प्रिय सखी- पुन्हा घे भरारी.

प्रिय सखी, तू पुन्हा घे भरारी.

प्रिय सखी,

पत्रास कारण कि,

ईरा व्यासपीठाने आपल्या जोडीदारास पत्रलेखनाची  स्पर्धा ठेवली आहे. पण आजही माझ्या मनात जोडीदार म्हणून तुझीच प्रतिमा रेंगाळत असते. म्हणूनच मी हे पत्र तुला लिहीत आहे. तुझ्याविना माझं आयुष्य सुरु असलं तरी ते अपूर्ण आहे. मी आज जो काही आहे तो केवळ तुझ्याचमुळे! दूर असूनही तू प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिलीस, माझ्या पडत्या काळात तू माझ्यात आत्मविश्वास निर्माण केलास.पण हे करताना स्वतःसाठी जगायचं विसरलीस म्हणून हे पत्र फक्त तुलाच!

माझा नेहमीचा सर्वात पहिला प्रश्न,

"कशी आहेस तू?"

 आणि तुझं ठरलेलं उत्तर,

"मी तुझ्यासारखीच."

सखी, आज मी तुला थोडं भूतकाळात घेऊन जाणार आहे, तू माझ्याबरोबर येशील ही मला खात्री आहे. कारण तू प्रत्येकवेळी माझ्यावर विश्वास ठेवला आहेस आणि मी तो विश्वास जपला आहे.

चल तर मग थोडं पाठीमागे जाऊ.

तुला आठवत का,आपली ओळख कशी झाली?

फेसबुक सारख्या आभासी जगात वावरताना सुमारे बारा वर्षांपूर्वी आपली ओळख झाली. एका मित्राच्या पोस्टवर कमेंटबॉक्समध्ये आपला थोडा वादविवाद झाला. एका गोष्टीवरून वेगवेगळे मत आपण मांडले. त्यातून पुढे चर्चा वाढत गेली आणि मित्राने ती पोस्ट डिलिट केली. मग आपल्याला वाटलं कि,आपण पुढे बोलत राहायला हवं. म्हणून आपण फेसबुकवर फ्रेंड बनलो.

मग रोज बोलणं होतं गेलं आणि मग मला समजलं कि तूला लिखाणाची आवड आहे. तसा मीही लहानमोठ्या कविता करत होतो. माझ्या कॉलेजमधील एक जवळची मैत्रीण नुकतीच हे जग सोडून गेल्यामुळे मलाही मनातील भावना कागदावर मांडायच्या होत्या. त्यामुळे मला तुझी मदत हवी होती. म्हणून मी तुझं लिखाण वाचायला घेतलं आणि मी तुझ्या लिखाणाच्या प्रेमात पडलो, तुझा एक एक शब्द म्हणजे सुगंधी अत्तराची कुपी,जसा अवकाशाचा अंत नाही तसाच अमर्याद आणि संपन्न असा तुझा शब्द संग्रह.मनातलं कागदावर मांडाव तर ते तूच! तूच माझी आध्यगुरू!


 

तुझा प्रत्येक शब्द वाचताना जणू माझ्या चेहऱ्यावरून मोरपीस फिरत आहे असाच भास होतं होता. वैशाख वणव्यात होरपळणाऱ्या तप्त धरणीवर अचानक पावसाच्या सरी पडाव्या आणि धरणीची गात्र तृप्त व्हावी. त्यातून मग आशेचे नवं अंकुर फुटावे आणि पानगळ होऊन जीर्ण झालेल्या झाडाला नवचेतना मिळावी. तशीच माझीही अवस्था होती. निराशेच्या खोल दरीत चाचपडणाऱ्या मला नवी आशा,नवी दिशा तुझ्या रूपाने दिसली आणि तू दिलेल्या विश्वासाचा धागा पकडून मी हळूहळू वर येऊन मूळ प्रवाहात आलो. 

तू मला लिहण्याची ऊर्जा दिलीस आणि मी शब्दाला शब्द जोडून तोडकं मोडकं लिहू लागलो. त्या माझ्या लिखाणाला तू तुझ्या अनुभवाच्या भट्टीत तावून सुलाखून काढलस.एक एक अक्षर, काना मात्रा, वेलांटी यांची पुन्हा नव्याने ओळख करून दिलीस.आणि नंतर म्हणालीस कि,

“इथून पुढे तू स्वतःहून आपल्या चुका शोधायचा प्रयत्न कर.स्वतःमधल्या चुका खूप कमी लोकांना समजतात आणि त्या शोधायला शिकलास तर तुला बाकी कोणाच्या आधाराची गरज भासणार नाही.”

थोडक्यात तू मला स्वावलंबी बनण्याचा कानमंत्रच दिलास. फक्त लिखाणतीलच चुका नाहीत,तर आयुष्यात माझ्याकडून होणाऱ्या चुका मी शोधायला शिकलो. त्या पुन्हा कशा टाळता येतील? यासाठी प्रयत्न करू लागलो.अशातच शब्दाला शब्द जुळवता जुळवता आपल्या मनाच्या तारा कधी जुळल्या हे आपल्याला दोघांनाही समजलं नाही. दोघांनाही एकमेकांच्या सोबत असण्याची सवयच झाली होती.

दिवसाची सुरवात ही आपणच होतो आणि दिवसाचा शेवट ही आपणच!

तसे पाहता आपल्यात शेकडो किलोमीटरच अंतर होतं. तू पुण्यासारख्या शहरात लहानाची मोठी झालेली आणि मी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका गावात वाढलेलो, तू चकाचक रस्त्यावरून चालणारी तर मी चिखलवाटा तुडवणारा. तू पावसात आनंदाने मनसोक्त भिजणारी तर मी पावसात भिजत नाईलाज म्हणून शेतात काम करणारा. तसे आपण पूर्व आणि पश्चिम दिशा सारखे विसंगत होतो. पण प्रेमात काहीही विसंगत नसतं म्हणतात ते खरं आहे. प्रेम परिस्थिती किंवा ठिकाण पाहून होतं नाही. ते होतं जिथं ते विधिलिखित असतं. अगदी तसंच तुझं माझं प्रेम. ना कधी प्रत्यक्ष भेट झालेली ना एकमेकांना पाहिल होतं. तरी आपल्या प्रेमाने शेवटची परिसीमा गाठली होती. फक्त शब्दांमधूनच आपण एकमेकांना पाहिलं होतं. अगदी आरपार आपली ओळख झाली होती.

तुला आठवत असेलच, तू म्हणाली होतीस कि,

“मी जरी कधी तुझ्या प्रेमात पडले ना,तरीही तुला कधी सांगणार नाही.”

इथंच मला तुझ्या मनातील प्रेम दिसून आलं होतं आणि मी तुला प्रपोज केलं, तेही डायरेक्ट लग्नासाठी मागणी घालूनच!

“लग्न करशील का गं माझ्याशी?”

हे विचारताना मला दाटून आलेला हुंदका,तुझ्या डोळ्यांत तरळलेलं पाणी आणि तुझा होकार सगळं अगदी आताच घडल्यासारखं भासत गं.

सकाळ संध्याकाळ कॉलवर बोलत असणाऱ्या आपणांस आता एकमेकांना भेटण्याची ओढ लागली होती.

मी म्हणालो,

“बस्स झालं आता फक्त कॉलवर बोलणं. आता आपल्याला समोर यायला हवं.”

तू म्हणालीस,

“मी तुझ्या वाढदिवसाला कोल्हापूरमध्ये येईन. आपण खूप छान सेलिब्रेट करू.”

ठरवल्याप्रमाणे तू बर्थडेच्या आदल्या दिवशी कोल्हापूरला आलीस. तुला प्रत्यक्षात समोर पाहून मी एकदम स्तंभीत झालो. जणू माझा श्वास थांबला होता. तू फोटोत दिसत होतीस त्यापेक्षाही कितीतरीपटीने सुंदर होतीस. मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती इतकी सुंदर. मला तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता. शेवटी तूच म्हणाली,

“अय कोल्हापुरी पैलवान!फक्त बघतच बसणार आहेस कि माझं स्वागतही करशील?”

मी भानावर आलो.

त्यानंतर मी तुला आपल्या घरी घेऊन गेलो. मी घरी आपल्याबद्दल सगळं बोललो असल्याने दुसरीकडे जाण्याची गरज नव्हती. घरी तुझं कोल्हापुरी पद्धतीनं छान स्वागत करण्यात आलं. तुझा तो दिवस घरच्यांशी चर्चा करण्यातच गेला.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मी बाईकला किक मारली आणि आपण आपलं आवडतं ठिकाण असणाऱ्या गणपतीपुळेला निघालो. आंबा घाटातून कोकणात उतरताना घाटात जे काही वातावरण होतं,ते मी शब्दांत नाही मांडू शकत. फक्त इतकंच सांगीन कि आपण स्वर्गातून प्रवास करत होतो. तीन तासाच्या प्रवासानंतर आपण गणपतीमंदिराजवळ पोहोचलो. थोडी गर्दी असल्याने दर्शन घेण्यासाठी आपल्याला एक तास लागला. तिथे देवाकडे जे मागितलं ते त्याने दिलं कि नाही हे आपल्यालाच माहित आहे. त्यावर सध्या न बोललेलं बरं.. 

पुढे तास दोनतास समुद्राच्या लाटा अंगावर झेलून आपण परतीच्या प्रवासाला निघालो. येताना माझं आवडतं ठिकाण असणाऱ्या मार्लेश्वरजवळ आपण बर्थडे केक कापला. आजवरचा सगळ्यात वेगळं आणि संस्मरणीय असं हे बर्थडे सेलिब्रेशन होतं. तेथील धबधब्याजवळ तू पाय घसरून पडणार इतक्यात मी तुला सावरलं,पण दोघांचेही पाय घसरून आपण पाण्यात पडलो होतो. तेव्हा तू मला झाडाला जशी वेल बिलगते तशी बिलगली होती. तो क्षण मी आजही तसाच जपून ठेवला आहे. मार्लेश्वराचे दर्शन घेऊन घराकडे परतताना अंधार पडायला आला असताना आपण घाटात थोडावेळ थांबलो होतो. थंडगार वारा असल्याने अंगावर शहारे येत होते. घाटातून दूरवर परसलेला कोकण अंधारातही लाईटच्या दिव्यामुळे मनमोहक दिसत होता.जणू त्या लाईट काजव्यासारख्या लुकलूक भासत होत्या. तिथे आपण एकेमेकांचे घट्ट पकडलेले हात आठवले कि, आजही मी हताशपणे माझ्या मोकळ्या हाताकडे बघतो आणि तुझ्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. डोळ्यांच्या कडा पानावतात.

आता इथून दीड दोन तासात आपण घरी पोहोचणार होतो. येता येता आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत आपला प्रवास सुरु होता. तो प्रवास कधीच संपू नये असं आपल्या दोघांनाही वाटत होतं. 

आपण ठीक अकरा वाजता घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पहाटे तु पुण्यासाठी जायला निघाली. मी तुला सोडण्यासाठी बस स्टॅन्डवर आलो होतो. इतक्यात तू बसच्या दारापर्यंत जाऊन पुन्हा धावत मागे आलीस आणि मला घट्ट मिठी मारलीस. मी बावरलो. माझ्यासाठी हे सारं अनपेक्षित होतं. अजूनही ती तुझी गंधाळलेली मिठी आठवली ना डोळे आपोआप झरू लागतात. तो तुझा स्पर्श, तो गंध अजूनही माझ्या श्वासात दाटून येतो.  त्यावेळीस तुझे आसवांनी भरलेले  डोळे आजही माझा पाठपुरावा करतात गं..

आजही आठवतोय मला तो क्षण.. तेव्हा तुझे डोळे अश्रुंनी भरले होते आणि नकळत बराचवेळ आवरलेला अश्रूंचा बांध तेव्हा फुटला. काही मिनिटं अशीच गेली. मग तू स्वतःला सावरत म्हणालीस,

“चल! आता मला जायला हवं. माझी जायची वेळ झाली.”

मी तुझे डोळे पुसत म्हणालो,

“येडू आहेस येडू. आता जातं आहेस पण लवकरच आपण कायमस्वरूपी एकत्र असू.”

तेव्हा तू म्हणालीस,

“मी काय सांगते ते ऐक, काही माणसांचा आपल्या आयुष्यातील रोल ठरलेला असतो. त्यांचा रोल संपला कि त्यांना एक्झिट घ्यावी लागते. पण त्यांचा रोल संपला म्हणून आपण तिथंच थांबून चालत नाही. आपला शो पुढे चालू ठेवावाच लागतो.”

हे बोलताना तुझा स्वर थरथरला आणि तू धावत जाऊन बसमध्ये बसलीस. बस सुरु झाली आणि जाताना तू खिडकीतून मला म्हणालीस,

“सांभाळ स्वतःला. मी उद्या असेन नसेन, पण तू तुझं लेखन सुरूच ठेव. बंद करू नको. तुला खूप काही साध्य करायचं आहे.माझं स्वप्न पूर्ण कर.”

तेव्हा तू असं का बोलत होतीस, हे मला काहीच समजलं नाही. मी त्याचं विचारात घरी गेलो. घरी आई माझी वाट बघत होती.

आईला मी म्हणालो,

“आई ती जाताना अशी काही बाही म्हणत होती.”

मग आईने मला तू तिला सांगितलेली हकीकत सांगितली.

"तिच्या घरातून तुझ्या आणि तिच्या नात्याला विरोध आहे. तुझं अजून करियर झालं नाहीये. तूझ्या भविष्याची काहीच खात्री त्यांना वाटतं नाही. शिवाय त्यांना तिच लग्न शहरातच करून द्यायचं आहे. आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुझ्या विरोधात जातात.तिने आईवडिलांच मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी तिचं ऐकलं नाही. तिला इमोशनल ब्लॅकमेल केलं. मग तिचा नाईलाज झाला. तिने प्रेम आणि आई वडील यामध्ये आई वडिलांना निवडलं. ती त्यांची परवानगी घेऊन शेवटची इच्छा म्हणून तुला भेटायला कोल्हापूरला आली होती.तू आयुष्यात खूपकाही मिळवावं,तुझा कथासंग्रह प्रकाशित व्हावा अशी तिची इच्छा आहे."

हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला,यानंतर मी स्वतःला कस सावरलं ते माझं मला माहित आहे.पण मी काही काळानंतर स्वतःला सावरलं आणि तू सांगितल्याप्रमाणे पुढे चालू लागलो. मी लग्न केलं आणि माझा संसार सुरळीत सुरु आहे. याला कोणी तडजोड म्हणेल किंवा कर्तव्य म्हणेल. पण मी एक नवरा म्हणून माझी सगळी कर्तव्य पार पाडली आहेत आणि सध्याही पाडत आहे.

आता सांगण्याचा मुद्दा हा आहे कि,तू जे जे मला सांगितलंस ते ते मी तुझी इच्छा समजून पूर्ण करत गेलो. तु मला वाहतं राहायला सांगितलं होतं. मी राहिलो वाहत माझ्या संसारात. मग मला सांगशील का, तू असं का वागतेस? स्वतःला का इतक्या विरहदाहाच्या वेदना देतेस? तू अजूनही लग्न केलेलं नाहीस. येणारं प्रत्येक स्थळ तू काहीं ना काही कारणं सांगून नाकारलं आहेस. हे सगळं तू का करतं आहेस? याचं उत्तर तू आजवर मला दिलं नाहीस. मला पुढे चालत राहायला सांगून तू त्याच जागी का थांबली आहेस? तू म्हणाली होतीस, "मी नदी बनून वाहत राहीन."

तुला तुझ्या सागराच्या दिशेने वहावंच लागेल..भलेही तुला हवा असणारा सागर मी नाही, पण तुला तरीही तुझ्या त्या सागराचा शोध घेत त्याच्याकडे वाटचाल करायला हवी.मला तुला असं आतल्या आत जळताना पाहून खूप त्रास होतो गं.तुझ्यासारखी निस्वार्थी जोडीदारीण मिळण्याइतपत माझं नशीब थोर नव्हतं हेच खरं. पण तू ज्याच्या आयुष्यात जाशील त्याला तुझ्या परिस स्पर्शाने त्याचं सोनं करशील यात शंका नाही. आता आणखी वेळ वाया घालवू नको. आधीच खूप वेळ वाया गेलेला आहे. तरी स्वतः पुन्हा नव्याने उभी रहा. तुझ्यातील ती जिद्द,ती धमक पुन्हा उफाळून येऊदे. दाखवून दे सगळ्यांना कि, तू नियतीसमोर गुडघे टेकले नाहीस. तू पुन्हा उभी राहिलीस आणि तू लढलीस. मला खात्री आहे कि तू माझी ही ईच्छा नक्की पूर्ण करशील. करशील ना? मला आपली स्टोरी जगासमोर मांडायची आहे, पण त्यासाठी त्या कथेचं हॅपी एंडिंग असणं गरजेचं आहे. करशील ना हॅपी एंडिंग?

आता या पत्राचं उत्तरं म्हणून मला तुझ्या लग्नाची निमंत्रणपत्रिका देशील हा विश्वास आहे.


 

तुझाही संसार फुलावा, तुझ्या वाट्याचं सुख आणि प्रेम तुला मिळावं. अशी सदैव प्रामाणिक इच्छा असणारा तुझा सखा-  सारंग

(वाचक मित्रहो, मी थोडं वेगळ्या धाटणीचं आणि धाडसी पत्र लिहिलं आहे, धाडसी याबद्दल कि स्वतःचं लग्न झालेलं असताना लग्नापूर्वीच्या प्रेयसीला तिच्या काळजीपोटी पत्र लिहिणं म्हणजे काही लोकांना व्यभिचारही वाटू शकतो. पण आपलं लग्न झाल्यावर पूर्वीच्या जिवलग माणसांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देणं योग्य आहे का? त्यांना योग्य मार्ग दाखवणं किंवा काही गोष्टींची जाणीव करून देणं कधीकधी फार गरजेचं असतं. आपण आपल्या आयुष्यात खूप खूप पुढे निघून जातो आणि काही माणसं आपली अजूनही वाट पाहत असतात. तेव्हा त्यांना मूळ परिस्थिती आणि भविष्यातील अडचणीची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना मदतीचा हात देऊन मूळ प्रवाहात आणणं गरजेचं असतं. नसेल तर मग ही आपलीच माणसं एकदिवस काळाच्या ओघात हरवून जातात ती कायमचीच……..

माझा विषय आणि माझा प्रामाणिक हेतू सुज्ञ वाचकवर्ग नक्की समजून घेईल अशी आशा आहे….. धन्यवाद.)