शीर्षक:- प्रीतीसारंग
विषय:- मनाचे खेळ
भाग -५
मागील भागात -
शिवच्या शायरीने कृतिका एकदम मंत्रमुग्ध झाली. तो पुढे काही बोलणार तोच तिची मैत्रीण आभाने तिला आवाज दिला. त्याने मागे वळून पाहिले तर ती पाहतच राहिली.
आता पुढे:-
शिव दिसायला खूप देखणा होता. पहिल्या नजरेत कृतिकाला तो खूप आवडला होता. त्यात तो शायरी लिहितो हे तिला माहिती झाल्यावर ती त्याच्या शायरीच्या प्रेमात पडली.
तो आभाचा चांगला मित्र होता त्यामुळे तिने तिची त्याच्याशी ओळख करून दिली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाली. आभाला भेटण्यासाठी येणारी कृतिका आता शिवला भेटायला येऊ लागली. मनोमन ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती ; परंतु याची कानोकान खबर ना शिवला होती ना आभाला.
सगळं काही छान चालू होतं. रोज भेटीगाठी, गप्पा, चेष्टा, मस्करी होत असायची. अशातच कसे दिवस निघून गेले हे त्यांना कळलेच नाही. काॅलेजचे वर्ष संपत आले तसे कृतिकाच्या मनात चलबिचल सुरू झाली. आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करायचे असे तिने मनात ठरवले. मनात शब्दांची जुळवाजुळव करून ती त्याच्या काॅलेज कॅन्टीनमध्ये गेली. सगळीकडे शोधूनही तो तिला कुठेच दिसला नाही. आभाला विचारल्यावर तिलाही त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही असे तिने सांगितले. त्याचा फोनही बंद येत होता. ती खूप उदास झाली. तो असा अचानक कोणाला काहीही न सांगता गायब झाला होता की त्याच्याबद्दल कोणालाच फारसं माहितीही नव्हतं. तिने तिच्या परीने शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात तिच्या हाती काहीच लागले नाही.
त्या दिवसानंतर तो तिला त्या रात्री भेटला होता. तेही त्या अवस्थेत. त्याच्या राहणीमानात कमालीचा बदल झालेला होता. डोक्यावरचे केस खांद्यावर रूळत होते. दाढीमिशा वाढलेल्या, डोळे काही तरी शोध असल्यासारखे, चेहरा रापलेला, जणू तो एक गुढ असा व्यक्तिमत्व आहे असा दिसत होता.
त्याच्या बदललेल्या व्यक्तीमत्वामुळे सुरूवातीला तिने त्याला ओळखलेच नाही. माणुसकी म्हणून ती तेव्हा त्याला तिच्या घरी घेऊन आली होती; नंतर जेव्हा त्याला तिने निरखून पाहिलं तेव्हा मात्र तिला खात्री पटली की तो तोच आहे तिचा शिव, तिचं पहिलं प्रेम.
तिला सगळं काही आठवलं तशी विचारात पडली. इतकी वर्षे तो कोठे होता? असं काय झालं होतं की तो तेव्हा अचानक निघून गेला होता? तो शिव आहे तर तो का स्वतःला सारंग म्हणून सांगतोय? प्रीती खरंच त्याची बायको आहे का? असे बरेचसे प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होते. अर्थात तो त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर देऊ शकणार नाही. कारण तो सध्या वेगळ्या भ्रमात राहतोय. अशा भ्रमात की त्याला स्वतःचा पूर्ण विसर पडला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असेल तर त्याच्या आईवडिलांनाच विचारावे लागेल. ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. बाकी नंतर पाहू असा विचार करत ती बसली होती.
तेवढ्यात तिला त्याची हालचाल जाणवली. त्याच्या डोळ्यांची हालचाल वेगाने होऊ लागली. हात पाय हळूहळू हालचाल करू लागले. ती त्याच्याजवळ जातच होती तर तो मोठ्याने ओरडला,"प्रीती, थांब. मला सोडून जाऊ नकोस."
त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. तो जोरजोरात श्वास घेत होता, त्याच्या शरीराची थरथर होत होती. ती जवळ गेल्यावर त्याने तिचा हात घट्ट पकडला. त्याचे डोळे अजूनही बंदच होते. त्यातच त्याची ती बडबड चालू होती. काहीशी पुसटशी ती बडबड तिच्या कानांपर्यंत पोहचली तर काही पोहोचली नाही.
ती त्याच्या डोक्यावरून हळूहळूपणे हात फिरवत होती. थोड्यावेळाने त्याची शरीराची थरथर बंद झाली. श्वासही नाॅर्मल झाले. तिच्या हातावरची त्याची पकडही सैल झाली. तो पुन्हा झोपेच्या अधीन गेला. कदाचित औषधाची गुंगी असल्याने तो पुन्हा झोपी गेला.
संध्याकाळी बऱ्याच उशीराने त्याला जाग आली. आता तो बऱ्यापैंकी नाॅर्मल व शांत झाला होता. त्याने प्रीतीबद्दल पुन्हा विचारणी केली.
तिने सांगितले की ती लवकरच येईल असा तिने निरोप दिला आहे. त्यावर तो खूप खूश होत तिच्यासोबत तिच्या घरी आला.
घरी आल्यावर त्याला एका रूममध्ये आराम करायला सांगून सदाला त्याच्याजवळ बसवून ती संजय व सुमन यांच्याकडे आली. तिला बघताच त्यांनी काळजीने त्याच्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, "तो आता ठीक आहे. काळजीचे कारण नाही. मला त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचे आहे."
"आम्हाला माहिती तुला काय विचारायचे आहे ते? त्याला काय झालंय? हे तर तुला एव्हाना कळले असेलच. तरीही तुला काय प्रश्न पडले असतील तर तू विचारू शकतेस?" संजय तिच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत म्हणाले.
"हो, काका. मला प्रश्न पडलेत आहेत. तो मानसिक आजाराचा शिकार आहे हे माहिती पण तो स्वतःला सारंग का म्हणतो आणि ही प्रीती कोण आहे?"
क्रमशः
काय असेल प्रीतीचे रहस्य? मानसिक आजारातून शिवला कृतिका बाहेर काढेल का?
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा