Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

प्रिय सांताक्लोज...

Read Later
प्रिय सांताक्लोज...

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : प्रिय सांताक्लोज...
                             प्रिय सांताक्लोज 

प्रिय सांताक्लोज,
डिसेंबर महिना उजाडला की सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागतात. पण नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी उत्सुकता लागून राहते ती तुझ्या येण्याची! नाताळ म्हटलं की डोळ्यांसमोर ख्रिसमस ट्री सोबत तुझा चेहरा सुद्धा येतो. शेवटी नाताळसोबत तुझं अतूट नातं आहे. नाताळची सुट्टी सुरू झाली की बच्चेकंपनी तर तुझ्याकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंची वाट पाहत असतात. डिसेंबर महिन्याच्या या शेवटच्या काही दिवसांत तर सगळीकडे नुसता झगमगाट दिसतो. आणि या उत्सवाची विशेष शोभा वाढवणारं जर कोणी असेल तर तो अर्थातच तू!
लहानपणी ना तुझ्याबद्दल खूप उत्सुकता लागून रहायची. म्हणजे एक चित्र समोर असायचं की आकाशातून तुझ्या त्या खास गाडीत बसून तू सर्वांच्या भेटीला येतोस. येताना ती भेटवस्तू, चॉकलेट,इ. नी भरलेली भलीमोठी पिशवी घेऊन येतो.‌ आणि रात्री उशिरा घरी येऊन नकळत भेटवस्तू देऊन जातोस. सोबतीला इतर ऐकीव गोष्टी सुद्धा होत्याच, जसं की उशीखाली मौजे ठेवायला हवे, इच्छा कागदावर लिहून ठेवली पाहिजे,इ. ख्रिसमसच्या संध्याकाळी किंवा पूर्वसंध्येला सांताक्लोजच्या वेशात येणारी ती व्यक्ती खरोखरच सांता वाटायची. त्यांच्याकडून मिळणारे ते चॉकलेट तर निराळाच आनंद द्यायचे. आणि या ही पलीकडे जाऊन मन एक वेडा विचार करायचं की कधीतरी ख्रिसमसच्या रात्री आपल्याला एक खास भेट नक्कीच मिळेल. लहानग्यांसोबत हसणारा, बागडणारा सांता त्या लहान मुलांच्याच नव्हे तर थोरामोठ्यांच्या मनावरही छाप पाडायचा, किंबहूना अजूनही ती छाप दिसते.
वर्ष भरभर सरली आणि कल्पनेच्या दुनियेतून बाहेर येऊन वास्तविक जगासोबत भेट झाली. कल्पनाविश्वात असणारा तू जो काही आहेस, तो कधीतरी भेटीला यावा अशी मनोमन एक इच्छा तर आहेच.
सांताक्लोजच्या वेशात येणारा तू, कित्येकांच्या चेहऱ्यावर हसू आणतोस. या कालावधीत कुठेही गेलं की ती नाताळची सजावट सहज लक्ष वेधून घेते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निरनिराळे सण साजरे करतात.‌ ख्रिस्ती धर्माचा हा सण सुद्धा आनंदाची लयलूट करणारा आहे. तू भेट घेऊन येशील की नाही ठाऊक नाही. पण हो हल्लीच्या 'सिक्रेट सांता' कडून मात्र भेटवस्तू नक्कीच मिळते.
असो! तुझ्या येण्याने लहानमोठ्यांच्या चेहऱ्यावर येणारं हसू आणि मिळणारा आनंद असेच टिकून राहूदे हीच सदिच्छा.
- एक सांता प्रेमी
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//