प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३

कथा एका यशस्वी उद्योजिकेची..! खऱ्या आयुष्यात ती खरेच यशस्वी झाली असेल का?

प्रीती पर्व दुसरे!
भाग -तीन.



टाळ्यांच्या गजरात सर्वांनी प्रीतीचे स्वागत करून सोनियाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. चहूबाजूने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. ती हसून शुभेच्छा स्विकारत होती पण माईच्या अशा अचानक आणि अनपेक्षित घोषणेने तिला आश्चर्यासोबत रागही आला होता. या क्षणी मात्र तिला तो दाखवता येत नव्हता. ती काही बोलणार तोच राधामावशीने तिचा हात गच्च दाबून धरला. 'तुला बोलायची ही योग्य वेळ नव्हे.' तिचे डोळे जणू तिला हेच सांगत होते.


"वेलकम टू अवर एसपी ग्रुप्स, मिस एचआर!" तिच्यापुढे गुलाबांच्या फुलांचा गुच्छ धरून मिश्किल हसत मिहीर म्हणाला.


"एसपी ग्रुप इज ऑलरेडी बिलांग्ज टू हर. आपल्या 'सोनप्रीत'  ची प्रीत तीच तर आहे." सोनिया म्हणाली.


"एस! आणि आता ऑफिशिअली सुद्धा ती एसपी ग्रुपची झालीय." मिहीर.


"मिहीर अंकल, यू टू?" प्रीती. "बाय द वे, थँक यू!" त्याच्या हातून पुष्पगुच्छ घेत ती.


"कम ऑन स्वीट गर्ल अँड चिअर अप! तुझ्यासाठी आणखी एक खास सरप्राईज ऑन द वे आहे." मिहीर.


"ओह नो! पुन्हा सरप्राईज? आय थिंक आय हेट सरप्राईजेस." ती छोटासा चेहरा करून म्हणाली.


"हे सरप्राईज असे आहे की तू जागेवर उडया मारू लागशील. आय बेट." तो हसून म्हणाला.

"तिकडे बघ." एंट्रन्सकडे तो बोट दाखवत होता. तिकडे बघून तिचा छोटासा झालेला चेहरा एकदम फुलून आला.

"ओह माय गॉड! स्यामी? व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज! मिहीर अंकल, हा केव्हा आला?"
ती एक्सायटेड होत विचारत होती.


"मला कशाला? त्यालाच विचार ना." मिहीर.


"हेय प्रीत! हॅपी बर्थडे डिअर!" तो तिच्या पुढ्यात उभा होता.


"राधाई पटकन एक चिमटा काढ बरं. माझा आत्ताही विश्वास बसत नाहीये."
राधामावशी कडे बघून ती.


"राधाई कशाला? मीच काढतो ना." तिला चिमटा काढत तो.


"आऊच! सम्या, गधड्या एवढया जोरात कोणी चिमटा काढतो काय?" ती ओरडली.


"मिस एचआर, जरा हळू बोला. लोकांच्या नजरा तुमच्यावरच आहेत." तिच्या कानाशी पुटपुटत मिहीर.


"ओह! सॉरी सॉरी. यू कॅरी ऑन!" लोकांकडे बघत ती म्हणाली.


"समीर, केव्हा आलास? ना खबर, ना पता." ती


अगं कालच आलो. तुला सरप्राईज द्यायचे होते सो, नो कॉल अँड नो मेसेज!" समीर.


"आणि हे काय घातलेस? सारी अँड ऑल?" तो.


"ऍक्च्युअली सम्या, साडी घालत नाही नेसतात." ती.

"व्हॉटएव्हर! बट प्लिज कॉल मी सॅमी नॉट सम्या." समीर.


"डिअर सॅमी टेल मी, हॉऊ आय लुक?" त्याच्याकडे पाहत ती.


त्याने एकवार तिला न्याहाळले.
"ब्युटीफुल. गॉर्जस! म्हणजे तू साडीमध्ये एवढी सुंदर दिसत असशील असे इमॅजिन केले नव्हते." त्याच्या स्तुतीने ती आनंदली.

सगळ्यांच्या शुभेच्छा स्विकारून आता ती बऱ्यापैकी थकली होती. हे असं खोटं खोटं हसून 'थँक यू थँक यू' म्हणायला तिला फारसे आवडायचे नाही. माईच्या इच्छेखातर ती हे सगळे करत होती.

मिहीर आणि समीर एका बाजूला बसून ड्रिंकचा आस्वाद घेत होते. प्रत्येक घोटासरशी मिहीरच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. पहिल्यांदा प्रीतीला भेटला तेव्हा तिचा पाचवा वाढदिवस! साधाच पण सुंदर फ्रॉक त्यातही किती गोड दिसत होती. गोबरे गाल, निळे डोळे.. किती सालस रूप होते तिचे!


"मामाश्री मला जे आठवतेय तेच तुम्हालाही आठवत आहे का?" आपल्या खास अंदाजात समीरने त्याला विचारले. तसा तो हसला.


"तुला काय आठवत आहे?" मिहीर.


"ती गोबरी गोबरी निळ्या डोळ्यांची छोटीशी परी!" समीर.

"तेव्हा तूही छोटाच होतास की." त्याच्याकडे बघून मिहीर.

"तिच्यापेक्षा वर्षभराने मोठा आहे मी." तो.

"म्हणून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतली होतीस का?"

"काही दिवस! नंतर तर ती स्वतःच ट्रेन झाली." तो हसला.


"आत्ताही तुला तेवढीच आवडते जेवढी लहानपणी आवडायची?" मिहीरने खडा टाकला.


"मामाश्री, आमच्यात केवळ मैत्री आहे. दुसरे काही नाही." दुरूनच प्रीतीकडे नजर टाकून त्याने घोट घेतला. ती त्यांच्याकडेच येत होती. त्यांची चर्चा तिथेच थांबली.


"फायनली आटोपलं सगळं. डिनर करूयात?" त्यांच्याजवळ येऊन बसत ती म्हणाली. तोपर्यंत राधामावशी आणि सोनिया देखील त्यांच्यात सहभागी झाल्या.
दहा वाजत आले होते. एकमेकांचा निरोप घेऊन सर्व निघाले.


"माई मला बोलायचेय तुझ्याशी." मनात असलेली खदखद आता बाहेर येत होती.

"घरी जाऊन बोलूया?" आपली निळी नजर तिच्यावर टाकत सोनिया म्हणाली.


"माई, इट इज नॉट फेअर! तू नेहमी तुझ्याच मनाचे करत असतेस." प्रीती लहान मुलीसारखी रुसून म्हणाली.


"तू अशी लहान असल्यासारखी वागतेस, मग मलाच मोठे बनायला नको का?" सोनिया गोड हसली. तिची मोत्यासारखी शुभ्र दंतपंक्ती उठून दिसत होती.


"राधाई, बघ ना, माई अजिबात माझे ऐकत नाही. पार्टीमध्ये सगळ्यांसमोर मला न विचारता आपला निर्णय सांगून टाकला. मला साधं विचारावं असेही तिला वाटले नाही आणि तू सुद्धा त्यात सामील होतीस. तुलाही माझा विचार आला नाही का गं?" कारमधून उतरून तणतणत आत येत प्रीती म्हणाली.



"आजपर्यंत तिने कधी चुकीचा निर्णय घेतलाय का?" प्रीतीच्या हातात पाण्याचा ग्लास देत राधामावशीने विचारले.


"नाही गं. तरीसुद्धा वाटतं ना की मला काही विचारावं." ती.


"माझा निर्णय तुला का आवडला नाही याचे मला पटण्यासारखे एक तरी कारण देऊ शकशील का?" सोनिया तिच्या समोर बसत म्हणाली.
"तुला आपल्या बिझनेस मध्ये यायचं नव्हतं का?"


"तसं नाही गं माई, पण मी अजून लहान आहे ना?" प्रीती.


"पंचेवीस पूर्ण झालेत तरी लहानच आहेस का? एमबीए ची डिग्री झाली. बाहेर छोटे मोठे यशस्वी जॉब करून झालेत. अनुभव गाठीशी बांधल्या गेला आणि तरीही लहान आहेस असेच तुला वाटते? तुझ्या वयाची असताना मी आपल्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली होती. मग तू कशी लहान गं?" तिच्याकडे बघत सोनिया विचारत होती.


"तू शेवटी बोललीस तेच तर खरे कारण आहे माई. तुझ्याशी माझी बरोबरी होऊच शकत नाही. मला भीती वाटते. तू निर्माण केलेलं साम्राज्य पेलवण्याची ताकद माझ्यात नाहीए अगं." डोळ्यात पाणी आणून प्रीती बोलत होती.


"वेडाबाई!" सोनिया खळाळून हसली. "तर मघापासून तुला हे बोलायचं होतं होय? त्यासाठी केवढा हा आटापिटा?"


"माई हसू नकोस अगं. खरंच तुझ्यापुढे मी काहीच नाहीए. माझी तितकी क्षमता नाहीए गं." प्रीतीच्या डोळ्यात अजूनही पाणी होते.


"प्रीत, तुझ्यातील क्षमता माहितीय मला. लहान असतानासुद्धा मी तुला अभ्यासाचे कधी दडपण दिले नव्हते, तू स्वतःच स्वतःच्या हुशारीने वरची पायरी चढत गेलीस. तुझा पहिला नंबर कधीच सोडला नाहीस. एमबीए ची गोल्ड मेडलिस्ट आहेस तू. आजवर जिथे नोकरी केलीस, ती प्रत्येक कंपनी तुझ्यामुळे पुढे गेलीय. एवढी हुशार आणि कॅपेबल मुलगी मी कशी सोडू शकेन ना? तुझ्यात आकाशात उंच झेप घ्यायची वृत्ती आहे. तेवढं कॅलिबर आहे आहे तुझ्यात. तुझ्या येण्याने आपली कंपनी खूप पुढे जाईल अगं." तिचे हात हातात घेऊन सोनिया बोलत होती.


"एवढा विश्वास माई तुझा माझ्यावर?" सोनियाकडे प्रीती टक लावून बघत म्हणाली.


"हो, तुझ्यावर विश्वास तर आहे. त्याहून जास्त विश्वास स्वतःवर आहे. माणसं ओळखायला सोनिया कधी चुकत नसते." तिला मिठीत घेत सोनिया म्हणाली.


"ओह माई, थँक यू सो मच! तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही यासाठी मी कायम वचनबद्ध राहीन. लव्ह यू सोऽऽ मच!" तिच्या मिठीत स्वतःला आणखी घट्ट केले.


"सगळे प्रश्न सुटलेत ना?" सोनिया.

"हूं." प्रीतीचा लाडीक सुर.

" मग मिठीतून बाहेर ये." आपले हात सोनियाने सैल केले.


"ऊहूं! आज माझा वाढदिवस आहे. छोट्या बाळासारखं तुझ्या मिठीत मला अशीच राहू दे." लाडात येत प्रीती म्हणाली.


"प्रीत, लहान आहेस का आता? चल सोड बघू मला." सोनिया.


"कशी गं माई तू? जगातील सगळ्या आयांना आपली मुलं कितीही मोठी झाली तरी लहानच वाटतात आणि तू एक जगावेगळी, तुला मी मोठीच वाटते."आपल्या हाताचा विळखा आणखी घट्ट करत ती म्हणाली.


"पण माई, जेव्हा तू प्रीत म्हणतेस ना तेव्हा मला मी तुझी पिटुकली प्रीती आहे असं वाटतं. तुझा सगळा व्याप सोडून माझ्या पाठीशी भरभक्कमपणे तू उभी आहेस असे वाटते. माई मला सोडून तू कुठेच जाणार नाहीस ना गं?"
दोघींच्या डोळ्यातील निळा समुद्र काठोकाठ भरला होता.



"हे असे इमोशनल व्हायला मला जमत नाही. माहितीए ना तुला?" स्वतःला सावरत सोनिया तिच्या हातांच्या विळख्यातून बाहेर आली.


"हो, माहितीय. पण एखाद्यावेळेस तुझ्या डोळ्यात हेलकावणाऱ्या समुद्राला बाहेर येऊ दिलेस तर काही बिघडणार नाहीए." प्रीती.
"बरं, ते सोड. तुझ्यासाठी आत काहीतरी खास सरप्राईज आहे, ते बघायला चल."तिला आत नेत प्रीती.


"माझ्यासाठी सरप्राईज?" सोनिया आश्चर्याने म्हणाली.


"हो! एक सरप्राईज तू दिलेस. आता माझी टर्न. डोळे मिट बघू." तिच्या डोळ्यावर पट्टी बांधत प्रीती.

"अगं पण.." सोनिया.


"माई आज माझा वाढदिवस तसाच तुझाही आहेच की. मला तू नव्या जगात आणलेस त्या बरोबरच आईपणाच्या नव्या भूमिकेत तू गेलीस. एक आई म्हणून तुझा आज वाढदिवस! त्यासाठी हे स्पेशल गिफ्ट!"
सोनियाच्या डोळ्यावरील पट्टी सोडत ती हळुवार बोलत होती.

सोनियाने हलकेच डोळे उघडले, समोर जे होते ते बघून ती स्तब्ध झाली.

.
.
क्रमश:
*******

काय होते सोनियाचे सरप्राईज? वाचा पुढील भागात. तोवर हा भाग कसा वाटला ते कळवा.

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********


🎭 Series Post

View all