Login

प्रीतीसारंग- भाग-२

मनाच्या खेळात अडकलेल्या शिवला वास्तव जगात आणणाऱ्या कृतिकाची कथा
शीर्षक:- प्रीतीसारंग

विषय:- मनाचे खेळ

भाग - २

"मॅम, लवकर या, तो शुद्धीवर येत आहे." सदाने जोरात तिला हाक मारली.

त्याने हाक मारताच ती लगबगीने धावत आली.

त्याने डोळे उघडले तसे समोर त्या दोघांना पाहताच झटकन उठून बसला.

"मी इथे कसा? " तो गोंधळून त्या दोघांना पाहत म्हणाला.

"तुम्ही काल रस्त्यावर आमच्या कारला धडकलात. बेशुद्ध पडला होतात म्हणून मॅम आणि मी तुम्हाला  इथे आणले." सदा त्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला.

त्याचे डोके जड झाले होते. त्याला पुन्हा भोवळ आली आणि त्याने डोळे झाकत दोन्ही हातांनी डोके गच्च धरून बेडच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर डोके टेकवले.

तिने सदाला डोळ्यांनी खुणावले तसे तो पुढे सरसावत त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाला,"काय झाले, साहेब. अजून बरे वाटतं नाही का तुम्हाला?"

"आ हा, अम्म.. हो, थोडी चक्कर आली. आता ठीक आहे मी. मला तिला शोधायला जायचे आहे. मी जातो." तो अंगावरील ब्लँकेट बाजूला करून उठत म्हणाला.

"हे पाहा मिस्टर, तुम्हाला अजून ठीक वाटतं नाही. तुम्हाला ज्यांना शोधायला जायचे आहे. त्यांना आपण मिळून शोधू. तूर्तास तुम्ही आराम करा." ती पुढे येत म्हणाली.

"तुम्ही कोण आहात?" तो कपाळावर आट्या पाडत  तिच्याकडे पाहत म्हणाला.

"माझे नाव कृतिका आहे. हा माझा केअरटेकर व ड्रायव्हर सदा आहे." ती तरूणी त्याच्याकडे पाहत  म्हणाली.

"ओह, अच्छा. तुमच्या दोघांचे खूप धन्यवाद मला इथे आणल्याबद्दल असे मी म्हणेन असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही म्हणणार मी. कारण माझ्या शोध कार्यात तुम्ही अडथळा निर्माण केलात. जाऊ द्या मला. " तो पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत चिडत म्हणाला.

"हे पाहा, मिस्टर, सध्या तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तुम्ही कोण आहात? कोणाला शोधत आहात ते आम्हाला सांगा. मी आणि सदा आम्ही दोघे तुमची मदत करू. वाटल्यास पोलिसांचाही मदत घेऊ. " कृतिका त्याला समजावत शांत स्वरात म्हणाली.

"मी सारंग, माझी बायको प्रीतीच्या शोधात गेलो होतो. पण तुमच्यामुळे तिला शोधू शकलो नाही." एक कटाक्ष रागात टाकत तिच्याकडे पाहत म्हणाला.

"अच्छा, तुम्ही काळजी करू नका. आपण शोधू त्यांना. आता आराम करा. पोलिसांत कम्पलेट करू आपण. तिचा फोटो असेल ना तुमच्याकडे तो द्या." ती पुन्हा त्याला आराम करायला सांगत म्हणाली.

"तुम्ही खरंच माझी मदत करणार का?" तो चेहऱ्यावर स्मित आणतं आश्चर्याने म्हणाला.

"हो नक्कीच. पण त्यासाठी तुम्हाला लवकर बरं व्हावे लागेल. आता आराम करा." ती त्याला म्हणाली.

"हो, पण तिला शोधणे गरजेचे आहे ना. आता जाऊ या. नाही तर ती खूप लांब निघून जाईल. चला ना." तो उठून उभा राहत म्हणाला. 

तो ऐकणार नाही हे तिला कळलं होतं. त्यामुळे तिने त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

सारंग उभा राहिल्यावर त्याचे लक्ष त्याच्या कपड्यांकडे गेले. पुन्हा त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. तिचे सगळे लक्ष त्याच्याकडेच होते. त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह ओळखून तो काही म्हणायच्या आधीच ती त्याला म्हणाली, "काल तुमचे कपडे भिजल्याने माझ्या भावाचे कपडे सदाने तुम्हाला घातले. त्याची अंगकाठी तुमच्यासारखीच आहे. तो सध्या आऊट ऑफ टाऊन आहे."

"ओके, जाऊ या का आता?" तो तिच्या उत्तरावर आधी चमकला व नंतर मान डोलवत म्हणाला.

तिने हो मध्ये मान डोलावली. कारची चावी घेत सदाला पुन्हा नजरेने काहीतरी खुणावले व त्याच्यासोबत ती निघाली.

कारमध्ये बसल्यावर तिने त्याला विचारले,"कोठे जायचे आधी? प्रीतीचा फोटो आहे का तुमच्याकडे? "

"आधी कोठे जायचे मला नाही कळतं. प्रीतीचा फोटो नाही माझ्याकडे." तो गोंधळलेला उदास होत म्हणाला.

त्याच्या चेहऱ्यावरील भाव वेगळेच वाटतं होते. ती त्याला निरखून पाहत होती. त्याच्या मनात नेमकं काय याचा शोध तिला घ्यायचा होता.

"ओके, रिलॅक्स. तुमचा फोन कोठे आहे? त्यात असेल ना तिचा फोटो?" तिने पुन्हा त्याला समजून घेत कार चालवत म्हणाली.

"आ हा, माझा फोन. बहुतेक मी घरीच विसरलो. ती लगबगीने बाहेर पडली ना मग मी पण तिच्यामागे फोन न घेताच बाहेर पडलो. " तो डोक्यावर ताण देत म्हणाला. त्याचे बोलणे गोंधळात टाकणारे होते.

"ठीक आहे. आधी आपण तुमच्या घरी जाऊ या. तुमचा फोन घेऊन मग शोधायला जाऊ. तुमचे घर कुठे आहे ते सांगा." ती त्याला म्हणाली.

"हो, जाऊ या घरी. इथून डावीकडे. साकेत बंगला आहे. तिकडे चला." तो डावीकडे हात करत म्हणाला.

त्याने सांगितलेल्या ठिकाणी ते दोघे तिथे गेले. तो कारमधून पटकन उतरला व लगबगीने बंगल्यात गेला. तीही त्याच्यामागे आत गेली. तिथे गेल्यावर तिला जे कळले त्याने ती गोंधळून गेली.

क्रमशः

कृतिका का गोंधळून गेली? सारंग असा गोंधळून का बोलत आहे? प्रीती सापडेल का?

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखक स्पर्धा-२०२५

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

🎭 Series Post

View all