प्रिय...

मैत्री तुझी माझी


‌‌प्रिय...

प्रिय अस्मि ,


आज या पत्राच्या निमित्तानी थोडं आपल्या मैत्रीबद्दल बोलते. "मैत्री" , कधी‌ कोणासोबत अन् कशी होईल सांगता येत नाही. काही लोकं कितीतरी काळ आपल्या सहवासात असतात, पण तरी त्यांच्या सोबत मैत्री होतेच असं नाही. तर काही जण अगदी काही वेळाच्या सोबतीत सुद्धा जीवाभावाचे होऊन जातात. आपलंही असंच काहीसं झालं. १६ वर्षांच्या या मैत्रीत‌ कितीतरी गोष्टी घडल्या. ते असतं ना , " फर्स्ट इम्प्रेशन , लास्ट इम्प्रेशन " हे प्रत्येक वेळी खरं ठरेलच असं नाही. आपल्या मैत्रीबद्दल तर याचा चांगलाच प्रत्यय आला आहे. अगदी सुरुवातीपासून आपण खूप चांगल्या मैत्रिणी झालो असं तर अजिबात नाही. खडूस, अभ्यासू, मस्तीखोर, चंचल, अबोल यातलं नक्की कोणतं विशेषण एकमेकींना द्यावं हा कदाचित गहन प्रश्न होता. पण पुढे जाणाऱ्या वेळेसोबत सारं च बदलत गेलं. मुरलेल्या लोणच्यासारखी आपली मैत्री पण हळूहळू मुरत गेली.


मैत्रीचं नातं नक्की कसं असावं असा प्रश्न बरेचदा उपस्थित होतो. वरचेवर दिखाऊपणा करणारी मैत्री खरी कि वेळप्रसंगी सोबत करणारी ? गोड गोड बोलतात म्हणून मैत्री करावी कि वेळप्रसंगी खडसावून सुद्धा सांगतात म्हणून मैत्री करावी ? मजामस्ती करतायेत म्हणून मैत्री करायची कि प्रसंगी शिस्तीचे अन् योग्य वर्तनाचे धडे देतात म्हणून मैत्री करावी ?

आपलं नातं नक्कीच या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अगदी समरस झालेले आहे. जितकं एकमेकींना गोड बोललं जातं त्याहून जास्त तीव्रतेने तर खडसावून सांगितलं जातं. बरोबर असेल तर जेवढं कौतुक केलं जातं त्यापेक्षा जास्त तर चूक असल्यावर ओरडा मिळतो. मजामस्ती करायला जितकं प्रोत्साहन देतो तेवढंच किंबहुना थोडं जास्तच आयुष्य उत्तम घडावं यासाठी निरनिराळ्या प्रकारे उत्तेजन दिले जाते. दिखाव्यापेक्षाही जास्त सुखदुःखाच्या क्षणांत एकमेकींना समजून घेणं महत्त्वाचं वाटतं.
आनंदाच्या गोष्टी जितक्या सहजतेने एकमेकींना सांगतो तितक्याच, कदाचित त्यापेक्षा मणभर जास्तच विश्वासानी दुःख वाटलं जातं. मग ते दुःख कमी होईल का , हा विचार मनाला शिवत ही नाही. कारण एक हक्काचं ठिकाण ते दुःख रितं करण्यासाठी आहे, याची शाश्वती असते.


नुसतं गोडगोड तर मुळीच नाहीये आपलं नातं. कित्येकदा खटके ही उडतात. पण म्हणून \"तू नाही बोलत तर मी का बोलू ?\" असं नाही होत.‌ दोन दिवसांच्या अबोल्यानंतर काही झालंच नाही या अविर्भावात आपली बोलाचाल सुरू राहते. कित्येकदा तर काही मिनिटे सुद्धा पुष्कळ असतात. "तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना" , असं असतं आपलं. पण या आंबटगोड नात्याची मजाच काही निराळी !

यापुढे सुद्धा आपली मैत्री अशीच राहूदे, ही इच्छा !

तुझीच मैत्रिण कामिनी

-©® कामिनी खाने.