प्रिय गंगा

.


प्रिय गंगा ,
मी रमणिक. तू मला विसरली नसशील. कारण तुझ्या आयुष्यात जी वाताहत झाली त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. तुझ्या जीवनकथेमधला एकमेव खलनायक. तुझ्या काळजावर कधीही न मिटणारी जखम दिलीय मी तुला. पत्रास कारण की काल आझाद मैदानावर तुझे भाषण ऐकले. खूप अभिमान वाटला. किती आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने बोललीस तू. वेश्यांच्या हक्कांसाठी तू आवाज उठवला. आता पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनाही भेटणार आहेस असे ऐकले. काल मैदानात तुझेच कौतुक कानावर पडत होते. मी चेहरा झाकला होता. याआधीही कमाठीपुऱ्यात दोनचारवेळा येऊन गेलो. दुरूनच बघितले तुला. वाटले तुझी माफी मागावी. पण हिंमत नाही झाली. कुण्या तोंडाने मी समोर येऊ ? मला आजही सर्वकाही आठवत आहे. तू खूप प्रेम करायची माझ्यावर. मी मात्र तुझा फायदा उचलला. तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तुला कमाठीपुऱ्यात विकले. एकदाही मागे वळून बघितले नाही. त्या रात्री खूप मजा केली. खिश्यात पैसे होते ना. पण खरं सांगू तो पैसा टिकला नाही. हरामची कमाई कधीच सुख देत नसते. मी आजन्म गरीबच राहिलो. लक्ष्मी कधी आलीच नाही माझ्या जीवनात. आला तो पैसा आणि तोही टिकला नाही कधीच. गंगा नदी पवित्र करते सर्वाना. पावित्र्य असते तिच्यात. पाप धुवून काढते. माझे कर्म असे की मी माझ्या गंगेला बाजारात बसवले. ज्या मुलीने माझ्यावर प्रेम केले तिलाच विकले. आजही रात्री झोप येत नाही. तुझा निरागस चेहरा समोर येतो. कालच्या गर्दीत मी एक सामान्य माणूस होतो. ज्याची कसलीच ओळख नव्हती. तर तू एक प्रसिद्ध व्यक्ती होतीस. एक लखलखणारा तारा होतीस. मी समाजात जरी इज्जतदार व्यक्ती म्हणून वावरत असतो तरी माझ्या स्वतःच्या नजरेत माझी काहीच किंमत नाही. तू जरी एक वेश्या असलीस तरीही कितीतरी लोकांच्या नजरेत तुझ्याबद्दल पराकोटीचा आदर आहे. हिरा कोळश्याच्या खाणीत गवसला तरी तो हिराच असतो आणि त्याचे स्थान राजमुकुटावरच असते. मी तुला कोळश्यात फेकले. वाटलं सडत बसेल आयुष्यभर कमाठीपुऱ्यात. पण तू हिरा होतीस गंगा. चमकणे तुझं प्रारब्ध होते. तू परीसासारखे कमाठीपुऱ्याच्या लोकांच्या आयुष्याचेही सोने केलेस. आज कितीतरी अनाथ मुले तुला " माँ " म्हणून हाक मारतात. मी ज्या गंगाला विकले होते ती गंगा मला कुठेच भेटली नाही. ती भाषण देणारी गंगुबाई वेगळीच होती. ती संघर्ष करून कणखर झाली होती. पण तिच्या हृदयातील मायेचा ओलावा कायम होता. चेहऱ्यावर हास्य तर डोळ्यात कोरडे झालेले आसवे होती. इतकी दुःखे पाहूनही कस हसायला जमत तुला ? गंगेत लोक आंघोळ करून पवित्र होतात. गंगा मात्र कधीच अपवित्र होत नाही. तसच तू पण कमाठीपुऱ्यात राहून तिथेही पावित्र्य आणलेस. तुझ्या नजरेत जो स्वाभिमान दिसला तो मला आजन्म मिळवता आला नाही. तू खरच खूप पुढे निघून गेलीस गंगा. जर मी तुला विकले नसते तर तुझे जीवन काही और असते. कदाचित तुझ्या हातून इतकं कार्य घडलं नसत. गंगा , हे पत्र वाचून तू रडत असशील. त्याने हा कागद ओला होत असेल. तुझ्या आसवांनाच गंगाजल समजून माझेही पाप कुठेतरी मिटतील. तू मला माफ करशील ना ? नक्की करशील. कारण तू एक स्त्री आहेस. आम्हा पुरूषांना नाही जमत इतकं महान व्हायला. आम्ही तर थोड्याशा संघर्षाने खचून जातो. तुम्ही स्त्रिया मात्र लढत राहतात. स्त्रिया आहेत म्हणून जग सुंदर आहे. गंगा खूप अभिमान वाटतो तुझा. लाजही वाटते स्वतःची की मी परिसाला विकून आलो. माझीही एक मुलगी आहे. खूप भीती वाटते की माझे पाप आडवे येतील आणि तिलाही कुणीतरी विकेल. असो. जमल्यास माफ कर मला. शोधू नको मला. माझी लायकी नाही तुझ्या आसपासही भटकायची. तू जिंकलीस गंगा. तू जिंकलीस. तुला अभिनेत्री बनायचं होत ना. एकदिवस नक्कीच एक प्रसिध्द अभिनेत्री तुझ्या आत्मचरित्रावर चित्रपट करेल. काळजी घे.
कधीकाळी तुझाच असलेला रमणिक