प्रिय सांताक्लॉज...

Santa la Patra


प्रिय सांताक्लॉज,
सगळे म्हणतात की तुझ्या जवळ काही मागितलं की तू त्यांना ते लगेच देतोस.
खरं तर आधी सगळी गंम्मत वाटायची, पण एक दिवस ठरवलं. सगळे तुझ्याकडे काही न काही मागतात ना तर आज मी पण तुला काहीतरी मागणार आहे, तुला ते द्यायला कितपत जमेल मला माहित नाही, पण तुला हे सगळं सांगताना माझं मन नक्कीच मोकळं होईल.
माझ्या लग्नाला पाच वर्षे झालीत, लव्ह मॅरेज असल्यामुळे दोन्ही घरातून सपोर्ट नव्हताच कधी. सगळं दोघांनी सांभाळून घेतलं. लग्नाआधी दहा वर्षे आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, त्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री होती, सगळ्यांचा विरोध पत्करून लग्न केलं, संसारही छान सुरू झाला. आता नात्यात फरक पडला, म्हणजे नात बदललं. आधी जे आमचं मैत्रीचं नातं होतं, ते नातं नवरा बायकोत बदललं. हळूहळू सगळं बदलत गेलं. आधी ज्या हक्काने मी त्याच्याशी बोलायचे ना ते मी आता बोलू शकत नव्हते, आधी मनमोकळेपणाने बोलायचे कारण मनात विश्वास असायचा की तो मला नक्की समजून घेईल. पण आता तस नव्हतं, तो टिपिकल नवऱ्याप्रमाणे वागायला लागला. आणि आमच्यात नको नको ते घडायला लागलं, भांडण तंटे सुरू व्हायला लागले.
सांता मला तो आताही खूप आवडतो, आणि माझं त्याच्यावर तितकंच प्रेम आहे, पण आता तू मला माझा जुना मित्र परत आणून दे, मला तोच समजून घेणारा मित्र हवाय, मला हवं नको ते बघणारा मित्र हवाय. माझ्यासाठी काहीही करू शकणारा मित्र हवाय. गरजेच्या वेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा माझा मित्र हवाय. प्लिज मला देशील ना....