प्रिय सांताक्लॉज..

सोशल मीडियाच्या या जगात पत्रातून सांताशी साधलेला संवाद.


प्रिय सांताक्लॉज,

अरे कसा आहेस तू? वर्ष झालं रे तुला भेटून. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक सुखद तसेच दुःखद घटनांचे गाठोडे सोबत घेवून नव्या वर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. वर्ष कसे सरले काही कळलेच नाही रे. पण खरं सांगू, सरत्या वर्षाला निरोप द्यायच्या आधी तुझी भेट होणं म्हणजे आमचं भाग्यच. कारण वर्षाचा शेवट कसा तुला भेटून अगदी गोड होतो आणि नवीन वर्षाच्या आगमनाचा उत्साह मनी द्विगुणित होतो.

आता दोन तीन दिवस झाले लेकाला ख्रिसमसची सुट्टी लागली आहे.

बापरे !!! आता त्याला दहा दिवसांची सुट्टी पण टेन्शन मात्र मला आलंय रे खूप. आता त्याची नॉनस्टॉप सुरू असणारी बडबड पुढचे दहा दिवस झेलावी लागणार. बरं ही फक्त बडबड असती तर एकवेळ मान्य होतं पण त्याची प्रश्नोत्तर मालिका...ती कशी थांबणार?

कालपासून सारखी तुझी आठवण काढतोय तो.

"आई यावर्षीही सांता येईल का ग? मला यावर्षीही गिफ्ट देईल का ग? आई पण, सांता रात्रीच का ग येतो? मला प्रत्यक्ष भेटून का गिफ्ट देत नाही तो? सांता लालच कपडे का बरं घालतो? त्याची दाढी जर कायम पांढरीच असते तर मग सांता आमच्यासारखा लहान कधी नव्हताच का ग? तो डायरेक्ट म्हातारा कसा काय झाला?"

हे आणि असे अनेक प्रश्न विचारून त्याने मला अगदी भंडावून सोडले आहे. या प्रश्नांची उत्तरे "हो " असतील तर का हो?आणि "नाही" असतील तर का नाही?

आता तूच सांग बाबा, ह्या आजकालच्या पिढीला हे एव्हढे सगळे प्रश्न कसे काय बरं पडू शकतात.?

फायनली तू त्याला एक सुंदरसे गिफ्ट दिले तो भाग वेगळा. पण त्याला ते खूपच आवडले बरं का.

ह्या आजच्या पिढीचे मात्र खूपच कौतुक वाटते. किती ती जिज्ञासू वृत्ती. कधी आणि कोणता प्रश्न समोरून बाणासारखा चाल करून येईल, काही सांगता येत नाहीं बाबा. पालक म्हणून मुलांच्या प्रश्नाचे निरसन करणे हे प्रत्येक पालकाचे आद्य कर्तव्य आहे. सारं काही मान्य आहे बघ. पण मग काही वेळा उत्तर माहीत असूनही ते देता येत नाही तेव्हा मात्र सर्व गोष्टींचा ताळमेळ साधताना आणि त्याचे मानसिक समाधान करता करता मात्र अगदी नाकी नऊ येतात रे.


बरं एवढेच नाही तर दादाची ही बडबड ऐकून नुकतीच बोलायला लागलेली माझी दोन वर्षाची लेक, सांता तू जो की अजून जिच्या कल्पनेत सुद्धा नाही, ती सुद्धा बोबड्या बोलात सांता सांता करत दादाच्या मागे मागे फिरत असते. यावर आता तूच बोल काय ते.

त्याबरोबरच एखाद्या प्रश्नावर उत्तर देताना "मला माहित नाही" म्हणायची तर पालकांना सोयच नाही बाबा ह्या आजच्या पिढीसमोर. कारण आजकालची ही पिढी थोडीच ना गप्प बसते. कारण त्यांना "नाही" ऐकायची जणू सवयच नाही.

"थांब आई, तुला नाही ना माहित, मग मी गुगल वर सर्च करतो."

हे उत्तर तर अगदी पाठच केलंय लेकाने माझ्या. आणि त्याची धाकटी बहीण, ती तर अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढे जात आहे.
नाही आई-बाबांकडून समाधानकारक उत्तर मिळाले तर गुगल कडून नक्कीच मिळते,अशी त्यांची आता खात्रीच पटली आहे जणू.

तुला विश्र्वास बसणार नाही, पण माझी लेक सुद्धा तिच्या दादाचे पाहून काल गुगल वर सांता सांता करत व्हॉईस रेकॉर्ड करून तुला शोधत होती अरे सांता. आणि काय चमत्कार समोर लाल लाल कपड्यातील तुझे ते रूप अचानक तिच्या समोर हजर. तुझी कापसासारखी पांढरी शुभ्र दाढी पाहून पळत आली रे ती माझ्याकडे आणि म्हणते कशी....
"आई,आई... शांता आजोबा, शांता आजोबा.

क्षणभर लेकीचे खूप कौतुक वाटलं रे. आपसूकच हसू फुलले माझ्या ओठांवर. इतक्या लहान वयात अगदी सराईतपणे स्मार्ट फोन वापरणारी ही आजची पिढी किती फास्ट आणि हुशार आहे नाही.

अगदी दीड दोन वर्षांची मुले सुद्धा इतक्या सफाईदारपणे स्मार्ट फोन वापरतात. ही तर एका दृष्टीने आनंदाचीच बाब आहे. या गोष्टीचे खूप कौतुक वाटते आणि तितकाच हेवाही. कारण आमच्यावेळी हे असं काही असतं तर कदाचित आम्हीही काहीतरी वेगळं नक्कीच करु शकलो असतो. नवनवीन गोष्टी अगदी सहज शिकलो असतो, याची खरच खंत वाटते.

पण त्याचवेळी सहज मनात आले, आम्हीही कधीतरी लहान होतोच रे, आमच्या वेळीही दहा दिवस नाही पण निदान एक दिवसाची नाताळची सुट्टी ही असायची. पण आम्हाला नाही कधी हे सगळे प्रश्न पडले बुवा.

हे सगळे ठीक आहे रे. मुलांची हुशारी पाहून त्यांचे कौतुक तर वाटतेच प्रत्येक पालकाला; पण मुलांची काळजीदेखील तितकीच वाटते.

स्मार्ट फोनच्या दुनियेत घडणारी ही आजची पिढी नशीबवान जरी असली तरी त्यांच्या भविष्याची चिंता पालक म्हणून मनाला खूप सतावत असते नेहमी.

सोशल मीडियाच्या या जगात सतत काही ना काही कानावर पडत असते. मोबाईलमुळे सारं अगदी सोप्पं झालं असलं तरी मोबाईलचे दुष्परिणाम देखील नाकारता येणार नाहीत.

लहान मुले तर आता मोबाइल शिवाय जेवणच करत नाहीत. त्यांचा हट्ट, आरडाओरडा यापुढे पालकांनाच माघार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.

आता मुलांना कंट्रोल करायचे म्हटले तर पालकांनीच आधी मोबाईल वापरणे बंद केले पाहिजे, असे सुचविणाऱ्यांची देखील काही कमी नाही बरं का. पण मला सांग सांता आता ह्या पॉइंटला येवून ही गोष्ट शक्य आहे का रे?

कारण मोबाईल हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल शिवाय लोकांचे पानच हलत नाही. मान्य आहे काही गोष्टी आता हाताबाहेर गेल्यात. पण याला सर्वस्वी जबाबदार तरी कोण?

विज्ञानाची प्रगती तर झाली आणि ती गरजेची पण होती. पण त्याबरोबरच होणाऱ्या दुष्परिणामांची चिंताही भेडसावत होती.

उदा.औद्योगिकिकरण म्हणजे थोडक्यात निसर्गाची हानी ठरलेली. पण प्रगतीही तितकीच गरजेची नाही का रे मग?

आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सहज झालेली ओळख देखील झटकन मैत्रीत बदलते. त्यातूनच पुढे नात्यांची गुंफण वाढत जावून गुन्हेगारी प्रवृत्तीला आपसूकच खतपाणी मिळते आहे.

बघ ना, सोशल मीडियावर नुकतेच गाजलेले "श्रध्दा" प्रकरण.

बापरे!!! किती भयानक होते रे सारे. ह्या अशा अनेक घटना आपल्या आजूबाजला घडतच असतात. काही उघड होतात तर काही लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरी लपून राहू शकत नाहीत.

याआधीही अशी खूप प्रकरणे गाजलेली आहेत. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपताना त्यांची काळजीही तितकीच वाटते रे.

सोशल मीडियाचा हा वाढता प्रभाव कमी करणे आता तरी शक्य नाही. पण होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना असेल तर नक्की सांग बाबा. कारण सोशल मीडियाच्या दुष्परिणामांची चिंता ही मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच काळजीपूर्वक हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.

तू तर मुलांसाठी मुलांचा जादूगार आहेस ना? गुपचुप येवून त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची खेळणी गिफ्ट म्हणून तू देतोस. हे जरी सगळे काल्पनिक असले तरी माझे एक ऐकशील का रे.. एखादी जादू आम्हा पालकांना पण देशील का रे? ज्यामुळे आम्हाला मुलांच्या भविष्याची मग जास्त काळजी वाटणार नाही. सांता बनून सतत त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू.

आता तर मन असे म्हणत आहे, आमची मुले कधी मोठीच होवू नयेत. म्हणजे मग ती आमच्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच उरणार नाही. पण हे अजिबात शक्य नाही हेही तितकेच खरे. पण पालक म्हणून आमची काळजी, ती कशी काय कमी होईल? याचे उत्तर तूच सांग बाबा आता.


कधीकधी वाटते, ह्या चिमुकल्यांमुळेच पुन्हा एकदा बालपण जगायला भेटते. जे करायचे राहून गेले ते सर्व पुन्हा नव्याने करता येते. ज्या गोष्टी कधी माहित नव्हत्या, त्या शोधण्यासाठी देखील नव्याने धडपड सुरू होते. आणि धेय्याप्रत पोहोचल्यानंतर लहान होवून उडया मारतानाही नव्याने जीवन जगत असल्याचा आनंद काही औरच वाटतो.

खरंच, मुले म्हणजे देवाघरची फुले..म्हणतात ते काही खोटे नाही.
पण या फुलांना जपण्याचा मूलमंत्र असेल एखादा तर तोही लवकर सांग रे बाबा.

अनोळखी ह्या दुनियेत खरी माणसे ओळखायची तरी कशी? जर माणसे ओळखण्याची खरी कला असेल एखादी तर तिही सांगून टाक बाबा पटकन्. म्हणजे पुढे जावून आम्ही आमच्या मुलांनाही त्याचे धडे नक्कीच देवू.

आज पहिल्यांदा तुझ्याशी असे पत्रातून बोलातना खरंच खूप छान वाटतंय. कारण आता पत्रही लोप पावलीत ना रे. आणि हे सर्व कशामुळे झाले? ते आता तुलाही समजलंय. मग या साऱ्यावर आता उपायही तूच सांग बाबा.

तुझ्या उत्तराची मी नक्कीच वाट पाहीन.

तुझीच,

सोशल मीडियाच्या या जगात लेकरांच्या
भविष्याची काळजी सतावणारी
आजची एक आधुनिक माता.

©® कविता वायकर