प्रा.स.दा.भुलचुके

Mr S D Bhulchuke N His Commedy Life

           (   सदर कथा ही एक काल्पनिक कथा असून,  कथेतील घटना , अपात्र आणि प्रसंग हे ही काल्पनिक आहेत . केवळ विनोदी निर्मिती एवढाच त्यांचा उद्देश आहे . कुठल्याही व्यवसाय किंवा व्यावसायिकाला दुखवण्याचा अजिबात प्रयत्न नाही , तसे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा , त्या करिता लेखिका क्षमा याचक  आहे .  )

       



         एक आटपाट नगर होतं. त्या नगराचं नाव होतं पुणे (पुणे तिथे काय उणे?) , तर या महानगरात एक मराठीचे प्राध्यापक राहत होते.  प्रा. स . दा. भूलचुके (सदानंद दामोदर भूलचुके). प्राध्यापक आता जरी पुण्यात राहत होते तरी ते मूळचे होते अकोल्याचे. ( वऱ्हाड प्रांत) (इथे मला कुठलाही प्रांतवाद उपस्थीत करायचा नाही आहे. ) एकदा काय होते \"अव माय कोन हाय?\" (अॅमीक्राॅन) नावाचा विषाणू जगात सगळीकडे धुमाकूळ घालत असतो म्हणून,  प्राध्यापक महोदय योगासन वर्गाला जायचं ठरवतात. प्राध्यापकांची सौभाग्यवती अकोल्याची असते (टिपिकल वऱ्हाडी) , तर योगासनाच्या वर्गाला जाण्यावरून त्या दोघांमध्ये झालेला हा संवाद - (की वाद?)

सौ - अच्छा! म्हणजे तुमाले म्या काय जाडी वाटतो ?

प्रा. -अवो तसं म्हणलं का म्या? म्या एवढंच म्हणू रायलो की , योगासनं केल्याने आपण तंदुरुस्त र्हायतो.

सौ - मंग म्या काय बिमारी हाय व्हय?

प्रा. - तसं म्हणलं काव म्या ? मी एवढच बोललो , का तुले जाव नाही वाटत तर राहू दे बा!

सौ. - तुमी मले अयदी  समजता का ?

प्रा. - कशी बाई हायस व तु ? म्या काय म्हनू रायलो अन् तु समजू काय रायली?

सौ. - तुमी मले काय बह्याड समजता?  मले काई समजत नाही व्हय?

प्रा. - डोक्शान नीरा पैदलं आहेस का व तू ? मीनं असं काहीच म्हनलं नाही.

सौ. - मग मी का खोटी बोलून रायली? मी खोटारडी हाय व्हय ?

प्रा. - सक्काळी सक्काळी उठून काय लावलं व तूनं नीरा वटवट वटवट.

सौ. - मी वटवट करू रायली ? मी का तुमाले भानगोळी दिसतो ? मले भांडकुदळ मनता तुम्ही? मले तुमच्या फंदातच नाय पडायचं! सवताच  कटकट करू रायले अन् माह्वय नाव घेतात.

प्रा. - चुल्र्यात गेला तो योगासनाचा वर्ग . मी जातो अन देतो तानुन.

सौ.- पाह्लंलं तुमालेच यायाम कराले जायचंच नव्हतं, अन् मलेच काय काय बोलू रायले.

प्रा. - एक काम कर तू पसर हिथंच , मी चाललो योगासन कराले .

सौ. - तुमी सदा असच करता , मले घरी एकलं ठेवून भाईर मजा मारता.

प्रा. - तु काय डोस्क्यावर पळली हाय का व?अवं  बह्याडे , कवा पासून तुले चाल चाल म्हनतो तर येत नाही,  तुले तंदुरुस्त राहायचं नाही तर ,माह्या वाट्याले  काऊन जाऊ रायली?

सौ. - कित्ती मतलबी हाय हो तुमी? नीर्रा सवताचा इचार करता ! माह्याशि तुमाले काई घेनंदेनंच नाई !

                तेवढ्यात प्राध्यापकांचा फोन वाजतो प्राध्यापकांना त्यांच्या सासूबाई नी फोन केलेला असतो............

    हॅलो .........नमस्कार सासुबाई ........मी कसा असणार ?......... तुमच्या घरची तोफ माह्या घरी आल्यावर...... अरे हे बाई हाय का काय ? नीर्रा सकाय पासून डोस्क खाते ......तुमी  चांगलं नाही केलं...... तुमच्या घरचं कत्रिना , स्वेतलाना चक्रीवादळ माह्या घरात पाठवलं ........तरी पाठवणी च्या वेळी तुमी मले म्हनल्या होत्या , जावईबापू सांभाळून घ्या...... मले काय माहित माह्या सवता साठी होतं ते.......सासरे मले सांगत होते .......माई लेक गाय  हाय गाय,  शिंगावाली सांगायचं ईसरले वाटते  ते ........ठेवतो मी फोन आता.........

        दुपारी प्राध्यापकांकडे त्यांचा एक विद्यार्थी येतो . हा विद्यार्थी महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेंवर पीएचडी करत असतो. हा विद्यार्थी असतो अर्थातच पुण्याचा...........

वि. - सर एक पत्र आले आहे अकोल्याहून. \"भटक भवानी भगिनी मंडळाचं\".

प्रा. - काय म्हणते भगिनी मंडळ?

वि - दोन दिवसांनंतर महिला मंडळाचा वर्धापन दिन आहे , त्यानिमित्त आयोजित विनोदी उखाणे स्पर्धे करीता  तुम्हाला परीक्षक म्हणून बोलावलं आहे.

प्रा. - विद्यार्थी तुम्हीही आमच्यासोबत अकोल्याला चला . त्या निमित्ताने तुमचा ही वर्‍हाडी भाषेचा जवळून अभ्यास होईल.  अकोल्याला जायचं म्हणजे रेल्वेच्या टिकीटाचं एरीकेशन करावं लागेल......

वि. - सर एरीकेशन नाही रिझर्वेशन.

प्रा.-  हाव ना बे!  तेच ते एरीकेशन........

           प्राध्यापक सदा भूलचुके आणि त्यांचा विद्यार्थी रात्रीच्या रेल्वेने अकोल्या करता निघतात. सकाळी सकाळी  अकोला आलं का म्हणून विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर एकाला विचारतो.......

वि. - काका हे कोणतं स्टेशन आहे?

तो माणूस - का बे ए भोकंन टिकल्या , गाडी ठेसनात येत होती तवा तू ये डोये  काय फुटले होते का बे बह्याडा? काय रं ऐ संतरगुल्ल्या  गाडी येतानी , फलाटावर काया पिवळ्या बोर्डावर  अकोला लिवलेलं दिसलं नाही का बे तुले ? तुमी आत्ताचे पोट्टे ! सायचे हो , तुमाले काम कराची लाज वाटते, सारं आयतं पाहिजे तुमाले? आम्ही काय रिकामचोट दिसतो काय?

प्रा. - विद्यार्थी अकोला आलं.

                \"भटक भवानी भगिनी मंडळाच्या\" अध्यक्षा आणि उपाध्यक्षा प्राध्यापकांचे यथायोग्य स्वागत करून , त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जातात....... . कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत समारंभाचा मुख्य कार्यक्रम झाल्यावर विनोदी उखाणे स्पर्धा सुरू होते............

               सर्वात प्रथम समीक्षकाची बायको उखाणा घेते................\"फडताळात होते फणसाचे गरे , आमचे राव दिसतात बरे पण नीट वागतील तेव्हाच खरे\"

   \"अदरावर पदरावर आंब्याची फोड, आमचे राव दिसतात गोड पण डोळे वटारायची  त्यांना भारीच खोड\" .............अकोल्याच्या प्रसिद्ध कवीची बायको.

            अकोल्यातील जे नोकरदार पुरुष आहेत त्यांच्या बायकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाच्या एका माऊलीने हा उखाणा घेतला...........\". काचेच्या बाटलीत गुलाबी सरबत, नवऱ्याला घर काम सांगितल्याशिवाय मला नाही करमत \".

           चायनीज पदार्थ आजकाल सगळ्यांनाच खुप आवडतात पण महिला मंडळातली एक सदस्य चायनीज पदार्थांची एवढी दिवानी होती कि,  तिने संपूर्ण उखाणाच चायनीज पदार्थावर रचला \"चायना बाऊलमध्ये मंचुरियन चे तुकडे , नुडस खातांना आमच्या रावांचे तोंड होते  वेडेवाकडे\"

            अकोल्यातले वैभव मिठाईंचे दुकान फार प्रसिद्ध आहेत , तर या मिठाई वाल्याच्या अर्धांगिनीने घेतलेला हा उखाणा \"चांदीच्या वाटीत मलाई चा पेढा आमचे हे म्हणजे ज्ञानेश्वराचा रेडा\".

            इतके सुंदर उखाणे ऐकून \"श्री फर्निचर\" वाल्याची बायको पण काय मागे राहणार आहे? तिने पण एक उखाणा घेतलाच, \"अंगणात उमललेल्या गुलाबाच्या कळ्या आमच्या रावांचे दात म्हणजे लाकडी फळ्या\".

            माधव दूधवाल्याच्या बायकोनेही मग आपली प्रतिभा दाखवली,\"केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र आमच्या नशिबी काळ बेंद्रं\".

          \"बासमती तांदळाचा केला नारळीभात,  दहाच्या आत या घरात,  नाहीतर घालीन कमरेत लात.....\"इति कराटे चॅम्पियन ची बायको हे वेगळे सांगायलाच नको.

            गुड हेल्थ जिम वाल्याच्या बायकोने घेतलेला उखाणा......\"दाढीत दाढी बोकडाची दाढी,  माझ्या नवऱ्याची बहीण टुणटुण पेक्षा जाडी".

               या महिला मंडळात एक सेल्समन ची बायको पण होती तिने घेतलेला हा उखाण...\"कोरोना वरची तू अजून घेतली नाही लस , गाव उंडारणाऱ्या नवर्या घरातच बस\".

                सगळ्यात शेवटी भाजीवाल्याची बायकोने घेतलेला  उखाणा \"चलती है गाडी उडती है धून आमच्या नशिबी मात्र गोभीचं फुल\".

                प्राध्यापक स दा भुलचुकेंना सगळ्याच महिलांनी घेतलेले उखाणे  खूपच आवडले , म्हणून त्यांनी सगळ्याच महिलांना विजेता घोषित केले.......... कार्यक्रम झाल्यानंतर प्राध्यापकांना त्यांची बाल मैत्रीण भेटते ...........

मैत्रीण - अय्या सदा किती वर्षानंतर ? घरी चल ना,  मी काहीतरी करते.(खूप वर्षानंतर मित्र भेटल्याने तिला प्राध्यापकांसाठी  काहीतरी खायचं बनवायचं असते!  ).(विद्यार्थ्याला  वाटतं ही बाई आता काय करणार!!!!.....)

प्राध्यापक - अग नको!  माझा उपवास आहे आज......

मैत्रीण -अय्या!  मग मी किस करणार.(खरंतर तिला आलूचा कींवा रताळ्याचा किस जो उपवास ला करतात तो म्हणायचा असतो.....)

          प्राध्यापक विद्यार्थी आणि मैत्रीण , मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यावर.........

मैत्रीण - \"आई सदा आला आहे त्याला किस कर ना\" .(मैत्रिणीची आई आतल्या खोलीत असते.......) (खरं तर या मैत्रिणीला प्राध्यापकांशी खूप सार्‍या गप्पा मारायच्या असतात,  म्हणून ती आईला आलूचा किस करायला सांगते......) 

आई - \"अगं तू आता मोठी झाली आहे,  तुला जमला पाहिजे ना कीस\" !

मैत्रीण - \"अगं तूच कर ना ! मला नाही जमत!\"

आई - \"अगं तू सुरुवात तर कर! नाही जमला तर मी आहेच!

            तर मित्रांनो असे हे प्राध्यापक सदा भुलचुके आणि त्यांच्या आयुष्यातले काही गमतीदार क्षण. यथावकाश प्राध्यापक आणि विद्यार्थी रात्रीचा रेल्वेने पुण्याला परत जातात हे वेगळे सांगायलाच नको.

   



 (सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका झाल्या असतील क्षमस्व )

      (वाचकहो तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय यामुळेच लेखकांना लिहिण्याची नवीन स्फूर्ती मिळते त्यामुळे आपली अमूल्य मध्ये नोंदवायला विसरू नका, आणि तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फाॅलो करा. )     





🎭 Series Post

View all