेल तर भेटवते मी तुम्हाला पण त्या आधी मला तुमची बाजू ऐकायची आहे."
आता रोहित व विहान दोघेही काळजीत पडले. नेमकं काय सांगावं आणि काय लपवावं? बरं ही खरंच बहिण आहे याची खात्रीही पटत नव्हती.
"सांगेन विशाखाजी , पण ते मन चित्रपटाचं काय म्हणालात? अन तुम्ही बहिण तर आम्ही कसं तुम्हाला पाहिलं नाही?"
"जेवणाची ऑर्डर देते मग सांगते डिटेल्स . बोला काय घेणार?" विशाखाने विषय बदलला.

क्रमशः

©® स्वाती बालूरकर देशपांडे,सखी.
दिनांक १ ऑगस्ट २०२२