Sep 30, 2022
// rablogging.com_GGINT //
ललित

प्रोफाइल पिक - ६

Read Later
प्रोफाइल पिक - ६


प्रोफाइल  पिक -भाग -६


 ©® स्वाती  बालूरकर, सखी

आता रोहित व विहान दोघेही काळजीत पडले. नेमकं काय सांगावं आणि काय लपवावं? बरं ही खरंच बहिण आहे याची खात्रीही पटत नव्हती.
"सांगेन विशाखाजी , पण ते \"मन\" चित्रपटाचं काय म्हणालात? अन तुम्ही बहिण तर  मग आम्ही कसं तुम्हाला पाहिलं नाही?"
ती हसली व म्हणाली,
"जेवणाची ऑर्डर देते मग सांगते डिटेल्स . बोला काय घेणार?"

विशाखाने विषय बदलला.

कथा पुढे-

दोघांना विचारूनच तिने जेवणाची ऑर्डर दिली अन विशाखाने सुरूवात केली.
"मला वाटतंय की तुम्हाला मनात कुठेतरी वाटतंय की मी खोटं बोलतीय!"
तिच्या या वाक्यावर दोघेही शांतच पण एकमेकांकडे पहायला लागले.
"म्हणजे वासवीला मी ओळखत नाही किंवा मी तिची बहिण नाही असं काही वाटतंय का ?"
ते दोघे नकारार्थी  मान हलवत असले तरीही चेहर्‍यांवरचे  भाव काहीतरी  वेगळेच होते.
तिने सांगायला सुरूवात केली.
"माझी बहिण माझ्या मावशीकडे रहायची व मी आई बाबांसोबत वाढले. त्यामागे एक खूप मोठी स्टोरी आहे. त्यामुळे ती कॉलेजात असताना मी कधीच मावशीकडे आले नाही."
मग विशाखाने दोघींचे लहानपणीचे व शाळेतले वगैरे फोटो फोनमधे दाखवले.
आता विहानची खात्री पटली की ही तिची बहिणच आहे.
" विशाखाजी एक विनंती आहे, वासवी जर तुमच्या घरी असेल तर ती भेटेल का ? ती अशी गायब का झाली ? मला विचारायचं आहे तिलाच?"
"विहान सर, नक्की विचारा? मला उत्तर माहित आहेत पण जे समाधान तुम्हाला विचारून मिळेल  ते मी हिरावून घेवू इच्छित नाही."

‌रोहित म्हणाला "आमचा तुमच्यावर विश्वास आहे, विशाखाजी!"
" असं काही नाही, इतकी वर्षे ती कुणाच्याच संपर्कात नव्हती म्हणून तिची काळजी वाटते आहे. तुम्हीच सांगा नेमकी काय स्टोरी आहे. त्यांच्या साठीच तर आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलोय.!" विहान भावूक होऊन म्हणाला.

जेवण  आलं , सर्व झालं आणि जेवण करता करता विशाखा सांगू लागली,"हे सगळं कुठेच आतापर्यंत  बोलले नाही त्यामुळे थोडं टेंशन येतय.  सॉरी पण ही आमच्या घरातली खूपच खाजगी गोष्ट आहे पण तुम्ही ताईसाठी इतकं विचारतात म्हणून मी शेयर करते आहे.
माझे वडील खूप जुन्या विचारांचे , त्यांना मुलगा म्हणजे कुलदीपक आणि मुलगी म्हणजे भार!  जेव्हा वासवी ताई जन्मली तेव्हा पहिल्यांदाच  मुलगी झाली म्हणून ते खूप नाराज झाले होते आणि आईवर ते सतत चिडचिड करायचे. हे सगळं नंतर आजीकडून कळालं.  त्यांची वडिलोपार्जित इस्टेट  होती, तिला सांभाळणारा कुणीतरी वारस मुलगाच हवा अशी ठाम समजूत होती.
  आई त्याच दबावात रहायची त्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स आले.  ताई दोन -तीन वर्षांची असेल तेव्हापासून आईला दुसरं मूल होण्याची एक भीतीच बसली, पुन्हा जर मुलगी झाली  तर तिचं काय?  दरम्यान बरेच काही काही प्रॉब्लेम झाले आणि जवळजवळ सहा सात वर्षांनंतर मी जन्मले. मी जन्माले आणि  तेव्हापासून बाबांनी आईशी बोलणच सोडलं.  मी साधारण महिनाभराची असेल त्यावेळी बाबा एक दिवस चिडून मला घेऊन निघाले हाेते, नको म्हणून कुठल्यातरी अनाथ आश्रमत सोडून देणार होते.

आईच्या ने सहन झालं नाही. तिने विरोध केला व वैतागली.  आईची आई आणि बहिण म्हणजे माझी मावशी दोघी जणी बाळंतपणासाठी आलेल्या होत्या.
मावशी त्या प्रकराने  खूप दु खी झाली कारण गडगंज संपत्ती असूनही मावशीला काहीच मूलबाळ नव्हतं. 
ती म्हणाली की ठीक आहे अनाथाश्रमात दिल्यापेक्षा तिला मी घेऊन जाते.
पण माझ्या आईचं मातृत्व  जागं झालं महिनाभराचं तान्ह लेकरू सोडायला तयार नव्हती.
आजी, मावशीचं आणि बाबांचं  खूप कडाक्याचं भांडण झालं आणि त्या भांडणाचा निष्कर्ष म्हणून मावशीने सरळ वासवी ताईची बॅग भरली, आणि तीन वर्षांच्या वाचवी ताईला सोबत घेवून गेली. ६ -७ वर्षाच्या  वासवीला  मावशीचा लळा होता  आणि तिला सांभाळणं पण शक्य होतं.
मावशी, काका आणिआज्जी तेथून निघून गेले.
आईला खूप वाईट वाटलं पण किमान ताई मावशीकडे सुखरुप आहे या गोष्टीचा आनंद होता .
मी वर्ष दीड-दोन वर्षांची असेपर्यंतच मला एक भाऊ झाला.  मुलाच्या जन्माने बाबा आईवर खूप खुश झाले .
त्यानंतर बाबा हसून खेळून  छान राहायला लागले .
तेव्हा माझं संगोपन त्यांनी खूप मनाने केलं पण ताई जी दुरावली ती दुरावलीच.
  मावशीने पुन्हा घरी पाय ठेवला नाही आणि आईलाही तिथे येऊ दिले नाही.
आई चोरून लपून कधी घरी मावशीला फोन करायची आणि ताईशी बोलायची किंवा  तिची खबरबात घ्यायची.

  वर्षांतून एकदा आईला आजीकडे भेटण्याची परवानगी होती.  तेव्हा आई जेव्हा पण आजोळी यायची त्या वेळेला मावशी एखाद्या दिवसांसाठी ताईला घेवून यायची आणि म्हणून आमचे खूप फोटो  सोबत काढलेले आहेत. जपून व लपून ठेवलेले."

"अच्छा! म्हणूनच." रोहित बोलला.

" पण तुम्ही साऊथ इंडियन कशा?" विहान ने विचारले.

"  हो,  ते मी अभ्यासात खूप हुशार होते आणि बाबा अभिमानाने शिकवायलाही तयार झाले होते . ताईच्या बाबतीत इतके कठोर कसे झाले मलाही कळत नाही पण ते कधी ताईची आठवण काढायचे नाही किंवा तिला भेटण्याची इच्छाही दाखवायचे नाही .
मावशीने सांभाळ केला व त्यांचंच नाव लावलं त्यामुळे ताई मावशीची मुलगी आहे असे सगळ्यांना माहीत आहे ."

"आणि  मग आम्ही इंजिनिअरिंगला असताना ताई सोबत शिकत  असताना तुम्ही कुठे होतात?" विहानने सहजच विचारलं.

" मी माझ्या आईबाबांकडे राहत होते. आनंदाने."
"आता वासवी तुमच्याकडे आहे म्हणालात, तुमच्या दोघींची  लग्न नाही झाली का? सॉरी हा  तुमचा पण  खाजगीतला प्रश्न आहे पण विचारतोय ." रोहित म्हणाला.

  "मिस्टर रोहित तुमचा प्रश्न अगदीच चुकीचा नाहीय पण त्याचं उत्तर ऐकायला तुम्हाला थोडंसं  जड जाईल. म्हणजेच  ताई इंजिनीअरिंगला हाेती त्या वेळी मी नववी दहावीला वगैरे असेन. त्याचवेळी  असं सगळं झालं आणि मग ताईचं आयुष्यच बदलून गेलं. म्हणजे ते सगळं सांगेन मी तुम्हाला आणि तिने लग्न नाही केलं."
  "तुमचं लग्न ?" रोहित पटकन म्हणाला.

"माझं झालंय ना अॅक्चुअली  लव्ह मॅरेज आहे . मला फूड किंवा आणि फूड अँड न्यूट्रिशन मध्ये करियर करायचं होतं म्हणून मी पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला राहिले आणि इथेच माझी भेट मिस्टर गुरुनाथन,  माझे पती यांच्याशी झाली.   ते तमिलीयन आहेत .सासर चेन्नई असलं तरीही आम्ही दोघे रहायला इथेच असतो आणि एकाच ठिकाणी जॉब करतो."

"ओह विशाखा गुरुनाथन - विशाखा जी!" रिहित वेगळ्याच टोनमधे म्हणाला. ती ही मनमोकळी हसली.
"त्यांना काही प्रॉब्लेम  नाही , वासवी तुमच्यासोबत राहते?" विहान उगीचच  बेचैन झाला.
" नो वे.  लग्नासाठी मी गुरूनाथन ला  हीच एक अट ठेवली होती, वासवी ताई माझ्यासोबतच  राहतीय आणि तेव्हापासून ती व  मावशी माझ्यासोबतच  राहतात."

" काय आहे बघा,   म्हणजे आम्ही ज्यांना वासवी चे आई बाबा म्हणून ओळखतो ते तुमची मावशी आणि काका आहेत."

" हो अगदी बरोबर."
" मग ते आता कुठे असतात?"

ती थोडोि नाराजीने म्हणाली, " दुर्दैवाने काका नाहीत आता, माझ्या लग्नानंतर वर्षभरात ते गेले. मावशी माझ्याकडेच आहे पण ती आता सध्या गावाकडे राहायला गेलीय."

"ते तिथे राहत नाहीत ना आता."

"हो ना. ओके विहान सर  चला निघूयात का ? थोडी गर्दी असते इकडे संडे दुपारी. अापण टेबल इतका वेळ टेबल होल्ड करणे योग्य नाही. "

"होका  निघायचं? आपण वासवीला भेटवतो म्हणालात? प्रोफाइल पिक्चरचं काही कळालं नाही." हळूच रोहित विहानच्या कानात म्हणाला.

"अहो निघूयात ना , म्हणजे आता येतो आम्ही!"
" तुमची हरकत नसेल माझ्या घरीही येऊ शकता  वासवीला भेटू शकता.  इतके लांबून आलात ,  तुम्हाला निराश नाही करणार !"

" मग ठीक !" बिल पेड पण झालं. तिनेच दिलं होतं. ऐकेचना.
विनाहरकत बोलता बोलता तिघांमध्ये चांगलंच मोकळेपणा आला होता. छोटीमोठी थट्टा मस्करी झाली हाेती विशाखाने गाडी काढली  विहान समोर बसला आणि रोहित मागे.


"कारमध्ये जाताना ती सांगू लागली "तुम्हाला माहीतीय  ताई बिल्कूल सोशल मीडिया वापरत नव्हती.  तिने स्वतच जगापासून संपर्क तोडला होता .मग  गेल्या काही वर्षांत तिला हळूहळू मी स्मार्टफोन घेऊन ,तिला वापरायला शिकवलं आणि मग एक दिवस केव्हा तरी फेसबुकचा अकाऊंटही उघडून दिलं .
तुम्हाला माहिती य जेव्हा मी तिला म्हटलं फेसबुकवर जुनी माणसं सापडतात ती म्हणाली आयुष्यातली हरवलेली माणसंपण सापडतात का?  आणि मी तिला प्रॉमिस केलं  तुला कोण हवं आहे ते मी शोधून देईल.  त्यांना कशी कळेल की मी शोधतेय? "

"का  अशी राहीली वासवी? कुणाला शोधलं  तिने?" विहानचा निरागस प्रश्न!

क्रमशः

©® स्वाती  बालूरकर देशपांडे,सखी.
दिनांक  ९ऑगस्ट २०२२
(प्रतिक्रिया अवश्य द्या.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.